Advertisement
आधुनिक मुंबईचे शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ
कथा उद्योजकांच्या

आधुनिक मुंबईचे शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

महाराष्ट्राचा भौगोलिक तसेच सामाजिक अविभाज्य घटक असलेली आपली मुंबई ही ब्रिटिशांनी व्यापार तसेच लष्कर या दोन बाबी डोळ्यासमोर ठेवून उभी केली. मुंबईच्या या जडणघडणीत ब्रिटिश नेत्यांइतकाच भारतीय पुढारकांचाही समान वाटा आहे. भारताची आर्थिक शान असलेली ही मुंबई भारतातील एका सर्वोत्तम नेत्याच्या हाताखाली उभी राहू लागली. हा नेता म्हणजेच जगन्नाथ शंकरशेठ.

जगन्नाथ शंकरशेठ हे सामान्यतः नाना म्हणून ओळखले जात. इ. स. १८०० मध्ये नाना गिरगावमधील एका आलिशान बंगल्यात राहत होते. हा बंगला म्हणजे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे घर. शंकरशेठ परिवार हा त्या काळच्या काही श्रीमंतांपैकी घरात सांस्कृतिक वातावरण असलेला एक श्रीमंत परिवार होता.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

आज महाराष्ट्रात जगन्नाथ शंकरशेठ हे फक्त नाना संस्कृत शिष्यवृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत. १८८६ पासून अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी झाले आहेत. ही शिष्यवृत्ती नक्कीच नानांचा महाराष्ट्राला दिलेला एक अनमोल ठेवा आहे, परंतु दुर्दैवाने नानांची इतर बरीच कामे आज विरत चालली आहेत. अनेकविध भाषा अवगत असलेले नाना त्यांच्या इंग्रजी भाषेतील वक्तृत्व कलेमुळे ब्रिटिशांत लोकप्रिय होते. कला, शिक्षण, आरोग्य, दळणवळण अशा अनेकविध क्षेत्रांत नानांनी त्यांच्या कारकीर्दीत मोलाचे बदल घडवून आणले.

नाना सतत काही ना काही शिकत असायचे. त्यांना ज्ञानाची महत्त्वाची जाणीव होती. त्यांनी किती तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केले. १८१९ मध्ये माऊनस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. आज काळा घोडा येथे जे एल्फिन्स्टन कॉलेज आहे तेसुद्धा माऊनस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्याच स्मरणार्थ बांधले आहे. नानांप्रमाणेच एल्फिन्स्टनसुद्धा ज्ञानप्रेमी होते. शिक्षण घेण्यासाठी एल्फिन्स्टनसुद्धा अनेक गरजूंना मदत करत.

जेव्हा एल्फिन्स्टन यांना समजले की, शंकरशेठ म्हणजेच नानासुद्धा या बाबतीत समाजसेवा करत आहेत तेव्हा त्यांनी लगेच नानांची भेट घेऊन पुढील कार्य एकत्र करण्याचे ठरवले. यापुढे त्या दोघांनी मुंबईचे ‘हिंदशाळा पुस्तक मंडळ’ स्थापन केले. यात बारा ब्रिटिश आणि बारा भारतीय असे चोवीस सदस्य होते. आजची मुंबईतील शिक्षणाची प्रगती ही नाना आणि एल्फिन्स्टन यांच्यापासूनच सुरू झाली, असे म्हणता येईल.

मुलींच्या शिक्षणासाठीसुद्धा नानांनी दादाभाई नौरोजी यांच्या मदतीने संपूर्ण मुंबईत आठ मुलींच्या शाळा सुरू केल्या ज्या काळी मुलींचे शिक्षण हे फार दुर्मीळ झाले होते. त्यातली एक शाळा तर नानांच्या राहत्या बंगल्यात सुरू झाली. १८३५ पासून पुढे रॉबर्ट ग्रँट हे मुंबईचे गव्हर्नर होते. हेसुद्धा समाजकार्य करण्यात तत्पर होते. त्यांच्या १८३८ मधील दुर्दैवी मृत्यूनंतर नानांच्या पुढाकाराने ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले जे आजही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत करत आहे. हे मुंबईतले पहिले तर भारतातले तिसरे मेडिकल कॉलेज आहे. त्या काळी मुंबईत उच्च शिक्षणाच्या संधी फारच कमी होत्या. हे लक्षात येताच नानांनी लंडन युनिव्हर्सिटीला पाया मानून मुंबई विद्यापीठाची कल्पना मांडली आणि ती ब्रिटिशांनीसुद्धा मान्य केली.

नुसतेच शैक्षणिक क्षेत्रात नाही तर न्यायासारख्या किचकट क्षेत्रातसुद्धा नानांची कामगिरी मोलाची आहे. त्या काळी न्यायालयात ज्युरी पद्धत होती. त्यात सुरुवातीला फक्त युरोपीयन लोकच ज्युरी म्हणून असायचे. युरोपीअन ज्युरी प्रत्येक बाबतीत भारतीयांनाच दोषी ठरवून त्यांना अत्यंत कडक अशा शिक्षा देत असत. नानांना हे जाणवताच त्यांनी त्यांच्या ओळखीने ज्युरी पॅनेलमध्ये भारतीयांना स्थान मिळवून दिले.

हळूहळू नानांच्या या समाजकामाची ख्याती जगभरात पोहोचू लागली. व्यवसायात तर ते प्रगती करतच होते आणि त्याचसोबत अनेक क्षेत्रांत भारतीयांना त्यांच्या हक्काचे स्थान प्राप्त करून देत होते.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस हे त्याच्या सुंदर बांधकामासाठी तर प्रसिद्ध आहेच, शिवाय मुंबईतील लाइफलाइन म्हणजेच रेल्वेचे माहेरघर आहे. नाना हे या भारतीय रेल्वेचे पहिले संचालक होते. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे धावली. या ऐतिहासिक प्रसंगात मुंबईच्या गव्हर्नरसोबत नाना आणि जीजीभॉय पहिल्या रेल्वेत बसले होते. नाना निसर्गप्रेमीसुद्धा होते. शेती क्षेत्र हेच भारताला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देईल, असे नानांचे विचार होते.

आपल्या इतर देशांतील मित्रांकडून नानांनी अनेक प्रजातींची झाडे आणून ती स्वतः मुंबईत लावली होती. आजचे वीरमाता जिजाबाई उद्यान म्हणजेच तेव्हाचे व्हिक्टोरिया गार्डन आणि प्रिंस अल्बर्ट संग्रहालयाच्या बांधकामात नानांचा मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे ग्रँट रोडचे बादशाही सिनेमागृह, भवानी शंकर मंदिर अशी अनेक बांधकामे नानांनी घडवून आणली. मुंबई असोसिएशनची स्थापनासुद्धा नानांनीच केली, तर ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सदस्यसुद्धा होते.

मुंबईचा प्रत्येक कानाकोपरा हा नानांच्या समाजकामाचा जणू साक्षीदारच झाला होता, परंतु दुर्दैवाने यापुढे काही काळातच नाना म्हणजेच जगन्नाथ शंकरशेठ स्वर्गवासी झाले.

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्त सा
अग्निचा पेरून जातो रात्रगर्भि वारसा

या ओळींप्रमाणेच नानांच्या मृत्यूनंतरही आज एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, मुलींच्या शाळा, वीरमाता जिजाबाई उद्यान, प्रिंस अल्बर्ट संग्रहालय तसेच मुंबईतली रेल्वे या रूपांतून नाना आजही आपल्या सर्वांत जिवंत आहेत.

– जयेश मेस्त्री


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!