Advertisement
उद्योजकता

व्यवसाय नेमका सुरू कसा करायचा?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


उद्योग करणे सोपे नक्कीच नाही; परंतु संपूर्ण तयारीनिशी उतरला नाहीत, तर नुकसान होण्याची संभावना जास्त असते. म्हणूनच पूर्वतयारी करणे हा यावर उत्तम पर्याय आहे. त्यामुळे उद्योगाची पूर्वतयारी करावी. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.

उद्योगाचे स्वरूप आणि संधी : आपल्या आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योगात मन लावून काम केले जात नाही. त्याचप्रमाणे उद्योगात संधी किती आहेत याचा विचारही करणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये कोणत्या गोष्टींना सतत मागणी असते, कोणकोणत्या नव्या संधी बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत आहेत, निवडलेल्या संबंधित उद्योगात किती संधी आहे याची माहिती घेणेही महत्त्वाचे ठरते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

उद्योगासाठी जागा : काही उद्योगांसाठी मोक्याची जागा असणे आवश्यक असते, तर काहींसाठी मोठे गोडाऊन अथवा साठवणूक करता येईल अशी मोठी जागा असणे गरजेचे असते. अशी जागा थोडी आतल्या बाजूला असली तरी चालते. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री, हॉटेल, कपडे, औषधे, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या उद्योगांसाठी तुम्हाला जागेची निवड काळजीपूर्वक करावी लागते.

उदा. हॉटेल, मॉल, आदी उद्योगांसाठी पार्किंगच्या सोयीचा विचार करावा लागेल, अन्यथा त्याचा परिणाम उद्योगावर होईल. त्याचप्रमाणे काही उद्योग घरगुती असतील तर घराची रचना त्याप्रमाणे करावी.

आर्थिक नियोजन : उद्योग सुरू करताना भांडवल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बँकेकडून कर्ज घेऊन आर्थिक सोय करता येते. कर्ज घेतल्यानंतरही हप्ते भरण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्ष राहणे गरजेचे आहे. आर्थिक शिस्त पहिल्यापासूनच लावून घेतल्यास उद्योग स्थिरस्थावर होऊन फायदेशीर होण्यास सुरुवात होते.

कच्चा माल, जागेची किंमत या गोष्टींचा विचार भांडवल उभारणी करताना लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे काही वेळा उद्योग सुरू करेपर्यंत कच्च्या मालाची किंमत वाढू शकते. त्यामुळे राखीव आर्थिक गंगाजळी ठेवणे गरजेचे आहे.

व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण : कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गरजेनुसार एखादा कोर्स, प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. यामधून उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी होण्यास मदत होते. उद्योगासाठी योग्य ती पूर्वतयारी, धाडस आणि आर्थिक समतोल राखला तर नक्कीच यश मिळते.

आवश्यक संसाधने : जमीन (जागा), भांडवल (पैसे), मनुष्यबळ (कामगार), कच्चा माल (जर गरज असेल तर) या संसाधनांचा विचार सर्वात आधी करावा लागतो. त्याचप्रमाणे मार्केटिंग (विपणन), जाहिरात, हिशोब ठेवणे या गोष्टीही तितक्याच आवश्यक ठरतात. या संसाधनांचा योग्य वापर करणे हे कोणत्याही उद्योजकासाठी आवश्यक गोष्ट ठरते. उद्योगासाठी योग्य जागा, त्याचप्रमाणे उद्योगाच्या उभारणीसाठी पुरेसे भांडवल हाताशी असणे आवश्यक ठरते.

काही काही उद्योगांसाठी कच्च्या मालाची गरज लागत नाही; पण जाहिरात आणि विपणन आवश्यकच ठरते. अशा वेळी ती ती कौशल्ये असलेली माणसे बरोबर बाळगावीच लागतात. बर्‍याच वेळा उद्योजकाच्या अंगी यातली अनेक कौशल्ये असतात किंवा त्याला या सर्व बाबींचे किमान ज्ञान असते; परंतु उद्योजकाच्या हातात असलेला वेळ आणि कामे यांची सांगड घालणे कठीण जाते. त्या वेळी त्याला प्रशिक्षित मनुष्यबळ नोकरीला ठेवावेच लागते.

कोणता उद्योग निवडावा?

स्वत:च्या क्षमतेनुसार व आवडीनुसार उद्योगनिवडीचा विचार करा. सुरुवातीला तुम्ही अगदी छोटा किवा सीझनल उद्योग करून बाजारपेठेचा अंदाज घेऊ शकता. नंतर हळूहळू जशी मागणी वाढेल तसतसा उद्योग वाढवू शकता.

मार्केटिंग प्लॅन

मार्केटिंग म्हटले की, उत्पादन, किंमत, जाहिरात आणि जागा या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. मार्केटिंग करून जर उद्योग केला तर तो उद्योग योग्य दिशेला जातो. तसेच निश्चित केलेले ध्येय साध्य करता येते. उत्पादनाची विक्री वाढवून नफा कमावणे, खर्च कमी व योग्य प्रकारे करणे अशी उद्दिष्टे समोर ठेवली पाहिजेत.

योग्य मार्केटिंग हे ग्राहकांच्या हिताचे, इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यावर भर देते. मार्केटिंगमध्ये नवीन ग्राहक निर्माण करण्यावर आणि ते ग्राहक टिकवण्यावर भर दिला पाहिजे. वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन, उच्च प्रत आणि उत्तम मार्केटिंगची डीएसके, चितळे, गाडगीळ अशी अनेक उदाहरणे आहेत.

मार्केटिंग प्लॅन तयार करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे :

 • उद्योगाचे ध्येय आणि दूरदृष्टी
 • विशिष्ट नियोजनात्मक वेळापत्रक
 • मार्केटिंगचे उद्दिष्ट
 • स्वत:चे सामर्थ्य, उणिवा, धोका आणि संधी. जोखीम पत्करण्याचे धाडस
 • सुसंवाद कौशल्य
 • मार्केटिंगची अपेक्षित बाजारपेठ
 • उत्पादनातील खुबी आणि वैशिष्ट्ये
 • मार्केटिंगचे घटक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
 • बजेटची मार्केटिंगमधील तरतूद
 • ग्राहकाभिमुख सेवा

मार्केटिंगचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी जिद्द, परिश्रम आणि कौशल्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. उद्योगातील तज्ज्ञ व्यक्ती आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज आवश्यक आणि लाभदायक ठरते.

विक्री कला

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरू असते. वस्तूंचे आर्थिक विनियोग घडवून आणण्यासाठी विक्रेता जी कौशल्यपूर्ण कला वापरतो त्याला ‘विक्रीची कला’ म्हणतात. व्यापारी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन तयार करतात. विक्रेता हा माल किंवा वस्तू प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोचवतात.

विक्रेत्याला वस्तूची विक्री करण्यासाठी ग्राहकांशी संपर्क, प्रदर्शन, मालाचे सादरीकरण, वस्तूची उपयुक्तता आणि कमीत कमी किमतीत वस्तूंची खात्री द्यायला लागते.

उत्पादनाची जाहिरात ही वर्तमानपत्र-साप्ताहिके-मासिके, टीव्ही चॅनल्स, होर्डिंग्ज, पत्रके, सवलती किंवा योजना, कार्यक्रमाचे प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) घेणे, फ्री सॅम्पल अशा अनेक प्रकारे केली जाते.

जाहिरातीने आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली आहे, याचा प्रसार आणि प्रचार केला जातो. विक्रीची कला यामध्ये वस्तूची जाहिरात महत्त्वाची मानली जाते. ग्राहकांचे मन जिंकण्याचे प्रयत्न विक्रेता करतो. ग्राहक उत्पादनाशी जोडला तर तो ग्राहक टिकवून विक्रेता दुसरे ग्राहक शोधत असतो. ग्राहकाचे वस्तूशी समाधान झाले की, तो ग्राहक पुन्हा खरेदीसाठी येईल याची विक्रेता काळजी घेतो.

विक्री कलेतील वैशिष्ट्यपूर्ण घटक

 • विक्रीचा प्रामाणिक प्रयत्न करणे. ग्राहकांचे मत जाणून त्यांना खरेदीकडे वळवणे.
 • ग्राहकांचा विश्वास साधणे. ग्राहक आणि विक्रेत्याचा फायदा हा चांगली सेवा देऊन करणे.
 • वस्तूंची संपूर्ण माहिती देऊन निर्यात करणे. विक्री कलेची तंत्रे मालाची, उत्पादनाची आणि वस्तूंची चांगल्या आणि आकर्षक पद्धतीने मांडणी करणे.
 • ग्राहकांना वस्तूंची सविस्तर माहिती देणे. रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून आकर्षक जाहिरात तयार करून त्यांचा प्रसार करणे.
 • गॅरंटी, वॉरंटी, सर्व्हिस, संपर्क अशी माध्यमे वापरून ग्राहकांशी संपर्क वाढवून उत्तम सेवा देणे.
 • फ्री सॅम्पलसारख्या योजना देऊन ग्राहकांना आकर्षित करणे.
 • ग्राहकांच्या शंकांचे समाधान करणे आणि तक्रारींचे निवारण करणे.

अशाप्रकारे विक्रीची कला ही प्रत्येक विक्रेत्याला अवगत झाली पाहिजे.

– टीम स्मार्ट उद्योजक

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!