स्थानिकांनो, आता निर्लज्ज व्हा!

निर्लज्ज व्हा, म्हणजे काही तरी चुकीचं करायला सांगतोय, असा चुकूनही अर्थ लावू नका. लज्जा ही काही बाबतीत, काही वेळेला आणि काहींसाठी गरजेची आहे. वर पक्ष मुलीला पाहायला आला आणि मुलगी लाज सोडून वागली तर त्याचे परिणाम बहुदा तिथेच बोलणी फिस्कटण्यात होतील; परंतु अंगावर पडलेली जबाबदारी एखाद्याने निव्वळ लाज वाटते म्हणून पार पाडण्यात कुचराई केली तर त्याच्यासारखा करंटा तोच!

या लॉकडाउन काळात देशाने कोरोनापेक्षा भयंकर संकटाचा सामना केला, हे संकट होत मजुरांच्या स्थलांतराचं. मजूर म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं ते खडी फोडणारे, घमेली उचलणारे कळकट-मळकट कामगार. पण ज्यांनी आता स्थलांतर केलंय ते फक्त अशाप्रकारची कष्टाची काम करणारी असंघटित क्षेत्रातील मंडळीच नव्हती, तर अगदी सामान्य मध्यमवर्गीयांतलीही बरीच होती.

जे सरकारी किंवा चांगल्या पद्धतीची खाजगी क्षेत्रात नोकरी करत नाहीत, अशा सगळ्याच मंडळींनी या स्थलांतरात भाग घेतला. यातले काहींनी अंशकालासाठी स्थलांतर केलं आहे तर काहींनी कायमस्वरूपी. पण एकूणच यातून एक गोष्ट लक्षात येते की रोजगारासाठी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं आहे. अप्रगत राज्यातून प्रगत राज्यांकडे लोकांचे लोंढे सतत वाहत असतात.

कोरोनाच्या या महामारीत पहिल्यांदा देशाला या समस्येची जाणीव झाली आहे. याचा परिणाम म्हणजे आता रोजगारासाठी किंवा अन्यत्र वसण्यासाठी अशाप्रकारच्या दीर्घकालीन स्थलांतराचे प्रमाण घटणार आहे. यामुळे व्यापारासह, छोट्या-मोठ्या प्रमाणात रोजगार हा स्थानिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

स्थानिक याला केवळ राज्याची सीमा नसून प्रत्येक जण आता आपल्या जिल्ह्यात रोजगार शोधण्याचा प्रयत्न करेल. जिल्ह्यात उपलब्ध होत नसेल तर जवळपासच्या जिल्ह्यात शोध घेईल. तिथेही उपलब्ध झाला नाही तर जवळच्या शहराकडे धाव घेईल.

देशपातळीवर सरकारलाही आता लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार तसेल जीवनावश्यक सर्व सुविधांची सोय करण्याला प्राधान्य असेल. त्यामुळे स्थानिकांना आता मिळेल ती संधी साधून तिचं सोनं केलं पाहिजे. प्रत्येकजण आपल्या गावात, शहरात कष्टाची काम करायला लाजतो.

आता ही लाज झटकून मिळेल ते काम, व्यापारउदीमाच्या संधी शोधल्या पाहिजेत. प्रत्येक जण आपल्या गावा-शहरात, आपल्या लोकांत जर सुखी होत असेल तर आणखी काय पाहिजे? म्हणून म्हणतो निर्लज्ज व्हा, मिळेल ते काम हाती घ्या, मिळेल तो धंदा करा… श्रीमंत व्हा, समृद्ध व्हा!

– शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?