फेसबुक मार्केटिंगची साधने

फेसबुक ही एक सोशल मीडिया वेबसाइट आहे, ज्यामध्ये वय वर्षे तेराच्या पुढील प्रत्येक व्यक्ती आपले खाते उघडू शकते. खाते उघडणे हे पूर्णपणे मोफत आहे. आपण आपले खाते उघडून आपले मित्र, सहकारी, कुटुंबीय आदी परिचितांना मैत्री करण्यासंदर्भात विचारणा करू शकता, ज्याला फेसबुकच्या परिभाषेत ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवणे असे म्हटले जाते.

फेसबुकच्या नियमावलीनुसार आपण ज्या व्यक्तीला ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहोत, ती व्यक्ती आपल्या परिचयाची असणे गरजेचे आहे. आपण जर सतत अपरिचितांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असू तर आपल्या खात्यातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे काही काळ बंद होऊ शकते व तसा समज देणारा संदेश आपल्याला फेसबुककडून दिला जातो. याशिवाय फेसबुक वापरताना इंटरनेटसंबंधित कायद्यांचे जर उल्लंघन केले तर फेसबुक तुमचे खाते कायमचे बंदही करू शकते.

डिजिटल मार्केटिंगचे साधन म्हणून फेसबुक का वापरावे?

“मला बुवा ते फेसबुक वगैरे काही आवडत नाही” किंवा “फेसबुक वगैरे या सगळ्या सोशल मीडिया वेबसाइट्स म्हणजे टाइमपास आहे, त्यावर उगाच वेळ वाया जातो”; अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया अनेक उद्योजकांच्या ऐकायला मिळतात; पण यावर एकच सांगावेसे वाटते. २००७ साली सुरू झालेल्या ‘फेसबुक’ या सोशल मीडिया साइटने आज अख्खे जग व्यापले आहे.

जगभरातील कोट्यवधी लोक त्यावर रोज काही ना काही कामासाठी उपलब्ध असतात. आपल्याला जरी टाइमपास वाटला तरी आपला ग्राहक वा संभाव्य ग्राहक हा फेसबुकवर आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो.

फेसबुक मार्केटिंगचे फायदे :
 • जगभरातील ग्राहकवर्गापर्यंत कमी वेळेत पोहोचणे शक्य.
 • कमी खर्चात मार्केटिंगसाठी पर्याय
 • सर्व स्तरांतील व सर्व वयोगटांच्या वाचकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी माध्यम
 • तुमच्या वेबसाइटला ट्रॅफिक मिळवण्यासाठी उपयुक्त
 • आपल्या वेगवेगळ्या गोष्टी ग्राहकांपर्यंत फेसबुकद्वारे पोहोचवणे सहज शक्य.
 • ग्राहक फेसबुकद्वारे कंपनीशी थेट संवाद साधू शकतात.
 • फेसबुकमुळे अत्यंत कमी खर्चात ब्रॅण्डिंग होऊ शकते.
 • गुगलसारख्या सर्च इंजिनवर सुरुवातीच्या पानांवर आपल्या कंपनीबद्दल माहिती येण्यासाठी फेसबुक अत्यंत उपयुक्त.

वर सांगितल्याप्रमाणे आपण फेसबुकवर खाते उघडता. त्यानंतर त्याचा आपल्या व्यवसायासाठी उपयोग करून घेण्यासाठी खालील गोष्टींचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

 • फेसबुक बिझनेस पेज
 • फेसबुक ग्रुप
 • फेसबुक इव्हेंट
 • फेसबुक अ‍ॅप

फेसबुक पेज

फेसबुक खात्याचा उपयोग वैयक्तिक संवादासाठी करणे अपेक्षित आहे. जसे की, ‘अबक’ नावाची व्यक्ती स्वत:च्या खात्यामध्ये लोकांना सुप्रभात, शुभरात्री अशा शुभेच्छा देऊ शकेल, तर त्याच्या मित्रांच्या वॉलवर ‘अबक’ने दिलेल्या शुभेच्छा या त्याच्या नावे दिसतील; पण जर ‘अबक’ला आपल्या कंपनीच्या एखाद्या ऑफरबद्दल तिच्या ग्राहकांना वा संभाव्य ग्राहकांना माहिती द्यायची असेल, तर त्याने त्या कंपनीचे फेसबुक पेज तयार करणे व त्या पेजवरून ती माहिती देणे अपेक्षित आहे.

या पेजचे सदस्य म्हणजे ज्यांनी हे पेज ‘लाइक’ केले आहे ते कदाचित ‘अबक’चे वैयक्तिक मित्र वा ओळखीचे नसतीलही, पण त्यांना त्याच्या कंपनीमध्ये रस आहे, त्याबद्दल जाणून घेण्यात रस आहे म्हणून त्यांनी कंपनी पेज लाइक केले आहे.

उद्योजकाचे वैयक्तिक फेसबुक खाते आणि त्याच्या कंपनीचे फेसबुक पेज या दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. त्याची योग्य सांगड घालणे आणि योग्य अंतर ठेवणे हे दोन्ही खूप गरजेचे आहे. उदा. जर ‘अबक’ हा एखाद्या ठिकाणी सहलीला जाऊन आला आणि त्याने सहलीचे फोटो अथवा अनुभव वैयक्तिक खात्याच्या वॉलवर न पोस्ट करता

कंपनी पेजच्या वॉलवर पोस्ट केले तर ते कंपनीची इमेज खराब करू शकते. कंपनी पेजवर उद्योजकाच्या कोणत्याच वैयक्तिक गोष्टी येऊ नयेत. मात्र एखादी वैयक्तिक बाब, पण जिचा व्यवसायावर चांगला परिणाम होऊ शकतो, ती नक्कीच कंपनी पेजवर यायला हवी.

जसे की उद्योजकाला त्याच्या उद्योजकीय कामगिरीविषयी जर एखादा सन्मान मिळाला, तर तो कंपनीचा सन्मान आहे, त्यामुळे ही माहिती कंपनी पेजवरही यायला हवी. फेसबुक खात्यात आपल्याला मित्र जोडण्याची ५ हजार ही कमाल मर्यादा आहे. आपली मित्रसंख्या ५ हजारच्या वर गेल्यावर आपल्याला कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता येत नाही किंवा आलेल्या रिक्वेस्टचा स्वीकार करता येत नाही.

अशा वेळी तुम्हाला अनावश्यक असलेल्यांना मित्रयादीतून काढावे लागते तेव्हाच नवे मित्र जोडता येतात. फेसबुक पेजला कोणतीही कमाल मर्यादा नाही. फेसबुक पेजला अधिकाधिक लाइक्स असणे गरजेचे आहे.

फेसबुकवर ‘फेसबुक पेज’ हे मार्केटिंगचे अधिकृत माध्यम आहे. या पेजच्या माध्यमातून आपण विविध प्रकारच्या पोस्टद्वारे आपल्या विद्यमान व संभाव्य ग्राहकांशी जोडलेले राहू शकतो. या पोस्टमध्ये आपण आपल्या विविध योजना, ऑफर्स इत्यादी ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. ग्राहक या पोस्टवर रिप्लाय करून किंवा मेसेज करून आपल्याशी थेट संवाद साधू शकतात.

पोस्टमधील मजकूर हा अक्षरात, ग्राफिकमध्ये, व्हिडीओ, वेबपेज लिंक यापैकी कोणत्याही रूपांत असू शकतो. ग्राहकाला आकर्षित करेल असे या वरील चारपैकी कोणतीही एक पद्धत आपण निवडू शकतो.

फेसबुक पेजला आपल्याला स्वतंत्र यूआरएल देता येते जी आपण आपल्या अन्य मार्केटिंग साहित्यात जसे की बिझनेस कार्ड, ब्रोशर, पॅम्फ्लेट, लीफलेट इत्यादीमध्ये वापरता येते. उदा. ‘www.facebook.com/smartudyojak’ फेसबुक पेजवर जास्तीत जास्त पेज लाइक्स असणे गरजेचे आहे.

एखाद्या व्यक्तीने पेज लाईक केल्यावर त्याला आपण प्रसारित करत असलेल्या पोस्ट त्याच्या वॉलवर पाहता येऊ शकतात. म्हणजेच जितक्या जास्त लाइक्स तितक्या जास्त लोकांपर्यंत आपल्या ऑफर्स अथवा अन्य गोष्टी पोहोचू शकतात.

फेसबुक पेज उघडण्याची प्रक्रिया
 • फेसबुक पेज उघडण्यासाठी खाते असणे गरजेचे आहे. ते नसल्यास प्रथम उघडा.
 • ‘पेजेस’मध्ये जाऊन ‘क्रिएट पेज’वर क्‍लिक करा.
 • आपल्या व्यवसायाची कॅटेगरी व सब कॅटेगरी निवडा.
 • संपूर्ण पत्ता भरा. (पिन कोडसहित संपूर्ण पत्ता दिल्यास पत्त्याशेजारी नकाशावर आपला पत्ता दिसू लागतो.)
 • पेजबद्दल थोडक्यात माहिती, वेबसाइट, हवा असलेला फेसबुक यूआरएल इत्यादी माहिती भरा.
 • प्रोफाइल पिक्‍चरमध्ये कंपनीचा लोगो टाकता येऊ शकतो.
 • पेज कव्हरमध्ये आपल्या व्यवसायाशी/कंपनीशी संबंधित फोटो टाकता येतो. (आकार ८५१ X ३१५ पिक्सेल)

पेजवर अधिकाधिक लाइक्स असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला पेजवर ‘इन्व्हाइट फ्रेंड्स’ हा पर्याय असतो. तिथे आपण आपल्या मित्रांना पेज लाइक करण्यासंबंधी निमंत्रण पाठवू शकतो. त्यांच्या नोटिफिकेशन्समध्ये ती सूचना जाते, मग तिचा स्वीकार करून पेज लाइक करणे अथवा न करणे हे त्यांच्या हातात असते.

फेसबुक ग्रुप

समान आवड असलेल्यांचे फेसबुकवर ग्रुप करता येतात. यात सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञानविषयक अशा अगणित विषयांचे ग्रुप्स फेसबुकवर उपलब्ध आहेत. मराठी उद्योजकांचेच सुमारे चाळीसेक ग्रुप फेसबुकवर आहेत. या विविध ग्रुप्सचा आपल्या मार्केटिंगसाठी उपयोग करताना अनेक पथ्ये पाळणे खूप गरजेचे आहे. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या ब्रॅण्डवर होण्याची शक्यता अधिक आहे.

तुम्ही विविध विषयांवरील पंधरा-वीस फेसबुक ग्रुप्सचे सदस्य असाल तर सरसकट प्रत्येक ग्रुपवर तुम्ही नियमित तुमची जाहिरातबाजी कराल तर विषयांतर केल्याबद्दल अनेक ग्रुप्सवरून तुम्हाला काढून टाकले जाईल. हल्ली अनेक ग्रुप्समध्ये ग्रुप्सविषयीच्या माहितीमध्येच येथे कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करू नये, अशी सूचना केलेली असते.

त्यामुळे अशा सूचनांची काळजी घ्यावी. उदा. तुमची वेबसाइट बनवणारी कंपनी आहे. पुण्यातील सामाजिक काम करणार्‍यांचा एखादा ग्रुप आहे, ज्याचे तुम्ही सदस्य आहात, तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमची जाहिरात करणे शंभर टक्के टाळा; पण सामाजिक संस्थांना वेबसाइट असल्याचे लाभ काय अशाविषयी एखादा लेख म्हणजेच फेसबुकच्या परिभाषेत ‘नोट’ तयार करून तुम्ही त्या ग्रुपवर पोस्ट करू शकता अथवा त्या ग्रुपवर या विषयासंदर्भात काही चर्चा सुरू असल्यास तुम्ही हे काम करण्यास सहकार्य करू शकाल असे, तेथे नमूद करू शकता.

तुम्हाला तुमच्या कंपनीसंबंधी, प्रॉडक्टसंबंधीही ग्रुप तयार करता येऊ शकतो. याचे एक उदाहरण म्हणजे मुंबईमध्ये एक घरगुती स्वयंपाक पुरवणार्‍यांनी स्वत:चा असा एक ग्रुप तयार केला आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या ग्राहकांना व संभाव्य ग्राहकांना जोडले आहे.

त्या ग्रुपमध्ये ते रोजच्या मेजवानीबद्दल माहिती देतात, त्यामुळे ग्राहक आजचा मेन्यू पाहून त्यांना ऑर्डर करतो. अशा प्रकारे आपल्याला आपल्या ग्राहकांचे ग्रुप्स तयार करून त्यांच्याशी सतत संपर्कात राहता येऊ शकते.

फेसबुक इव्हेन्टमध्ये एखाद्या कार्यक्रमासंबंधी माहिती देता येऊ शकते तसेच लोकांना निमंत्रितही करता येऊ शकते. फेसबुक अ‍ॅपद्वारे तुम्हाला काही अ‍ॅडव्हान्स गोष्टी करता येतात, मात्र अ‍ॅप तयार करणे हे पूर्णपणे तांत्रिक काम असल्यामुळे त्यासाठी तुम्हाला वेब डेव्हलपरचीच मदत घ्यावी लागते.

Author

 • शैलेश राजपूत

  शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

  व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

  संपर्क : ९७७३३०१२९२

  View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?