कुणी वेळ देता का वेळ?
हा मथळा किंवा हेडिंग वाचून काही लोक थांबले असतील, काहींना कतूहल वाटले असेल आणि बरेच लोक “हं! वेळेचे व्यवस्थापन ना माहीत आहे”, असे म्हणून पान उलटून पुढे गेले गेले असतील. तुम्ही इथवर वाचलंय तर पूर्ण लेख वाचा यात काही तरी नवीन द्यायचा प्रयत्न मी यात नक्कीच केला आहे.
प्रत्येक माणसाला रोज एक हजार चारशे चाळीस मिनिटे म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सेकंद मिळतात. ते आपण जमा करून ठेवू शकत नाही. आता त्या वेळेत आपण काय काय करतो किंवा त्याच्या विनियोग आपण कसा करतोय हे आपल्यावर अवलंबून असते. वेळ कुठे, कसा आणि किती वेळ घालवायचा हे ज्याने त्याने ठरवायचे. मात्र गेलेला वेळ परत येत नाही हेच सत्य आहे.
“आपण वेळेचे व्यवस्थापन कधीच करू शकत नाही. आपण फक्त स्वत:ला व्यवस्थापित करू शकता.” : पीटर ड्रकर
स्वत:ला व्यवस्थापित करणे म्हणजे जीवनाचे संतुलन जपण्याची एक कलाच असते. कुठलीही कला एका रात्रीत शिकता किंवा आत्मसात करता येतनाही, तशीच ही कलादेखील एका रात्रीत शिकता येत नाही. या कलेत प्रत्येक क्षणाला महत्त्व असते, ज्यात मिनटांची व तासांची गणित जुळवली जातात.
ही कला असते तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उंची देणारी, जिथे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला जातो किंवा तसा प्रयत्न नक्कीच केला जातो. हा कधीच न संपणारा प्रवास आहे. असे असले तरी त्याची सुरुवात एका पावलाने होते.
“प्रतिक्षा करू नका; वेळ कधीही सुयोग्य होणार नाही. तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा.” : नेपोलियन हिल
स्वत:ला मॅनेज करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेचा योग्य उपयोग केल्याने तुमच्या आयुष्यातील अनावश्यक ताणतणाव कमी होऊन तुम्हाला मनःशांती मिळते. उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित ठेवून सगळी कामे वेळेत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे तुमची कार्यक्षमता आतापेक्षा कायम वाढत राहते.
यात तुम्ही थोडे स्वत:ला शिस्तबद्ध ठेवता आणि छोटे, मध्यम आणि दूरगामी लक्ष्ये म्हणजे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याकडे तुमचा कल वाढत जातो. नियोजनाशिवाय आपला वेळ वाया जातोय हे तुमच्या हळूहळू लक्षात येते आणि पटायलादेखील लागते. या सेकंड स्टेजला तुमची रोजची धावपळ थांबते आणि तुम्हाला शांतपणे विचार करायला वेळ मोकळा मिळायला लागतो.
नवीन ध्येय आणि उद्दिष्ट्ये दिसू लागतात आणि आयुष्याला एक नवी दिशा मिळू लागते. आपली व आपल्या सहकार्यांची उत्पादकता वाढते. तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो आणि सगळ्यांना तो जाणवूदेखील लागतो. इथे वेळ तुम्हाला सांगू लागते, मी तुझी कधीही साथ सोडणार नाही, फक्त तू माझा योग्य प्रकारे वापर करत राहा.
“तुम्ही आज जे करता त्यावरून तुमचे भविष्य घडते, उद्या कराल त्यावरून नाही.” : रॉबर्ट कियोसाकी
आपले भविष्य घडवायचे असेल, तर त्याची सुरुवात आजपासूनच करावी लागते. अनेक वेळा आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, पण आपण त्या पुढे ढकलतो. उद्यापासून सुरू करू हा विचार कित्येक संधी गमावतो. भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाची असते ती आजची तयारी, आजचे प्रयत्न आणि आजचे निर्णय. वेळ कोणासाठी थांबत नाही.
ज्या गोष्टी आपण आज करू शकतो, त्या पुढे ढकलल्याने आपण आपली क्षमता, वेळ आणि संधी वाया घालवत असतो. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. ती संधी हातातून निसटली की पुन्हा येईल याची शाश्वती नसते. म्हणूनच तुमच्या स्वप्नांची पूर्तता करायची असेल, तर त्यासाठी आजपासून नाही आतापासून प्रयत्न करावे लागतात. आजचे छोटे-छोटे प्रयत्नच आपल्याला मोठ्या यशाकडे घेऊन जातात.
तुमच्या उज्वल आणि यशस्वी भविष्यासाठीची पायाभरणी आजपासून करावी लागेल. आज केलेले शिक्षण, आज शिकलेल्या नवीन गोष्टी आणि आज घेतलेले अनुभव हेच तुम्हाला भविष्यात यशाकडे घेऊन जातील. तुम्ही जितके आजमध्ये गुंतवाल, तितके तुमचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल.
आपले भविष्यातील यश आणि मिळणार सन्मान हे सगळे अचानक घडत नाही, ते आपण रोज घडवत असतो. म्हणून प्रत्येक दिवसाचे महत्त्व ओळखून त्याचा उपयोग करण्याची सवय आपण स्वत:ला लावली पाहिजे. आळस, टाळाटाळ आणि आजचे उद्यावर ढकलण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊ देत नाही.
आज केलेली मेहनत, आज शिकलेली गोष्ट, आज लावलेली चांगली सवय हे सर्व तुमच्या आयुष्याला आकार देतात. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. आजची लहान कृती भविष्यात मोठ्या बदलाचे कारण ठरू शकते. तुम्ही आज आत्मसात केलेले एक नवीन कौशल्य भविष्यात तुमच्यासाठी एक मोठी संधी निर्माण करू शकते.
‘आज’मधूनच तुमचा ‘उद्या’ साकार होऊ शकतो. आज घेतलेला एक सकारात्मक निर्णय तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. आज स्वत:मध्ये लहान लहान बदल करायला सुरवात करा तीच असेल सुरुवात तुमच्या स्वत:ला व्यवस्थापित करण्याची.
स्वत:ला व्यवस्थापित करणे म्हणजे नक्की काय हा प्रश्न अनेक लोकांना पडतो. सुरुवात कुठून करावी हेदेखील उमगत नाही आणि ते पुढे ढकलले जाते. स्वत:च्या विचारांना, वागणुकीला आणि आपल्या वेळेचे आपण नियोजन करण्याला स्वत:ला व्यवस्थापित करणे म्हणतात.
हे काही खूप मोठे शास्त्र नाही. हे किचकटदेखील नाही. यात तुम्ही प्रथम स्वत:च्या निर्णयांची आणि कृतींची जबाबदारी स्वीकारणे सुरू करता. आपल्या निर्णयांवर ठाम राहता, कारण कोणते काम आधी आणि कोणते नंतर करायचे याचे तुमचे नियोजन झालेले असते. म्ही बेशिस्त जीवनशैलीकडून शिस्तबद्ध जीवनशैलीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असतो. शिस्तबद्ध जीवनशैलीचे पालन करत राहिल्यास स्वत:ला व्यवस्थापित करणे सोपे होते.
कुठलाही बदल सोपा नसतो. माणसाला त्याचा कंफर्ट झोनमधून बाहेर पडायला वेळ हा लागतोच आणि त्यात अनेक वेळा तोच स्वत:ला खेचतो, उद्यापासून सुरू करतो हा विचार आपल्याला अनेक वेळा मागे खेचतो. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नकारात्मक गोष्टींचा सामना करणे आवश्यक आहे आणि याकरता दिवसाची सुरुवात आणि शेवट याचा विचारपूर्वक आराखडा (प्लॅन ऑफ अॅक्शन) कायम तयार ठेवावा.
“कामाचे नियोजन करा आणि नियोजनानुसार काम करा.” – नेपोलियन हिल
नियोजनामुळे स्वत:चे व्यवस्थापन सुलभ होते. नियोजनादरम्यान अडचणी ओळखून त्यावर उपाय शोधता येतो. मोठ्या कामाचे छोटे-छोटे टप्पे करता येतात. कामाची अंमलबजावणी तत्परतेने होते. तुमच्या कामाचा मागोवा घेत सुधारणा करता येते. कामे ट्रॅक करता येतात. संघटनेत काम करताना नियोजनामुळे एकत्र काम करणे सोपे होते. सातत्याने काम केल्यामुळे प्रगती होत राहते.
Time Management Tips in Marathi
टू-डू लिस्ट : टू-डू लिस्ट म्हणजे आपल्या कामांची यादी, ज्यामध्ये आपण पूर्ण करायची असलेली सर्व कामे लिहून ठेवतो. ही यादी तयार करणे हा एक अत्यंत सोपा, पण अत्यंत प्रभावी वेळ व्यवस्थापनाचा उपाय आहे. लहान मोठी कामे लक्षात ठेवण्याऐवजी ती यादीत लिहून ठेवल्यास आपला वेळ, ऊर्जा आणि लक्ष अधिक चांगल्या पद्धतीने वापरता येते.
टू-डू लिस्ट तयार करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी करायची सर्व कामे, प्रोजेक्ट्स किंवा उद्दिष्टे व्यवस्थित लिहून ठेवणे. यामुळे आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे स्पष्ट होते आणि गोंधळ कमी होतो. कामे विसरण्याची भीती राहत नाही.
टू-डू लिस्टमुळे कामाला शिस्त लागते. कामाची दिशा स्पष्ट होते आणि त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. यादी तयार केल्याने प्रत्येक मोठे काम छोटे-छोटे भाग करून हाताळता येते. अशा प्रकारे कामाचा ताण कमी होतो. मोठ्या प्रकल्पासाठी उप-याद्या तयार कराव्यात, ज्यामुळे मोठ्या कामांचा भार हलका वाटतो.
लहान-मोठे काम वेळेवर करणे म्हणजे एक चांगली सवय लावणे. यामुळे तुम्हाला स्वत:बद्दल समाधान वाटते आणि आत्मविश्वास वाढतो. यादीतील कामे पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळ आणि मर्यादा ठेवल्यास आपली कार्यक्षमता वाढते व कामे अचूकपणे पूर्ण करणे शक्य होते.
टू-डू लिस्टचे प्रकार : टू-डू लिस्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे केली जाते.
आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता टू-डू लिस्ट करण्यासाठी खाली दिलेली ऑफलाइन साधने सोपी व प्रभावी आहेत.
नोटबुक, डायरी किंवा जर्नल्स : कामे लिहिण्यासाठी, त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी आणि तुम्ही ती पूर्ण करताच झाल्याची नोंद करण्यासाठी.
स्टिकी नोट्स : तुमच्या प्लॅनर, डेस्क किंवा डायरीमध्ये चिकटवून नोंद करण्यासाठी (रंगीत नोट्ससुद्धा वापरल्या जातात म्हणजे काम किती महत्त्वाचे आहे हे समजते.)
व्हाईट बोर्ड : ज्यावर तुम्ही करायची कामे लिहू शकता आणि झाल्यावर ती पुसून टाकू शकता.
प्लॅनर : बाजारात मिळणारे प्लॅनर, ज्यात तुम्ही दिवसाचे, साप्ताहिक व मासिक नोंदी करू शकता.
ऑनलाईन संसाधने
गुगल कीप : हे ‘गुगल’ने बनवलेले अॅप आहे. हे मोबाइलमधून व्हॉइस नोट्सपासून टास्क ते रिमाइंडरपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला देते. हे तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरही उघडता येते.
नोशन एआय : हेदेखील एक जुने अॅप आहे. हे मोबाईलमधून व्हॉइस नोट्सपासून टास्क ते रिमाइंडरपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला देते.
टिकटिक टू-डू लिस्टअप : हे फोल्डर करून तुम्हाला तुमची टू-डू लिस्ट विविध रंगात बनवून देते. यात प्रायोरिटी मॅट्रिक्स नावाचे फिचर आहे जे तुम्हाला तुमची कामे अर्जंट आणि इम्पॉरटंत या मॅट्रिक्समध्ये विभाजित करायला मदत करते.
आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला स्वत:ला व्यवस्थापित करायला मदतनीस म्हणून काम करते. आता गरज आहे आजपासूनच सुरुवात करण्याची, पहिले पाऊल आज उचलण्याची.