Advertisement
कथा उद्योजकांच्या

पॅकेज फूडमध्ये स्वतःला प्रस्थापित करणारा ‘समृद्धी’ ब्रॅण्ड

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


वडिलोपार्जित अडत दुकानाला नव्या उद्योगाची जोड देत लातूर जिल्ह्यातील औसा येथील विश्वराज औटी यांनी १६००० स्क्वेअर फीटवर ‘शांतीगंगा अ‍ॅग्रो उद्योगा’ची स्थापना केली. महिन्याला ६०० टन मालाची विक्री होते. २७ लोकांच्या हाताला काम दिलंय.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आज महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत होत असलेले वितरण हळूहळू वाढवत संपूर्ण देशभर पसरवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांची घोडदौड चालू आहे. वयाच्या ३२व्या वर्षी त्यांनी हा प्रवास सुरू केलाय. विश्वराज औटी हे एमबीए आहेत. वडिलोपार्जित अडत दुकान आहे. त्यामुळे लहानपणापासून धान्य खरेदीविक्री जवळून पाहिली.

आपणही उद्योगात उतरायचं, असे मनाशी पक्के झाल्यावर प्रथम त्यांनी स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास केला. त्या वेळी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, आपल्याकडे ‘पॅकेज फूड’मध्ये खूप कमी लोक आहेत. बाहेरचे लोक व्यवसाय करतात, आपण मात्र हिम्मत करत नाही. या सगळ्याचा विचार करून समृद्धी या ब्रॅण्ड नावाने गहू पीठ बाजारात आणले.

मोठ्या ब्रॅण्डने आमच्यासाठी पीठ पुरवठादार व्हा, अशी दिलेली ऑफर नाकारून स्वतःचा ब्रॅण्ड याच बाजारपेठेत उतरवला. सुरुवातीच्या तीन महिन्यांतच व्यवसायाने जोर पकडला. त्यामुळे विश्वराज यांनी मागे वळून पाहिले नाही. आज कोटींची उलाढाल करताना आपल्या मालाच्या दर्जाची ते जास्त सजगपणे काळजी घेतात.

यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शांतिगंगा अ‍ॅग्रोमध्ये काम चालते. पीठ तयार करण्यासाठी प्रथम तो चांगला धुतला जातो, मग पाण्यात भिजवला जातो, दळला जातो, त्यानंतर ते चाळले जाते आणि पीठ व कोंडा वेगळा होतो. हे सगळे करण्यासाठी एकूण बारा मशीन्स आहेत. पीठ थंड झाले की मग त्याचे पॅकेजिंग होते.

या सगळ्या प्रक्रियेमधून बाहेर पडलेला गव्हाचा कोंडा, तण यालाही केटलफिल्ड बाजारात खूप मागणी आहे. आमच्याकडून दररोज पन्नास किलोंच्या चाळीस गोण्या विकल्या जातात. बाजारात यालाही खूप मागणी आहे. येत्या काळात आम्ही कॅटेलफिल्ड प्रोडक्शनमध्येसुद्धा उतरतोय.

समृद्धी आटा एक किलोपासून शंभर किलोच्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध आहे. मोठ्या मेस, हॉटेल्सना मुख्यत्वे माल जातो. होलसेलमध्ये माल विकला जातो. लातूर, सोलापूर, कर्नाटक येथील बिदर, विजापूर या ठिकाणी सध्या माल जातो. हळूहळू हे जाळे संपूर्ण देशभर पसरवायचे आहे.

लातूरमधला गहू हा बाहेर न जाऊ देता आम्हीच तो घेऊ लागलो. त्यामुळे आम्हाला स्थानिक बाजारपेठेतच कच्चा माल उपलब्ध झाला. सोबत आम्ही मध्य प्रदेशहून चांगल्या प्रतीचा लोकवन मागवतो, असे विश्वराज सांगतात.

बर्‍याचदा गहू पिठाच्या चपात्या काळ्या पडतात किंवा काही काळातच कडक होतात. सुरुवातीच्या महिन्याभराच्या काळात अनेक वेळा लोक पीठ परत आणून देत. त्यामुळे उत्तम दर्जाचे, ग्राहकाच्या पसंतीला उतरेल असे पीठ तयार करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक आणि गरजेचं होतं.

खूप ताण यायचा; पण नैराश्य झटकून काय कमतरता राहतायत त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. बाजारातली इतर अनेक ब्रँडची पिठे वापरून पाहिली. त्यात प्रयोग केले आणि स्वतःचे पीठ तयार केले. त्याचा मऊपणा टिकवण्यासाठी खूप अभ्यास केला.

लोकांच्या विश्वासासाठी बाजारात लाइव्ह डेमो दिले. भर चौकात चपात्या लाटून, भाजून दाखवल्या. वितरकांना पोळी-भाजीचा डबा दिला. अशा प्रकारे समस्येच्या मुळाशी जाऊन काम केले. सध्या एकाच प्रकारचे गहू पीठ आम्ही देतोय. आम्हाला तडजोड करायची नाहीय, त्यामुळे टप्प्याटप्प्याने पुढे जायचंय, भविष्यात विविध धान्यांची आणि इतर प्रकारची पिठे आणायची आहेतच, असे ते सांगतात.

व्यवसायाच्या या यशामध्ये कुटुंबाची मोलाची साथ, विशेषतः वडिलांची खूप मदत झाली. यासोबतच कुशल कामगार, मॅनेजमेंट स्टाफ आणि कामाची योग्य विभागणी यामुळे उद्योगाची घडी नीट बसली. कुशल कामगार मिळणे ही मोठी समस्या होती. आपल्याकडे लोकांची बारा तास काम करायची तयारी नसते, अंगमेहनतीची मानसिकता कमी पडते. त्यामुळे नाइलाजाने मला तमिळनाडू, मध्य प्रदेशमधून कामगार आणावे लागले. याचे त्यांना दुःख वाटते.

लॉकडाऊनच्या काळात उद्योगावर परिणाम झाला. माझा माल मुख्यतः मोठमोठ्या मेस, हॉटेल्सना जातो. या काळात शाळा-कॉलेज बंद असल्याने परिणाम झाला. मला माझा माल इतरत्र पाठवावा लागला. कर्नाटक येथील विजापूरला माल वळवावा लागला. खर्च वाढला, ट्रान्सपोर्टेशन वाढले; पण नवी दारे उघडली हा फायदाही झाला. डिजिटल मीडिया ही आधुनिक काळाजी गरज आहे. त्यामुळे तिचा वापरही वाढला याच्याशी ते सहमत आहेत.

विश्वराज म्हणतात, मला प्रवासाची आवड आहे. मुख्यत्वे कामानिमित्त विविध प्रदर्शनांना, प्रोजेक्टला भेट द्यायला आवडते. माणसांना भेटायला आवडते. नव्याने उद्योगात लोकांनी उतरायला हवे. अभ्यास आणि कामाप्रती समर्पण असेल तर धोका पत्करून मोठ्या प्लांटचा विचार करू शकता. प्रॉडक्शनमध्ये उतरलात तर मालाचा दर्जा आणि सेवा चोख हवी. यामुळे मार्केटमध्ये प्रॉडक्ट स्थिर राहील आणि योग्य मॅनेजमेंटमुळे घडी नीट बसेल.

विश्वराज यांचा व्यावसायिक प्रवास हेच सांगतो की, स्वप्न मोठं पाहा आणि त्यासाठी योग्य अभ्यास, नियोजन, गुंतवणूक करा. चांगली माणसं जोडा. आपल्या यशाचे शिल्पकार स्वतःच व्हा!

संपर्क : विश्‍वराज औटी –  ९४२३३४८७४७


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!