पर्यटन व्यवसाय व त्याचे प्रकार

‘पर्यटन’ हा शब्दच मुळात व्यापक आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन संघटनेच्या व्याख्येनुसार पर्यटन म्हणजे ‘आपण जिथे नेहमी वावर असतो, त्या ठिकाणापासून प्रवासाच्या माध्यमातून दूर जाऊन, मौजमजा, धंदा व व्यवसाय करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी राहणे!’

सर्वसाधारणपणे आपण पर्यटन म्हणजे आपल्या घरापासून प्रवास करून दूर जाऊन दुसर्‍या ठिकाणी जाऊन मौजमजा करणे, असे समजतो; मात्र पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत.

जरी आपण या सर्व प्रकारांमध्ये विविध कारणांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सहभागी होत असलो, तरी आपल्याला पर्यटनाच्या या विविध प्रकारांची शास्त्रीय परिभाषा माहीत नसते. आपण आयुष्यभर करीत असलेल्या पर्यटनामध्ये आनंद, दु:ख, करुणा, साफल्य आदी मानवी भावनांचा समावेश असतो.

पर्यटनाच्या आधुनिक परिभाषेमध्ये पर्यटनाच्या पुढील प्रकारांचा स्थूलमानाने समावेश आहे. यातील बहुतेक प्रकारांमध्ये आपण कधी ना कधी सहभागी झालो असतो. यातील काही प्रकारांचा आपण ढोबळपणे ऊहापोह करणार आहोत.

शेतीप्रधान पर्यटन, कौटुंबिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, साहस पर्यटन, निसर्ग पर्यटन, इतिहासविषयक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, सागरी पर्यटन, धार्मिक पर्यटन, व्यवसाय व व्यापारविषयक पर्यटन आदी तसेच शैक्षणिक पर्यटन व क्रीडा पर्यटन.

आपल्यापैकी बहुतेकांचे आयुष्यातील पहिले पर्यटन आईच्या पोटात असताना होते. बाळंतपणास आईचे माहेरी जाणे व आईच्या कुशीतून वडिलांच्या घरी परत येणे.

कुटुंबातील माणसे व्यवसाय/नोकरी/शिक्षण यांच्या निमित्ताने दूर गावी राहत असले, तर एकमेकांना भेटायला जाणे, सुटीत सणासुदीला, आजारपणात घरी जाणे किंवा मयतास जाणे यांचा समावेश कौटुंबिक पर्यटनात होऊ शकतो.

सांस्कृतिक पर्यटन

देशांतर्गतही नागरिकांच्या विभिन्न संस्कृती, धर्म, चालीरीती असू शकतात तसेच मित्रदेशांच्या संस्कृतीदेखील भिन्न असतात. अशा वेळी एकमेकांच्या संस्कृतींची माहिती एकमेकांना करण्यासाठी देशातील राज्ये किंवा दोन देश आपली कलापथके इतर राज्यांमध्ये वा दुसर्‍या देशामध्ये पाठवतात.

ही कलापथके आपल्या राज्यांची व देशांची संस्कृती सादर करतात. यामध्ये स्थानिक नागरिक सामील होतात. यास ‘सांस्कृतिक पर्यटन’ म्हटले जाते.

साहस पर्यटन

जगातील सर्वच माणसांना साहस करण्यासाठी सुप्त ऊर्मी असते. जीव धोक्यात घालून, इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची ईर्षा मनात कायम स्थान करीत असते. उंच कडे चढून जाणे, पर्वतांमधील जोरात वाहणार्‍या, खळाळत्या, धबधबे असणार्‍या नद्यांमध्ये नौकानयन करणे, डोंगरमाथ्यावरून हॅडग्लायडरने आकाशात विहार करीत जमिनीवर तरंगत येणे, डोंगरकड्यांवरील निसरड्या, निमुळत्या पाऊलवाटांवरून दुचाकीने भ्रमंती करणे वगैरे गोष्टींचा साहस पर्यटन या प्रकारात समावेश होतो.

यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो, कारण साहस करण्याच्या ईर्षेला दणकट शरीराची साथ आवश्यक असते.

निसर्ग पर्यटन

वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी व स्वार्थासाठी मानवाने निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. तरीदेखील माणसाला निसर्गाचा सहवास आवडतोच. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून दूर जाऊन उंच डोंगरांच्या कुशीत वा शुभ्र वाळूच्या समुद्रकिनार्‍यावर निळ्याशार लाटा बघायला आपल्या सर्वांनाच आवडते.

हल्ली पर्यावरणाचा होणारा र्‍हास, प्रदूषण, वन्यप्राण्यांची होणारी हत्या या ज्वलंत विषयांबाबत जागृती करण्यासाठी बर्‍याच पर्यावरणप्रेमी सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. या संस्थासोबत निसर्ग व पर्यावरणतज्ज्ञांना घेऊन निसर्गाशी जवळीक साधायला सहली काढतात व समाजजागृतीचे काम करतात. या कार्यास ‘निसर्ग पर्यटन’ म्हटले जाते.

कृषी पर्यटन

शहरी वस्त्यांमध्ये राहणार्‍यांना ग्रामीण जीवनाची कल्पना नसते. शेती केल्याने धान्य पिकते, गाय किंवा म्हैस दूध देते, उसापासून साखर बनतो वा गूळ बनतो, सर्व प्रकारची फळे झाडांवर येतात, या गोष्टी शहरात जन्मलेल्या लोकांनी शाळेच्या पुस्तकात वाचलेल्या असतात.

एक अभिनव कल्पना म्हणून या लोकांना ग्रामीण भागात नेऊन त्यांना शेती दाखवणे, झाडावरून पिकलेले आंबे स्वत: काढायला लावणे, उसाचा गळीत हंगाम दाखवणे, त्यांना गवळीवाड्यात नेऊन दूध कसे काढले जाते, हाताने वा यंत्राने हे दाखवणे असे शेतीविषयक पर्यटन सुरू झाले आहे.

या संकल्पनेचा तरी अजून व्हावा इतका प्रचार झाला नाही. शहरातील लोकांनी ग्रामीण भागातच राहणे अभिप्रेत असून, यांची गावात राहणारे शेतकरी, आपल्या घरात या पर्यटकांसाठी जास्त खोल्या बांधून सोय करणार आहेत व करत आहेत. शेतीस जोडधंदा व उत्पन्नाचे आणखी एक साधन असा सामाजिक दृष्टिकोन या पर्यटनात जोपासला आहे.

ऐतिहासिक पर्यटन

जगातील प्रत्येक देशाला आपला असा इतिहास असतो. तसेच एकाच देशातील वेगवेगळ्या राज्यांनाही आपला इतिहास असतो आणि देशातील वा राज्यांमधील नागरिकांना आपल्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असतो. या इतिहासांशी निगडित प्राचीन वास्तू, राजवाडे, किल्ले, जलदुर्ग, स्मृतिस्थळे त्या देशांमध्ये व राज्यांमध्ये भग्नावस्थेत किंवा क्वचितच चांगल्या अवस्थेत अस्तित्वात असतात. या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला व राष्ट्राभिमान दाखवायला सर्वांनाच खूप आवडत असते.

ऐतिहासिक वस्तू जतन करणाऱ्या संग्रहालयांना भेट देणे, हासुद्धा एक आवडता छंद असतो. उत्खननात उघडकीस आलेली प्राचीन शहरे, तेथील घरे, स्नानगृहे, बाजारपेठा बघण्यात लोकांना रस असतो. यास ‘इतिहासविषयक पर्यटन’ म्हटले जाते.

वैद्यकीय पर्यटन

बर्‍याच वेळी छोट्या-मोठ्या गावांमध्ये, लहान-मध्यम शहरांमध्ये किंवा बर्याच अविकसित गरीब देशांमध्ये असाध्य रोगांवर उपचार होऊ शकत नसतात किंवा भीषण अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांवर अवघड शस्त्रक्रिया व अनुरूप उपचार होऊ शकत नसतात, तसेच बर्‍याच ठिकाणी गंभीर रोगांच्या साथींना तोंड द्यायला स्थानिक यंत्रणा सक्षम नसतात.

अशा वेळी रुग्णांना वा जखमींना उचित वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय/स्थानिक स्वराज्य संस्था/सेवाभावी संस्था/त्या देशांची सरकारे, जिथे योग्य वैद्यकीय उपचार व आवश्यक औषधे उपलब्ध आहेत अशा शहरांत वा अशा देशांमध्ये घेऊन जातात. ह्या रुग्णांबरोबर/जखमींबरोबर त्यांची सर्व प्रकारची काळजी घेणारे आप्तस्वकीय, नोकर, तसेच आवश्यक असल्यास त्यांचे डॉक्टर्स, असे सर्व सहभागी असतात.

या पूर्ण प्रक्रियेमध्ये संबंधित रुग्णालये, डॉक्टर्स व त्यांचे मदतनीस, परिचारक यांच्याबरोबर निवासी हॉटेल्स, विमान कंपन्या, रुग्णवाहिका, भाडोत्री वाहने, औषध कंपन्या, वैद्यकीय उपचारांसाठी देणगी वा कर्ज देणार्या वित्तसंस्था यांचाही सहभाग असतो.

या सर्व प्रक्रियेस ‘वैद्यकीय पर्यटन’ म्हटले जाते. या पर्यटनामध्ये आर्थिक उलाढाल खूप मोठी असते. हिंदुस्थानमध्ये अवघड शस्त्रक्रिया व असाध्य रोगांवर उपचार वाजवी खर्चात करण्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याने हिंदुस्तान सरकार या वैद्यकीय पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना देत आहे.

अर्थात अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत देशांमध्येच उपलब्ध असल्याने जरी खर्च खूप जास्त असला तरी आर्थिकरीत्या सबल असणारे रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी जात आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रशिया, चीन, सिंगापूर, थायलंड, क्युबा आदी देशांना जाणार्या रुग्णांचे प्रमाण आज तुलनात्मकरीत्या जास्त असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय पर्यटन क्षेत्रामध्ये नजीकच्या भविष्यकाळामध्ये प्रचंड वाव आहे.

सागरी पर्यटन

आपल्या देशाला कच्छपासून पश्चिम बंगालपर्यंतचा हजारो किलोमीटर्सचा समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच जगातील काही सर्वात लांब नद्यादेखील आपल्या देशात आहेत. या व इतर नद्यांच्या खाड्या आणि या नद्या, तसेच देशातील नैसर्गिक व मानवनिर्मित जलाशय यांवर अत्यंत मोठ्या प्रमाणावर सागर तथा जल पर्यटनास वाव आहे.

तरंगते राजवाडे भासणारी आलिशान मोठी जहाजे, मध्यम व छोट्या तांत्रिक नौका, तसेच सर्व आकारांच्या वार्यावर चालणार्‍या शीडनौका, पर्यटकांना हजारो मीटर्स समुद्रात खोल घेऊन जाणार्‍या पाणबुड्या ही जरी सागरी पर्यटनाची साधने असली तरी विंडसर्फिंग, स्कुबा डायव्हिंग, वॉटर-स्किइंग, स्नॉर्केलिंग या जलक्रीडांचाही समावेश सागर/जल पर्यटनामध्ये समाविष्ट आहे.

प्राणवायूची टाकी बरोबर घेऊन शेकडो मीटर्स खोल पाण्यात खाली जाऊन प्राणघातक शार्कस्, किलर व्हेल्स, स्टिंग-रेज, ईल मासे, प्रचंड देवमासे यांचे निरीक्षण करणे, खोल समुद्रातील प्रवाळांचा अभ्यास करणे, पाण्याखाली असणार्‍या गुहांचा शोध घेणे या सर्व साहसी गोष्टी सागर/जल पर्यटनामध्ये समाविष्ट आहेत. तसेच सागरकिनार्‍यावर सूर्यस्नान, नौकानयन स्पर्धा वगैरे या पर्यटनामध्ये समाविष्ट आहेत.

धार्मिक पर्यटन

मानवाच्या उत्क्रांतीपासून, अनादी काळापासून माणसाला देव ह्या संकल्पनेचे आकर्षण वाटले आहे, तसेच भयही वाटले आहे. म्हणूनच माणसाने ‘देव’ या संकल्पनेस मूर्त वा अमूर्त स्वरूपामध्ये पूजले आहे. भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीनुसार माणसाने आपले देव व आपले धर्म निर्माण केले आहेत.

आजवर जगभर कित्येक धर्म जन्मास येऊन अस्तंगतही पावले आहेत; मात्र अर्वाचीन २००० वर्षांच्या इतिहासात आजमितीस या जगामध्ये हिंदू, ज्युडाइझम्, बौद्ध, ख्रिस्तीअॅनिटी, इस्लाम, झोराष्ट्रियन हे धर्म, तसेच बहाई, शीख व जैन हे नंतर वाढलेले धर्म अस्तित्वात आहेत. या धर्मांच्या अनुयायांमध्ये आपल्या धर्माचे अधिराज्य वाढवण्यासाठी व धर्मप्रसारामध्ये भीषण रक्तलांच्छित लढाया झाल्या आहेत.

या धर्मांच्या अनुयायांनी आपापल्या धर्म-संकल्पनांच्या अनुषंगाने आपापली धर्मस्थळे म्हणजे मंदिरे, सायनागॉग, विहार, चर्च, मशिदी, अग्निमंदिरे, गुरुद्वार व स्थानके बांधली आहेत. धर्म चालवण्यासाठी धर्मगुरू, वर्षातील पवित्र दिवस, धार्मिक दिवस, विशिष्ट रीतिरिवाज निर्माण झाले आहेत व या सर्व गोष्टींची सांगड घालून, अनादी काळापासून किंवा या सर्व धर्मांच्या स्थापनेपासून धार्मिक पर्यटन सुरू झाले आहे.

या धार्मिक पर्यटनांच्या माध्यमातून वर्षातील विशिष्ट दिवशी, त्या धर्मांच्या विशिष्ट धर्मस्थानांना भेट देण्याचा पायंडा सुरू झाला आहे. अगदी आपल्या गावची देवीची जत्रा, हज, ख्रिसमस, दिवाळी, पपेटी, ईद, गुड फ्रायडे, मंगळवारी गणपतीस जाणे या सर्व गोष्टी धार्मिक पर्यटनामध्ये मोडतात.

– संजय भिडे
(लेखक ‘ट्रान्स आशियाई चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?