उद्योग अपेक्षेप्रमाणे चालत नाही? मग हे उपाय करून बघा!

तुमचा उद्योग अपेक्षेप्रमाणे चालत नाही, हा उद्योगाचा नाही तुमचा दोष असतो. तुमच्याच परिसरात तोच उद्योग दुसरा कुणी तरी यशस्वीपणे चालवतोय आणि तुम्ही अपयशी ठरताय. यातच सर्व काही आले. प्रत्येक उद्योगात लाखो-करोडो कमावणारे उद्योजक आहेत. मग तुम्हीच का अपयशी ठरत आहात?

आपण एखाद्या उद्योगात लाखो रुपये गुंतवतो, पण त्यातून अपेक्षेप्रमाणे परतावा मिळत नाही याचे कारण चुकीच्या मार्केटिंगमध्ये दडलेले असते. आपण तेच तेच सरधोपट मार्ग वापरून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो, पण जो मार्ग अपयशी ठरतोय तो बदलण्याचे आपण धैर्य दाखवत नाही.

अशा वेळेस स्वत:चे मूल्यमापन न करता ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या उक्तीप्रमाणे उद्योगाची निवड चुकली, असे बिनधास्त बोलून मोकळे होतो; पण यामुळे एक प्रकारे आपण चुका सुधारण्याची सुवर्णसंधी वाया घालवत असतो. ब्रँड योग्य प्रकारे लोकांपर्यंत नेला तर कोणताच उद्योग अपयशी होऊ शकत नाही!

माझ्या पाहण्यात बरेच जण आहेत ज्यांनी एखादा उद्योग चालत नाही म्हणून दुसरा सुरू केला, तो चालत नाही म्हणून तिसरा उद्योग सुरू केला; पण परिणाम शून्य. तरीही त्यांनी स्वत:चे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला नाही, की नक्की काय चुकतंय हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही. उलट निराशा होऊन नशिबाला दोष देऊन पुन्हा अपयशाच्या गर्तेत गेले.

मित्रांनो, उद्योगातून अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही म्हणून निराश होऊ नका. खालील उपाय अमलात आणा, लवकरच चांगला परिणाम दिसेल.

  • ग्राहक आपल्याकडे आकर्षित का होत नाही याचा विचार करा.
  • आपण कुठे चुकतोय हे शोधण्याचा प्रयत्न करा.
  • इतर यशस्वी उद्योजकांच्या स्ट्रॅटेजींचा अभ्यास करा.
  • नवनवीन कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करा.
  • पारंपरिक जाहिरातींच्या माध्यमांसोबतच नवीन माध्यमांचा वापर करा.
  • फक्त स्वत:शीच चर्चा करू नका, जास्तीत जास्त लोकांशी चर्चा करा.
  • स्वत:ला ग्राहकाच्या ठिकाणी उभे करून आपल्या उद्योगाचे मूल्यमापन करा.
  • प्रॉडक्ट कितीही चांगले असले तरी प्रेझेन्टेशनला महत्त्व असते, त्यामुळे तुमचे प्रेझेन्टेशन आकर्षक राहील याची काळजी घ्या.
  • मार्केटिंग व जाहिरातींवर खर्च करताना कचरू नका.
  • याच उद्योगात दुसरा यशस्वी होऊ शकतो तर मी का नाही, हे स्वत:लाच विचारा. विचारात सकारात्मक ऊर्जा तेवती ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा.
  • तुमची देहबोली ही पराभूत मानसिकता दाखवणारी ठेवू नका, यशस्वी उद्योजकाप्रमाणेच तुमचा उद्योग असला पाहिजे.
  • स्वत:चा ब्रँड डेव्हलप करा. तुमच्या उद्योगासाठी तुमची प्रतिमासुद्धा महत्त्वाची असते.
  • तुमचा ब्रँड, लोगो रिफ्रेश करा किंवा आवश्यकता असेल तर बदलूनच टाका. चांगल्या डिझायनरची मदत घ्या.
  • नव्याने सुरुवात केल्यासारखी जाहिरातबाजी करा.
  • लोकांसमोर तुमच्या उद्योगाचे आधुनिक स्वरूप प्रकट करा.
  • प्रॉडक्टची किंमत कमी केल्याने विक्री वाढत नसते. किंमत कमी करून तुमच्या ब्रँडची पातळी खाली आणू नका.
  • तुमचे विक्री प्रतिनिधी चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करा.
  • सध्याच्या उद्योगात आणखी काही प्रॉडक्ट वाढवता येतील का पाहावे, ते उद्योगाला सोडून नसावे, पण सामान्य नसावे. किमान एखादे प्रॉडक्ट स्पेशल म्हणून मिरवता येईल यासाठी प्रयत्न करा.
  • दुसर्‍याची कॉपी करू नका, स्वत:चा ब्रँड डेव्हलप करा, स्वत:ची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरा.
  • मोठमोठ्या उद्योजकांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न करा. या लोकांचा १५ मिनिटे जरी वेळ मिळाला तरी काही तरी चांगले ज्ञान मिळते, जे तुम्हाला उद्योगासाठी उपयुक्त ठरू शकते.

हे काही उपाय आहेत जे तुम्हाला उद्योगात आमूलाग्र बदल करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. एक एक मार्ग हळूहळू अमलात आणायला सुरुवात करा. लवकरच तुम्हाला तुमच्या उद्योगात वाढ झाल्याचे दिसून येईल. फक्त थोडा संयम ठेवा, तात्काळ बदलाची अपेक्षा करू नका.

श्रीकांत आव्हाड
(लेखक व्यवसाय सल्लागार आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?