उद्योगोपयोगी

मराठी उद्योजकांमध्ये ‘ब्रॅण्डिंग’बद्दल जागरूकता आवश्यक : विकास कोळी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मराठी उद्योजकांमध्ये ‘ब्रॅण्डिंग’ हा अतिशय दुर्लक्षित व त्याहीपेक्षा जास्त बरेच गैरसमज असलेला विषय आहे. त्यामुळे योग्य प्रकारे ब्रॅण्डिंगच्या पद्धतींचा वापर करून हळूहळू आपला ब्रॅण्ड विकसित करणार्‍या मराठी उद्योजकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. शिवाय या क्षेत्राबद्दल आता नव्याने जाणीव होऊ लागल्याने त्यात बर्‍याच संधी उपलब्ध होत असल्यामुळे बरेच जण आपण ब्रॅण्डिंग करून देतो वा ब्रॅण्ड एक्स्पर्ट आहोत असा दावा करत आहेत.

मराठी उद्योजक अशा कोणाच्याही नादी लागून आपले पैसे फुकट घालवतात आणि मग त्यांचा ब्रॅण्डिंगवरचा उरलासुरला विश्‍वासही उडून जातो. वरील कारणांमुळे ब्रॅण्डिंगबद्दल समाजात योग्य ती जाणीव-जागृती करण्याची गरज आहे. विकास कोळी हे ब्रॅण्डिंग क्षेत्रातील आपल्या सतरा वर्षांच्या अनुभवानंतर मराठी उद्योजकांसाठी एक विशेष ‘ब्रॅण्डिंग बॉक्स’ घेऊन आले आहेत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

‘ब्रॅण्डिंग बॉक्स’च्या माध्यमातून विकास कोळी हे फक्त मराठी उद्योजकांचे ब्रॅण्ड उभे करण्यावर काम करणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि प्राविण्याचा उपयोग प्रत्येक मराठी उद्योजकाला व्हावा यासाठी स्मार्ट उद्योजकचे संपादक शैलेश राजपूत यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद…

‘ब्रॅण्डिंग बॉक्स’ या संकल्पनेच्या जन्माची कथा सांगताना विकास कोळी म्हणाले, ‘ब्रॅण्डिंग बॉक्स’ची सुरुवात तशी म्हणाल तर मी सिंगापूरला शिकायला होतो त्या ठिकाणी खर्‍या अर्थाने झाली. तिथे आमचे एक शिक्षक होते त्यांचा स्वत:चा डिझाइन स्टुडिओ होता. मी हुशार होतो त्यामुळे मला त्यांनी स्वत: त्यांच्या स्टुडिओत बोलावले. त्याच ठिकाणी खरं तर ‘ब्रॅण्डिंग बॉक्स’ माझ्या या संकल्पनेचा जन्म झाला.

त्यांच्या स्टुडिओत एक वेगळेपण होतं. त्यांच्या स्टुडिओच्या भिंतींवर वेगवेगळे ब्रॅण्ड होते, पण ते फक्त आशियातीलच होते. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनिंग केले जात असे. अगदी लोगोपासून, ब्रोशर डिझायनिंग ते ब्रॅण्ड पोझिशनिंगपर्यंत. मी उत्सुकतेने त्यांना विचारले तुमच्याकडे कॅडबरी, नेस्टले असे ब्रँड नाहीत? त्यावर ते म्हणाले आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचे नाही, कारण ते अमेरिकेतील ब्रँड आहेत. आम्हाला केवळ आशियाई ब्रँडसोबतच काम करायचं आहे. ही आमची तत्त्वं आहेत.

एवढी मोठी कंपनी असून त्यांना केवळ आशियाई ब्रॅण्डसाठीच काम करायचं आहे, हे पाहून माझे डोळे उघडले. ते व्हिएतनाममधल्या एका छोट्या शेतकर्‍याच्या बियाण्याच्या ब्रँडसाठी काम करायला तयार होते, परंतु अमेरिका किंवा युरोपीय ब्रँडसोबत त्यांना काम करायचं नव्हतं.

डॉमिनोज कशासाठी प्रसिद्ध आहे? ९९ टक्के लोक उत्तर देतात की पिझ्झासाठी प्रसिद्ध आहे, पण हे चूक आहे. डॉमिनोज प्रसिद्ध आहे ते म्हणजे ३० मिनिटात घरपोच डिलिव्हरीसाठी. त्यामुळे तुम्ही डॉमिनोजच्या जाहिराती पाहा, ‘खुशीओं की होम डिलिव्हरी’, ‘३० मिनट मे होम डिलिव्हरी’ इ. इ. त्या ३० मिनिट यावरच फोकस केलेल्या असतात. हे त्यांचं पोझिशनिंग आहे.

त्या स्टुडिओतून निघाल्यावर माझ्या डोक्यात विचारांची चक्र सुरू झाली. एवढी मोठी कंपनी स्थानिकांच्या हिताला एव्हढे प्राधान्य देते, तर आपण आपल्या मराठी उद्योजकांसाठी काही करायला नको का? एक मराठी माणूस असल्यामुळे मला या गोष्टीची जाणीव होती की, मराठी माणूस ब्रँडिंगवर लक्ष्य केंद्रित करत नाही.

मराठी उद्योजकामध्ये असलेल्या ब्रॅण्डिंगबद्दलच्या अनास्थेचा अभ्यास केला तेव्हा काही निष्कर्ष माझ्या डोळ्यांसमोर आले. त्यातील सर्वात मुख्य गोष्ट होती ब्रॅण्डिंगबद्दल मराठी उद्योजकांमध्ये असलेले विविध गैरसमज. हे गैरसमज त्याच्या डोक्यातून काढून टाकणे व ब्रॅण्डिंगबद्दल जागृती निर्माण करणे याचसाठी आम्ही ‘ब्रॅण्डिंग बॉक्स’ या संकल्पनेला जन्म दिला.

आम्ही त्यापूर्वी लोगो बनवायचो, ब्रोशर बनवायचो, ब्रँडिंग करायचो, मोठमोठ्या कंपन्यांसाठी जसे की पँटलुन, शॉपर्स स्टॉप, टॉमी हिलफिगर इ. मग हेच आपण मराठी उद्योजकांसाठी करायचं असं ठरवलं. यासाठी आम्ही लोकांमध्ये गेलो. मराठी उद्योजक काय करतो, ब्रँडींग म्हणजे काय समजतो, याचा अभ्यास करू लागलो. यातून अनेक प्रश्‍नांची उत्तरं मिळू लागली.

विशेषत: मराठी उद्योजकांमध्ये ब्रँडिंगविषयी असलेले अनेक प्रकारचे गैरसमज समजू लागले. गैरसमज असे होते की लोकं लोगोला ब्रँडिंग समजतात. माझा व्यवसाय अजून लहान आहे मला ब्रँडिंगची गरज नाही, ब्रँडिंग म्हणजे खर्चिक गोष्ट वगैरे. वगैरे. यातून असे लक्षात आले की हे जे गैरसमज आहेत हे आपण सहज सोडवू शकतो. उदाहरण घ्यायचे झाले तर खर्च ही गोष्ट घेतली तर आपण त्याला आपल्या बजेटमध्ये बसवू शकतो.

सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की लोक लोगोला ब्रँडिंग समजतात, परंतु लोगो म्हणजे ब्रँडिंग नव्हे; तर ब्रॅण्डिंग म्हणजे आपली मोजता न येऊ शकणारी संपत्ती असते. ती आपण निर्माण केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मराठी माणूस हा आपल्या ब्रॅण्ड पोझिशनिंगवर अजिबात काम करत नाही. तो ग्राफिक क्रिएटिव्ह कसे असेल, ते चांगलं कसं दिसेल यावर जास्त काम करतो. उदाहरण द्यायचं झालं तर मी कित्येक लोकांना प्रश्‍न विचार तो की, डॉमिनोज कशासाठी प्रसिद्ध आहे? ९९ टक्के लोक उत्तर देतात की पिझ्झासाठी प्रसिद्ध आहे, पण हे चूक आहे.

डॉमिनोज प्रसिद्ध आहे ते म्हणजे ३० मिनिटात घरपोच डिलिव्हरीसाठी. पिझ्झा तर पिझ्झाहट, पापाजॉन असे हजारो लोक बनवतात, परंतु डॉमिनोज प्रसिद्ध आहे ते ३० मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी. ते त्यावर काम करतात. त्यामुळे तुम्ही डॉमिनोजच्या जाहिराती पाहा, ‘खुशीओंकी होम डिलिव्हरी’, ‘३० मिनट मे होम डिलिव्हरी’ इ. इ. त्या ३० मिनिट यावरच फोकस केलेल्या असतात. हे त्यांचं पोझिशनिंग आहे. यावरच ते काम करतात.

मराठी उद्योजकांनी आपल्या ब्रॅण्डच्या पोझिशनिंगवर काम केलं पाहिजे. जसं की चितळ्यांची बाकरवडी आणि श्रीखंड फेमस आहे. तसं पाहता चितळ्यांचे इतर अनेक प्रोडक्ट आहेत, पण आपण याच गोष्टींसाठी चितळेंना ओळखतो. त्यांच्या या पोझिशनिंगचा अभ्यास करायला हवा. एखाद्याची पुरणपोळी खूप चांगली असते, पण कशासाठी ती चांगली आहे हे सांगायला हवे. आम्ही अनेक प्रदर्शनांना भेटी दिल्या. त्यात अनेक प्रकारचे मराठी उद्योजकांची प्रॉडक्ट्स पाहिली.

मराठी उद्योजकाची प्रॉडक्ट्स खूप चांगली असतात, परंतु पॅकेजिंग योग्य दर्जाचे नसते. पॅकेजिंग नसेल तर तुम्ही लोकल मार्केटमध्येच विकू शकता. त्याला एक्सपोर्ट करूच शकत नाही. त्यासाठी चांगलं पॅकेजिंग हवे, ते वेगळ्या नॉर्म्समध्ये बसते की नाही हे सांगणारे इंडस्ट्रीत कोणी नाही, असे मला वाटते. हे सगळे आम्ही ब्रँडिंग बॉक्समध्ये कव्हर करतो.

लोगो कसा दिसावा याऐवजी का असावा?

लोगो तयार करण्यापूर्वी तुम्हाला लोगो का असला पाहिजे? कसा असला पाहिजे? तुमच्या ब्रॅण्डची ध्येयधोरण लोगोमधून कळली पाहिजेत. अनेक लोकं असं विचारतात, ब्रँडिंगमध्ये लोगोने सुरुवात झाली पाहिजे ना? तर तसं नाही. तुमच्या ब्रॅण्डच्या पारदर्शकतेने तुमच्या ब्रॅण्डिंगची सुरुवात झाली पाहिजे. काही लोकं विचारतात, मी अजून लहान उद्योजक आहे आता गरज नाही.

मी त्यांना विचारतो, मुलांवर संस्कार कधी करायचे असतात. जेव्हा लहान असतो तेव्हाच आपण संस्कार करू शकतो. तसेच उद्योगावरही तो लहान असतानाच संस्कार करायचे असतात. मग मोठा झाल्यावर तो चांगला होतो. हाच तो काळ असतो जेव्हा तुम्ही उद्योगावर चांगले संस्कार करू शकता व ब्रँड तयार करू शकता. मग तो ब्रॅण्ड मोठा होतो.

अन्य भाषिक व्यापारी मराठी उत्पादकाकडून माल विकत घेतात. त्यावर स्वत:चं वेष्टन लावून, स्वत:चं ब्रॅण्डिंग करून तोच माल बाजारात विकतात. उदा. एखाद्याकडून ३० रुपयाला गूळ घेऊन तोच गूळ स्वत:चं लेबल लावून ४० रुपयाला डी-मार्टला विकतो. या व्यापार्‍याकडून घेतला गूळ चांगलाच मिळणार हे डी-मार्टला ठाऊक असते, त्यामुळे तो कुठून आणतो याचा अभ्यास करायला डी-मार्ट जात नाही. त्यांना फक्त तो ४० रुपयात चांगला गूळ मिळतोय याच्याशीच कर्तव्य असते. हे लेबलिंग, पोझिशनिंग मराठी माणसाने करण्याची गरज आहे.

मराठी उद्योजक जे उत्पादन करतो त्याची गुणवत्ता उत्कृष्ट असते, परंतु त्याला ते विकता येत नाही. खाद्यपदार्थांचा विचार केला तर आपल्याकडे एक उत्कृष्ट खाद्यपदार्थ आहे ते म्हणजे थालीपीठ. आपल्याला ढोकळा, ठेपला, डोसा हे पदार्थ माहीत आहेत, परंतु अमराठी लोकांना आपलं थालीपीठ तितकंसं माहीत नाही. हा खूप पौष्टिक पदार्थ आहे. कमी कॅलरिजचं आणि अनेक धान्यपदार्थांचं मिळून बनवलेलं थालीपीठ खाण्याऐवजी लोक डोसा खातो, कारण लोकांना डोसा ठाऊक आहे. आपण थालीपीठला हे ब्रॅण्ड करूच शकलो नाही.

एकदा मी पावसला गेलो होतो. तिथे मठाच्या बाहेर आंब्याचं पन्ह आणि कोकम सरबत विकणार्‍या विक्रेतेच्या स्टॉल होता. लोकल बाटलीतून तो ते सरबत विकत होता. अत्यंत चवीष्ट असे ते पेय होतं. त्याचा दिवसाचा गल्ला १० हजार होता. तो २ हजार बाटल्या दिवसाला विकतो.

तो साध्या बाटलीत ते विकतो. त्याने जर त्याचा ब्रँड तयार केला तर तो पावसच्या बाहेत अख्ख्या कोकणात, महाराष्ट्रात, देशात इतकेच नव्हे तर जगभर विकू शकतो. हे दुर्दैव म्हणावं लागेल की इतकं सुंदर प्रॉडक्ट ब्रॅण्डिंगच्या अज्ञानामुळे जगाला माहीत नाही.

ज्यांचा पारंपारिक व्यवसाय सुरू आहे त्यांनी ब्रॅण्डिंगकडे कसे पाहायला हवे, यावर बोलताना विकास कोळी म्हणाले, लोकं हळूहळू आपल्या व्यवसायाकडे गांभिर्याने पाहू लागली आहेत. अनेक लोकं आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात आम्हाला आमचा उद्योग वाढवायचा आहे. आम्ही त्यांना सांगतो. हा जो तुमचा विचार आहे हाच खूप क्रांतिकारक आहे. हीच तुमची बदलाची सुरुवात आहे.

आम्ही अनेक उद्योजकांना त्यांच्या नावात बदल सुचवलेत. आम्ही आमच्या सिस्टीमचा वापर करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं समाधान होईल अशाप्रकारे नावात साधर्म्य साधून देतो. या अभ्यासात आम्ही एक अनुभवलं आहे. लोकांमध्ये एक ट्रेंड आहे. अनेकांच्या व्यवसायाची सुरुवात त्यांच्या आडनावाने, कुटुंबियांच्या नावाने किंवा अद्याक्षराने होते. लोकं त्यात गुंतून पडतात.

पूर्वी आपल्याच नावाने उद्योग करण्याचा ट्रेंड होता, जसं की, कॅडबरी, झेरॉक्स, हॅव्हलेट पॅकर, मोती, चितळे, टाटा ही सर्व नावाची ट्रेंडच आहेत. तो काळ वेगळा होता. पण आता जर तुम्ही नावांचा अभ्यास केलात तर आता उबर, ओला अशी नाव चालतात. आता लोकांच्या डोक्यात जी लगेच घर करतील अशा स्वरूपाची नावं चालतात. मग आम्ही त्याप्रकारे उद्योजकांना सुवर्णमध्य काढून देतो.

मी शॉपर्स स्टॉप, जॉकी, Tommy Hilfiger आणि त्यानंतर मी फ्युचर ग्रुपमध्ये ब्रॅण्डिंग क्षेत्रात नोकरी करत होतो. त्यानंतर आम्ही २०१२ साली ‘विक्ट्री कॉन्सेप्ट्स’ची सुरुवात केली. ‘विक्ट्री कॉन्सेप्ट्स’च्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिल्या दिवसापासून आमचं हे ठरलं होतं की ती एक कंपनी असेल, सोल प्रोप्राटरशीप नाही.

आम्हाला कुठेही स्वत:ला वन मॅन आर्मी किंवा फ्रीलान्सर अशी ओळख निर्माण करायची नव्हती. याचा संस्थापक म्हणून सुरुवातीला कर्ता-धर्ता मीच होतो, तरीही मी ‘विक्ट्री कॉन्सेप्ट्स’ हे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं.

“Creativity for Happiness”, हे ब्रिदवाक्य घेऊन आमच्या ग्राहकांना सर्जनशील कलेतून आनंद मिळवून द्यायचा या एकमेव ध्येयाने कामाला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही रिटेल ब्रॅण्ड्ससोबत बरेच काम केले. गेल्या सहा वर्षांत कॉर्पोरेट कम्युनिकेशन, सेल्स जाहिराती, वृत्तपत्रीय जाहिरात, मासिकातील जाहिराती इत्यादी सर्वप्रकारची कामं ‘विक्ट्री कॉन्सेप्ट्स’मध्ये आम्ही केली.

२०१३ पासून ऑनलाइन व्यापार वाढल्यामुळे रिटेल हळूहळू खाली येऊ लागले. त्यामुळे आम्ही काळाची पाऊले ओळखून एम.एस.एम.इ.कडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान एम.एस.एम.इ. क्षेत्र उभारी घेऊ लागलं होतं. त्यामुळे छोट्या उद्योजकांचा ओघ आमच्याकडे आपणहून यायला सुरुवात झाली होती.

‘विक्ट्री कॉन्सेप्ट्स’चा आपल्या लोकांना म्हणजे मराठी उद्योजकांना जास्तीत जास्त फायदा व्हायला हवा या उद्देशाने आम्ही ‘ब्रॅण्डिंग बॉक्स’ या संकल्पनेला जन्म दिला. ज्याचा लाभ फक्त आणि फक्त मराठी उद्योजकांनाच होणार आहे.

लोकांना अशी भीती असते की मी अमूकअमूक हे नाव आधीपासून वापरतो, जर समजा मी आता तीस वर्ष या नावाने उद्योग केला आणि आता नाव बदलतोय तर माझी एवढ्या वर्षाची इमेज पुसली जाईल. यावर एक उदाहरण देतो, आमचे एक मिरारोडचे ग्राहक आहेत. त्यांचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी ब्रॅण्डिंगसाठी आम्हाला संपर्क केला. त्यांचं ‘सृष्टी आर्ट्स’ या नावाने दुकान होतं. आताच्या नावावरून आम्हाला लोक बॅनरच्या दुकानच समजतात, ही त्यांच्या प्रगतीतील अडचण होती.

आम्ही यामध्ये सुवर्णमध्य काढण्याच्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. त्यांच्या भविष्यातील योजनेचा अभ्यास केला आणि त्यांना नवीन नाव सुचवले. आम्ही बॅनर छापाईव्यतिरिक्त आम्ही इतर सेवाही पुरवतो, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. आम्ही त्यांना ‘प्रिंटियो’ बाय ‘सृष्टी आर्ट्स’ असे नवीन नाव सुचवले. याच नावानेते इतर ठिकाणी फ्रँचायजीसुद्धा उघडू शकतील. कालांतराने लोकांना ‘प्रिंटियो’ हे नाव परिचित होऊ लागले की बाय ‘सृष्टी आर्ट्स’ची गरज राहणार नाही.

ब्रॅण्डिंग करणे म्हणजे नेमकं काय?

ब्रॅण्डिंग रोज करणे अनिवार्ह आहे. ज्याप्रमाणे आपण रोज आंघोळ करतो तसे. मूळात ब्रँडिंग म्हणजे काय तर लोकांच्या मनात, डोक्यात स्वत:ला कोरणं.

एकवेळ आपण नरिमन पॉईंटला घर घेऊ शकतो पण एखाद्याच्या मनात घर करणं खूप कठीण असतं. त्यामुळे आपल्याला एखाद्याच्या मनात घर करायचे असेल तर सतत काही ना काही करत राहावं लागतं. मग त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या ग्राहकाशी संबंध प्रस्थापित करा. त्याला शिक्षित करा.

तुम्हाला झेपेल त्या माध्यमाचा वापर करा. एखाद्याला टिव्हीवर जाहिरात करायला जमेल तर एखाद्याला फेसबुकवर फ्री पोस्ट करायला. त्यामुळे ज्याला जसे जमेल, जे अवाक्यात असेल ते ते सर्व सतत करत रहावे लागेल. आज केले म्हणून उद्या नाही केलं तर चालेल असे करून चालणार नाही. सातत्य महत्त्वाचं आहे.

स्वत:चा उद्योग सुरू करू ईच्छिणारा एखादा तरुण असेल अजून त्याच्या उद्योगाची संकल्पनाच तयार आहे अशा व्यक्तीला ब्रँडिंग बॉक्स कशी मदत करू शकेल या विषयी विकास कोळी म्हणतात, आम्हाला असा अनुभव आहे की लोकं म्हणतात ब्रँडिंगची सुरुवात लोगोने होते. लोगो बनवला पाहिजे. पण ते तुमच्या उद्योगाच्या ५ टक्के झालं त्यापूर्वी येते तुमच्या उद्योगाची स्पष्टता. का केलं पाहिजे? ते कसं केलं पाहिजे हे ब्रँडिंग बॉक्स तुम्हाला समजावून देतं.

आमच्या प्रश्‍नाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या उद्योगाची संकल्पना आम्हाला सांगितली की आम्ही मग तुमची पोझिशनिंग कशी असेल याविषयी त्यांना माहिती देतो. मग तो उद्योजक त्याच्या उद्योगाच्या विचाराविषयी अजून स्पष्ट होतो. आणि मग जर तो करावे की करू नये अशा दोलायमान मन:स्थितीत असेल तर एका विचारावर ठाम होतो. भविष्यातला त्यांचा ब्रँड कसा असेल याची आम्ही त्यांना झलक दाखवतो. त्यातून त्यांना अजून हुरूप येतो.

बरेच लहान उद्योजक व त्यांचा व्यवसाय यांची गल्लत होते. याबद्दल विकास कोळी यांना विचारले असता ते म्हणतात, विमा सल्लागार किंवा दुसर्‍या कंपन्यांचे चॅनेल पार्टनर म्हणून काम करणार्‍यांच्या बाबतीत ते प्रामुख्याने घडतं. अशा वेळी तुम्हाला स्वत:च्या नावालाच ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित केलं पाहिजे.

लोकांचा तुमच्यावर विश्‍वास निर्माण झाला पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही कंपनीची प्रॉडक्ट्स विका. लोकांना त्याच्याशी काहीही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट ही आहे की त्या त्या कंपन्या स्वत:ची जाहिरात किंवा ब्रॅण्डिंग हे करणारच आहेत. तुम्हाला स्वत:ची ओळख निर्माण करणे गरजेचे असते.

संपर्क – ९३२१०६८९७३


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!