कोळसा आणि खनिज क्षेत्रे
योजना : कोळसा खाण क्षेत्रांमध्ये व्यावसायिक तत्त्वावर खाणकाम करण्याची योजना आहे. यामध्ये मुख्यतः कोळसा खाणक्षेत्रात धोरणात्मक सुधारणा करण्याची योजना आहे. कोळसा क्षेत्रात खाजगी क्षेत्राला संधी देऊन त्यात निकोप स्पर्धा आणि पारदर्शकता आणणे हा मूळ उद्देश असेल.
खनिज शोध क्षेत्रात खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याची योजना आहे. याचसोबत खनिजे क्षेत्रात अनेक बदल आणि पारदर्शकता आणण्याची योजना आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या खाणींचे हस्तांतरण करण्यास परवानगी आणि जास्तीच्या आणि न वापरलेल्या खनिजांची विक्री करण्यास परवानगी देण्याची योजना आहे. यामुळे खाणकामातील व खनिजे उत्पादनातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
संधी : या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मोठ्या उद्योगांना तसेच खनिजे हा कच्चामाल असणाऱ्या उद्योगांना या योजनेमुळे नक्कीच (बॅकवर्ड इंटिग्रेशन) फायदा होऊ शकेल.
नॉन-बँकिंग फायनान्स, कंपनी हाउसिंग फायनान्स कंपनी, म्युच्युअल फंड संस्था
बऱ्याच नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आणि हाऊसिंग कंपनी यांनी दिलेली कर्जे सध्या पुनर्प्राप्त अर्थात वसुली होत नाहीत. त्यामुळे अशा कंपन्यांना ना रोखीचा खूप मोठा सहन करावा लागत आहे अशा कंपन्यांसाठी विशेष रोख रक्कम पुरवण्याची तसेच या कंपन्यांतील काही कर्जांना हमी पुरवण्याची योजना आहे. यायोगे अशा कंपन्यांकडे रोख रक्कम निर्माण होईल व त्या मार्केटमध्ये एम.एस.एम.इ. क्षेत्राला अर्थसहाय्य पुरवू शकतील.
अणुउर्जा, विमानचालन, अवकाश आणि संरक्षण क्षेत्र
वर नमूद केलेली चारही क्षेत्रांमध्ये जास्त प्रमाणात पैशांची गुंतवणूक केली जाते व त्यातून तेवढा परतावा मिळतोच असं नाही, किबहुना बऱ्याचदा परतावा हा गुंतवणुकीचा उद्देश असतोच असे नाही. तसेच संरक्षणाशी निगडित असल्याने ही चारही क्षेत्रे बहुतांशवेळा सरकारी नियंत्रणाखाली असतात.
सीए तेजस पाध्ये यांनी नुकत्याच घोषित झालेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या केंद्र सरकारच्या अभियानाचा विस्तृत अभ्यास करून याचा सामान्य उद्योजकाच्या दृष्टिकोनातून कसा लाभ घेता येईल याचे या लेखमालेच्या माध्यमातून विवेचन केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्ज आणि अनुदान याच्यापलीकडे उद्योजकांसाठी या अभियानात बऱ्याच लाभकारक गोष्टी सामावलेल्या आहेत. या दृष्टीने प्रत्येक उद्योजकाने ही लेखमाला संपूर्ण वाचावी आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीने योजना आखाव्यात.
संपूर्ण लेखमाला वाचण्यासाठी : https://udyojak.org/tag/atmanirbhar-bharat-series/
विमानचलन क्षेत्र
योजना : आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामाजिक हवाई क्षेत्राची कार्यक्षमता वाढवणे आणि विमान उड्डाणाचा खर्च एकूण मिळून एक हजार करोड रुपये इतका कमी करण्याची योजना आहे. याशिवाय खाजगी आणि सरकारी एकत्रित गुंतवणुकीतून जागतिक दर्जाचे जास्तीत जास्त विमानतळ निर्माण करण्याचीसुद्धा योजना आहे.
या क्षेत्रातील सगळ्यात आकर्षित करणारी घोषणा म्हणजे विमान दुरुस्ती व देखभाल क्षेत्रात भारताला जागतिक केंद्रस्थान म्हणून स्थान मिळवून देणे. या योजनेमध्ये पुढील तीन वर्षांत विमानात लागणाऱ्या वस्तूंच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये होणाऱ्या खर्चामध्ये सध्या होत असलेल्या ८०० करोड खर्चावरून २,००० करोड खर्चापर्यंत नेण्याची योजना आहे.
पहिल्या योजनेमुळे एअरक्राफ्ट उद्योगाला साधारण एक हजार करोडपर्यंतचा फायदा होऊ शकेल. भारतात आंतरराज्यीय विमान वाहतूक अजूनही पूर्ण क्षमतेने होत नाही. या योजनेमुळे जलद प्रवासासाठी अंतर्गत विमानसेवा उपलब्ध होऊ शकेल. तसेच भारताला देखभालीचे केंद्र बनविण्याची योजना असल्यामुळे विमानाची इंजिने बनवणारे मोठे उद्योग भारतात त्यांच्या दुरुस्ती देखभालीची केंद्र उभे करू शकतील.
संरक्षण क्षेत्रातील विमानसेवा व वाहतुक विमान सेवेमध्ये एकसंधता आणल्यामुळे याबाबतीत अनेक क्षेत्रामध्ये कार्यक्षमता वाढवायला व काटकसर करायला मदत होऊ शकेल.
संधी : विमान सेवा क्षेत्र हे अतिशय लहानात लहान ते मोठ्यात मोठ्या सेवा आणि वस्तूंची गरज असणारे क्षेत्र आहे. यामुळे विमानसेवेसोबतच विमानतळ क्षेत्रातसुद्धा प्रचंड रोजगार आणि संधी निर्माण व्हायला मदत होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय गुंतवणुक आल्यामुळे परकीय चलनाचा फायदा तर होईलच, परंतु या तशा थोड्या फार दुर्लक्षित क्षेत्राकडे अनेक उद्योगांचे लक्ष जाऊ शकते.
अनेक लहान-मोठे उद्योग या मुख्य उद्योगाच्या सभोवताली उभे राहू शकतील. विमानसेवा क्षेत्रात तांत्रिक आणि सेवा याबाबतीत प्रशिक्षण देणाऱ्या अनेक उद्योगांना आणि वैयक्तिक उद्योजकांना यामध्ये नक्की संधी निर्माण होऊ शकतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या यांनी आतापासूनच स्वतःला त्या दृष्टीने घडवायला सुरुवात केली पाहिजे व योग्य वेळी त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे.
संरक्षण क्षेत्र
योजना : संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण तयार करत असलो तरीही बहुतांश वस्तू आपण आयात करतो. आता या क्षेत्रामध्ये संरक्षण सामग्री निर्मितीबाबत आत्मनिर्भर होण्याची योजना आहे. यासाठी संरक्षण वस्तू निर्मिती क्षेत्रात धोरणात्मक सुधारणा करण्याची योजना आहे.
थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. संरक्षण सामग्री खरेदी प्रक्रिया जलद आणि कालबद्ध करण्याची योजना आहे. यामुळे भारताला संरक्षण क्षेत्रामध्ये स्वावलंबीत्व येऊ शकेल.
संधी : संरक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या अनेक व्यवसायांना संधी निर्माण होऊ शकते. तसेच संरक्षण सामग्री निर्मिती कारखान्याचे कॉर्पोरेटायझेशन करण्याची योजना असल्यामुळे इतर अनेक सेवा उद्योगांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाचे : डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओ यांचा कोविंड-१९ उत्पादनातील सहभाग (DRDO research in covid 19 products) असे गुगल करून बघा. संरक्षण क्षेत्राने कोरोनासारख्या कठीण काळात आपल्यासाठी किती प्रचंड योगदान केले आहे, याची जाणीव उद्योजक म्हणून आपल्याला होणे गरजेचे आहे.
अवकाश क्षेत्र
‘इसरो’ करत असलेल्या संशोधनांचा उपयोग खाजगी क्षेत्रातील उद्योगांना करून दिला जाईल यामुळे अनेक संशोधनांचे व्यावसायीकरण होऊ शकेल. यातून ‘इसरो’ संस्थेला स्वयंपूर्ण होण्यास नक्की मदत होईल. तसेच अनेक संशोधनासाठी लागणारा निधी ‘इसरो’ अशा प्रकारच्या संशोधन निर्मिती / विक्रीमधून उभा करू शकेल.
अणुऊर्जा क्षेत्र
योजना : अणुऊर्जा क्षेत्रात सरकारी आणि खाजगी एकत्रित गुंतवणूक करून त्या गुंतवणुकीतून कॅन्सर व इतर रोगांवर माफक दरात उपचार होऊ शकतील अशा वैद्यकीय बाबींवर संशोधन केले जाणार आहे. तसेच भारतातील स्टार्टअप उद्योगांना अणुऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञानाची आणि इंक्युबॅशन केंद्रांची मदत मिळवून दिली जाणार आहे.
संधी : भारतात खर्चिकदृष्ट्या पाहिल्यास मूलभूत संशोधन आणि विकास (बेसिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट) या विषयावर खूप कमी काम होत आहे. आपण एक देश म्हणून बऱ्याचशा व्यावसायिक क्षेत्रात इतर देशांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा वापर करत आहोत, परंतु भारताने अणुऊर्जा संशोधनामध्ये बरीच प्रगती केली आहे. हे संशोधन जर व्यावसायिक तत्त्वावर उपलब्ध झाले तर आपला देश अनेक क्षेत्रात प्रगती करू शकेल अशी या मागची संकल्पना असावी.
उपसंहार
मी पहिल्या लेखात सांगितल्याप्रमाणे माझ्या मर्यादित ज्ञानाप्रमाणे अर्थमंत्र्यांनी केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेमधील पाचही दिवसांच्या घोषणांचा थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. मी अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसोबत काम करत असल्यामुळे त्यांच्यासाठी यातून ज्या काही संधी मला दिसल्या; त्या मी येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
बऱ्याच संधी अशाही असतील ज्या मला दिसल्या नाहीत, कारण त्या माझ्या आजपर्यंत केलेल्या कामामध्ये माझ्यासमोर आल्या नसतील. पण आपण सगळे उद्योजक आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम आपण भारतीय आहोत.
यातील ज्या काही संधी निवडू शकतो, ज्या संधीवर काम करू शकतो, ज्यायोगे भारतात रोजगार निर्माण करू शकतो आणि भारताच्या प्रगतीमध्ये आपला खारीचा वाटा देऊ शकतो. तो देण्याचा आपण जरूर प्रयत्न करावा. या लेखाच्या निमित्ताने मी माझा खारीचा वाटा देण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे.
– सीए तेजस पाध्ये
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट असून MSME क्षेत्रांसाठी असलेल्या योजनांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
संपर्क : 98202 00964
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.