प्रगतिशील उद्योग

देशातला पहिला इंग्लिश स्पिकिंग क्‍लब सुरू करणारा उद्योजक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


सोलापूर हा बहुभाषिक जिल्हा. मातृभाषा ही तेलगू असलेले विठ्ठल वंगा हे सोलापूरकर आहेत. इंग्लिश विषयात एम. ए., बी.एड. असलेले विठ्ठल वंगा हे प्राध्यापक आहेत. सुरुवातीच्या काळात ते शाळा, कॉलेजमध्ये शिकवत होते. त्यांना केजीपासून पीजीपर्यंत शिकवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता.

या दरम्यान त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे मुलांमध्ये प्रतिभा आहे, परंतु जेव्हा ती गोष्ट सांगायची किंवा मांडायची वेळ येते त्यावेळी ते मागे पडतात. याचं कारण इंग्रजीबद्दल त्यांच्यामध्ये असलेला न्यूनगंड.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

अनेक विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन पुढे जातात, पण जेव्हा नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी कुठे इंटरव्यू द्यावा लागतो, त्या ठिकाणी यांना अपयश येतं. या गोष्टीचा विठ्ठल यांनी पाठपुरावा केला तेव्हा त्यांना जाणवलं की आजच्या काळात आयटीसारख्या क्षेत्रात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लागतं. जुजबी इंग्रजी तरी यायला हवं, पण यातच ही मुलं मागे असल्यामुळे त्यांना इथे अपयश यायचं.

यावर आपण काय करू शकतो, यावर त्यांनी अभ्यास सुरू केला. शाळा-कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवलं जातं, परंतु या भाषेतून बोलण्याचा सराव होत नाही त्यामुळे ते कठीण जातं. असं म्हणतात, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आता सराव करण्यासाठीसुद्धा या भाषेत बोलणारं कोणीतरी हवं! असा विचार करताना त्यांना प्रश्‍न पडला की आपणच असा एक प्लॅटफॉर्म का निर्माण करू नये? यातूनच जन्म झाला ‘इंग्लिश स्पिकिंग क्लब’चा.

२००४ पासून त्यांनी अध्यापन सोडून पूर्ण वेळ ‘इंग्लिश स्पीकिंग क्लब’वर काम करायला सुरुवात केली. हा भारतातील पहिला इंग्लिश स्पीकिंग क्लब आहे, असं वंगा सांगतात.

‘इंग्लिश स्पीकिंग क्लब’च्या स्वरुपाबद्दल विचारलं असता विठ्ठल वंगा सांगतात, सोमवार ते शनिवार मुलं शाळा-कॉलेजमध्ये व्यस्त असतात, काही जण नोकरी-व्यवसायात व्यस्त असतात त्यामुळे आम्ही रविवार हा दिवस निश्चित केला. सुरुवातीला मेंबरशिप देऊन कार्याला सुरुवात केली. संध्याकाळच्या वेळी हा अ‍ॅक्टिव्हिटी बेस वर्ग सुरू केला.

इंग्रजी भाषा पक्की करण्यासाठी विशेषत: ‘स्पोकन इंग्लिश’ यावर भर देत अनेक ऍक्टिव्हिटी इथे राबवतो. मॉक इंटरव्यू, ग्रुप डिस्कशन, ग्रामर, वर्ड गेम्स अशा अनेक अ‍ॅक्टिव्हिटीज असतात.

विविध सेमिनार, गेस्ट लेक्चर्स, रोल प्ले, विविध सणउत्सव साजरे करतो. इथे एक गोष्ट प्रकर्षाने पाळावी लागते ती म्हणजे एकदा तुम्ही कार्यक्रमाच्या हॉलमध्ये आला की पूर्ण वेळ फक्त तुम्हाला इंग्रजीतच संभाषण करावे लागते. इथे येऊ लागल्यापासून अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊन तीन महिन्यांतच इथे येणार्‍यात बदल दिसू लागतो. सभाधीटपणा वाढतो, भीड चेपते, मुलं स्वत:हून स्टेजवर येऊन बोलू लागतात. चुका होतात; पण न भीता त्या सुधारल्या जातात.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


सुरुवातीच्या काळात जेव्हा काही मुलांकडे आम्ही ही संकल्पना घेऊन गेलो तेव्हा त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. लोकांना यावर विश्वास नव्हता. भाषा अशी कशी शिकणार? एवढा दोन तास कोण वेळ देणार? इतरही व्याप असतात. अशी अनेक कारणं मिळाली. आम्हीही हार न मानता यावर काम करत राहिलो.

सुरुवातीला आलेल्या काही मुलांना जेव्हा याचा फायदा झाला तेव्हा आपला अनुभव त्यांनी इतरांना सांगितला आणि यातूनच माऊथ पब्लिसिटीने ही संकल्पना चांगल्या पद्धतीने काम करू लागली. ना वयाचं बंधन ना शिक्षणाचं. इंग्रजी भाषा शिकायची आहे असं कोणीही या क्लबमध्ये सहभागी होऊ शकतं.

आता तर शाळा कॉलेजच्या विद्यार्ध्यांपासून उच्च शिक्षण घेणारे, नोकरी करणारे, उद्योजक, गृहिणी असा प्रत्येक जण आमच्या या क्लबचा फायदा घेत आहेत. वर्षानुवर्ष अनेक जण आमची ही मेंबरशिप रिन्यू करत या क्लबचा भाग आहेत.

इथून घडलेला प्रत्येक जण आज विविध कार्यात मोठमोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपर्‍यात आज काम करत आहेत. परंतु भाषेवर प्रभुत्व आणि त्यातून मिळालेला आत्मविश्वास यामुळे ते ‘सारथी संडे स्पिकिंग क्लब’शी जोडलेले आहेत.

मागील सतरा वर्षार्ंत १० हजारच्या विद्यार्थी इथून घडले आहेत. आमचे अनेक विद्यार्थी पुण्यात स्थायिक आहेत. आज तेही तिथे हा क्लब सुरू करू इच्छितात. ‘मास्टर इंग्लिश, मास्टर द वर्ल्ड’ ही आमची टॅगलाइन आहे.

इंग्रजी या विषयावर काम करणारे शिक्षक, इंग्रजीचा न्यूनगंड कमी व्हावा म्हणून काम करणार्‍या व्यक्तींचा आम्ही दरवर्षी आमच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सत्कार करतो. याचसोबत उत्कृष्ट विद्यार्थी ज्यांना आम्ही ‘सारथीयन’ म्हणतो अशांची निवड करून त्यांचाही सत्कार करतो.

मागील सतरा वर्षाच्या कालावधीत सोलापुरातील अनेक शिक्षण संस्था आता सारथीला चांगल्या प्रकारे ओळखतात. अनेकांनी संस्थेसोबत विविध कार्यक्रमांसाठी, वर्कशॉपसाठी, ट्रेनिंगसाठी करार केलेले आहेत. आम्ही अनेक विद्यालय, महाविद्यालय यांनासुद्धा आमची सेवा देत असतो.

ही संपूर्ण यंत्रणा कशी काम करते असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्याचे उत्तर आहे यासाठी एक्झिक्युटिव्ह बॉडी काम करते. एक टीम निवडली जाते त्यातून एक प्रेसिडेंट, व्हॉइस प्रेसिडेंट, सचिव, सहसचिव असतो. एक्झिक्युटिव्ह बॉडीचा कालावधी सहा महिन्यांचा असतो.

विठ्ठल वंगा यांनी स्थापन केलेल्या ‘सारथी संडे स्पिकिंग क्लब’ला नुकताच ‘एज्युकेशन सेनसेशन्स’ या संस्थेतर्फे ‘बेस्ट स्किल डेव्हलप्मेंट इन्स्टिट्युट इन एशिया’ हा पुरस्कार मिळाला आहे. विठ्ठल वंगा यांचे आज वय वर्ष ५४ आहे. घरी दोन मुलं आणि बायको असं चौकोनी कुटुंब आहे.

संपर्क : विठ्ठल वंगा – 9890925996


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!