सुरुवात केली एका युट्यूब चॅनेलने; भविष्यात ठरले युनिकॉर्न स्टार्टअप

ते भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. ते हाडाचे शिक्षक आहेत आणि दहा वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अभियंता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु नंतर अध्यापनाकडे वळले आणि नंतर मागे वळून पाहिलेच नाही.

त्यांनी आयआयटीच्या इच्छुकांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना शिकवले आहे. ते केवळ शिक्षकच नाहीत, तर उद्योजकही आहेत. या आधी त्यांनी शिक्षण क्षेत्रात दोन कंपन्या स्थापन केल्या आहेत.

प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं आणि त्यासाठी तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावू शकते असा विश्वास होता. यातूनच त्यांना ‘अनॲकॅडमी’ सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय आहे.

शिक्षण घेताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि शिक्षण अधिक सोयीस्कर आणि परवडणारे बनवण्यासाठी त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. सॉर्टिंग हॅट टेक्नॉलॉजीजच्या मालकीच्या ‘अनॲकॅडमी’ची स्थापना २०१५ मध्ये झाली होती. खरं सांगायचं तर ‘अनॲकॅडमी’ची सुरुवात गौरव मुंजाल यांनी २०१० मध्ये युट्यूब चॅनल म्हणून केली होती.

‘अनॲकॅडमी’ची स्थापना तांत्रिकदृष्ट्या गौरव मुंजाल यांनी केली असली, तरी नंतर हेमेश सिंग आणि रोमन सैनी कंपनीत सामील झाले. गौरव मुंजाल मुंबईतील काॅलेजमध्ये अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. नंतर त्यांनी ‘डायरेक्टी’ या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले.

इतकंच नव्हे तर ‘फ्लॅट.टू’ नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली, जी नंतर ‘कॉमन फ्लोअर’ या कंपनीने विकत घेतली. हेमेश सिंग हे मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी आहेत. ते फ्लॅटचॅट डॉट काॅमचे मुख्य तांत्रिक अधिकारी झाले आणि सध्या ‘अनॲकॅडमी’चे सीटीओ आहेत.

डॉ. रोमन सैनी कदाचित ‘अनॲकॅडमी’चे सर्वात बहुचर्चित सहसंस्थापक आहेत. ते वैद्यकीय पदवीधर आहेत ज्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. अखेरीस त्यांनी ‘अनॲकॅडमी’मध्ये सामील होण्यासाठी कायमची सरकारी नोकरी सोडली आणि वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

बेंगालुरूमध्ये प्रमुख कार्यालय असलेले ‘अनॲकॅडमी’ हा भारतातील सर्वात मोठा शैक्षणिक प्लॅटफॉर्म बनला आहे, जो लाखो विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण प्रदान करतो. ‘अनॲकॅडमी’च्या पॅकेजमध्ये संगणक प्रोग्रामिंग (कोडिंग), स्पोकन इंग्लिश आणि इतर व्यावहारिकदृष्ट्या लागू होणारे वर्ग यासारख्या विविध अभ्यासक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे.

प्लॅटफॉर्मची प्रीमियम आवृत्ती ‘अनॲकॅडमी’ प्लस ॲप आहे, ज्यात अधिक अनुकूल सेवा, तसेच उपलब्ध नसलेल्या विविध कोर्सेसचा समावेश आहे. सध्या ‘अनॲकॅडमी’द्वारे विविध शिक्षकांनी क्युरेट केलेले ऑनलाइन वर्ग थेट आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध आहेत.

इथले शिक्षक संपूर्ण भारतातील आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांमधील उद्योग व्यावसायिकदेखील आहेत. बोर्ड, जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स्ड, नीट, गेट, युपीएससी, कॅट अशा बहुतेक लोकप्रिय स्पर्धा परीक्षांसाठी ते संपूर्ण तयारी करून घेतात.

‘अनॲकॅडमी’ने फेब्रुवारी २०२१ मध्ये विद्यमान गुंतवणूकदारांकडून सुमारे ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर जमा केले आहेत. तीन प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये टायगर ग्लोबल, ड्रॅगोनियर इन्व्हेस्टमेंट ग्रुप, स्टेडव्ह्यू कॅपिटल आणि जनरल ॲटलांटिक यांचा समावेश आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये प्रतिष्ठित युनिकॉर्न क्लबमध्ये सामील होणारा ‘अनॲकॅडमी’ हा भारताचा दुसरा ई-लर्निंग उपक्रम बनला आहे. हे यश सॉफ्टबँकच्या नेतृत्वाखालील फंडिंगमुळे प्राप्त झाले, ज्यामध्ये ‘अनॲकॅडमी’ने १.४५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मुल्यांकनाने १५९ दशलक्ष अमेरिकन डॉलर मिळवले.

कंपनीने आजपर्यंत सहा संस्था विकत घेतल्या आहेत. यामध्ये क्रिॲट्रिक्स, गेटसाठी एक ऑनलाइन तयारी प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. जून २०२० मध्ये ‘अनॲकॅडमी’ने अल्गोरिदम आणि कोडिंगसाठी लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्म कोडशेफच्या संपादनाची घोषणा केली.

या संपादनाचा उद्देश होता शालेय मुलांसाठी कोडिंग कौशल्ये उपलब्ध करून देणे. ‘अनॲकॅडमी’ने जुलै २०२० मध्ये चंदीगड-आधारित एड-टेक स्टार्टअप प्रेपलॅडर आणि निओस्टेन्सिल विकत घेतले.

“आम्हांला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील सर्वात मोठे शैक्षणिक व्यासपीठ तयार करायचे आहे”, ‘अनॲकॅडमी’चे सहसंस्थापक आणि सीईओ गौरव मुंजाल म्हणतात आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू आहे.

– चंद्रशेखर मराठे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?