उद्योजकता

व्यवसाय उत्तमरीत्या सुरू करण्यासाठीचे चार नियम

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


‘उद्योग केला पाहिजे’ असा सल्ला कुणाला दिला की, तात्काळ आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले जातात, याचा मला चांगलाच अनुभव आहे. पैसा कुठून आणणार, लफडी कोण करणार? असे एक ना अनेक प्रश्न/शंका उपस्थित केल्या जातात. या सर्वांना मी चुकीचे ग्रह समजतो. चोऱ्यामाऱ्या केल्याशिवाय जणू कुणी उद्योग करूच शकत नाही, अशी अनेकांची समजूत झालेली असते आणि म्हणून ही उद्योगाची चतु:सूत्री मी स्वानुभवावरून बनवली आहे.

व्यवसाय दुसऱ्यांच्या पैशावरच करावा

हे सर्वात पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे. याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे मी जे नेहमी सांगतो की, ‘उद्योग करायला पैसे लागत नाहीत’ हे म्हणणे नीट समजले.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

उद्योगासाठी लागणारा पैसा बँकेकडून घ्यावा, गुंतवणूकदारांकडून घ्यावा किंवा ग्राहकांकडून घ्यावा. ते तीनही उत्तम मार्ग आहेत आणि उद्योग उभारणीसाठी पैसा पुरवणारे आहेत. यासाठी उद्योग कशाचा आहे, कुठे आहे, इत्यादी महत्त्वाचे नसून तो कोण करणार आहे, हे महत्त्वाचे आहे. वरील तीनही मार्ग हे माणसाभोवती फिरणारे आहेत.

स्वत:च्या पैशावर जो उद्योग करतो तो जास्त काळ टिकू शकत नाही. लवकरच संपतो. परंतु दुसऱ्यांच्या पैशावर उद्योग करणारा प्रदीर्घ काळ टिकू शकतो व उद्योगाला मोठे स्वरूप देऊ शकतो. जे जे मोठे उद्योजक झाले त्यांनी हेच केले. म्हणून उद्योग करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे सूत्र आत्मसात करणे गरजेचे आहे. दुसरे सूत्र आहे प्रामाणिकपणाचे.

प्रामाणिकणे व्यवसाय करता येतो

चोऱ्या-माऱ्या, लांड्या-लबाड्या केल्याशिवाय कुणी उद्योग करूच शकत नाही, असा अनेकांचा समज असतो. तो चुकीचा आहे. प्रत्येक उद्योगात “Margin of Honerty” म्हणजे इमानी नफा असतोच. तोट्यात कुणी उद्योग करावा अशी जनभावना कधीच नसते.

उद्योग करणाऱ्या प्रत्येकाने दोन पैसे कमावले पाहिजेत, अशीच सर्वसाधारण धारणा असते. ही जनभावना अत्यंत महत्त्वाची आहे. ती समजून घेतली पाहिजे. तसेच प्रामाणिकपणावर आपला विश्र्वास असला पाहिजे. झटपट मोठे व्हावे असे कुणालाही वाटू शकते. त्यात गैर काहीच नाही. पण मेहनतीच्या व प्रामाणिकपणाच्या जोरावरच प्रगती होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे.

Short Cuts will cut you short. त्यामुळे Short Cuts ला थारा देणे धोक्याचे आहे आणि प्रगतीचीही एक गती असते, हे समजले पाहिजे. Exponential Growth झाली की Exponential Fall ही होतो. तेव्हा चढ-उताराचे धक्के खाण्यापेक्षा एका झेपणाऱ्या गतीने उद्योग करणे हिताचे ठरते.

कमी नफा व जास्त उलाढाल

नफा मिळवणे हा उद्योगाचा अपरिहार्य हेतू होय. नफा जास्त ठेवावा ही कमी ठेवावा, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. नफा जास्त असेल तर विक्री कमी होईल व नफा कमी असेल तर विक्री अधिक होईल. दोन्ही पर्यायात नफा मिळतोच, परंतु पहिल्या पर्यायात जास्त कमाई होते असे वाटते, पण ते तसे नसते.

दुसऱ्या पर्यायातच जास्त नफा मिळतो. शिवाय ग्राहक संख्याही दुसऱ्या पर्यायातच अधिक असते. उद्योगामध्ये मनुष्‍यबळ अर्थात ग्राहक संख्या हे मोठे भांडवल समजले जाते व ग्राहकांशी चांगले संबंध हा नफा समजला जातो. तेव्हा कमी नफा व जास्त उलाढाल हे फायद्याचे सूत्र ठरते.

तुफान कर्तृत्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा

महात्त्वाकांक्षा हे सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे, असे मला वाटते. ती नसेल किंवा कमजोर असेल तर आपण उद्योग करू शकणार नाही. तीसुद्धा साधीसुधी असून चालणार नाही, तर जिथे जाऊ तिथे टॉपवर राहू ही जिद्द असली पाहिजे. माणसाची क्षमता ही काही ठरलेली नसते. वजनासारखे गणित क्षमतेचे नाही.

ती आव्हानानुसार बदलती असते. म्हणून मोठमोठी आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि तुफान कर्तृत्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा मनी बाळगली पाहिजे.

मला वाटते या चतु:सूत्रीच्या आधारे कुणीही उद्योग करू शकतो. तो यशस्वी होईल ही माझी खात्री आहे. अधिकाधिक तरूणांनी हे आव्हान स्वीकारावे, अशी अपेक्षा बाळगून मी इथेच थांबतो.

– सुरेश हावरे
(‘उद्योगनीती’ या पुस्तकातून साभार)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!