एका मसालेदार, चविष्ट औद्योगिक वटवृक्षाची कहाणी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मराठी माणसांमध्ये उद्योजकतेची वृत्ती कमी असल्याने उद्योग घराण्यांची फारशी मोठी परंपरा महाराष्ट्राला नाही. परप्रांतीयांमध्ये पिढ्यान पिढ्या व्यवसाय करणार्‍या घराण्यांची अनेक नावे सांगता येतात; पण मराठी माणसांमध्ये तशी नावे सहजतेने आणि विपुल प्रमाणात सापडत नाहीत. महाराष्ट्रातले बरेचसे उद्योजक हे फर्स्ट जनरेशन एन्टरप्रेन्युअर्स असतात.

मात्र याच महाराष्ट्रात पश्चिम समुद्र किनारपट्टीवर पालघरजवळच्या एडवण येथे एक औद्योगिक घराणे नांदते. शतकभराची औद्योगिक परंपरा असलेल्या या कुटुंबाने गेल्या तीन पिढ्या औद्योगिक वारसा जपला आहे. इतकेच नव्हे तर त्याचा विस्तार करून त्याला अनेक उद्योगांचे आयाम जोडून तो समृद्ध केला आहे.

या घराण्याचे नाव आहे एडवण येथील चौधरी कुटुंब. या घराण्यातील एक वारसदार आहेत अरविंद सखाराम चौधरी म्हणजे आजच्या ‘लक्ष्मी मसाले’ आणि ‘आदर्श अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज’चे प्रवर्तक. चौधरी घराण्याच्या औद्योगिक वटवृक्षाची बीजे रोवली त्यांचे वडील सखाराम रामचंद्र चौधरी यांनी. त्यांच्या सहा अपत्यांपैकी अरविंद हे तिसर्‍या क्रमांकाचे. सखाराम चौधरी यांनी आपल्या सर्व मुलांना आधी उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले आणि त्यानंतर निरनिराळे उद्योगधंदे काढून दिले.

या सर्व मुलांनी आपल्या वडिलांचा उद्योजकतेचा वारसा जपला आणि वाढवला. आज चौधरी कुटुंंबीय सॉ मिल, राइस मिलपासून मसाले उत्पादनापासून इम्पोर्ट-एक्सपोर्टपर्यंत निरनिराळ्या व्यवसायांत उत्तम कामगिरी बजावत आहेत.

या घराण्याची एक शाखा म्हणजे अरविंद सखाराम चौधरी यांचा उद्योगसमूह. अरविंद चौधरी यांचा जन्म दि. २३ जून १९५६ रोजी एडवण येथे झाला. वडिलांच्या सूचनेनुसार त्यांनी पुण्याच्या वाडिया कॉलेजातून बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर दोन वर्षे बँकेत नोकरीही केली.

तेव्हा वडील सखाराम चौधरी एडवण येथे एक आदर्श भातगिरणी नावाची राइस मिल चालवीत असत. बँक नोकरीचा पुरेसा व्यावहारिक अनुभव गाठीशी बांधून जेव्हा अरविंद चौधरी आपल्या गावी परत आले तेव्हा वडील सखाराम यांनी राइस मिलची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

तांदळाची भरडाई करण्याबरोबरच ते तांदळाचा व्यापारही करीत असत. त्या वेळी त्यांचे धाकटे बंधू म्हणजे मधुसूदन हेही अरविंद यांची मदत करीत. भातभरडीसाठी एडवणच्या परिसरातील भिन्न जातीजमातींचे लोक येथे आपल्या भातपिकाची भरडाई करण्यासाठी येत.

या लोकांची वर्दळ आदर्श भातगिरणीत सतत चालू असे, त्यामुळे चौधरी कुटुंबाचा जनसंपर्क फार मोठा होता. अरविंद चौधरी यांनी भातगिरणीबरोबरच एक पिठाची गिरणी आणि नंतर मसाला कांडप मशीनही चालू केली.

प्रत्येक कुटुंबास जेवणात मसाला लागतोच. एडवण परिसरातील लोकही त्यास अपवाद नव्हते. चौधरी कुटुंबाची मसाले दळण्याची गिरणी होती. एडवण परिसरात वाडवण, भंडारी, आगरी, कोळी वगैरे निरनिराळ्या समाजांतील लोक राहतात. प्रत्येक समाजाची मसाले बनवण्याची पद्धती किंवा त्यातील घटक पदार्थांचे प्रमाण वेगवेगळे असायचे.

आजही आपण पाहतो की, मालवणी मसाला आणि गोडा मसाला यांचे प्रमाण वेगवेगळे असतेच. हे प्रमाण घरातील पूर्वापार परंपरा, त्या-त्या समाजाची तिखट खाण्याची पद्धती यानुसार ठरलेले असते.

एडवण परिसरातील निरनिराळ्या समाजांतील लोक त्यांच्या पूर्वापार पद्धतींप्रमाणे मसाल्यातील कच्चे पदार्थ मारवाडी वा दुकानदारांकडून विकत घेत व फक्‍त दळण्यासाठी अरविंद चौधरी यांच्या मसाला गिरणीत येत. तेव्हा अरविंद चौधरी यांच्या लक्षात आले की, मसाल्यांचे उत्पादन हा एक व्यवसाय होऊ शकतो. त्यांनी अनेक प्रयोग करून निरनिराळ्या प्रकारच्या मसाल्यांतील घटक द्रव्यांचे प्रमाण निश्चित केले.

दरम्यान त्यांचे धाकटे बंधू मधुसूदन यांनी मसालेनिर्मितीसंबंधी विविध कोर्सेसही केले. चौधरी बंधूंनी नंतर मसाल उत्पादनाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी मिर्ची पावडर, शुद्ध हळद, वाडवळ मसाला, गरम मसाला आदी काही नियमित लागणारे मसाले बनवले व आपल्या गिरणीत विक्रीसाठी ठेवले.

चौधरी यांची गिरणी तांदूळ खरेदीचेही केंद्र असल्याने तिथे लोकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असे. तिथे येणार्‍या काही सेल्समन्समार्फत त्यांनी हे मसाले इतरत्र विक्रीला पाठवले. मात्र तरीही पूर्वापार चालत आलेली चौकट लगेच भेदणे अवघड होते. त्यामुळे या व्यवसायात त्यांचा जम बसायला काही काळ जावा लागला. त्या दरम्यान काही कालावधीनंतर धाकटे मधुसूदन यांनी अन्य व्यवसाय सुरू केला व ते परगावी गेले.

मात्र हळूहळू चौधरी यांचे मसाले परिसरात प्रसिद्ध होऊ लागले. या कामी अरविंद यांच्या पत्नी अस्मिता यांचाही मोठा वाटा होता. पुढे लक्ष्मी मसाले या नावाने हे मसाले नावारूपाला आले. एडवण व आजूबाजूचा परिसर हा समुद्रकिनार्‍याचा भाग असल्याने येथे आजूबाजूला अनेक पर्यटनस्थळे आहेत. मुंबई व परिसरातून तिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. केळवा बीच येथून जवळच आहे.

किनारपट्टीवरील बहुतेक हॉटेलांत चौधरी यांचेच मसाले वापरले जात. पर्यटक त्या मसाल्यांचा वापर करून बनवलेल्या जेवणाने तृप्‍त होत व हॉटेलवाल्यांना हा मसाला कोणता, असे विचारीत. हॉटेलमालक मग एडवणच्या लक्ष्मी मसाल्यांचे नाव सांगत. या मसाल्यांच्या आकर्षणाने पुढे पर्यटक एडवणला येऊन घाऊक प्रमाणात आपल्याला लागणारे मसाले खरेदी करू लागले.

पुढे अरविंद व अस्मिता चौधरी या दाम्पत्याने अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून व उत्पादनप्रक्रियेचे स्टँडर्डायझेशन करून या व्यवसायाला आधुनिक स्वरूप दिले. यातूनच लक्ष्मी मसाले अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचा आजचा वटवृक्ष उभा राहिला. यासोबत चौधरी कुटुंबाचे पूर्वीचे व्यवसायही चालूच आहेत.

ग्राहकांना उत्तम प्रतीचे आणि विश्वासार्ह मसाले पुरवायचे हे ध्येय ठेवून अरविंद व अस्मिता चौधरी यांनी पुढे मसाला उत्पादनात विविध प्रयोग केले. प्रयोग आणि ग्राहकांची मागणी यानुसार चौधरी कुटुंबाचा मसाला व्यवसाय वाढतच गेला.

निरनिराळे प्रयोग करून त्यांनी मसाला संवर्गातील अनेकविध प्रकार विकसित केले व ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले. त्यांची नुसती जंत्री द्यायची म्हटली तरी ते एका छोट्या लेखात मावणे शक्य नाही. काळाच्या ओघात त्यांच्या उत्पादनांची संख्या वाढतच चालली आहे.

‘लक्ष्मी मसाले’ स्पेशल वाडवली मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्यातर्फे जनता मिक्स, स्पेशल मिक्स, स्पेशल गरम, पुलाव बिर्याणी, गोडा मसाला, मालवणी मसाला, स्पेशल चहा मसाला, केशरी दूध मसाला, लोणच्याचा तयार मसाला, सांबार मसाला, पावभाजी मसाला, मटण चिकन मसाला, खिमा मसाला, मच्छी मसाला, चिंबोरी मसाला, तंदुरी चिकन, तयार पाटण मसाला, पंजाबी छोले मसाला, घाटी मसाला, स्पेशल संडे मसाला, चाट मसाला, पाणीपुरी मसाला यांसारखे निरनिराळे मसाले बनवले जातात.

त्यांच्याकडे मिरची, हळद, राई, धणे, काळी मिरी, लवंग, तीळ, हिंग, बडीशेप, सुंठ हे नेहमीचे मसाले शुद्ध स्वरूपात मिळतात. शाही मसाल्यांमध्ये त्यांच्याकडे हिरवी वेलची, मसाला वेलची, नागकेशर, त्रिफळा, दगडफूल, कबाबचिनी, जायपत्री, रामपत्री, जायफळ, शहाजिरे, तमालपत्र आणि खसखस हे प्रकार मिळतात.

त्याचप्रमाणे शहरी गृहिणींच्या सोयीसाठी उकडीच्या तांदळाचे तयार पीठ, राता तांदूळ पीठ, चकली भाजणी पीठ, अनारसे पीठ, वड्याचे पीठ, डायबिटीज आटा, थालीपिठाचे पीठ, मल्टी ग्रेन पीठ आदी तयार पिठे मिळतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे धणा, जिरा, काळेमीरे, मेथी, वेलची, लसूण, कांदा, दालचिनी, सुंठ, राई, जायफळ, लवंग, खोबरे, काजू, आमचूर यांच्या शुद्ध पावडरीही उपलब्ध आहेत. हळद आणि मिरची पावडरींमध्ये निरनिराळे प्रकार त्यांच्याकडे मिळतात.

तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यांचा तयार मसाले, विविध प्रकारच्या चटण्या-पापड-सरबते तसेच विविध प्रकारच्या मसाल्यांचे अर्क असलेले व्हिनेगर्स, मसाला अर्क तेले, विविध प्रकारच्या शेवया, सॉसेस, सुक्या मेव्याचे पदार्थ फूड कलर्स, सायट्रिक अ‍ॅसिड, खायचा सोडा, उटणे, लग्‍नाची चंदनमिश्रित हळद व अक्षताही मिळतात. गेल्या १५ वर्षांपासून ते एका आयुर्वेदिक सुगंधित उटण्यांचे वितरक आहेत.

आता चौधरी कुटुंबाची तिसरी पिढी व्यवसायाच्या संचालनात मोलाची भूमिका निभावत आहे. अरविंद व अस्मिता चौधरी यांच्या दोन कन्या आत्ताच्या सौ. स्नेहा अभिषेक इंदुलकर आणि सुप्रिया रोहित सावे या दोघींनीही एमबीएची पदवी संपादन केलेली आहे.

या दोघींनी घराण्याच्या परंपरेनुसार उच्च शिक्षण संपादन करून आता व्यवसायाकडे लक्ष पुरवले आहे. सुप्रिया ही आयटी इंजिनीअर असून ती कंपनीच्या टेक्निकल बाजू बघते, तर स्नेहा चौधरी-इंदुलकर यांनी मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केले आहे.

या भगिनींनी themasalabazzar.com ‘द मसाला बाजार’ डॉट कॉम नावाचे एक संकेतस्थळ विकसित केले आहे. बदलत्या काळानुसार आता या कंपनीच्या काऊंटर सेल्सव्यतिरिक्‍त कंपनीच्या मालाची वेबसाइटवरूनही विक्री होते. लक्ष्मी मसाल्यांचे काही ग्राहक पिढ्यान्पिढ्या येथूनच मसाले खरेदी करणारे आहेत. त्यातील काही परदेशात स्थायिक झाले आहेत.

त्यांना तसेच परगावच्या ग्राहकांना वेबसाइटवर मागणी नोंदविता येते. तसेच त्यांना कुरिअर व पार्सलने माल पाठवला जातो. त्याचप्रमाणे उत्पादनांच्या प्रचारासाठी फेसबुक मार्केटिंग तंत्राचाही प्रभावी वापर केला जातो. लक्ष्मी मसालेच्या या सर्व वाटचालीत त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांना फार चांगला समर्पित, निष्ठावान कर्मचारीवृंद मिळाला आहे.

लक्ष्मी मसाले कारखान्याजवळ त्यांनी परिवारातर्फे साई मंदिरही बांधले आहे. दरवर्षी १९ डिसेंबरला येथे मोठा उत्सव आणि चौधरी कुटुंबाचे वार्षिक स्नेहसंमेलनही होते. शक्य होईल तेव्हा या उद्योगसमूहाला लागणारे पॅकिंग मटेरिअल अंध, अपंग यांच्यातर्फे खरेदी केले जाते.

लक्ष्मी मसालेतर्फे उद्योगी महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून लक्ष्मी मसाले उद्योग समूहामार्फत महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिर घेतले जाते. यात मान्यवर वक्त्यांना बोलावून त्यांच्याकडून महिलांना उद्योग उभारणी, कर्जप्राप्‍ती, मशीनरी घेणे वगैरेंबाबत मार्गदर्शन केले जाते. इतकेच नव्हे तर महिला उद्योजिकांनी बनवलेल्या वस्तूंचे पाच वर्षे दरवर्षी एक विक्री प्रदर्शन विरार येथे ८ मार्च महिला दिनानिमित्त भरवले जाते.

यात सहभाग घेण्यासाठी महिला उद्योजिकांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. या मेळाव्याचा सर्व खर्च लक्ष्मी मसालेतर्फे केला जातो. ह्या वर्षी डिसेंबर २०१९ मध्ये एडवण येथे असा छोटेखानी महिला मेळावा घ्यायचे प्रयोजन आहे.

या वटवृक्षाचे मूळ पुरुष अरविंद सखाराम चौधरी यांना परदेशभ्रमणाचा व दुर्मीळ, पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याचा मोठा छंद आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारची दुर्मीळ नाणी आणि चलनी नोटा यांचा मोठा संग्रह आहे. अरविंद चौधरी यांचे इतर सर्व बंधूही निरनिराळ्या व्यवसायांत आहेत. ते व त्यांची मुले आपापले व्यवसाय जोमाने चालवीत आहेत. अरविंद व अस्मिता यांच्या दोन कन्या स्नेहा इंदुलकर आणि सुप्रिया सावे यांनी लक्ष्मी मसालेची धुरा समर्थपणे पेलली आहे.

चौधरी कुटुंबाची एकूणच तिसरी पिढी आता या औद्योगिक साम्राज्याला आधुनिक रूप देण्यात मग्‍न आहे. या सर्व कुटुंबीयांचे आपापसात अतिशय प्रेमाचे व अगत्याचे संबंध आहेत. आजोबा सखाराम चौधरी यांनी जो पाया रचला त्यावर आत्ताची पिढी कळस चढवीत आहे. या कुटुंबाची यशोगाथा तो़ंडाला पाणी सुटायला लावणारी स्वादपूर्ण आहे, चवदार आहे, सुवासिक आहे, रंगदार आहे, ढंगदार आहे आणि मसालेदारही आहे.

संपर्क – स्नेहा इंदुलकर – ९८९००४३६७५

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?