नवोद्योजकांना उद्योजकतेची बाराखडी शिकवणारा ‘उद्योगमित्र’

उद्योगमित्र हा ग्रामीण तळागाळातील एखाद्या व्यवसायात उतरू इच्छिणार्‍या उद्योजकाला आपला मित्र वाटावा आणि प्रथम त्याला उद्योगमित्र आठवावा. ‘उद्योगमित्र’ म्हणजे बिझनेस इकोसिस्टिममधला लँडमार्क असावा असे ध्येय बाळगणारा ३२ वर्षीय तरुण उद्योजक विजय पवार यांचा हा प्रवास लक्ष्यवेधी आहे.

विजय पवार यांच्या ‘उद्योगमित्र’ने आजपर्यंत आठशेपेक्षा अधिक उद्योजकांना सेवा दिली आहे. सध्या १३६ उद्योग व्यवसायांना सर्विससोबत मेंटॉरशीप दिली जातेय. सध्या पुणे येथून ते व्यवसाय करतात.

विजय पवार यांचा जन्म लातूर जिल्हातील शेतकरी कुटुंबात झाला. घरात कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती. विजय लहानपणापासूनच हुशार. पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुणे, मुंबईसारख्या शहरात इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेता आले नाही. उस्मानाबादमधून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केले.

विजय यांनी हाउसकिपिंग मॅनेजमेंट हा व्यवसाय प्रथम सुरू केला. या वेळी व्यवसायात ते अगदी नवखे होते. व्यवसाय करताना अगदी व्यवसायाला नाव काय द्यावे, लोगो कसा असावा इथपासून व्यवसाय नोंदणी कशी करावी त्यासाठी काय आवश्यक असते अशा अनेक व्यावसायिक गोष्टी माहीत नव्हत्या. त्यात खूप अडचणी आल्या. या समस्यांतूनच ‘उद्योगमित्र’ या संकल्पनेचा जन्म झाला.

विजय सांगतात, ‘उद्योगमित्र’ची स्थापना २०१८ ला झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आमची सेवा देतो. गरजू नवोद्योजक आणि विविध सेवा देणार्‍या आस्थापन यांच्यातील दुवा म्हणून आज आम्ही काम करतोय. मुख्य म्हणजे उद्योजक आणि त्यांना सेवा देणारी अनेक आस्थापनेही नवीन आहेत. म्हणजेच नवोद्योजक आणि नवीन स्टार्टअप यांच्यातला दुवा म्हणून आम्ही काम करतोय.

नवीन व्यावसायिक हा सुरुवातीला जास्त खर्च करू शकत नाही त्यामुळे आम्ही याची दखल घेत कमीत कमी खर्चात त्यांना सेवा मिळवून देतो. उद्योजकाचा सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षाचा असतो. पै न पै जपून वापरावी लागते. अशा वेळी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा उद्देश आहे.

आंत्रप्रेन्योर इकोसिस्टिममध्ये उद्योजकाला आवश्यक असलेल्या अगदी आयडियापासून डॉक्युमेंटेशन, ब्रॅण्डिंग अशा सर्व सेवा एकाच छताखाली ‘उद्योगमित्र’तर्फे दिल्या जातात.

आता ग्रामीण महाराष्ट्रातला तरुण उद्योग याचा विचार करू लागलाय. मला काही तरी करायचंय अशा गोंधळलेल्या मानसिकतेत असलेल्या तरुणांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यापासून प्रत्यक्ष तो सुरू करून त्याला टिकवताना ज्या ज्या मदतीची आवश्यकता आहे. त्या सगळ्या सेवा आम्ही एका छताखाली देतो.

सुरुवातीच्या काळात स्वतःच्या काही चुकांनी मला खूप काही शिकवले. मी कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन न करता भागीदारीत केलेला व्यवसाय अचानक काही वादामुळे बिनसला आणि एकदम सर्वत्र अंधार दाटला. एक क्षण आत्महत्येचाही विचार मनाला स्पर्शून गेला.

महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि संघर्षाचा आलेख डोळ्यांसमोरून गेला. लगेच मनाला सावरले आणि आपण इतरांचे ब्रॅण्ड उभे करायचे काम करतोय तर आपला का नाही करता येणार या विचाराने पुढे सरसावलो. मग मागे वळून पाहिले नाही.

आयुष्यात स्थिरस्थावर व्हायचे म्हणजे एक चांगली नोकरी असावी आणि त्यासाठी नीट शिक्षण पूर्ण करावे अशीच माझ्या शेतकरी कुटुंबाची इच्छा होती. त्यामुळे सुरुवातीला दोन वर्षे मी त्यांना व्यवसायाविषयी काही सांगितले नाही. व्यावसायिकाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण आहे.

मुलीचं कुटुंब यासाठी तयार नसते. ही वास्तविकता आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांना मी जेव्हा व्यवसाय करतो असे सांगितले तेव्हा तुला लग्नासाठी मुलगी कशी मिळेल अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. पण मी सगळ्यांना विश्वासात घेऊन समजावले.

विजय यांनी लिहिलेले ‘बाराखडी उद्योजकतेची’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आणि पहिली आवृत्ती अवघ्या दोन महिन्यात संपली. पुस्तक प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. त्यावेळी मोठमोठ्या लोकांमध्ये आपल्या मुलाच्या कार्याचा कौतुक सोहळा पाहून कुटुंबीयांचा ऊर अभिमानाने आणि आनंदाने भरून आला.

व्यवसाय हा पारंपरिक आणि स्टार्टअप अशा दोन भागात विभागला आहे. आजचा तरुण सुरुवातीला अगदी जोशात असतो. रात्रीचा दिवस करून राबायलासुद्धा सुरुवातीच्या काळात तयार असतो, पण हळूहळू तो जोश कमी होतो. इथेच व्यावसायिक गणित चुकू लागते.

व्यवसाय म्हटले की भरपूर पैसा मिळणार असे अनेकांच्या डोक्यात असते. ही धारण चुकीची आहे कारण सुरुवातीला आपल्याला व्यवसायाला खूप जास्त वेळ आणि आपला पैसा गुंतवावा लागतो. हे समजून घ्यायला कमी पडतात. चुकीचे आर्थिक व्यवस्थापन, सामाजिक अनास्थासुद्धा उद्योग बंद करायला खतपाणी घालतात.

आपण जे करतोय ते पडताळून पाहणे प्रत्येक उद्योजकाला जमायला हवे. डोक्यावर बर्फ ठेऊन आणि जिभेवर साखर पेरून पुढे जायला हवे. तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असते. सध्या अनेक अमर्याद संधी आहेत. प्रत्येक गोष्टीला चांगले-वाईट पैलू असतातच.

अभ्यासपूर्वक साधनांचा पुरेपूर वापर करत, बदल स्वीकारता यायला हवे. आपल्या मतांवर ठाम राहायला हवे. दुर्दैवाने आपल्याकडे याच सगळ्या गोष्टीची जागरूकता कमी आहे. गरजवंताला योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक मदत वेळीच मिळण्यासाठीच ‘उद्योगमित्र’ची उद्योजकांना किती जास्त आवश्यकता आहे हे यातूनच कळते.

– प्रतिभा राजपूत
संपर्क : विजय पवार – 9765892127

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?