उद्योगोपयोगी

प्रगतीच महामार्ग ‘मास्टरमाइंड ग्रुप’

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


‘मास्टरमाइंड ग्रुप’ या विषयाची आपली पहिली ओळख होते ती नेपोलियन हिल यांच्या 1925 साली लिहिलेल्या ‘लॉ ऑफ सक्सेस’ या पुस्तकाने आणि पुढे त्यांनी 1937 साली लिहिलेल्या ‘थिंक अँड ग्रो रिच’ या पुस्तकात या विषयाचा विस्तार केला आहे. त्यात हिल मास्टरमाइंड ग्रुपबद्दल ते असे संबोधित करतात,

“The co-ordination of knowledge and efforts of two or more people, who work toward a definite purpose, in the spirit of harmony.”

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
Book : The Laws of Success

मास्टरमाइंड ग्रुप म्हणजे समान ध्येय, उद्दिष्टे असलेल्या लोकांनी एकत्र येऊन आपली उद्दिष्टे, ध्येय पूर्ण करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे. ही ध्येये मग साधे कॉलेज अ‍ॅडमिशन असो, स्वस्थ राहणे असो किंवा संपूर्ण आयुष्य यशस्वी घडवण्याची असोत. मास्टरमाइंड ग्रुप म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग, प्रशिक्षण आणि परस्पर सहकार्य यांचे एकत्रीकरण आहे. यामध्ये प्रत्येक सदस्य एकमेकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. सहभागी सदस्य एकमेकांशी आपल्या ध्येयाबद्दल चर्चा करतात. ती साध्य करण्यासाठीची व्यूहरचना तयार करतात.

यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते एकमेकांशी स्पष्ट बोलणे, चर्चा करणे, सद्य:स्थितीचा आढावा घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठरलेली गोष्ट साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे. मास्टरमाइंड ग्रुप याविषयी आपल्या मनात अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. मुळात एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, हा कोणत्याही प्रकारचा बिझनेस नेटवर्किंग क्‍लब नाही किंवा शिकवणी नाही. इथे प्रत्येकासमोर स्वत:चे प्रामाणिक ध्येय स्पष्ट असायला हवे आणि एकमेकांची मदत घेऊन, एकमेकांना वेळप्रसंगी जाब विचारून ते ध्येय पूर्ण करण्याची तयारी असायला हवी.

मास्टरमाइंड ग्रुपचे फायदे

सामान्यपणे आपल्याला असेच अनेक लोकभेटतात ज्यांच्या आयुष्यात काहीही ध्येय नाही. त्यांच्यासाठी जे जसे चालू आहे तसे जगणे म्हणजेच जीवन आहे. या ग्रुपमध्ये आल्यावर तुम्ही एका विशिष्ट वर्गात समाविष्ट होता, जिथे तुमच्याप्रमाणेच ध्येयवेडे एकत्र आलेले असतात. समर्थ रामदासांनी म्हटले आहे त्याप्रमाणे ध्येयनिष्ठांची सुसंगती आपल्याला अशा प्रकारच्या मास्टरमाइंड ग्रुपमध्येच मिळू शकते.

निरनिराळे दृष्टिकोन : मास्टरमाइंड ग्रुपमधील लोकांचे एखाद्या विषयावरील निरनिराळे दृष्टिकोन ऐकून तुम्हाला तुमच्या जीवनातील तसेच ध्येयाकडील काही महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव होते. त्यांचे दृष्टिकोन तुम्हाला पटोत अथवा न पटोत, पण या सर्वांनी तुम्हाला तुमचे विचार अधिकाधिक सुधारण्याची संधी मिळते.

मदतीचा स्रोत : तुम्हाला लागणार्‍या वेगवेगळ्या प्रकारची मदत तुम्हाला तुमच्या ग्रुप सदस्यांकडून मिळू शकते. तुम्हाला असाही अनुभव येऊ शकेल की, हे काम मी एखाद्याची मदत घेऊन इतक्या चांगल्या प्रकारे करू शकलो, जितके मला स्वत:ला जमले नसते.

जबाबदारीची आठवण करून देणारे भेटतात : आपले ग्रुप सदस्य हे आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने असलेल्या जबाबदार्‍यांची आठवण करून देतात. साप्ताहिक किंवा मासिक पातळीवर नियमित होणार्‍या मास्टरमाइंड ग्रुप्सच्या मीटिंग्जमुळे तुम्हाला सतत तुमच्या ध्येयाची आठवण होत राहते.

कसा सुरू करायचा मास्टरमाइंड ग्रुप?

विषय निवडा : विषय कितीही छोटा वा मोठा असू शकतो, अगदी तुमचे संपूर्ण आयुष्यसुद्धा. जर तुम्ही यात नवीन असाल तर एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. जसे प्रकृती, करीयर, शिक्षण किंवा इतर कुठलाही विषय ज्यात तुम्हाला सुधारणा किंवा प्रगती कराविशी वाटते.

सदस्य निवडा : मास्टरमाइंड ग्रुपची मदार ही त्यातील सदस्यांवर अवलंबून असल्याने तुमच्या ग्रुपचे सदस्य बारकाईने निवडा.

मास्टरमाइंड ग्रुपमध्ये कोणाला जोडावे?

स्वत:च्या ध्येयाप्रति गंभीर असणार्‍यांना, कष्ट करून ध्येय साध्य करण्याची तयारी असणार्‍यांना, ध्येय कितीही कठीण वाटत असले तरीही ते पूर्ण करण्याची चिकाटी असणार्‍यांना. महत्त्वाचे, मास्टरमाइंड ग्रुपमध्ये खोगीरभरती करून कोणालाही जोडल्यास शेवटी ग्रुपचे नुकसानच होणार आहे, कारण यामध्ये प्रत्येक सदस्य हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो जर का आपल्या ध्येयाप्रति गंभीर नसेल, तर त्याचा संपूर्ण ग्रुपच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

सामान्यपणे ग्रुप हा कमीत कमी लोकांचा असावा. यामुळे थोडक्यात स्पष्ट आणि संपूर्ण विषयावर खोलात चर्चा होते. तुम्ही कमी-जास्त लोकांत प्रयोग करू शकता, पण जर ही तुमची सुरुवात असेल तर दोन किंवा तीन लोकांमध्ये सुरुवात करणे श्रेयस्कर.

मास्टरमाइंड ग्रुप कसा चालवावा?

नियमित आणि अचूक भेटा : नियमित वेळ ठरवा आणि प्रत्येक सदस्य वेळेत आणि नियमित आहे याची खात्री करा. दर आठवड्याला किमान एक तासासाठी भेटणे उत्तम. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कमी-अधिक वेळ लागू शकतो.

प्रत्येक सदस्याला समान वेळ द्या : प्रत्येक सदस्याला समान वेळ मिळणे आवश्यक आहे. याने वेळेचे बंधनही राहते व कोणाला आपल्यावर अन्याय झाला असे वाटत नाही.

मधे व्यत्यय आणू नका : एका वेळी एकच सदस्य बोलेल. कायम लक्षात ठेवा की मीटिंगमध्ये प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी. तुमचे विचार समोरच्याचे बोलणे पूर्ण होईपर्यंत थांबवून ठेवा.

तुम्हाला कुणी मार्गदर्शक हवा आहे का हे ठरवा : ग्रुप सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणी मार्गदर्शक हवा असल्यास तसे ठरवा. अतिथी मार्गदर्शकही बोलवता येऊ शकतो.

नोंदी ठेवा : प्रत्येक मीटिंगमध्ये झालेल्या गोष्टी तुमच्याकडे नमूद करून ठेवत आहात ना यावर लक्ष ठेवा. जसे ध्येय, नवीन कल्पना, विचार इ.

अशा प्रकारे मास्टरमाइंड ग्रुप तयार करून एकमेकांच्या सहकार्याने परस्परांची प्रगती करणे नक्की शक्य आहे. तर हा प्रयोग आपापल्या ठिकाणी आपापल्या परीने नक्की करून बघा.

– शैवाली बर्वे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!