अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकात कोणते गुण असावेत?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


एकदा नवीन उद्योग उभारायचा असेल, विशेषत: अन्नप्रक्रिया उद्योग उभारायचा असेल तर उद्योजकाला काय काय करावे लागते, कसे करायचे याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्याची मोठी गरज आहे.

विशेषत: आपल्याला याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की ग्रामीण भागात जेथे शेती केली जाते, जेथे या उद्योगाचा कच्चा माल तयार होतो, तेथेच शेताशेतांत, घरोघरी शेतातले पीक कापल्यावर जेव्हा शेतकर्‍यांना उसंत मिळालेली असते.

जेव्हा ग्रामीण भागात रोजगाराची मोठी गरज निर्माण झालेली असते तेव्हा; ज्यांचे शिक्षण फारसे झालेले नाही, ज्यांनी शहरातले जीवन आणि विक्री पाहिलेली नाही, त्यांनासुद्धा प्रक्रिया उद्योग यशस्वीपणे करता यावा एवढे मार्गदर्शन केले पाहिजे.

ग्रामीण भागात चौथी, सातवी आणि दहावीच्या टप्प्यांंवर अनेक जणांना/जणींना शिक्षण सोडून देऊन आयुष्याला सुरुवात करावी लागते. बेकारी खेड्यात तशीच शहरातही असते. मात्र शहरात शिक्षणाच्या मार्गदर्शनाच्या सोयी असतात. मात्र उद्योजकतेविषयीचेे प्रशिक्षण फारसे कोठेच मिळत नाही.

देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. स्वत:च उद्योग निवडून स्वयंरोजगार, कुटिरोउद्योग, रायनी उद्योग, लघुउद्योग उभारण्याला पर्याय राहिलेला नाही. येथे आपण एकदा अन्नप्रक्रिया उद्योग उभारताना कोणकोणत्या पायर्‍या चढाव्या लागतात त्याची माहिती घेऊयात.

१) उत्पादनाची संकल्पना – कोणते उत्पादन करायचे आहे हे प्रथम ठरवावे लागते.

२) आता जे उत्पादन निवडले त्याच्या बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला पाहिजे.

माझी आई चटणी चांगली बनवते. ही झाली मूळ कल्पना, पण ही चटणी फायदेशीरपणे विकली जाईल का? यासाठी बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. हे उत्पादन कोण खरेदी करते-करतो-करतात म्हणजे खरेदी महिला करतात की मुलांच्या आवडीचा निर्णय खरेदी होणार की नाही हे ठरवतो, अशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे.

बाजारात एकाच प्रकारचे उत्पादन विविध आर्थिक गटांसाठी वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये आणि विविध प्रकारे विकले जात असते.

३) मार्केटिंगचे 4-P म्हणजे

१) उत्पादन (Product)
२) स्थान (Place)
३) किंमत (Price)
४) प्रमोशन (Promotion)

अशा सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. आपण आपले उत्पादन कोणाला विकणार आहोत, आपला संभाव्य ग्राहक कोणता हे ठरवले पाहिजे, एवढेच नव्हे तर त्याप्रमाणे उत्पादनात बदल केले पाहिजेत उदा. मधुमेही रुग्णांसाठी जाम करायचा असेल तर त्यांना चालणारी गोडी देणारी साखरेला पर्याय अस्पार्टेम, इक्वल, स्टेव्हिया वगैरेंचा वापर केला पाहिजे.

४) प्राथमिक माहिती गोळा केल्यावर आपला आपला बिझिनेस प्लॅन केला पाहिजे.

५) आपण आपल्या मनात प्लॅन करण्यापेक्षा प्लॅन लिहावा.

तसेच तो जेवढा तपशीलवार करता येईल तेवढा तपशीलवार प्लॅन करावा. म्हटलेच आहे If you plan you get results, if you don’t, you get consequences!. अनुभव हा एक असा शिक्षक आहे की, तो प्रथम परीक्षा घेतो व नंतर शिकवतो.

अर्थातच आपण प्रथम तपशीलवार माहिती घेतली तर अनेक धोके टाळता येतील. पर्यायांचा विचार झालेला असेल तर प्रत्येक खाचखळग्यात पाय मुरगळवून घ्यावा लागणार नाही.

६) आपल्याला यासाठी अनेकांची मदत घ्यावी लागेल.

कोठे कोणती मदत मिळते हे माहीत करून घ्या. उदा. जिल्हा उद्योग केंद्रामध्ये उद्योगाची जवळजवळ सगळी माहिती मिळते. बँकांमध्ये कर्जाचे निकष समजतात.

७) नोंदणीचा फॉर्म

जिल्हा उद्योग केंद्रात मिळणारा नोंदणीचा फॉर्म वाचल्यावर आपल्याला कोणकोणती माहिती मिळवायची आहे ते लक्षात येते. उदा. कंपनीचा फॉर्म म्हणजे कंपनी प्रोप्रायटरीशिप आहे, पार्टनरशिप आहे वगैरे.

८) कोणताही उद्योग व्यवसाय निवडताना सरकारी नियमांची माहिती घ्यावी.

विशेषत: अन्नपदार्थांच्या बाबतीत ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नियम केलेले आहेत; किंबहुना आपण आपल्या मालाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने, ग्राहकांमधील आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी सरकारी नियमांपेक्षा जास्तच काळजी घ्यावी. अगदी पाश्चात्त्य देशातील व्यक्तीने आपला अन्नप्रक्रिया उद्योग पाहिला तर त्याला आपल्या स्वच्छतेचे कौतुक वाटले पाहिजे.

९) अन्नप्रक्रिया उद्योगांच्या बाबतीत अन्नाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळवावी.

१०) आता आपण उत्पादनाचे धोरण ठरवावे.

११) बाजारात आपले उत्पादन ज्या स्वरूपात विकले जाणार आहे त्या प्रकारचे उत्पादन विकसित करावे.

१२) पॅकिंग आणि लेबलिंग पूर्ण विकसित करावे.

१३) विक्री किंमत, मार्केटिंग, प्रमोशन (जाहिरात वगैरे) धोरण ठरवावे.

१४) आपण हेही लक्षात ठेवावे की, उत्पादन चांगले असले तरी बाजारात अयशस्वी ठरू शकते.

रस्त्यावरून जाणारी ‘नॅनो’ पाहिल्यावर हे लक्षात येईल आणि हो, जर आपणास नॅनो जगाची एक नंबरची गाडी म्हणून यशस्वी करण्याची कल्पना सुचली तर टाटा मोटर्सला अवश्य कळवा – याउलट ‘मारुती ८००’ कशी लोकप्रिय झाली याचाही विचार करावा. कसे करायचे याचा आराखडा तयार करावा.

१५) विक्रीसाठी जाहिरात करावी लागते. पण त्याचबरोबरच इतरही अनेक कमी खर्चाचे मार्ग असतातच ‘word of mouth‘ या प्रकारची पब्लिसिटी फुकट असते, पण त्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात.

निरनिराळ्या कारणांमुळे रोजगारनिर्मिती ठप्प झालेली आहे. अशा वेळेला शाळा, कॉलेजांमध्ये आपण आताच्या पिढीला हे शिक्षण न देता पूर आलेल्या नदीत ढकलून देतो आणि सांगतो, ‘swim or sink‘ पोहा, नाही तर बुडा.

– पद्माकर देशपांडे
9325006291
soyasangh@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?