ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपण उद्योजक आहात किंवा होऊ इच्छिता. तुम्ही करोडो रुपयांचे व्यवसाय करणार्‍या अशा मोठ्या कंपनी/संस्था पाहिल्या असतील. त्यांची उलाढालीची व नफ्याची वार्षिक टारगेट्स असतात. आपल ध्येय काय आहे? मन, शरीर, बुद्धी हे आपल्याकडील महत्त्वाचे भांडवल आहे, हे आपण जाणतो. त्याचा वापर करून आपण कोणतीही गोष्ट करू शकतो, मिळवू शकतो.

आपण स्वत: सीइओ असून आपले मन आपला मॅनेजर आहे, आपलं काम आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो, असे समजून घेऊ. यशस्वी व्यक्ती आपल्या मनाचा वापर करून कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात, घडवून आणू शकतात.

ज्या वेळी मन ध्येयाने प्रेरित होतं, त्या विषयावरच मन एकाग्र होतं, त्या वेळी यश मिळतं, असंही आपण पाहिलं. आज आपण ध्येय कसं ठरवावं व कसं साध्य करावं याविषयी विचार करू या. अर्थातच, मनाच्या वापराने हे कसं करायचं याची चर्चा आपण करू या.

ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?

ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक काळात काय हवे आहे? काय मिळवायचे आहे? ध्येय, उद्दिष्ट, goal, target या सर्वांचा सोपा अर्थ आहे, आपल्या सर्व गोष्टी करण्याचे कारण! आपण जे काही करतोय त्याने आपल्याला काय मिळवायचे आहे, कोठे पोहोचायचे आहे ते म्हणजे ध्येय?

दुसर्‍या शब्दात सांगायचं तर, तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ, पैसा, मेहनत, विचार, लक्ष कोठे लावले आहेत, ते तुमचे लक्ष, ध्येय, सेरश्र. तुम्ही मागील सात दिवसांतील १६८ तासांपैकी ८० तासांत काय मिळवायचा प्रयत्न करीत होतात ते तुमचे ध्येय!

आता यावर जर तुम्ही नीट विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे नक्की काही एक ध्येय आहे किंवा नाही. तुम्ही स्वत:साठी काही करत आहात की दुसर्‍याच्या ध्येयाचा एक भाग झाला आहात? तुम्ही स्वत: ठरवून काही क्रिया करीत आहात की तुम्ही फक्त प्रतिक्रिया देत आहात? काय करावं, याचा गोंधळ तुमच्या डोक्यात झाला आहे काय? या प्रश्‍नांची उत्तरे द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे ध्येय तुम्ही ठरविले आहे का?

एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी तिचा ध्यास घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. धरसोड करणार्‍या व्यक्तीस कोणतंही यश मिळत नाही. तुमचे श्रम, पैसा, वेळ, लक्ष, मेहनत विखुरले गेले तर कोणतेही एक लक्ष्य साध्य होत नाही. जगातील यशस्वी कलाकार, क्रीडापटू, उद्योजक, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी यांची चरित्रे अभ्यासली असता, ते सगळे तन-मन-धन लावून एकाच विषयाचा, ध्येयाचा विचार करीत होते असे दिसून येते.

आपणाला एखादा चित्रपट पाहायचा असेल, तर कशी तयारी करतो? किती त्यासाठी काहीही करतो? किती वेळ त्याचा विचार करतो? जर तीन तासांच्या चित्रपटासाठी आपण एवढा विचार व कृती करतो, तर जीवनातील पाच, दहा, वीस वर्षांसाठी आपले काही ध्येय निश्‍चितच असायला हवे. त्यामुळे जगण्याला दिशा मिळते, अर्थ प्राप्त होतो, उत्साह वाढतो. आपल्यातील सुप्त गुण व शक्ती आपल्याला कळतात.

ध्येयामुळे जीवनात नियमितता व शिस्त येते. नियमिततेमुळे यश मिळते. विचार करा, तुम्हाला सकाळी दूध, पेपर देण्यापासून, बस-गाडी, अन्नपुरवठा, मोबाइल, औषधे, करमणूक, कपडे या व अशा शेकडो वस्तू व सेवा देणार्‍या संस्था नियमित व यशस्वी आहेत ना? जशा या संस्था ध्येय ठेवून नियमित काम केल्याने यशस्वी आहेत, तसे आपणही होऊ शकतो.

हीच वेळ आहे, जर तुमचं कोणतंही एक नक्की ध्येय नसेल व तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर ते ध्येय ठरविण्याची!

ध्येयाचे प्रकार

ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक वेळेत काय हवे किंवा मिळवायचे आहे? ते ‘काहीही’ असू शकतं. पैसा, घर, गाडी, लग्‍न हे तर सर्व मान्य विषयच आहेत; पण ध्येय गायक होण्याचं, मोठा खेळाडू होण्याचं, वजन कमी करण्याचं, समाजसेवेचं, रागावर नियंत्रण मिळवण्याचं कसलंही असू शकतं.

प्रश्‍न हा आहे की तुम्ही नक्की ठरवलं आहे का तुम्हाला काय हवं आहे? किती हवं आहे? कसं हवं आहे? कधी हवं आहे? त्यासाठी अविरत प्रयत्न करायला तुम्ही तयार आहात ना? त्या यशासाठी किंमत तुम्ही मोजणार ना? तुमची अनेक प्रकारची ध्येय असू शकतात.

उदा. तुम्ही एकाच वेळेस व्यवसाय १० लाख करायचा व वजन दहा किलो कमी करायचं, अशी दोन ध्येय ठरवू शकता; पण मग त्यासाठी वेळ व इतर साधनांची वाटणी व नियोजन तसे करायला हवे व या दोन ध्येयांचाच पाठपुरावा करायला हवा. तुमच्या वेळेचा, विचाराचा व इतर साधनांचा खर्च काटेकोरपणे यासाठीच व्हायला हवा.

या सर्व गोष्टी करताना आपले मनच आपला साथीदार व भागीदार असते. या सार्‍या विश्‍वात आपले मन ही एकच गोष्ट अशी आहे की, ज्यावर आपले नियंत्रण ‘असू शकते’.

आपल्याबाबत घडणार्‍या घटनांवर आपले नियंत्रण नसते. आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो ते महत्त्वाचे. अशी प्रतिक्रिया देताना, आता तुम्ही विचार कराल की, ही गोष्ट, ज्यावर आपण वेळ, पैसा, विचार, भावना खर्च करत आहोत, ती ध्येयाशी संबंधित किंवा त्याजवळ नेणारी आहे का, तरच त्यावर प्रतिक्रिया द्यावी, अन्यथा त्यावर मानसिक व शारीरिक शक्ती खर्च करू नये.

ध्येय कसे ठरवावे

ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक वेळेत काय हवे किंवा मिळवायचे आहे? हा प्रश्‍न परत विचारण्याइतका महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला नक्की काय हवे आहे? किती? कधी? ज्यांनी आयुष्यात यश मिळविले त्यांनी त्यांना आवडणार्‍या विषयात ध्येय ठेवले व त्यांतच काम केले, त्याचाच विचार केला.

तुम्हाला गायक व्हायचे आहे, पण तुम्ही फुटबॉल सामने बघत राहिलात, तर काय उपयोग, तुम्हाला कोट्यधीश व्हायचे आहे, तर तुम्ही नोकरी केल्याने ते साध्य होईल का? तर, तुमच्या आवडत्या विषयातील ध्येय ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्यात काम करायला कंटाळा येणार नाही, तुम्ही दमणार नाही व कायम उत्साहात भरपूर मेहनत कराल.

त्याचप्रमाणे, तुमचे ध्येय SMART असू द्या.

S म्हणजे Specific ध्येय मोजक्या शब्दांत, आकड्यांत, तारखेत व्यक्त करा, ते लिहून काढा,

M म्हणजे Measurable असू द्या. नुसतं ‘भरपूर श्रीमंत व्हायचंय’, हे ध्येय नव्हे. ‘मला ३१ मार्च २०१६ पर्यंत १०० कोटी रुपये मिळवायचे आहेत’, हे ध्येय आहे. ध्येय मोजण्यासारखे ठरविल्यामुळे, त्यातील पायर्‍या, विभाग ठरविता येतात, मोजता येतात.

A म्हणजे Achievable. सुरुवातीला तुम्हाला दृष्टिपथात असेल असे ध्येय ठेवा, ज्यामुळे ते साध्य केल्यामुळे पुढे मोठी ध्येय ठेवण्याचा उत्साह वाढेल.

R म्हणजे Realistic. तुमच्या ध्येयातील टप्पे तुम्हाला ठरविता आले, तर तुमचे ध्येय realistic आहे.

T म्हणजे ढळाश Time Bound. तुमचे ध्येय तुम्हाला कोणत्या दिवसापर्यंत गाठायचे आहे, ते ठरवा. त्यामुळे ध्येय गाठण्यातील टप्पे तुम्हाला ठरविता येतील. उदा. तुम्हाला बारा महिन्यांत १०० कोटी मिळवायचे असतील तर प्रत्येक तिमाहीत २५ कोटींसाठी नियोजन करावं लागेल.

आपलं आठ ते दहा शब्दांचं ध्येयवाक्य ठरवा. ते कायम मनात रुजवा, त्याचा जप करा, ते लिहून ठेवा. त्याचे फलक करून तुमच्या घरात व कार्यालयात लावा. ते लोकांना सांगा, म्हणजे लोकही तुम्हाला विचारून त्याची आठवण करून देतील. तुम्ही ठरविलेले ध्येय तुम्ही गाठणारच यांवर तुमचा विश्‍वास हवा.

ध्येयवाक्याची काही उदाहरणे

३१ मार्च २०१६ पर्यंत मला १०० कोटी रुपये मिळत आहेत.
माझ्या उत्पादनाची विक्री ३१ डिसेंबरपर्यंत १० लाख होत आहे.
३० ऑगस्टपर्यंत माझे वजन 68 किलो होत आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत मी इंग्लिश बोलायला शिकत आहे.

असं तुमचं ध्येयवाक्य तुम्ही आताच लिहून काढा व सुरू करा ध्येयाचा रोमांचकारी प्रवास आणि तुम्ही बघाल की, आयुष्यात कोणतीही गोष्ट करणं शक्य आहे. तुम्ही ठरविण्याचाच अवकाश!

ध्येय गाठण्याचा आराखडा

आता एकदा काय करायचं व कोणत्या दिवसापर्यंत हे नक्की ठरविल्यावर, आपण प्रकल्पाचा आराखडा तयार करू या. सर्वात आधी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कोणत्या माहिती, ज्ञान, वस्तू, व्यक्ती, जागा, पैसा अशा साधनांची सविस्तर यादी करावी. त्याची उपलब्धता आपल्याला निश्‍चित करावी लागेल. त्यासाठी क्रमबद्ध कार्यक्रम लिहून काढा.

आपल्या ध्येयाच्या दृष्टीने आवश्यक, पण आपण करू शकत नाही, अशा गोष्टींसाठी इतरांची मदत घ्यावी लागेल. जसं की तुम्ही चांगलं उत्पादन बनवू शकता, पण तुम्हाला विक्री करणे जमत नाही, तर त्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची नेमणूक करा.

लक्षात ठेवा, तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला मित्र, शेजारी, नातेवाईक, सहकारी, भागीदार, अशा अनेक जणांची मदत लागणार आहे व होणार आहे. म्हणून सर्वांना घेऊन पुढे जाण्याची तयारी ठेवा. त्यासाठी मानवी स्नेहसंबंध सुधारण्यावर भर द्या. नवीन पद्धती, व्यवस्था, नियम शिकण्याची तयारी करा.

आता थोडं आकड्यांशी खेळू या. समजा, तुमचं एक वर्षाचं ध्येय व तारीख ठरली. आता ते बारा महिने किंवा ५२ आठवड्यांत विभागा. पाहा, किती छोटं व सोपं झालं ते. क्रिकेटच्या सामन्यातही एका षटकात किती धावा करायच्या ते ठरवूनच ३००-३५० धावा ५० षटकांत उभारतात, हे तुम्ही पाहिले आहेच.

तर, त्यानुसार तुमच्या ध्येयाचा दर आठवड्याचा व दिवसाचा कार्यक्रम व आराखडा तयार करा. दिवसभरात किती काम करायचे, कोणाला भेटायचे, कोणाला फोन करायचे, ई मेल पाठवायच्या, कोणाकडून कोणते काम करून घ्यायचे, कोणाकडे कोणत्या कामाविषयी अहवाल मागवायचा, हे सर्व लिहून काढा.

अशा यादीला to-do-list म्हणतात. करायची कामे लिहून काढल्यावर ती कामे होण्याची व आपण करण्याची शक्यता खूपच वाढते. पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे पैशाचे हिशेब. तुमचं वार्षिक जमा-खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. तुम्ही व्यवसायाशी संबंधित सर्व बाबींचा विचार करा.

त्यानुसार तुम्हाला तुमच्या उत्पादनाची वा सेवेची वाजवी किंमत ठरवता येईल. अशा अंदाजपत्रकाचं महिन्याच्या पातळीवरचं कोष्टक तयार करा व त्याचा आढावा घ्या. या सर्व गोष्टी लिहून काढून तुम्ही एक आंतरिक शिस्त तयार करता व तिचे पालन केल्यास तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होते.

या तुम्ही बनविलेल्या आराखड्याचा मुख्य उपयोग तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाची कायम आठवण देणे हा होय. त्यामुळे तुम्ही सदैव ध्येयाचा विचार करता व इतर गोष्टींत तुमचे लक्ष विचलित होण्याचे प्रमाण खूप कमी होते. आता तुम्हाला मनाची कार्ये, एकाग्रता, तर्क, गणित, आत्मविश्वास, संयम, आयोजन, भावना, स्मरणशक्ती यांची मदत आपल्या ध्येयपूर्तीसाठी कशी होईल, हे समजायला मदत होईल.

मन हे चोवीस तास कार्यरत असते. आता तुम्ही त्याचा स्वेच्छेने वापर करून, त्यांवर नियंत्रण ठेवून ध्येय गाठण्यासाठी वापर कराल. एका दिवसात आपल्या मनात ५० हजार विचार येतात, त्यापैकी अर्ध्याहून अधिक विचार तुमच्या ध्येयाचेच असतील, तर तुम्ही ते विसरू शकणार नाही व तुम्ही यशस्वी होणारच! शंका वाटत असेल तर आधी करूनच बघा!

– सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?