आजवरच्या संघर्षातून आपण जे काही मिळवलं, त्याचा समाजाला उपयोग व्हायला हवा. आपलं ज्ञान, अनुभव आणि कौशल्यं यांचा समाजाच्या प्रगतीत उपयोग होऊ शकला तरच त्याला अर्थ आहे, अशी भावना मनात ठेऊन विनयतापूर्वक काम करणारे असे एक उद्योजक म्हणजे विनय वाघ.
अतिशय हलाखीची परिस्थिती, गरीबी आणि संघर्ष त्यांनी पाहिला. कष्ट आणि बुद्धिमत्ता याच्या बळावर ते यातून बाहेर आले. समाजात आणि मराठी उद्योजकविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. आपण समाजाचं देणं लागतो, समाजासाठी आपण काही भरीव कामगिरी केली पाहिजे, या उद्देशाने त्यांनी आता कामाला सुरुवात केली आहे.
विनयजींचा प्रवास तरुणांसाठी खरोखर प्रेरणादायी असा आहे. गिरणगावात त्यांचा जन्म झाला. गिरणीच्या संपात वडिलांची नोकरी गेली. एकीकडे कुटुंबावर कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे खाण्यापिण्याची भ्रांत. अशा परिस्थितीत चाळीतल्या अभ्यासिकेत १६ ते १८ तास अभ्यास करून विनय यांनी १९९२ साली व्हीजेटीआयमधून आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तेही डिस्टिंक्शनसह.
त्यावेळी त्यांचं स्वप्न होतं मुंबई महापालिकेत नोकरी मिळवणं. इंजिनिअरिंगच्या दरम्यान अॅप्रेन्टिसशिप म्हणून एका खाजगी कंपनीत चारशे रुपये महिना पगाराची नोकरी धरली. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर त्याचं कंपनीने यांना नोकरीसाठी विचारलं. पगारही वाढणार होता. त्यांनी नोकरीला स्वीकारली.
घरची गरीबी पाहता एवढ्या पगारात भागणारं नव्हतं. म्हणून मालकाची परवानगी घेऊन नोकरीसोबत बाहेर आणखी काही काम मिळतात का याचा शोध सुरू केला. दादरला एक छोट चेंबर बनवायचं काम मिळालं.
त्या कामात विनय यांनी फक्त दोनशे रुपये कमावले, पण अगदी छोट्याशा त्या प्रोजेक्टमधून विनय वाघ यांच्यातला उद्योजक जागा झाला. कारण काम छोटं असलं तरी व्हेंडर ठरवणं, माल आणणं, वेळेत आणि चांगल्या गुणवत्तेचं काम करून ग्राहकाच्या चेहर्यावरचा आनंद पाहणं हा अनुभव त्यांच्यासाठी नवीन होता. जे त्यांना कोणत्याही नोकरीत पाहायला मिळणं कठीण होतं.
या छोट्याशा कामातून प्रेरणा घेऊन त्यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला आणि जमेल तशी कामं मिळवू लागले. १९९६ च्या गुढीपाडव्याला स्वतःचं ऑफिस सुरू केलं. त्याच वर्षी महापालिकेत नोकरीसाठी बोलवणं आलं. पण आता विनय यांची नोकरी करण्याची इच्छा नव्हती. तरीही घरातल्या प्रेशरमुळे महापालिकेची नोकरी स्वीकारावी लागली.
चार वर्ष महापालिकेत नोकरी केली. यातसुद्धा कामाचा चांगला अनुभव घेतला. सोबत स्वतःचा व्यवसायही सुरू होताच. चार वर्ष नोकरी केल्यावर मात्र नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ व्यवसाय सुरू केला. नोकरीदरम्यान विलेपार्ल्यात घर घेतलं.
तिथेच एक प्रोजेक्ट करताना एका मोठ्या विकासकाकडून फसवणूक झाली. प्रोजेक्ट पूर्ण होत आलेला असताना हातातून काम सोडावं लागलं. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं. आतापर्यंत जेवढं कमवलं होतं. ते सगळं या प्रोजेक्टमध्ये घालवाव लागलं, पण हार मानली नाही. या धक्क्यातूनही ते बाहेर आले. जमतील तसे छोटे-मोठे प्रोजेक्ट घेऊन करू लागले.
या दरम्यान २०११ मध्ये त्यांना अतुल राजोळी यांच्या ‘लक्ष्यवेध’बद्दल कळलं. ते ‘लक्ष्यवेध’सोबत जोडले गेले. ‘लक्ष्यवेध’शी जोडलं जाणं हे विनय वाघ आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट मानतात, कारण इथेच त्यांना त्यांच्यातला ‘स्व’ सापडला.
२०११ साली ते अतुल राजोळी यांच्याशी जोडले गेले अजूनही आहेत. २०१७ साली अतुल राजोळी यांनी विनय सरांना स्वत:च्या जागी लेक्चर घेऊ दिलं. हळूहळू त्यांच्या बॅचेस वाढू लागल्या. ‘लक्ष्यवेध’सोबतच्या प्रवासात विनयजींना ते एक चांगले प्रशिक्षक आहेत, मार्गदर्शक आहेत, हे कळलं.
इथून पुढे त्यांनी प्रशिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शेकडो उद्योजकांचे व्यवसाय सेटअप करून दिले. प्रोसेस सेट करून दिल्या. अनेक उद्योजक घडवले. हजारांच्या वर विमा प्रतिनिधींना प्रशिक्षित केलं. अनेक डेव्हलपमेंट ऑफिसर्सना ट्रेनिंग दिलं. दरम्यान विनयजींनी २००६ ते २०१७ या काळात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसुद्धा चालवली. यामध्ये मोठमोठे इव्हेंट केले.
सध्या ते ‘अर्बन आयुर्वेद’ या कंपनीचे सीईओ आहेत. ‘अर्बन आयुर्वेद’ प्रमाणबद्ध आयुर्वेदिक उपचार देते. त्याची दादर, ठाणे, कल्याण, खारघर आणि बडोदा अशी पाच केंद्रं सध्या कार्यरत आहेत. विविध प्रकारचेआयुर्वेदिक उपचार इथे केले जातात.
आतापर्यंतच्या विनयसरांच्या अनुभवातून त्यांना आता समाजासाठी काही भरीव आणि ठोस कार्य करायचं आहे. म्हणून त्यांनी ‘आर-3’ या नव्या व्हेंचरची मुहूर्तमेढ रोवली.
‘आर-3’ हे सामान्य मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून त्याच्या आर्थिक, भावनिक, सामाजिक गरजा डोळ्यासमोर ठेवून काम करेल. मध्यमवर्गीय माणसाचे प्रश्न सोडवेल. त्याच्या सामूहिक मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणेल. त्याला अधिकाधिक प्रगतिशील आणि विकासोन्मुख करेल.
विनय वाघ आणि त्यांची टीम येत्या काळात विविध माध्यमातून यासाठी काम करणार आहे. सामूहिक मानसिकता घडवण्याच्या या कामात पुस्तकासारखे पारंपरिक माध्यमही असेल आणि युट्यूब चॅनलप्रमाणे आधुनिक माध्यमही असेल. माध्यमं वेगवेगळी असू शकतात, पण लक्ष्य एकच आहे सामान्य मध्यमवर्गीय माणसाचा सर्वांगीण विकास.
संपर्क : विनय वाघ – 9892318395
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.