कृषीउद्योग

कृषीउद्योग : केळीच्या खोडापासून धागानिर्मिती

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


महाराष्ट्रात अंदाजे ७२,००० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळी घड काढल्यानंतर केळी खोड निरुपयोगी म्हणून बाहेर फेकले जाते आणि जाळले जाते. काही शेतकरी थोड्या प्रमाणात त्याचा उपयोग कंपोस्ट खत करण्यासाठी करतात.

केळीची खोडे फेकून दिल्यानंतर होणारे नुकसान :

  • केळीचे घड काढल्यानंतर मळा स्वच्छ करण्यासाठी लागणारी अनुत्पादक मजुरी.
  • टाकलेले ढीग वर्षभरात कुजू न शकल्याने जाळणे. यामुळे ऊर्जेचा र्‍हास, पर्यावरण प्रदूषण.
  • ढीग असणार्‍या जागेचा भाग आगीमुळे तापल्याने जमिनीच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम.
  • केळीचे खोड लवकर कुजत नसल्यामुळे आंतरमशागतीसाठी अडचणी येतात.
  • शेतातच ढीग असल्याने अस्वच्छता, त्यामुळे पिकांवर रोगजंतू किंवा तत्सम बाबींचा अधिक प्रादुर्भाव.

केळीच्या खोडापासून धागेनिर्मिती यंत्र व कार्यपद्धती :

केळीच्या खोडापासून उत्कृष्ट प्रतीचा धागा काढण्यासाठी लाल केळी, नेंद्रन, रस्थाली ह्या जातींचा वापर करतात. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या अर्धापुरी, ग्रॅन्ड नैन, श्रीमंती, महालक्ष्मी ह्या जातींपासूनही चांगल्या प्रतीचा धागा काढता येतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

धागा काढण्यासाठी फक्त खोडाचाच वापर करता येतो असे नाही, तर घडाच्या दांड्याचा तसेच पानाच्या शिरेचाही करता येता; परंतु आर्थिकदृष्ट्य किफायतशीर धागा फक्त खोडापासून बनू शकतो.

धागा काढण्यासाठी खोडाचा वापर झाड कापल्यापासून चोवीस तासांच्या आत करावा. धागा काढणीसाठी तीन माणसांची गरज असते. एक माणूस खोड उभे चिरून त्याचे चार तुकडे करतो. त्यासाठी केळीचे खोड कापणी यंत्र तयार केले आहे.

यात दोन फूट लांब, तीन इंच रुंदीच्या दोन धारदार पट्ट्या क्रॉसमध्ये जोडून त्यावर चारही बाजूस हॅण्डल लावून खोडावर ठेवून दाबल्याने खोडाचे चार भागांत सहजरितीने ते कापले जाते. नंतर खोडाच्या एक मीटर पट्ट्या सुट्या कराव्यात.

दुसरी व्यक्ती प्रत्यक्ष यंत्रावर धागा काढणीचे काम करते. या यंत्रात दोन रिजिड पाइप बसवलेले असून, गायडिंग रोलर असतात. या रोलरमुळे केळी खोड आत सरकते. खोडाच्या आकारमानानुसार दोन रिजिड पाइपमधील अंतर कमी-जास्त करता येते.

रोलर फिरविण्यासाठी बेल्ट पुली यंत्रणा बसवलेली असते. यासाठी एक एचपी क्षमतेची सिंगल फेज विद्युत मोटर पुरेशी होते. यंत्राच्या दुसर्‍या बाजूने निघालेले धागे पिळून त्यातील पाणी बाहेर काढले जाते. धागे तारांवर एक दिवस वाळवतात. कोरड्या धाग्यांमध्ये विशिष्ट प्रकारची फणी फिरवून ते एकमेकांपासून वेगळे करतात.

तिसरी व्यक्ती काढलेला धागा पिळण्याची प्रक्रिया करून धागा दोरीवर वाळत घालते. तसेच प्रक्रियेदरम्यान निघालेले पाणी व लगदा वेगळे करते. दोन स्त्री मजुरांचा वापर साहाय्यक म्हणून होतो. सुकवलेला धागा मोठ्या दाताच्या फणीने विंचरून घेतल्यास धाग्याची प्रत चांगली मिळते.

कुशल कारागिराद्वारे आठ तासांमध्ये २० ते २५ किलो धागा मिळू शकतो. केळी खोडापासून काढलेला धागा एकूण ३ (पहिली, दुसरी व तिसरी) प्रतीत विभागला जातो. यंत्रामधून काढलेले सूत सहसा तिसर्‍या प्रतवारीचे असते. त्याला विंचरून घेतल्यास ते दुसर्‍या प्रतीपर्यंत जाऊ शकते.

त्यानंतर लाकडी पाटीने त्यास पॉलिश करून पांढरे शुभ्र झाल्यास पहिल्या प्रतीपर्यंत जाऊ शकते. केळीच्या खोडापासून धागा काढण्याची मशीन ही सिंगल फेज आणि एक ते दीड हॉर्सपॉवर मोटरवर चालणारी आहे. ही मशीन हाताळायला अतिशय सोपी असते, त्यासाठी विशेष कौशल्याची गरज नाही.

मशीनद्वारे सुरुवातीस दिवसाला आठ ते दहा किलो धागा निघतो. अनुभवाअंती १५ ते २० किलो धागा प्रति दिनी निघतो. या यंत्राची किंमत अश्वशक्तीनुसार ७० हजार ते १ लाख ७५ हजार रुपये अशी असते.

धाग्याचा दर :

  • पांढरा शुभ्र धागा – १०० ते १२० प्रतिकिलो
  • सिल्व्हर शाइन धागा – ८० ते १०० प्रतिकिलो
  • पिग्मेंटयुक्त धागा – ८० ते ८५ प्रतिकिलो

धाग्याची उपयुक्तता :

  • धाग्यापासून बारीक दोरी, दोरखंड, पिशव्या, पायपुसणी, चटई, आकर्षक टोप्या, कापड, साड्या, शोभेच्या वस्तू, क्राफ्ट पेपर, टिश्यू पेपर, फिल्टर पेपर, पृष्ठ, फाइलसाठी जाड कागद, सुटकेस, डिनरसेट, बुटांचे सोल, चप्पल इत्यादी वस्तू बनविता येतात.
  • या तयार होणार्‍या धाग्यात दीर्घकाळ टिकाऊ क्षमता आहे. त्यापासून उत्तम दर्जाचे कापड, तसेच दोरी, दोरखंड, शोभेच्या वस्तू, पिशवी, पायपोस, हातकागद इत्यादी निर्मिती शक्य होते.

केळी खोडापासून धागानिर्मितीचे फायदे :

  • केळी बागेतील न कुजणारे अवशेष जाळले जातात. त्यामुळे पर्यावरणाच्या र्‍हासासोबतच जमिनीतील उपयुक्त जिवाणूही नष्ट होतात. त्याचा फटका उत्पादकतेला बसतो.
  • बागेच्या स्वच्छतेसाठी लागणारी अनुत्पादक मजुरी वाचते.
  • दुष्काळामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे घडनिर्मिती न झाल्यास उर्वरित उभ्या खोडापासून काही प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो.
  • बेरोजगार युवकांना त्यांच्या गावातच स्वयंरोजगार मिळेल.
  • केळी खोड/कच्चा माल गावातच उपलब्ध असल्याने टंचाई आणि वाहतूक खर्च या समस्या नाहीत. शेतकर्‍याने स्वत:च केळी धागा काढल्यास हेक्टरी ६५० ते ७५० किलो धागा मिळून त्यापासून हेक्टरी रुपये १५,००० ते २०,००० पर्यंत निव्वळ नफा मिळेल.
  • केळी धाग्यापासून रोजच्या वापरातील वस्तू किंवा शोभेच्या वस्तू तयार करून महिला बचतगटांना आर्थिक लाभ होईल.
  • केळी धाग्यापासून हातकागद बनविण्याचा उद्योग वाढविता येईल.
  • केळी धाग्यापासून हॅण्डलूम कापडनिर्मिती करता येत असल्याने स्वतंत्र उद्योग उभारले जाऊ शकतात.
केळीच्या धाग्यापासून बनवलेली साडी (Image Source: greenqueen.com.hk)
  • कंपोस्ट खत, गांडूळ खत, जैविक खतात वाया जाणार्‍या चोथ्याचे परिवर्तन करता येत असल्याने सेंद्रिय खतांची कमतरता टळेल.
  • बायोगॅसमध्ये वापरल्यास ऊर्जानिर्मिती होऊन पर्यावरण संतुलन राखता येईल.
  • कमी गुंतवणुकीत हा स्वयंरोजगार सुरू करता येतो. भांडवल गुंतवणूक कमी आहे. तसेच किमतीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागार्फत २५% किंवा जास्तीत जास्त रू. ५०००/- पर्यंत अनुदान दिले जाते.

केळी खोडापासून खत :

धागा काढून उर्वरित खोडाचा शिल्लक भाग खड्डा करून त्यात टाकावा. त्यावर शेण व माती टाकून उत्तम कंपोस्ट खत तयार होते; तसेच जळगाव, यावर भागात सगळे खोड एकत्र आणून त्याचे बेड तयार करतात, त्यावर शेण, माती टाकून त्यापासून आठ-दहा महिन्यांत खत तयार होते. खोडापासून खत तयार होण्यास वेळ लागतो, खोड कापून बारीक तुकडे करावेत.

केळी खोडापासून नैसर्गिक रंग, स्टार्च :

धागा काढत असताना खोडातील पाणी (सॅप) आणि चोथा शिल्लक राहतो. पाण्यापासून नैसर्गिक रंग तयार करता येतील किंवा या पाण्याला गाळून / फिल्टर करून पॉटॅश पुरवठ्यासाठी केळी बागेत उपयोग करता येतो. चोथ्यापासून स्टार्च वेगळा करून स्टार्च उद्योग सुरू करता येईल. स्टार्च काढल्यानंतर राहिलेल्या शिल्लक मालापासून कंपोस्ट खत/गांडूळ खत तयार करता येते.

कालांतराने केळी धागानिर्मिती आणि त्यावर आधारित उद्योग हा ग्रामीण भागातील एक रोजगार आणि उत्पन्न देणारा ‘कुटिरोद्योग’ होऊ शकतो. ‘कचर्‍यापासून सोने-निर्मिती’ हे दृश्य स्वरूपात नजीकच्या भविष्यात शक्य आहे आणि म्हणूनच केळी शेतकर्‍यांसाठी ‘कल्पतरू’ आहे.

– शैलेंद्र कटके
( पीएच.डी. स्कॉलर, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!