Advertisement
संकीर्ण

आशियाई पदक विजेत्या वसिमला आर्थिक मदतीची गरज

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

महाभारतात एकलव्याची कथा आहे. सामान्य गरीब कुटुंबातला किरात वंशाचा एकलव्य धनुर्विद्या शिकायला अतिशय उत्सुक होता. त्याने कौरव-पांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांना नेमबाजी शिकवण्याची विनंती केली. हस्तिनापूरचे राजगुरू असलेल्या द्रोणाचार्यांनी त्याला नकार दिला. तेव्हा एकलव्याने त्यांचा मातीचा पुतळा बनवून जंगलात एकट्यानेच साधना केली. धनुर्विद्येचा अभ्यास केला आणि तो अर्जुनाइतकाच तरबेज नेमबाज बनला. महाभारतातील ही एकलव्याची कथा आपल्या समाजातील संधींपासून वंचित राहणार्यान लाखो गरीब विद्यार्थ्यांची आणि अनुकूल वातावरण न मिळणार्‍या क्रीडापटुंची सनातन कहाणी आहे. आज पाच हजार वर्षांनंतरही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही.

कॉमनवेल्थ, एशियन, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आमचे खेळाडू मागे पडतात, कारण त्यांना योग्य प्रशिक्षण, किमान सुविधाच मिळत नाही. जे झगडून देशाला पदके मिळवून देतात त्यांचा पुढे समाजाला विसर पडतो. त्यांना नंतर देश-सरकार विसरून जाते व पोटापाण्यासाठी कष्ट करायची वेळ त्यांच्यावर येते. ही देशातल्या सर्वच क्रीडापटुंची शोकांतिका आहे.

हे सर्व आज पुन्हा आठवण्याचे निमित्त म्हणजे अंबरनाथच्या वसिम रफीअहमद मुल्ला या तरुणाने मलेशियातील क्रीडास्पर्धेत ट्रिपल जंपमध्ये मिळवलेले रजत पदक आणि त्याची हृदयद्रावक वास्तविक परिस्थिती.

वसिम रफीअहमद मुल्ला

आर्थिक मर्यादा, प्रशिक्षणाचा अभाव, पोषक आहार, आधुनिक क्रीडासाधनांचा अभाव या सगळ्याशी झगडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकाला गवसणी घालून देशाची मान उंचावणारा, हा तरूण वास्तविक जीवनात मात्र फार प्राथमिक समस्यांशी झगडताना दिसतो. त्याचे क्रीडानैपुण्य त्याला पोटापाण्याची खात्री देऊ शकत नाही आणि तो आर्थिक पायावर सक्षमपणे उभा नसल्याने त्याच्या वडिलांना निवृत्तीनंतरही काम करावे लागत आहे. हे कटू असले तरी वास्तव आहे.

वसिमचे कुटुंब अंबरनाथच्या कोहोजगाव येथील खुप जुने रहिवासी आहे. त्याचे वडील रफीअहमद मुल्ला विम्को कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर होते. अंबरनाथच्या फातिमा हायस्कूलमध्ये त्याचे माध्यमिक शिक्षण झाले. लहानपणापासून वसिमचा खेळाकडे ओढा होता. फातिमा हायस्कूल व जांभूळच्या एसआयसीईएस कॉलेजात शिकताना तो नेहमी फुटबॉल टीमचा कप्ताथन असायचा. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. संघ हारला तर खेळाडू आपोआपच बाद होतो.जिद्दी वसिमला हे वास्तव स्वीकारणे कठीण जायचे म्हणून तो वैयक्ति क क्रीडाप्रकारांकडे वळला. अॅटथलेटीक अंतर्गत येणार्या् विविध क्रीडाप्रकारांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले. शेवटी त्याच्या शरीरयष्टीला योग्य असणार्‍या ट्रिपल जंप या प्रकारावर त्याने लक्ष केंद्रित केले. त्यातच त्याने अलीकडे आशियाई पातळीवर रजत पदक मिळवले आहे.

ही सर्व वाटचाल वसिमने कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय केली आहे. मुंबई-ठाणे येथे त्याच्या क्रीडाप्रकारातले प्रोफेशनल ट्रेनर्स आहेत पण त्यांची फीस परवडत नसल्याने तो ते घेऊ शकला नाही. ते प्रशिक्षक इतरांना शिकवायचे तेव्हा तो बघायला जायचा, निरीक्षण करायचा व खरोखरच एकलव्याप्रमाणे तशी प्रॅक्टीस करायचा जंपसाठी आवश्यक असलेले पिच तसेच स्पाईक किंवा तळाला खिळे असलेले बुटसुद्धा फक्तठ स्पर्धेच्या वेळीच वापरतो. कसून प्रॅक्टीस केल्यावर होणारी शरीराची हानी भरून काढायला पोषक आणि प्रोटीनयुक्तच आहार घ्यावा लागतो. वसिमला ते परवडत नाही.

सगळ्यात मोठी अडचण म्हणजे प्रशिक्षकांची वानवा. तो चांगला खेळाडू असूनही प्रशिक्षक न मिळाल्याने त्याच्या कर्तत्वावर मर्यादा आल्या आहेत. अंबरनाथमधील जोएल जिमचे संचालक देवयासी जोशी हे त्याला सर्व प्रकारची मदत करतात. त्यांची मदत व काही चांगल्या मित्रांचा पाठींबा यामुळेच त्याचे मानसिक धैर्य टिकून राहते.

ट्रिपल जंप या क्रीडाप्रकारात वसिम मुल्लाह स्टेट आणि नॅशनल लेव्हलचा प्लेाअर आहे. ३२व्या इंटरनॅशनल अॅाथलेटिक्स चॅम्पियनशिप या मलेशियात १२ ते १४ ऑक्टोबर २०१८ रोजी होणार्या् स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची त्याला संधी मिळाली. पण ती साधण्यासाठी लागणारा पैसा त्याच्याजवळ नव्हता. त्याने तर आशा सोडून दिली होती पण मित्रमंडळींनी मदत केली. शिवसेनेच्या युवासेनेचे नेते राहुल कनात यांनी पुढाकार घेतला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्याला आवश्यक आर्थिक मदत दिली. त्यामुळेच वसिम त्या स्पर्धेत सहभागी होऊ शकला. त्याबद्दल तो युवासेनेचा फार आभारी आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच खेळताना वसिमला थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, समोहा आयलंड व काही भारतीय खेळाडुंशी स्पर्धा करावी लागली. अंतिम फेरीत सहा खेळाडुंमध्ये तो दुसरा आला. केवळ १० सेमीने त्याचे सुवर्णपदक हुकले.

त्याने मारलेली ट्रिपल जंप केवळ त्याच्यासाठीच मोलाची नाही. त्याने अंबरनाथ या छोटेखानी शहराचे नाव जगभरात पोहोचवले आहे. त्याची उडी म्हणजे प्रतिकूलतेचे अडथळे ओलांडून यशाच्या दिशेने घेतलेली झेप आहे. एका रजत पदकापेक्षा त्या पदकातून मिळणारा जिद्दीचा संदेश लाखमोलाचा आहे. परिस्थितीशी झगडणार्याद सर्वच होतकरू खेळाडुंची उमेद वाढवणारा आहे. सध्याच्या मोबाईल, वॉटस्अॅयपच्या जगात मुले व तरूण पिढी आभासी विश्वात रमली आहे. मुलांना मैदानी खेळांचा तर विसरच पडला आहे. वसिमच्या या यशापासून प्रेरणा घेऊन शाळकरी मुलांना मैदानी खेळाची गोडी लागावी ही अपेक्षा.

वसिम बी. कॉम. आहे. तसेच सीएमएसतर्फे त्याने कंम्प्युटर डिप्लोवमा केला आहे. तो विवाहित आहे. पूर्वी तो रिपब्लिक ऑफ कांगोत चांगल्या नोकरीला होता. नियमबदलांमुळे त्याला भारतात परत यावे लागले. तेव्हापासून त्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. तो आयटी सर्व्हीसेससंबंधी व्यवसाय करतो पण त्यातून होणारी प्राप्ती मर्यादित आहे. वसिमला आर्थिक स्थैर्याची गरज आहे. त्याच्या आर्थिक विवंचना मिटवणारी मदत त्याला हवी आहे. तो आहारतज्ज्ञ वा क्रीडाप्रशिक्षक म्हणूनही काम करू शकतो. त्याने क्रीडाप्रशिक्षणाचा डिप्लोमा केला आहे. आजवर त्याने अनेक नवोदित खेळाडूंना मोफत मार्गदर्शन केले आहे. क्रीडाप्रशिक्षक म्हणून संधी मिळाल्यास तो खूप उत्साहाने नव्या दमाचे खेळाडू घडवेल. तशी संधी त्याला कुणीतरी द्यायला हवी.

वसिमने आशियाई पातळीवर पदक मिळवले. सध्या त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण त्याला कोरड्या शुभेच्छा वा पुष्पगुच्छ नको आहेत तर भरघोस आर्थिक मदतीची आणि सुरक्षित भविष्याची खरी गरज आहे. समाजपुरूषाने या गुणी क्रीडापटूला मदत करण्यासाठी पुढे यायला हवे.

संपर्क : वसिम मुल्लाु – 9422481711
Email: wasim.mulla@gmail.com

मुलाखत : प्रशांत असलेकर (पॅसिफिक मीडिया सर्व्हिसेस)
भ्रमणध्वनी : 9322049083, 9689114854

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: