स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
उद्योजकता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग दाखवते आणि तिच्याद्वारे माणूस आपले भाग्य बदलू शकतो. ‘वैसन पेट्रोलियम प्रा. लि.’ या कंपनीच्या तीन तरुण मराठी संचालकांनी उद्योजकतेची कास धरली आणि आपल्या आयुष्यात क्रांती घडवून आणली.
मराठी माणूस उद्योगात मागे आहे, तो एकमेकांचे पाय खेचतो, असे म्हटले जाते. या सर्व पारंपरिक समजुतींना खोटे ठरवत वैसन पेट्रोलियमच्या वैभव चाळके, संजय पाटील व गणेश पाटील या तीन संचालकांनी गेल्या अवघ्या नऊ वर्षांत लक्षणीय प्रगती साधली आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मराठी तरुणही उद्योगात उतरून तो एकदिलाने यशस्वीपणे चालवू शकतात, हे तत्त्व त्यांनी सिद्ध केले आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
हे तिघे एकत्र कसे आले याची एक वेगळी सुरस कथा आहे.

या तिघांपैकी वैभव चाळके व संजय पाटील हे एकोकाळी लूप मोबाईल या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीत काही काळ एकत्र कामाला होते. तिथे दोघांची ओळख झाली. मने जुळली. दोघेही सामान्य मध्यमवर्गीय परिवारातून आलेले आहेत. त्यामुळे व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी दोघांच्या मागे नव्हती. मात्र दोघांची वृत्ती उद्योजकतेची आहे.
लूप मोबाईलमध्ये ते सेल्स फिल्डमध्ये एरिया मॅनजर या उच्च पदावर कार्यरत होते. दोघांनाही उत्तम पगार होता. तरीही ते मनातून समाधानी नव्हते. आपले विक्रीकौशल्य आपण दुसऱ्याच्या कंपनीसाठी वापरतोय याची खंत दोघानाही वाटायची.

आपला स्वत:चा व्यवसाय असावा, अशी त्यांची तीव्र इच्छा होती
आपली कंपनी असावी. तिच्या मालाची आपणच विक्री करू म्हणजे आपली झपाट्याने प्रगती होईल, या विचारातून त्यांनी २०११ साली ‘वैसन पेट्रोलियम प्रा. लि.’ची स्थापना केली.
ऑटोमोबाइल क्षेत्रात स्वयंचलित वाहनांच्या स्पेअर पार्टसचे घर्षण कमी व्हावे म्हणून ऑइल किंवा ल्युब्रिकन्टस् वापरले जातात. त्याला इंजिन ऑइल असे म्हणतात. इंजिन ऑइलमुळे वाहनाच्या पार्ट्सचे घर्षण कमी होऊन वाहनाची कार्यक्षमता व आयुष्य वाढते. वैभव चाळके व संजय पाटील यांना सेल्सचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांनी विचारपूर्वक इंजिन ऑइल हे प्रॉडक्ट निवडले. ‘बायो पॉवर इंजिन ऑइल’ या नावाने त्यांनी आपले उत्पादन सुरू केले.
सुरुवातीला त्यांच्याकडे फॅक्टरी व इतर साधने नव्हती म्हणून ते दुसऱ्याकडून उत्पादन बनवून घेत. व्यवसायात सुरुवातीलाच त्यांना मोठा फटका बसला. वैभव व संजय यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नेमक्या त्याच टप्प्यावर त्यांना त्यांचे तिसरे पार्टनर गणेश पाटील भेटले.

ते आखाती देशात फार्मा कंपनीत वर्क मॅनेजर होते. त्यांना पेट्रोलियम उत्पादनांच्या निमिर्तीचा दांडगा अनुभव होता. परदेशातील असाईनमेंट संपवून ते भारतात आले. त्यांनी सिल्वासा येथे आपली छोटीसी फॅक्टरी टाकली होती.
योगायोगाने गणेश पाटील हे संजय यांचे मेव्हणे आहेत. नियतीनेच या तिघांची भेट घडवली. त्यांच्या गरजा परस्परपूरक होत्या. गणेश यांच्याकडे खात्रीलायक उत्पादनाची दृष्टी आणि अनुभव होता. तर वैभव चाळके व संजय पाटील यांच्याकडे विक्रीचा अनुभव होता त्या दोघांना उत्पादनाची बाजू खात्रीशीररित्या सांभाळणाऱ्या समर्थ व्यक्तिची गरज होती. दैवाने या तिघांची गाठ घालून दिली.
त्यानंतर या तिघांनी एकत्रित वाटचाल सुरू केली ती आजही अव्याहतपणे सुरू आहे. तिघांनी परस्पर विश्वासाने खूप मोठी मजल मारली आहे. आज वैसन पेट्रोलियमची सिल्वासा येथे पंधरा हजार चौरस फुटांची मोठी फॅक्टरी आहे. उत्पादनाची सर्व जबाबदारी गणेश पाटील सांभाळतात तर वैभव चाळके आणि संजय पाटील यांनी केवळ विक्रीवरच आपले लक्ष केंद्रित केलेले आहे.
सुरत, सिल्वासा आणि मुंबईतील कळवा येथे त्यांची ब्रॅन्च ऑफिसेस आहेत. सध्या त्यांच्याकडे ८२ कर्मचारी आहेत. त्यांची उलाढाल १५ कोटींची आहे. २०२३ पर्यंत शंभर व २०२६ ला ३०० कोटींपर्यत उलाढाल वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
‘बायो पॉवर’ हे त्यांच्या इंजिन ऑइलचे ब्रॅण्डनेम आहे. सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये ते वापरले जाते. भारतातील तेरा राज्यांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट जाते. याशिवाय ते नेपाळला निर्यातही करतात. भविष्यात निर्यातीसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याची त्यांची योजना आहे.
या तिघांच्या वतीने बोलताना वैभव चाळके म्हणाले की, “मराठी तरुणांनी नोकरी जमत नाही म्हणून व्यवसायात येवू नये. आवड असली तरच यावे. तसेच कोणत्याही व्यवसायात स्थिर होण्यासाठी किमान एक हजार दिवस थांबणे गरजेचे आहे. व्यवसायाला तेवढा वेळ दिला पाहीजे.
व्यवसायाच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण केल्या पाहिजेत. सुरुवातीला नफा-तोटा बघू नये. तीन वर्षे निष्ठेने कोणताही व्यवसाय केल्यास निश्चितपणे मोठा बदल घडतो. समस्यांकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी. समस्यांकडे संकटे म्हणून नव्हे तर संधी म्हणून बघितले पाहिजे. प्रश्नांमध्येच उत्तरे आणि प्रगतीच्या संधी दडलेल्या असतात.
वैभव चाळके, संजय पाटील व गणेश पाटील या तीन मराठी तरुणांनी मराठी माणसाच्या चाकोरीबद्ध विचारसरणीला फाटा देऊन स्वतंत्र व्यवसायात पदार्पण केले. तसेच मराठी माणूस एकमेकाचा द्वेष करतो, पाय खेचतो ही समजूतही खोटी ठरवली आहे. तिघांनी एकोप्याने, समजुतदारपणे, परस्पर सहकार्याने, एकमेकां सहाय्य करू-अवघे धरू सुपंथ या उक्तीनुसार आपले आयुष्य घडवले आहे. सर्वच मराठी तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा.
संपर्क : वैभव चाळके – 8080997080
संजय पाटील – 98703 55929
गणेश पाटील – 78200 01222
Email – v.chalke@vaiisan.com
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.