एकविसाव्या शतकातल्या ‘टॉप-२१’ उद्योगसंधी

कोरोना महामारीनंतर अनेकांना नवीन उद्योग सुरू करणं ही कल्पना थोडी धाडसी वाटू शकते पण बदललेल्या परिस्थिती आणि जीवनशैलीनुसार अनेक नवे व्यवसाय उदयाला आलेत. त्यामुळे २०२१ च्या सुरुवतीसोबतच विविध संधी आणि पूर्वी दुर्लक्षित राहिलेले उदयोग सध्या नफा कमावून देणारे झालेत असे म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

वर्षभरात लॉकडाऊनमुळे लोकांना स्वत:ला समजण्याची संधी मिळाली. यातूनच ऑनलाईन व्यवसाय आणि नोकरीच्या संधी समोर आल्या. व्यवसाय उभं करणं यासाठी भरपूर ऊर्जा आणि कामाची गरज लागते, पण योग्य मार्गदर्शन आणि साहाय्य यांच्या आधारे हे साध्य होऊ शकतं.

एकविसाव्या शतकातल्या प्रमुख व्यावसायिक कल्पनांपैकी काहींची ओळख खाली देत आहोत. यापैकी काही उद्योगसंधी ह्या सद्यस्थितीला धरून असतील.

१. मेडिकल कुरियर सेवा : सध्याच्या महामारीच्या परिस्थितीमध्ये लोकांना सर्वात जास्त गरज औषधांची भासली आहे. त्यामुळेच जर तुमच्याकडे एक स्वतःच्या मालकीची गाडी असेल आणि तुमची नोकरीची वेळपण ठरलेली असेल, तर हा उद्योग तुमच्या योग्य आहे.

तुम्ही ठरवून आरोग्य क्षेत्रासाठी कुरियर सेवा द्यायला सुरुवात करू शकता. तुम्ही स्वतः किंवा गाडीचालकाची नेमणूक करून चाचण्यांचे नमुने, डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि उपकरणे यांसारख्या गोष्टींची ने-आण करू शकता.

२. ऑनलाईन लेखाजोखा : बरेचसे व्यवसाय ऑनलाईन काम सुरू करत असल्याने, तसेच बरेच ऑनलाईन उद्योग निर्माण होत असल्याने, त्यांचा आर्थिक ताळेबंदसुद्धा ऑनलाईन ठेवला जात आहे. अकाऊंटिंगचे ज्ञान आणि कौशल्य बाळगणारी कोणतीही व्यक्ती ही सेवा अगदी घरबसल्या देऊ शकते. स्वतःच्या क्षमतेनुसार ग्राहक संख्या ठरवून आपल्या वेळेप्रमाणे आणि आहे त्या जागेतून हे काम केलं जाऊ शकतं.

३. ट्रान्स्क्रिप्शन सेवा : उत्तमरीत्या ऐकू शकणारे आणि पटापट लिहू शकणारे लोक या व्यवसायाचा विचार करू शकतात. तुमच्या घरून आणि आपल्या सोयीचे कामाचे तास निवडून तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

सध्या मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनला जास्त करून मागणी आहे. यासाठी आपली कौशल्य सुधारणे आणि कुशलता मिळवण्याचा विचार करू शकता. या व्यवसायात तुमची इच्छाशक्ती व कौशल्य यांसोबत एक संगणक, चांगले इंटरनेट आणि योग्य सॉफ्टवेर यांची गरज असते.

४. सफाई सेवा : सर्वत्र महामारीच्या उद्रेकानंतर सफाई सेवा ही आता काळाची गरज बनली आहे. निरोगी आरोग्यासाठी घर, कार्यालय, शाळा, रुग्णालय, मॉल, चित्रपटगृह आणि प्रत्येक ठिकाण कसून सॅनिटाईज करणं आवश्यक ठरत आहे. शिवाय लाकडी सामान वाळवीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे निर्जंतुकीकरण आणि कीटकनाशक फवारणी करणं अपरिहार्य आहे. त्यामुळेच ही सेवा आजच्या घडीला खूप फायदेशीर ठरू शकते.

५. होम केअर सेवा : जागतिक स्तरावर आरोग्यास धोका वाढल्यामुळे, मुले आणि वयोवृद्ध नागरिक हे घरात बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे अशा लोकांची मोठी यादी बनू शकेल, ज्यांना घरच्या कामात आणि वैयक्तिक दैनंदिन कामात मदतीची गरज आहे.

अशा लोकांना व्यावसायिकपणे मदतीचा हात देऊन अर्थार्जन केलं जाऊ शकतं. तसेच अशी मदत करण्यासाठी तयारी असलेल्या व्यक्तींना कामं देऊन रोजगार उपलब्ध करून देता येईल. यासोबतच पॅकिंग, घर बदलणं, ने-आण यामध्येही मदत केली जाऊ शकते.

६. डिजिटल मार्केटिंग : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे बरेचसे व्यवसाय ऑनलाईन झाले आहेत, होत आहेत. पण यामुळे डिजिटल मार्केटिंगची मागणीसुद्धा वाढत चालली आहे. मोठ्या कंपन्यांत याकरिता स्वतंत्र विभाग असतो, पण छोट्या उद्योजकांना हे शक्य नसतं, त्यामुळे ते डिजिटल मार्केटिंगची सेवा आउटसोर्स करतात.

एसइओ, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, पे पर क्लिक यांमध्ये कौशल्य अवगत असलेल्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. यामध्ये ठराविक परिणाम मिळवण्यासाठी आवश्यक सोशल मीडिया स्ट्रॅटेजी तयार करणे आणि ती राबवणं हेच करायचे असते.

७. ग्राफिक डिझायनर : कंपनी लोगो किंवा आकर्षक वेबसाईट बनवणे हे प्रत्येकाला जमतच, असं नाही. मोहक जाहिरातीचा कंटेंट तयार करण्यासाठी अभ्यासू नजर लागते. कलेची आवड असणारी आणि उत्तम कल्पनाशक्ती असणार्‍या व्यक्तीसाठी हा एक परिपूर्ण व्यवसाय आहे. फ्लायर्स, डिजिटल जाहिराती, पोस्टर्स व इतर लक्ष्यवेधी डिझाइन्स बनवून देऊन या व्यवसायाची सुरुवात करता येते.

८. ड्रॉप शिपिंग : हल्ली बर्‍याच विक्री करणार्‍या कंपन्या माल साठवून ठेवण्यापेक्षा ड्रॉपशिपिंगच्या साहाय्याने माल पोचवतात. ड्रॉपशिपिंगच्या व्यवसायात मालाचा साठा करणे आणि ऑर्डर आल्यावर ती योग्य त्या पत्त्यावर पोचवणे असे कामाचे स्वरूप असते. त्यामुळे किमान सामानासोबत सुरू करण्यासाठी हा एक योग्य व्यवसाय ठरू शकतो.

९. रिअल इस्टेट एजंट : जीवनावश्यक गरजेशी निगडित आल्याने या व्यवसायाला कधीच मरण नाही. आपल्या आवडीचे घर शोधणार्‍या लोकांना तुम्ही तुमच्या कौशल्य आणि माहितीच्या आधारे योग्य पर्याय निवडण्यात साहाय्य करू शकता. या व्यवसायात उतरण्यापूर्वी तुमच्याकडे मूलभूत मानवी कौशल्ये जसे की संभाषण कौशल्य असणे, आवश्यक आहे.

१०. ऍप डेव्हलपर : आजच्या काळात सर्वात जास्त कमाई असलेल्या आणि सर्वात जास्त चर्चेत असलेल्या व्यवसायांमध्ये या व्यवसायाची गणती होते. तंत्रज्ञानाची आवड आणि कोडिंगचे ज्ञान बाळगणारी कोणीही व्यक्ती या क्षेत्रात सहज करियर घडवू शकते.

लोकांची गरज लक्षात घेऊन विविध प्रकारचे ऍप्स बनवून देऊन त्यांचे जीवन अधिक सुलभ करून कमाई करता येते. शिवाय या व्यवसायाला जगभरातून ग्राहकवर्ग उपलब्ध होतो.

११. ऑनलाईन शिकवणी : जर आपण एखाद्या विषयात आणि तो विषय इतरांना समजावून देण्यात एक्सपर्ट असाल, तर या क्षेत्राचा नक्कीच विचार करा. लॉकडाऊनमुळे या क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. म्हणूनच आजच आपल्या आवडीचा विषय निवडा आणि अगदी घरबसल्या कामाला सुरुवात करा.

१२. ऑनलाईन रिसेलिंग : फॅशन आणि कापड क्षेत्रात रुची असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी हा उत्तम कमाईचा पर्याय आहे. सुरवातीला खूप वेळ आणि संयम घेणारा हा व्यवसाय एकदा जम बसल्यावर पुढे सहजपणे कमाई करून देतो. उलाढाल आणि प्रगती याचा अंदाज घेऊन या व्यवसायाचा पूर्णवेळासाठी विचार करू शकता. या व्यवसायासाठी जगभरातून कित्येक साईट्स आणि ऍप्सचे पर्याय उपलब्ध आहेत.

१३. घराचे व्यवस्थापन : बर्‍याचदा घरातील सामानाकडे पाहूनच एखाद्याला आपल्या स्वतःच्या घरात जाणेच जीवावर येते. पण यामधील नेमके काय ठेवायचे आणि काय काढायचे हेदेखील त्यांना कळत नसते.

अशावेळी तुम्ही अशा व्यक्तींना घरातील सामान कमी करून ते राहण्यालायक बनवायला मदत करू शकता. हा व्यवसाय नक्कीच शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय लोकांना पसंत पडेल. केलेल्या कामाचे फोटो दाखवून नवीन ग्राहक मिळवू शकता.

१४ . फ्रीलांस लेखन : मार्केटिंग कंटेंट समजू शकणार्‍या आणि वाक्यांमध्ये शब्द कसे वापरायचे याची जाण असणारी कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय उत्तमरीत्या करू शकते. ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे लेख लिहून देऊन प्रति लेख किंवा प्रति शब्द शुल्क आकारले जाऊ शकते.

एसइओच्या ज्ञानाची जोड देऊन यामध्ये अधिकाधिक उपयुक्तता आणता येईल. यामुळे ग्राहकवर्ग वाढण्यास मदत होईल. फक्त एक लॅपटॉप आणि इंटरनेट सुविधेसोबत सुरू करून या व्यवसायात अगदी सहज कमाई करता येते.

१५. फूड ट्रक : मूलभूत गरज असल्यामुळे हा व्यवसाय कधीच तोट्यात जात नाही. लोक मोकळ्या जागेत खाणं पसंत करत असल्याने हा व्यवसाय जास्त फायदेशीर ठरत आहे. वाहन असल्याने प्रत्येक जागेच्या गर्दीच्या वेळेनुसार त्या ठिकाणी पोचणे सोपे ठरते.

स्वयंपाकाची आवड असणारी व्यक्ती आपली स्वतःची शैली विकसित युनिक पदार्थ देऊन जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करू शकतात. यातून तुमच्या उद्योगाला मौखिक प्रसिद्धी ही मिळेल.

१६. सल्लागार : एखाद्या विषयातील अनुभव आणि अभ्यासातून मिळवलेल्या आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना करून देऊन त्यामधून कमाई करता येईल. हा व्यवसाय एकट्याने किंवा भागीदारीने सुरू करता येईल.

१७. कॅब सर्व्हिस : स्वतः चारचाकी चालवत फिरायची आवड आणि त्याला वाहन चालवण्याच्या उत्तम ज्ञानाची जोड असेल, तर हा व्यवसाय चांगला पर्याय आहे. ही सेवा तुम्ही स्वतः देऊ शकता आणि तुमच्यासोबत घेऊन इतर चालकांनासुद्धा रोजगार देऊ शकता. शेअरिंग सुविधा दिल्यास ग्राहकसंख्या वाढायला मदत होईल. तसेच ग्राहक मैत्रीपूर्ण संवादातून सहजरित्या टिकवले जाऊ शकतात.

१८. सोलर सेटअप कंपनी : हल्ली बर्‍याच प्रमाणात लोक घर आणि कार्यालय यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याकडे वळत असल्याने हा व्यवसाय झटपट भरभराटीस येणारा ठरला आहे. यामध्ये सौर उपकरणांची मांडणी करून देणं आणि त्याची देखभाल हे काम येते. छोट्याशा गुंतवणुकीने सुरुवात करून थोड्याच काळात दुप्पट परतावा या व्यवसायात मिळू शकतो.

१९. दुर्गम भागात डिलिव्हरी देणे : रस्त्यांची दुरावस्था आणि गोदामापासून लांब असल्याने ग्रामीण भागात डिलिव्हरी देण्यामध्ये शिपिंग कंपन्यांना खूप अडचणी येतात. त्यामुळे अशा भागात डिलिव्हरी देण्याचं काम व्यवसाय म्हणून केला जाऊ शकतो. यासाठी किमान गरज आहे ती फक्त एका दुचाकीची.

२०. ऍमेझॉनवर विक्री : अंगिकृत कौशल्यातून कमाई करायची असेल, तर तुम्ही ऍमेझॉन फुलफिलमेंट्सची मदत घेऊ शकता. यामध्ये तुम्ही घरबसल्या आपली उत्पादने विकू शकता. याशिवाय उत्पादने तुमच्याकडून कलेक्ट करून ऑर्डर करणार्‍या ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे कामसुद्धा ऍमेझॉन स्वीकारते, तेही संपूर्ण देशात कुठेही आणि इतर देशांतही.

२१. अभ्यासक्रम तयार करून विकणे : कोरोनामुळे शिक्षणसुद्धा बर्‍याच अंशी ऑनलाईन बनलं आहे. ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्मला आता चांगले दिवस आले आहेत. जर तुम्ही एखाद्या विषयात एक्स्पर्ट असाल, तर त्याचा फायदा इतरांना करून देऊन वेगवेगळ्या पद्धतींनी यातून कमाई केली जाऊ शकते. यासाठी शैक्षणिक वेबसाईट शिवाय युट्युबचाही उपयोग होऊ शकतो.

थोडक्यात सांगायचं तर ऑउटसोर्सिंग, कमी गुंतवणूक अशा सगळ्या घटकांना लक्षात घेऊन किमान रिस्कसोबत व्यवसाय सुरू करणे आता अगदी सोपे आहे. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?