यश कसं मिळवावं, यावर लिहिणारे, बोलणारे अनंत आहेत. यशस्वी होण्याच्या टिप्स आणि ट्रिक्स देणं हीच आता एक अवाढव्य इंडस्ट्री झाली आहे. पुस्तकं, व्हिडीओज्पासून काही तासांच्या वर्कशॉप्सपासून कित्येक महिने चालणार्या कोर्सेसपर्यंत अफाट आवाका आहे या इंडस्ट्रीचा.
यातून काय कळतं? तर मानवाची यशस्वी होण्याची भूक अनंत आहे. यशाची व्याख्या काय, इथपासून ते यशस्वी झाल्यानंतर पुढे काय इथपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं आपण सतत शोधत असतो; शोधत राहूच. काळ बदलत जाईल तसे प्रश्नांचे परिमाण बदलत जातील कदाचित; पण या प्रश्नाच्या केंद्रस्थानी असणारी मानवी भावना तशीच राहील.
या यशाच्या कोड्यात एक मोठा टप्पा असतो आर्थिक स्वावलंबनाचा. याच संदर्भात अनेकदा वापरलं गेलेलं, तरीही आजपर्यंत जुनं न झालेलं ‘नोकरी करून कुणीही संपत्ती संचय करू शकलं नाही!’ हे वाक्य आपल्याला काही तरी वेगळं करण्याच्या दिशेने घेऊन जातं. अनेकांना स्वत:चा बिझनेस असावा असं वाटण्यामागे याच धर्तीची कोणती तरी भावना असते.
मनापासून एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन काही तरी करावंसं वाटणं, एखादी मॅजिक आयडिया सुचणं आणि त्यावर झपाटल्यासारखं काम करणं, जग विसरून जाऊन एका स्वप्नपाठी धावणं, किती छान वाटताहेत ना ही सर्व वाक्यं? एका यशस्वी उद्योजकाकडून हेच सर्व अपेक्षित असतं.
स्वत:वर विश्वास ठेव आणि मेहनत घेत राहा, बस्स! पण दुर्दैवाने हा ‘स्क्रॅचिंग द सरफेस’ प्रकारचा उपदेश आहे. उद्योजकाने यशस्वी होण्यासाठी यापेक्षा खूप वेगळं, किती तरी खोलवर काही तरी करणं आवश्यक असतं. तिथेच आपण कमी पडतो.
झोपेतून उठण्याआधी मनात आलेला पहिला विचार आणि झोपल्यानंतरही मेंदूत रुंजी घालत असलेले प्रश्न हा खर्या (यशस्वी नव्हे! यश याच्या पुढे!) उद्योजकाचा गुणधर्म म्हणता येईल. इन्स्पिरेशन-मोटिव्हेशनच्या फार पुढची गोष्ट आहे ही. ही जीवनशैलीची गोष्ट आहे, लाइफस्टाइलची गोष्ट आहे.
उद्योजकाने आपला उद्योग उभारताना विद्यार्थ्याच्या वा नोकरदाराच्या माइंडसेटने वावरू नये, हे आणखी एक अनेकदा वापरलं गेलेलं, पण तितकंच व्हॅलिड असणारं वाक्य. अडचण ही आहे की, उद्योजकाने अमुक करावं किंवा तमुक करू नये, हे असं वन लायनर सांगून, आपण सगळेच टाळ्या मिळवून पुढे जातो; पण ते काही तरी करणं किंवा न करणं कसं साध्य करायचं? याचा आराखडा समोर उभारलाच जात नाही.
जोपर्यंत असा आराखडा समोर उभा राहत नाही आणि त्यावर क्रूरपणे, हो क्रूरपणे काम करून स्वत:मध्ये ते सगळं रुजवलं जात नाही तोपर्यंत उद्योजकतेचे खरे धोके टळणार नाहीत. हे सगळं रुजवणं म्हणजेच जीवनशैली, लाइफस्टाइल घडवणं. उद्योजकतेच्या अनुषंगाने घडवलेली लाइफस्टाइल जगणं म्हणजेच उद्योजक लाइफस्टाइल जगणं.
मी ‘इनमराठी’ या मराठी डिजिटल मीडियाला आकार देताना, माझ्याच नकळत आधी चुकीची आणि नंतर बरोबर लाइफस्टाइल जगत गेलो आणि त्या त्या अनुसार परिणाम मिळवत गेलो. माझ्या नवउद्योजकतेच्या सुरुवातीच्या काळात माझ्या हातून अगदी साध्या साध्या चुका होत गेल्या. आज मागे वळून बघताना कधी हसू येतं, तर कधी विषाद वाटतो.
इतक्या बेसिक चुका करूच कशा शकतो मी? त्या केल्या नसत्या तर आजची आपली आर्थिक परिस्थिती किती चांगली असली असती, असं बरंच काही वाटत राहतं. अर्थात, जर-तरमध्ये अडकून रडत राहण्यात काहीच अर्थ नसतो. हे विचार फक्त इतिहासातून धडे मिळवून पुढे जाण्याच्या कामी येतात.
महत्त्वाचं हे की, हे पुढे जाणं फक्त माझं माझ्यापुरतं असू नये. इतरांच्या अनुभवातून आपण शिकायला हवं. आपल्या अनुभवातून इतरांनी शिकायला हवं. यातूनच आपल्या सर्वांची सामायिक उद्योजकता अधिक परिपक्व होत जाईल.
प्रत्येक धडा आपल्याच अनुभवातून शिकायचा नसतो. आपलं जीवन आणि आपले रिसोर्सेस मर्यादित आहेत. त्यामुळे इतरांकडून शिकून, त्याचा फायदा घेऊन आपण आपल्या अडचणी कमी करत न्यायला हव्यात. हे शिकत जाणं म्हणजेच ‘उद्योजक लाइफस्टाइल’ घडवणं. याच दिशेने एक पाऊल आणखी पुढे जाऊ या.
उद्योजक लाइफस्टाइल जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
तर मार्क झकरबर्गपासून येवले चहाच्या नवनाथ येवलेंपर्यंत प्रत्येक यशस्वी उद्योजकाने ज्या प्रकारची जीवनशैली घडवली, तीच घडवणे. गंमत पहा. आपल्याकडे फेसबुक, गूगल, मायक्रोसॉफ्ट का घडू शकत नाहीत; या प्रश्नावर चर्चा होते; पण या प्रश्नाच्या उत्तराच्या मुळापर्यंत आपण जात नाही.
वास्तव हे आहे की, अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली वसू शकली, कारण तिथे होतकरू तरुणांमध्ये उद्योजकाची लाइफस्टाइल घडवण्याचे सिस्टमॅटिक प्रयत्न सतत होत असतात. कॉलेजमध्ये शिकत असताना फेसबुकसाठी सहा महिन्यांचा गॅप घेऊ शकण्याची हिम्मत मार्क दाखवू शकला, कारण त्याचा फॉल-बॅक प्लॅन रेडी होता.
इतकंच नव्हे त्या सहा महिन्यांत अगदीच बाळबोध चुका होऊ नयेत यासाठी मेंटरिंगसुद्धा तयार होतं त्याच्याकडे. टीम कशी उभारावी, को-फाऊंडर कसा असावा, फायनान्शिअल मॉडेल उभारणं म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरं रेडिमेड तयार नसतातच, पण ती शोधण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध असतं तिकडे.
आपल्याकडे हे आहे का? नाहीये.
हे सगळं चर्चिलंच जात नाही. मग तसे विचार रुजणार कसे? विचार रुजले नाहीत तर त्या प्रश्नांचा ध्यास कसा लागणार? ध्यास लागलाच नाही तर २४ तास मेंदू त्यामागे कसा धावणार? मेंदू २४ तास त्यामागे धावत नसेल तर तशी जीवनशैली कशी रुजणार? असं हे चक्रव्यूह आहे. ते भेदण्यासाठी सिस्टीम हवी. तशी सिस्टीम उभारण्याचा प्रयत्न ‘उद्योजक लाइफस्टाइल’ या उपक्रमाद्वारे आता केला जातोय.
मराठी तरुणांमध्ये ध्येयासक्ती आहे, मोठी स्वप्नं आहेत, धडपड करण्याची जिद्दसुद्धा आहे; परंतु उद्योजकतेच्या बाबतीत सकारात्मक इको-सिस्टीम नसल्याने एक तर पहिलं पाऊलच टाकता येत नाही आणि हिमतीने टाकलंच तर अनंत अडचणींना विनाकारण सामोरं जावं लागतं.
ही समस्या सोडवण्यासाठी, मराठी तरुणांमधून शास्त्रशुद्ध रीतीने उद्योजक घडवण्यासाठी ‘उद्योजक लाइफस्टाइल’ हा उपक्रम सुरू केला गेला आहे. उद्योजकता म्हणजे फार क्लिष्ट, फार रिस्की, काही तरी जगावेगळं नसतं. फक्त उद्योजकतेचे काही मूलभूत नियम असतात. ते समजून घ्यायला हवेत, त्यानुसार आपण वागायला हवं आणि आपला व्यवसायदेखील त्याच नियमांच्या आधारावर उभारायला हवा. बस्स इतक्या साध्या-सोप्या-सरळ सिद्धांतावर उद्योजक लाइफस्टाइल उभं आहे.
या उपक्रमाबद्दल आम्ही सतत मोफत वेबिनार घेत असतो, ज्यांत उद्योजकता रिस्क-फ्री प्रकारे कशी घडवता येऊ शकते यावर इन-डेप्थ चर्चा केली जाते. मराठी माणसाने वेगवेगळ्या कारणांनी उद्योजकतेच्या जगापासून अंग चोरून घेतलं आहे. वेळ आली आहे ती सगळी कारणं स्टेप बाय स्टेप सोडवत जाण्याची, गुंता उलगडण्याची. स्टार्टअपच्या जगात मुसंडी मारण्याची.
हे करताना गुडी-गुडी इन्स्पिरेशनल-मोटिव्हेशनल गप्पांचा फारसा फायदा होणार नाहीये. सिस्टीमॅटिक प्लॅन आखून त्यानुसार काम करावं लागणार आहे. उद्योजकता प्रयत्नपूर्वक रुजवावी लागणार आहे. उद्योजक लाइफस्टाइल घडवावी लागणार आहे.
– ओंकार दाभाडकर
omkar@udyojaklifestyle.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.