उद्योजकाचे नाव : विजय शांताराम जाधव
व्यवसायाचे नाव : विलास क्रिएशन
जिल्हा : नाशिक
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
जन्मदिनांक : १ जून १९७४
व्यवसाय स्थापना वर्ष : १ ऑक्टोबर २०१०
नाशिकच्या देवळा तालुक्यातील खुंटेवाडी राहणारे विजय जाधव लहानपणापासून सुतारकाम बघत मोठे झाले. घरात त्यांचे वडील टेबल, खुर्ची आदी बनवण्याचे काम करायचे. पुढे बातमीदारीचे काम करताना अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. त्या वेळी त्यांना जाणवले की, आपण उद्योग, व्यवसाय केल्यानंतरच प्रगती साधता येऊ शकते.
हे लक्षात घेऊन नवीन काही तरी करायला हवे याचा शोध सुरू केला. बाजारात जी गोष्ट उपलब्ध नाही, पण लोकांना घ्यायला आवडेल असे काही तरी शोधले पाहिजे असा विचार त्यांनी सुरू केला. पुढे या प्रवासातून कलात्मक बैलगाड्यांची निर्मिती त्यांनी केली. या बैलगाड्या लोकांना खूप आवडल्या.
यातून पुढे चिमण्यांसाठी घरे, घोडागाडी, अशा अनेक वस्तू बनवण्याचे काम सुरू केले. लोकांचा चांगला प्रतिसाद बघून ‘विलास क्रिएशन्स’ची मुहूर्तमेढ रोवली. आता या अंतर्गत सर्व दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या लाकडी वस्तूंची निर्मिती केली जाते.
आपल्या व्यवसायाविषयी अधिक माहिती देतांना ते सांगतात की, शेतकऱ्यांच्या जगण्याचा कधी काळी बैल हा एकमेव आधार होता आणि बैलगाडी हेच साधन प्रत्येक कामासाठी वापरले जात असे, परंतु कालानुरूप बैल व गाडी मागे पडत गेले असले, तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात कायम आहेत.
या तयार करत असलेल्या बैलगाडीची प्रतिकृती इतकी लोभस व आकर्षक आहे की प्रत्येक जण तिच्या मोहात पडतो. यामुळेच या बैलगाड्यांना देशांतर्गत तर मागणी आहेच पण आता परदेशातूनही मागणी होऊ लागल्याने ती ग्लोबल झाली आहे.

या बैलगाड्या ओमान, झांबिया या देशांत पाठवल्या असून मलेशिया व इतर इंग्लड, अमेरिका, युरोप आदी देशांतून बैलगाडी पाठवा, असे मेसेज जाधव यांना आले. आता ‘ही’ बैलगाडी ग्लोबल झाली आहे.
परदेशासह या आकर्षक बैलगाड्यांना बेळगाव, गुलबर्गा (कर्नाटक), तमिळनाडू, केरळ, पंजाब, छत्तीसगड यांच्यासह पुणे, मुंबई, रत्नागिरी, बुलढाणा, औरंगाबाद, सातारा, नाशिक आदी ठिकाणांहून मागणी असून आतापर्यंत या ठिकाणी पाच हजारांपेक्षा जास्त नग पाठवले आहेत.
यूट्यूब चॅनल, फेसबुक, व्हॉट्सॲप यावरून या कलाकृतीची जाहिरात केली जाते. सागवानी लाकूड, उत्कृष्ट क्वालिटीचे एमडीएफ प्लाय, फायबरचे बैल व शेतकरी कुटुंब, पितळेची चाकांची धाव व घुंगरू यातून ही बैलगाडी साकारली जाते. सूक्ष्म कोरीवकाम, रंगरंगोटी, आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध व कुंदन नक्षीकाम असल्याने ही कलाकृती प्रत्येकालाच भावते.
लहानमोठ्या तीन-चार आकारांत बैलगाडी बनवली जात असली तरी २० इंच लांब, १० इंच रुंद व आठ इंच उंची असलेल्या मध्यम आकाराच्या बैलगाडीला सर्वाधिक मागणी आहे. पूर्ण संचाची किंमत पाच हजार रुपये असली तरी परदेशात पाठवताना ५५० रुपये प्रति किलो खर्च वाढतो.
तोफ ठेवलेली बैलगाडी, घोडा, चिमण्यांची घरटी, शैक्षणिक साहित्य व इतर विविधांगी लाकडी साहित्य ते बनवतात. ही उत्पादने तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा स्थानिक बाजारपेठेतूनच घेतला जातो. या व्यवसायातून साधारपणे वर्षाला १५ ते १८ लाखांची उलाढाल होते.
विजय यांच्या या कामात त्यांना पत्नी वंदना, मुलगा प्रणव यांचे नेहमीच सहकार्य असते. विशेष करून त्यांचा मुलगा प्रणवने आता व्यवसायाची धुरा सांभाळत आहे. यासाठी त्याने वडिलांकडून धडे घेतले आहेतच. सोबतच आवश्यक असलेला कारपेंटरीचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. आता सुंदर, रेखीव अशा नवीनपूर्ण कलाकृती तयार करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे.
आपल्या आतापर्यतच्या वाटचालीविषयी बोलतांना विजय सांगतात की, उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्या उद्योगात नावीन्यता असणे खूप गरजेचे आहे. बाजारात आपल्यासारखे काम करणारी दहा दुकाने आहेत मग ग्राहकाने आपल्याकडे का यावे याचे उत्तर शोधले पाहिजे.
सोबतच बाजारपेठेत नवीन ग्राहक शोधण्यासाठी आधुनिक संवादमाध्यमांचा वापर केलाच पाहिजे यातून मोठी भरारी घेण्यासाठी नक्कीच मदत होते. मला याचा फायदा झाला आहे. योग्य ग्राहक अचूकपणे शोधता येतो. आपल्या उत्पादनाबाबत अधिक ते सांगतात की, ही उत्पादने आपल्या देशातील कलात्मक आणि शेतीचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित करते.
सजावटीच्या उद्देशाने ही हस्तकला घरात, कार्यालयात ठेवण्यासाठी तसेच संस्मरणीय भेट देण्यासाठी या बैलगाडीला परदेशातूनही मागणी वाढल्याने आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो असे ते आनंदाने सांगतात.
संपर्क क्रमांक : 8698786854
ई-मेल : vilascreation80@gmail.com
संकेतस्थळ : https://m.youtube.com/c/Vijayjadhavsutar
व्यवसायाचा पत्ता : खुंटेवाडी, ता. देवळा (नाशिक)
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.