शेतकऱ्यांच्या मुलांनाच प्राधान्याने नोकरी देणारे विजय शेळके

मराठी माणूस धंदा-व्यवसायात मागे दिसतो याची अनेक कारणे आहेत. मुळात त्याच्यात व्यवसायाला लागणारी उद्योजकतेची वृत्ती कमी असते; पण हे सरळपणे मान्य न करता तो इतर कारणे देत बसतो आणि स्वत:चीच फसवणूक करून घेतो. बहुतेकदा आपल्याजवळ भांडवल नाही, अशी त्यांची तक्रार असते.

भांडवल मिळाले तरी बाजारात स्पर्धा खूप आहेत, धंद्यात लांडीलबाडी करावी लागते, ती आपल्याला जमत नाही, वगैरे एक ना अनेक कारणे तो सांगत असतो. खरे म्हणजे व्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्‍त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे तुमची प्रबळ इच्छाशक्‍ती. ती जर तीव्र असेल तर इतर सर्व भौतिक अडचणींवर मात करता येते.

पुण्याच्या ‘स्कायलार्क इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीज’चे संचालक विजय नवनाथ शेळके यांच्याजवळ व्यवसायाला लागणारी कोणतीच गोष्ट नव्हती. त्यांच्याजवळ ना भांडवल होते, ना जागा, ना त्यांच्या घरात व्यवसायाची कोणती परंपरा होती; पण केवळ प्रबळ इच्छाशक्‍तीच्या जोरावर त्यांनी आज दहा करोडचा टर्नओव्हर आणि अनेक देशांत आपल्या मालाची निर्यात करण्याइतकी मजल मारली आहे.

आपली जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि बाजारपेठेतील संधी अचूकपणे शोधून त्यावर प्रयोगशील वृत्तीने इनोव्हेशन्स करण्याच्या जिवावर त्यांनी हे सारे साध्य केले आहे. त्यांची कहाणी म्हणजे आपल्या निष्क्रियतेवर बाह्य गोष्टींच्या कमतरतेचे पांघरूण घालणार्‍या सर्वांसाठी झणझणीत अंजन आहे.

विजय नवनाथ शेळके यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९८४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरजवळच्या चिलाईवाडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात झाला. त्यांचे वडील नवनाथ हे एक सामान्य शेतकरी होते. त्यांच्या पाच अपत्यांपैकी विजय हे सर्वात धाकटे. लहानपणी त्यांना शेतीतील सर्व कामे करावी लागत.

गुरांच्या धारा काढणे, शेतात कीटकनाशक फवारणे वगैरे कामे करीत त्यांना शिकावे लागले. सहा किमी दूरच्या गावी पायी चालत जाऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या चुलत-मावस परिवारातले मॅट्रिक पास होणारे ते पहिलेच होते. यावरून त्यांच्या घरातल्या शैक्षणिक स्थितीची कल्पना यावी. घरात कोणीच सुशिक्षित नसल्याने मॅट्रिकनंतर काय करायचे याबाबतही त्यांना मार्गदर्शन करायला कोणी नव्हते.

का कोण जाणे, पण शालेय जीवनापासूनच त्यांना व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा होती…

पुढे त्यांनी सोलापूरच्या नामांकित कॉलेजातून पदवी संपादन केली व नंतर हुबळीच्या आयबीएमआर या प्रतिष्ठित कॉलेजातून एमबीए केले. हे कॉलेज देशातील १० सर्वोत्तम कॉलेजांत गणले जाते. विजय शेळके यांना केवळ हुशारीच्या बळावर तिथे प्रवेश मिळाला होता.

जरी स्वत:चा व्यवसाय करायचा असे मनात होते तरी सुरुवातीला काही काळ त्यांनी काही इंजिनीअरिंग कंपन्यांत नोकरी केली. या कंपन्यांमध्ये त्यांना प्रॉडक्शन आणि मार्केटिंग या दोन्ही विभागांत काम करावे लागले. त्यातूनच ते घडले. मार्केटिंगसाठी त्यांना बाहेर फिरावे लागायचे. त्यातून त्यांचा जनसंपर्क वाढला.

या जनसंपर्कातूनच त्यांना स्वत:साठी पहिली ऑर्डर मिळाली. ऑटोमोबाइलचे पार्ट्स बनवणार्‍या चाकणच्या यश इंडस्ट्रीज या प्रख्यात कंपनीला स्पेअर पार्ट्स ठेवायचे प्लास्टिकचे ट्रे स्वच्छ धुण्यासाठी एका प्लास्टिक कंपोनंट वॉशिंग मशीनची गरज होती. विजय शेळके यांनी आपण ती पुरवू शकू, असे आत्मविश्वासाने सांगितले.

कंपनीची गरज समजल्यावर विजय शेळके यांनी तिचे ड्रॉइंग बनवले. ते कंपनीला पसंत पडले. कंपनीने ऑर्डर दिली खरी, पण ती पूर्ण करण्यासाठी विजय शेळके यांच्याजवळ ना भांडवल होते, ना मशीन्स, ना जागा.

पण इच्छाशक्‍ती तीव्र असेल तर अडचणींतून मार्ग निघतो. त्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टींची पूर्तता केली. ज्या कंपनीने ऑर्डर दिली त्यांनीच काही अ‍ॅडव्हान्स दिला व तो जॉब कुठे बनवता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे विजय शेळके यांनी तो जॉब बनवला. तो इतका उत्तम बनला होता की, त्या रेफरन्सेसने त्यांना त्याच प्रकारच्या मशीन्सच्या पुढे अनेक ऑर्डर्स मिळत गेल्या.

ऑटोमोबाइल स्पेअर पार्ट्स जिथे जिथे बनतात तिथे ते साठवण्यासाठी प्लास्टिक क्रेट लागतात. डिलिव्हरीही क्रेटमधूनच केली जाते. जेव्हा हे क्रेट परत येतात तेव्हा त्यांच्यावर बरेचदा ग्रीस, ऑइल, वंगण चढलेले असते. दुसरी डिलिव्हरी देण्यापूर्वी हे क्रेट्स स्वच्छ धुवायला लागतात. हे काम हाताने करता येत नाही. विजय शेळके हे क्रेट धुण्याच्या मशीन्स बनवतात. त्यांनी बनवलेल्या मशीन्स बघून त्यांना अशाच तर्‍हेच्या मशीन्सची इतर अनेक ठिकाणांहून ऑर्डर येऊ लागली.

सरकारी क्षेत्रातील कंपन्या भिलाई स्टील प्लांट, भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड आणि चेन्नईची मेट्रोचे डबे बनवणारी कंपनी इंडियन मॉडर्न कोच फॅक्टरीने त्यांना ऑर्डर दिली. त्यामुळे ते तुलनेने लवकर आपल्या व्यवसायात स्थिर झाले. आता त्यांनी बनवलेल्या प्लास्टिक कंपोनन्ट व ट्रे वॉशिंग मशीन्सना प्रायव्हेट सेक्टरमधील होण्डा, कॉन्टिनेन्टल, जेबीएम, मिण्डा या कंपन्यांकडूनही मोठी मागणी आहे.

विजय शेळके यांचे वैशिष्ट्य हे की, एका प्रकारच्या मशीन्समध्ये मास्टरी मिळवल्यावर ते तिथेच अडकून पडले नाहीत. ते आपल्या मशीन्समध्ये वेगवेगळ्या सुधारणा, इनोव्हेशन्स करीत राहिले.२०१४-१५ मध्ये काही काळ त्यांच्या व्यवसायात मंदी आली तेव्हा त्यांनी अन्य पूरक उत्पादनांचा विचार सुरू केला. त्यातून त्यांची अन्य उत्पादनांची साखळी सुरू झाली. ही साखळी आता खूप मोठी झाली आहे.

ऑटो स्पेअर पार्ट्सचे क्रेट धुताना त्यांना ग्रीस, ऑइल लागलेले असते. धुतल्यावर ते पाण्यावर तरंगते. सरकारच्या नवीन नियमांनुसार ऑटो आणि हॉटेल इंडस्ट्रीलाही त्यांच्या भटारखान्यातील तेल थेट सांडपाण्यात वा गटारांत सोडायला परवानगी नाही. त्यामुळे पार्ट्स धुतलेल्या पाण्यातले हे तेल कसे वेगळे काढता येईल यावर त्यांनी संशोधन केले.

त्यातून त्यांच्या ऑइल स्टीमर या नव्या प्रकारच्या मशीन्सचा शोध लागला. या मशीन्सद्वारे हे तेल शोषून घेतले जाते व निव्वळ पाणी गटारात सोडले जाते. सर्व साखर कारखान्यांतही ही मशीन्स लागतात.

त्याचप्रमाणे त्यांचे अजून एक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट म्हणजे ऑपरेशन्स थिएटरमध्ये लागणारे लॅमिनर एअर फ्लो मशीन्स. कोणत्याही ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया चालू असताना शुद्ध आणि निर्जंतुक हवेची गरज असते. ऑपरेशन थिएटरमधील सर्व बॅक्टरिया मारून तिथे हवा सतत खेळती ठेवावी लागते.

यादृष्टीने संशोधन करून त्यांनी लॅमिनर एअर फ्लो सिस्टम्स बनवल्या. त्यांनाही आता वैद्यकीय जगतातून वाढती मागणी आहे. त्यांच्या मशीन्स आता भारतात गुजरात, दिल्‍ली, फरिदाबाद, कोलकाता, जमशेदपूर, चेन्नई इत्यादी ठिकाणी जातात, तर श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, दुबई वगैरे ठिकाणी निर्यात होतात.

अशा तर्‍हेच्या एकूण ३२ वेगवेगळ्या मशीन्स विजय शेळके यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. आपल्या कंपनीला लागणारा कच्चा माल ते थेट चीनमधून आयात करतात. त्यासाठी ते अनेकदा चीनला जाऊन मुक्‍काम करतात. आता पुण्यातील धायरी येथे त्यांची दहा हजार चौ. फुटांची फॅक्टरी आहे. त्यात ४० कर्मचारी काम करतात.

ऑटो इंडस्ट्री ही दिल्‍ली, हरयाणा-गुरगाव येथे केंद्रित झालेली आहे. विजय शेळके यांचे बरेचसे क्लायंट गुरगावला आहेत. त्यांना चांगली व तत्पर सेवा देता यावी म्हणून त्यांनी मानेसर गुरगाव येथेही एक शाखा काढली आहे. त्यांचे काही कर्मचारी तिथे असतात. विजय शेळकेही महिन्यातला एक आठवडा गुरगावला असतात.

जास्तीत जास्त लोकांना रोजगार पुरवता यावा, अशी विजय शेळके यांची इच्छा आहे.

ते स्वत: एका शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकर्‍यांच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगार पुरवण्यावर त्यांचा भर असतो. तसेच त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक मित्रांनी मदत केली. शरद चौगुले नावाच्या एका मित्राने तर आपल्या तुटपुंज्या पगारातून त्यांना काही काळ आर्थिक मदत केली होती.

याची जाणीव ठेवून ते आता अनेकांना व्यवसायात उतरण्यासाठी मदत करतात. त्यांच्याकडून सल्‍ला, मार्गदर्शन घेऊन आजवर अनेक होतकरू तरुणांनी आपापले व्यवसाय उभारले आहेत. त्यातील काहींनी तर विजय शेळके यांच्यापेक्षाही जास्त प्रगती केलेली आहे.

मराठी तरुणांना ते सल्‍ला देतात की, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपल्या प्रयत्नांत अपयश आले तर खचून जाऊ नका, प्रयत्न सोडू नका. उलट जास्त जोमाने प्रयत्न करा. आयुष्यात यश मिळवण्यासाठी प्रयत्नांत सातत्य ठेवले पाहिजे. कष्ट करण्याची तयारी, संधी हेरण्याची नजर आणि प्रयोगशील वृत्ती असेल तर यश तुमचेच आहे. आता टू-फोर व्हीलर गाड्यांच्या सर्व्हिसिंगबाबत ते एक नवे अ‍ॅप डेव्हलप करीत आहेत.

बरेचदा कामाच्या व्यापामुळे आपल्याला आपल्या टू व्हीलर वा फोर व्हीलर गाडीची सर्व्हिसिंग करायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत या मोबाइल अ‍ॅपद्वारे ग्राहक आपले काम करीत असताना जवळच्या सर्व्हिस सेंटरद्वारे त्याची गाडी घेऊन जाऊन, सर्व्हिसिंग करून ती परत त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचती करण्याची सेवा ते पुरवणार आहेत. विजय शेळके यांना यश हे त्यांच्या या संशोधक व प्रयोगशील वृत्तीमुळेच मिळालेले आहे.

संपर्क – विजय शेळके
९८६०१४५७४५

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?