Lockdown : हा नवीन गोष्टी शिकण्याचा काळ

सध्या कोरोना रोगामुळे आपल्यापैकी बहुतांश उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. काहींचे व्यवसाय तर पुर्णपणे बंद पडले आहेत. अशा वेळी आपल्यातील काही जण याचं टेन्शन घेऊन विचार करत बसलेत, काही जण अचानक सुट्टी मिळाल्यामुळे केवळ मौज-मजा करण्यात वेळ घालवत आहेत तर काही जणं चक्क मित्रांना भेटायचा किंवा गावाला जायचा विचार करत आहेत.

एक उद्योजक म्हणून आपल्याला यातलं काहीच करायचं नाहीये. कारण ही वेळ आहे यशस्वी होण्याची तयारी करण्याची. ही वेळ आहे नवनवीन गोष्टी शिकण्याची. जेव्हा तुमचे स्पर्धक वर दिल्याप्रमाणे एखादी गोष्ट करत असतील तेव्हा तुमच्यासाठी ही एक संधी आहे स्वतःला घडविण्याची आणि इतरांपेक्षा खूप पुढे जाण्याची.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे नक्की करायचं तरी काय!

उत्तर सोपं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे घरी बसायचं. पण घरी नुसतं बसायचं नाहीये तर इंटरनेट, मोबाईल आणि मोकळा वेळ या तिघांचा मेळ घालून काहीतरी नवीन शिकायचंय.

कोरोनामुळे या अचानक मिळालेल्या सुट्टीत पुढे दिलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी तुम्ही केल्यात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
१. ऑनलाईन कोर्सेस करा

तुमच्याकडे संगणक, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन असेल आणि त्यावर इंटरनेट असेल तर तुम्ही वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस करून तुमच्यातली कौशल्य विकसित करू शकता. तुम्हाला प्रश्न पडत असेल सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय तर त्याचा कोर्स करा, तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन शिकायचं असेल तर त्याचा कोर्स करा किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही इतर कोर्स तुम्ही करू शकता. यासाठी पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. आज गुगल किंवा फेसबुकच्या सर्टिफिकेट कोर्स सकट अनेक कोर्स मोफत उपलब्ध आहेत. शिवाय आपले युट्युब बाबा तर अहेतच!

२. तुमच्या व्यवसायात काही बदल करता येतील का याचा विचार करा.

म्हणजे, आता तुमची व्यवसाय करण्याची एक पद्धत ठरली असेल आणि त्यानुसार तुम्ही रोज काम करत असाल. या ठरलेल्या कामांमध्ये काही कामं अशी असतील जी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने होऊ शकतात पण वेळ नसल्यामुळे त्यांचा तुम्ही कधी विचारच केला नसेल. तुम्ही कामावर कसे जाता, किती वाजता जाता इथपासून कोणती नवीन मशिनरी बाजारात कमी किंमतीत अली आहे का, आपलं उत्पादन वेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी सुद्धा आपण तयार करू शकतो का, इत्यादी.

३. उत्पादनांच्या वेगवेगळ्या जाहिराती तयार करा
हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

तुमचं उत्पादन हे तुमच्या इतकं आणखी कुणालाच माहीत नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक प्रकारच्या ग्राहकासाठी किमान एक जाहिरात तयार करा. ही जाहिरात म्हणजे एखादा मेसेज असेल, एखादा फोटो असेल किंवा इतर काहीही असेल. तुम्हाला त्याच्या सजावटीचा किंवा आकाराचा विचार करायचा नाहीये तर त्यातल्या मजकुराचा विचार करायचा आहे.

४. नवीन उत्पादनं, जोड व्यवसाय यांचा विचार करा

आपला आताचा जो व्यवसाय आहे आणि त्यात जी उत्पादनं आहेत त्याशिवाय त्यांना जोडून कोणती नवीन उत्पादनं आपण काढू शकतो का किंवा आपल्या व्यवसायसोबत एखादा जोडव्यावसाय सुरू करू शकतो का याचा विचार करा. जोडव्यावसाय तसेच शून्य गुंतवणुकीत करता येणाऱ्या १०० हून अधिक व्यवसायांची माहिती या e-book मध्ये वाचा- http://bit.ly/393MsMl

५. स्वतःला वेळ द्या

नेहमी आपल्याकडे कामाच्या गडबडीत स्वतःला द्यायला वेळच नसतो. त्यामुळे आता दिवसातून किमान एक तास तरी वेळ स्वतःसाठी द्या. यात तुमच्या ध्येयांचा विचार करा. व्यवसाय सुरू करताना तुम्ही कोणतं ध्येय ठरवलं होतं हे आठवा आणि आज तुम्ही कुठे आहात याचा विचार करा. कदाचित तुम्ही ध्येयाच्या खूप पुढे गेला असाल, कदाचित काही प्रमाणात ध्येय तुम्ही गाठलं असेल आणि कदाचित तुम्ही जिथे होतात तिथून पुढे जाण्याऐवजी आणखी मागे गेला असाल किंवा तुमचं ध्येय बदललं सुद्धा असेल. यात निकाल काय लागला हे महत्वाचं नाहीये. आपण काय ठरवलं आहे, आपल्याला कुठपर्यंत पोहचायचं आहे, त्यासाठी आपण काय करत आहोत आणि कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे.

६. शॉर्ट टर्म ध्येय ठरवा

तुमच्या व्यवसायाचा, पैशांचा आणि वेळेचा सर्व बाजूंनी विचार करून एक ध्येय ठरवा. हे ध्येय कालबद्ध असावं. अर्थात एक महिना, सहा महिने, एक वर्ष अशा ठराविक काळात पूर्ण करण्याचं. ते एखादा टर्नओव्हरचा आकडा गाठण्याचं असू शकतं, ठराविक ग्राहक मिळविण्याचं असू शकतं किंवा नवीन एखादा प्लांट टाकण्याचं सुद्धा असू शकतं.

७. लॉंग टर्म ध्येय ठरवा

तुम्ही शॉर्ट टर्म ध्येय हे काही काळासाठी ठरवलं असेलच. त्याशिवाय तुम्हाला एक उद्योजक म्हणून कुठपर्यंत पोहचायचं आहे, कोणतं शिखर गाठायचं आहे हे ठरवा. अर्थात तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय आहे हे ओळखा.

८. तुमच्या परिवाराला वेळ द्या

जसं नेहमी आपण आपल्याला वेळ देत नाही तसंच आपण आपल्या आई-बाबा, बायको/नवरा, मुलं आणि इतर परिवाराला सुद्धा कमी वेळ देतो. यांना तुम्ही आता जो वेळ द्याल त्याने व्यवसायात नफा वाढणार नाहीये. पण तुम्ही रिफ्रेश नक्कीच व्हाल आणि जास्त चांगल्या प्रकारे पुन्हा कामाला सुरुवात करू शकाल. आई-बाबांशी मनसोक्त गप्पा मारणं, एखादा पदार्थ बनवून बायकोला/ नवऱ्याला सरप्राईज करणं अगदी चहा सुद्धा चालेल, मुलांना व्यवसायातल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणं असं काहीही तुम्ही करू शकता.

कोरोना मुळे आपल्याला एक, दोन, चार, पंधरा असे किती दिवस सुट्टी घ्यावी लागेल हे कुणीच आता सांगू नाही शकत. पण जो काही वेळ आपल्या हातात आहे तो वरच्या आठ गोष्टींत आणि तुमच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ज्या इतर गोष्टींची गरज आहे त्यात घालवलात तर तुम्ही नक्कीच इतरांपेक्षा खूप पुढे जाऊ शकता. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा.

घरी रहा, काळजी घ्या, तंदुरुस्त रहा आणि सतत प्रगती करत रहा!

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

    View all posts
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?