“माझे पुढचे वर्ष कसे आहे ते सांगा?”
माझ्यापुढे बसलेले सुखवस्तू गृहस्थ मला विचारात होते. असा प्रश्न आला, की तो प्रश्नच नसतो, त्याच्या नंतर येणारा प्रश्न असतो. हे मला आता अनुभवाने पाठ झाले आहे म्हणून मी गप्पच राहिलो. त्यांना बोलू दिले. त्यांची कहाणी कळली ती अशी.
हे गृहस्थ एका मोठ्या नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मागील दहा वर्षे सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. आता त्यांना एका नवीन कंपनीने उत्तम पगारवाढीबरोबर नोकरीची संधी देऊ केली होती.
ते मला हे विचारायला आले होते की, नवीन कंपनीमध्ये नोकरी कधीपासून सुरू करावी.
मी त्यांची पत्रिका पाहिली आणि चमकलोच. हा माणूस सेल्समध्ये कसा, असा प्रश्न मला पडला. त्यांची पत्रिका वस्तू विक्रीच्या संदर्भात अतिशयच डावी होती. सप्तमात अष्टकवर्गाचे बिंदू अतिशय कमी होते, बुध ग्रह काही फारसा उत्तम बसलेला नव्हता आणि मंगळदेखील जेमतेमच होता.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
याचाच अर्थ विक्रेत्याच्या भूमिकेस जरुरी असलेला जोम किंवा वाक्पटुत्व किंवा प्रथमदर्शनी पडणारी छाप या सगळ्यांचाच येथे अभाव जाणवत होता; परंतु त्याच वेळी ह्या गृहस्थांनी आतापर्यंत विक्री खात्यात उत्तम प्रकारे कामगिरी केली होती हे पण नाकारता येत नव्हते.
याचा अर्थ त्यांचे कामाचे स्वरूप आणि कुंडलीतील बलस्थाने यांचा कुठे तरी उत्तम संबंध लागत होता. कुठे आणि कसा हेच आता शोधायचे होते. मी त्याहून त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या कंपनीबद्दल, त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल खोदून खोदून व विस्ताराने माहिती विचारायला सुरुवात केली आणि लवकरच चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली.
त्यांची कंपनी ही अतिशय नावाजलेली कंपनी होती. तिला शंभर वर्षांहून अधिक चांगला इतिहास होता. उत्तम उत्पादन, दर्जावर नियंत्रण, वितरणातील शिस्त या तिन्ही गोष्टींची कंपनी चांगली काळजी घेत होती त्यामुळे बाजारात कंपनीची प्रत उत्तम गणली जात होती.
या कंपनीमध्ये या गृहस्थांनी गेली दहा वर्षे इमानेइतबारे नोकरी केली होती. आता येणारी कंपनी, जिने त्यांना नोकरी देऊ केली होती ती या क्षेत्रात नवीनच होती. बाजारातच नवीन होती. तिच्या मागे मोठे व्यापारी. गुंतवणूकदार होते आणि तिला लवकरात लवकर बाजारात जम बसवायचा असल्याने ते उत्तम पगार देऊन अनुभवी लोकांची भरती करीत होते, अर्थात त्याच उद्योगाशी संबंधित असलेल्या कंपन्यांमधून.
त्यांनी नेमबाज मस्तकमार (headhunter) या कामासाठी खास नियुक्त केले होते आणि अशाच एका मस्तकमाराच्या नजरेत हे गृहस्थ भरले होते. तो त्यांना उत्तम पगारवाढ व इतर सोयी देऊन आपलेसे करण्याच्या प्रयत्नात होता.
आता चित्रात रंग भरले जात होते…
मी त्यांना सांगितले, तुम्ही ही नोकरी घेण्याचा विचारसुद्धा करू नका. ते गृहस्थ खुर्चीतून बाहेर पडायचेच बाकी होते. एक मिनिट तर त्यांच्या तोंडातून शब्ददेखील बाहेर पडेनात. मी त्यांना पाणी दिले. त्यांना शांत होण्यास थोडा वेळ दिला. मग त्यांना दुसरा धक्का दिला.
तुम्ही कुठल्याही प्रकारची विक्री करत नाही. हे मला तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून आणि तुमच्या कुंडलीवरून स्पष्ट झाले आहे. मग, मी आतापर्यंत काय केले असे तुम्हाला वाटते? मी काय मासे मारत होतो? त्यांनी थोड्या कुत्सितपणे विचारले. अपेक्षाभंग झाला की कुत्सितपणा थोडाफार येतोच. मी त्याकडे दुर्लक्ष करून माझे आख्यान पुढे सुरू केले. त्यांना या भूमिकेमागचे कारण समजावून सांगितले.
एखादा किराणा मालाचा दुकानदार घ्या. तो दिवसभर किराणा माल विकत असतो. लोक त्याच्या दुकानातून माल विकत घेतात. वाच्यार्थाने हा विक्रेता झाला. दुकानात चांगली विक्री होत असेल तर आपण त्याला चांगला विक्रेता म्हणणार; परंतु येथे त्याच्या विक्री कौशल्याचा कुठेच कस लागत नाही. याचे कारण असे, किराणा दुकान चालण्यासाठी तीन गोष्टींची अनुकूलता आवश्यक असते.
- मध्यवर्ती जागा.
- आपल्याला हवा असणारा दररोजच्या गरजेचा माल दुकानात असणे.
- दुकान दिवसभर उघडे असणे.
या तीन गोष्टी असल्या तर आपण तेथून माल खरेदी करतो. याचा त्या दुकानदाराच्या विक्री कौशल्याशी, त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी किंवा त्याच्या वागणुकीशी काही फारसा संबंध नसतो. त्याने फक्त काटा मारू नये, वस्तू बरोबर बांधून किंवा पिशवीतून द्याव्यात आणि उद्धट बोलू नये इतकी आपली माफक अपेक्षा असते.
अगदी या अपेक्षा जरी पूर्ण झाल्या नाहीत तरीदेखील गरज म्हणून आपण त्याच्याकडून वस्तू घेतोच. तसेच या गृहस्थांचे होत होते. कंपनी चांगली, माल चांगला, नाव चांगले, त्यामुळे प्रामाणिक विक्रेत्याकडून माल विकला न गेल्यासच नवल. हे गृहस्थ फक्त आपल्या कंपनीच्या वस्तूंसह माहिती प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठपणे आपल्या ग्राहकांसमोर मांडत होते.
हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी, पत्रिकेशी सुसंगत असल्यामुळे त्यांना तेथे पुरेपूर यशदेखील लाभत होते. दशास्वामी गुरू आणि आरूढ पदांमध्ये गुरू चंद्राचा योग असल्यामुळे या गृहस्थांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा प्रामाणिक आणि साधा सरळ माणूस असा उमटत होता.
आपली भूमिका ते अतिशय श्रद्धेने आणि कष्टाने पार पाडीत होते; परंतु नवीन कंपनीमध्ये यातील काहीच जमेच्या बाजू नव्हत्या. परत आताच्या कंपनीबरोबर सामना करायचा होता आणि यासाठी स्ट्रीट स्मार्ट असणे, ग्राहकास पटवणे, थोडेफार खोट्याचे खरे करणे, प्रसंगी कोलांट्या मारण्याची तयारी ठेवणे हे गरजेचे होते.
ते या गृहस्थांना जमणे कठीणच होते. त्यांचा लोकसंपर्क, ग्राहक संपर्क, कीर्ती यांचा वापर करून घेण्यासाठी तर नवीन कंपनी त्यांना जवळजवळ दुप्पट पगार देण्यास तयार होती.
गुरूच्या महादशेची दोन वर्षे बाकी होती. याचा अर्थ सरळ होता, दोन वर्षे काम करून घेऊन ती कंपनी यांना निरोपाचा नारळ देण्याची दाट शक्यता होती. नंतर यांना इतर कोठे नोकरी मिळणे दुरापास्त झाले असते. याच नोकरीत ते राहिले तर काही दशासंबंधित अडचण येण्याची शक्यता होती; परंतु नोकरी टिकून राहिली असती. म्हणून या परिस्थितीत नवीन नोकरी न घेणे हा पर्याय परिस्थितीशी, पत्रिकेशी सुसंगत होता.
माझे बोलणे संपत असताना त्या गृहस्थांनी उठून माझ्याशी दोन्ही हातांनी हस्तांदोलन केले आणि उत्तम विवेचनासाठी माझे अभिनंदन केले. अजून काय पाहिजे!
– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
९८२०४८९४१६
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.