Advertisement
कथा उद्योजकांच्या

गोष्ट वेगाने उद्योगात गरुडभरारी घेणाऱ्या देशमुख बंधूची

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


ध्येय मोठे तर त्याचा त्रासही मोठा. त्यासोबत येणार्‍या समस्या जास्त. आणि त्या मार्गावर चालताना तो मार्गही मोठा खडतर. त्यामुळे त्रास होणारच. ‘Without Pain No Gain’ असे प्रगतिशील विचार अजिंक्य मिल्क प्रोसेसिंग प्रा.लि.चे चेअरमन हिम्मत देशमुख आणि विजय देशमुख यांचे आहेत. या दोन भावंडानी मिळून अजिंक्य मिल्क प्रोसेसिंग प्रा.लि. नावाने २०१६ साली कंपनी सुरू केलीय आणि तीन वर्षांत ३४ कोटींपर्यंत टर्नओव्हर नेऊन ठेवला.

कंपनीच्या व्हिजनबद्दल बोलताना चेअरमन हिम्मत देशमुख सांगतात ‘२०२५ च्या आर्थिक वर्षात आपली कंपनी २०० करोडचा टर्न ओव्हर करणारी कंपनी असेल आणि २०३० पर्यंत महाराष्ट्रातील दूध व्यवसायाच्या उलाढालीत १०% शेअर हा अजिंक्य मिल्क प्रोसेसिंग प्रा. लि.चा असेल’ आणि हे आत्मविश्वासाने सांगणार्‍या या उद्योजकाची गरुडभरारी खूपच प्रेरणादायी आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

हिम्मत देशमुख यांनी पदवी घेतल्यानंतर २००४ साली ते कापड व्यवसायात उतरले आणि विजय देशमुख यांनी इंजिनिअरिंगची आणि एमबीएची पदवी घेवून २००८ साली त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि टाटा कंपनीत मोलाचा अनुभव मिळवला. दरम्यानच्या काळात कापड उद्योगातून एखादी मोठी उडी घ्यावी असे दोन्ही भावांना वाटले.

यातूनच मग त्यांनी दूध कलेक्शनचे छोटे युनिट सुरू केले. यात दूध गोळा करणे, दूध चिलिंग, प्रोसेसिंग असे काम सुरू केले. यातूनच अजिंक्य मिल्क प्रोसेसिंग प्रा. लि. ही कंपनी सुरू झाली जी एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. पुढील ३ वर्षांत शेअर मार्केटमध्ये रजिस्टर करून कंपनी शेअर मार्केटमध्ये उतरवण्याची मनिषा श्री विजय देशमुख यांची आहे.

हिम्मत देशमुख उद्योजकीय प्रवासाबद्दल सांगतात की, फॅक्टरीची सुरुवात करून विविध उपकरणे व मशिनरी घेतली व प्रत्यक्ष ऑक्टोंबर २०१६ मध्ये कामाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी केवळ पाचशे लिटर दूध गोळा झाले. त्यानंतर वर्षअखेरपर्यंत हा आकडा साडेतीन हजार ते चार हजार लिटर दिवसाला इथपर्यंत गेला.

उद्योग सुरू केल्यापासून वर्ष संपेपर्यंत या आर्थिक वर्षाचा कंपनीचा टर्नओव्हर ५ कोटींचा होता. पुढच्या वर्षी हाच आकडा दिवसाला नऊ हजार ते साडेनऊ हजार लिटर दूध गोळा करू लागलो आणि मग तेवीस ते चोवीस कोटी टर्नओव्हर झाला.

यंदाच्या चालू वर्षात दूध कलेक्शन दिवसाला बारा हजार ते तेरा हजारच्या घरात आहे. त्यांच्यासारखे छोटे छोटे युनिट चालवणारे अनेक जण या क्षेत्रात मागील दहा ते बारा वर्षं कार्यरत असून त्यांचा दिवसाचा दूध कलेक्शनचा आकडा नऊ ते साडेनऊ हजारपर्यंतचा आहे.

त्यांनी हा आकडा अल्पावधीतच पार केलाय. त्यामुळे त्यांची ही खूप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. यंदा चौतीस कोटी टर्नओव्हरपर्यंत मजल मारली आहे. व्यवसायाच्या वाढीचे गणित करायचे झाले तर प्रत्येक वर्षी ६०% पर्यंत वाढ होते.

या उद्योगात अजिंक्य मिल्क शेतकर्‍यांकडून थेट दूध गोळा करते. दोन प्रकारे त्यांचे काम चालते. एक तर जे छोटे छोटे दूध कलेक्ट करणारे सेंटर आहेत त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे आणि दुध पुरवठा वाढवला. जिथे शक्य झाले नाही तेथे COCO (Company Owned Company Operated) बेसिसवर सेंटर्स सुरू केली.

जी कंपनीची स्वतःची सेंटर्स आहेत. म्हणजे जागा भाड्याने घेऊन तिथे आपली माणसे कामाला ठेवणे व दूध गोळा करणे. आजघडीला अशी ६२ सेंटर्स त्यांची स्वत:ची म्हणजेच कोको बेसिस आहेत. म्हणजेच साठ टक्के धंदा त्यांच्या स्वतःच्या सेंटर्समधून येतो.

यासाठी देशमुख यांनी स्वतःच्या रणनीती तयार केल्या होत्या. त्यातून गावागावांतून तिथल्या प्रथितयश लोकांना भेटून त्यांच्या माध्यमातून थेट शेतकर्‍यांशी जोडले गेले. यामुळे दुधाचे कलेक्शन वाढले. दर दिवशी तेरा ते चौदा हजार दूध म्हणजे खूप मोठा आकडा आहे.

त्यांच्या गावातील फॅक्टरीपासून चाळीस किलोमीटरच्या परिसरात अशीच पाच ते सहा सेंटर्स आहेत जी यांच्याप्रमाणेच दूध गोळा करण्याचे काम करते; परंतु त्यांना अजूनही यांच्यासारखा अल्पावधीत हा आकडा गाठता आलेला नाही.

सातारा जिल्ह्यातील मायणी तालुक्यात देशमुख यांची दूध प्रोसेसिंग फॅक्टरी आहे आणि पुणे पिंपरी चिंचवड मुळशी येथे मुख्य कार्यालय आहे. भविष्यात स्वतःचे प्रॉडक्ट बाजारात उतरवणार आहे. त्यामुळे मार्केटिंग वगैरेचे काम इथून पाहिले जाते.

त्यांच्या कंपनीचे अजिंक्य नावाचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. आता अजिंक्य नावाने ते मार्केटमध्ये आपली प्रॉडक्ट उतरवू शकतात आणि येत्या वर्षभरात स्वत:चे प्रॉडक्ट बाजारात उतरवण्याचे ध्येय विजय देशमुख यांचे आहे. दुधाचे अलाइड प्रॉडक्ट ते बाजारात आणणार आहेत. प्लेन दुधाचे प्रोडक्ट्स जसे की दूध, ताक, दही, तूप, पनीर अशी उत्पादने त्यांना बाजारात आणायची आहेत.

आपल्याला नेमकं काय करायचंय, काय हवंय हे विजय यांना स्पष्ट आहे. सध्या दूध गोळा करून त्यावर प्रक्रिया करून चितळेना पुरवले जाते. ‘अजिंक्य मिल्क’च्या दूध कलेक्शनचा सर्वात मोठा भाग हा चितळे डेरीला जातो तर उरलेले दूध हे ‘डोंगराई’ व ‘डायनामिक्स’ या कंपन्यांना दिले जाते.

या संपूर्ण प्रवासात अनेक अडचणी आल्या. याविषयी बोलताना हिम्मत देशमुख म्हणतात, सुरुवातीला भांडवल उभे करणे, फॅक्टरीसाठी जागा, त्याचे बांधकाम, लागणारी यंत्रे, उपकरणे, या सगळ्यांसाठी कमीत कमी दोन करोडची गुंतवणूक होती. बँक कर्ज देण्यास तयार नव्हती. तारण काही नसल्याने फंड नाही आणि त्यामुळे सगळे एकत्रित न उभारता आम्हाला मग टप्प्याटप्प्याने सुरुवात करावी लागली.

टी.व्ही.च्या एका जाहिरातीत ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या प्लॅन्सविषयी माहिती सहज मिळते तितक्या सहज लोन अथवा भांडवल मिळत नाही. हे वास्तव आहे. त्याचसोबत दूध व्यवसायाच्या संदर्भात सरकारची बदलणारी धोरणे अडचणी निर्माण करतात. उदाहरणार्थ शेतकर्‍याला मिळणारी जी सबसिडी आहे ती थेट त्यांच्या अकाऊंटला मिळणार, दूध संघाला नाही. मग त्यांची अकाऊंट्स तयार करा. ती जोडा.

या सगळ्या नवीन प्रक्रिया होतात. याचा कामाचा बोजा आमच्यावर वाढतो. तर या सगळ्यात शेतकरीसुद्धा भरडला जातो. कारण त्यांच्या अकाऊंटला सबसिडी जमा होणार म्हणजे ती आमच्याकडून लगेच मिळत नाही आणि सरकारकडून ती एक महिन्यानी किंवा त्याहून जास्त काळाने मिळते. याचा त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. ते नाराज होतात. मग दूध तुटणे, कमी होणे हे प्रकार सुरू होतात.

अजून एक मुद्दा सांगायचा तर जेव्हा या धंद्यात आम्ही नवीन होतो तेव्हा प्रत्यक्ष येणार्‍या अडचणी या वेगवेगळ्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे जून ते डिसेंबर या कालावधीत उत्पादन जास्त होते. या काळात गाईम्हशी दूधही भरपूर देतात; परंतु त्यानंतरचा काळ हा कमी उत्पादनाचा असतो. त्याला आमच्या भाषेत lack zone म्हणतात. वातावरण बदलते.

दूध उत्पादन घटते. जेव्हा दूध उत्पादन जास्त असते त्या वेळी जर दुधाची पावडर वगैरे बनवून ठेवली असेल तर ती या काळात उपयोगी पडते. पहिल्या वर्षी आम्हाला हे माहीत नव्हते, आणि त्यामुळे आम्हाला बर्‍यापैकी तोटा सहन करावा लागला. पहिल्या वर्षीच्या या अनुभवातून आम्ही शिकलो आणि पुढील वर्षी हा बदल केला, त्यामुळे आमचा तोटा भरून निघाला.

विजय देशमुख म्हणतात, आमचे एकत्र कुटुंब आहे. माझे वडीलबंधू आणि मी दोघेही फॅक्टरीचे काम पाहतो आणि बंधू हिम्मत देशमुख फॅक्टरीची ऑपरेशनल काम खूप व्यवस्थित सांभाळतात. आम्ही एकमेकांना नेहमी मदत करतो. माझ्या वहिनी आणि सौभाग्यवतीसुद्धा मदत करतात. फॅक्टरीच्या सुरुवातीच्या काळात आमचे कामगार आणि ऑफिस स्टाफ तसेच घरातील प्रत्येक सदस्याने खूप मोलाची साथ दिली.

सुरुवातीच्या काळात कधी कधी उशिरा पगार द्यावे लागले; परंतु आमच्या कामगारांनी आम्हाला खूप समजून घेतले. जेव्हा आम्हाला प्रत्यक्ष फॅक्टरीची कामं पाहायला जमत नव्हती तेव्हा वहिनी आणि बायको यांनी ती धुरा सांभाळली. त्याही दोघी हि कंपनीत डायरेक्टर आहेत.

या उद्योगात कोणाला यायचे असेल तर त्यांच्यासाठी माहिती देताना देशमुख म्हणतात, हा व्यवसाय म्हणजे खरं तर व्हॉल्यूम गेम आहे. टर्नओव्हर किंवा दूध कलेक्शन जेवढे जास्त तेवढा नफा जास्त. हा व्यवसाय दिवसाला पाच हजार लिटर कलेक्शनच्या व्हॉल्यूमचासुद्धा करता येतो आणि सोनाई किंवा चितळेप्रमाणे दर दिवशी वीस लाख लिटरपर्यंत करता येतो.

तुम्हाला कोणत्या क्षमतेनुसार युनिट उभारायचे आहे त्यानुसार खर्च आहेत. उदा. आमचे युनिट हे दर दिवशी पन्नास हजार लिटर प्रोसेसिंग क्षमता असलेले युनिट आहे.

जागा माझी स्वतःची होती; पण त्यावर फॅक्टरी बांधणे, त्यासाठी लागणारी उपकरणे, यंत्रसामग्री, ती उपकरणे कोणत्या कंपनीची आहेत त्यानुसार त्याचे गणित तसेच इलेक्ट्रिक प्लांट, जनरेटर, मिल्क प्रोसेसिंगसाठी चिलिंग प्लांट म्हणजे त्याचे शीतलीकरण करणे. यासाठी मग प्रोसेसिंगनुसार मशीन्स लागतात. फॅक्टरी बांधकाम असते. अंदाजे एक ते दीड करोडची गुंतवणूक लागेल.

सगळ्यात महत्त्वाची चिकाटी. कोणतीही परिस्थिती येवो, चिकाटी सोडू नका. जर मोठे ईप्सित साध्य करायचे आहे तर जास्त कष्ट करावे लागतील. मला वाटते पैसा जोडण्यापेक्षा माणसे जास्त जोडा. आपल्या कठीण काळात हीच माणसे आधार होतात. त्यांचा आधाराचा एक शब्दसुद्धा पुन्हा नवी उमेद देतो.

मोठे स्वप्न पाहा तरच तुम्ही मोठे व्हाल आणि तुमच्याकडे ध्येयच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे ध्येयनिश्चिती खूप महत्त्वाची आहे. ते पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करण्याची तयारी हवी. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्याची मानसिक तयारीसुद्धा असायला हवी.

चितळे, सोनई यांसारख्या मोठ्या ब्रँडप्रमाणे आपल्यालाही मोठे व्हायचंय हे स्वप्न उराशी बाळगून ध्येयाच्या मागे झपाटून मेहनत घेणार्‍या विजय देशमुखांना ‘स्मार्ट उद्योजक’ परिवाराकडून खूप सार्‍या शुभेच्छा!

विजय देशमुख : ९५४५२३६६६६

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!