कोणत्याही उद्योगात भागीदाराचे योगदान आणि महत्त्व फार मोठे असते. तरीही अनेक लोक तुम्हाला धंद्यातील पहिला सल्ला हा देतात की, भागीदारी नको. जरा आजूबाजूला बघा, तुम्हाला बहुतेक सगळे चांगले चाललेले उद्योग भागीदारीतच आहेत हे दिसेल. यशस्वी भागीदारीचे गमक आहे ते भागीदार/साथीदार : का? कसा? केव्हा? हे शोधून त्याप्रमाणे व्यवहारात आणण्यात.
आज मोठ्या झालेल्या कंपन्या पाहा. टाटा, बिर्ला, रिलायन्स या सगळ्या कंपन्या भागीदारीतून चालू झाल्या आहेत. आजच्या फेसबुक, गुगल, उबेर, मॅकडॉनाल्ड यादेखील भागीदारी कंपन्याच आहेत. आपल्याकडेदेखील बारा बलुतेदारी आणि फड पद्धतीची शेती ही यशस्वी भागीदारीची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. गुजरातमधील अमूल किंवा महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने हेदेखील त्यातलेच.
भागीदारी फक्त दोन कारणांसाठी करावयाची असते. एक-ते काम करण्यासाठी जे तुम्हाला जमत नाही किंवा दोन-ते काम करण्यासाठी जे तुम्हाला अधिक मोठ्या प्रमाणात करावयाचे आहे. यामध्ये तुमची वैयक्तिक आवडनिवड यांचा संबंध येऊ द्यायचा नाही.
माझ्याकडे एकदा तीन भाऊ आले होते, ३५ ते ४५ वयोगटातले. त्यांचा काही रसायनांचा कारखाना होता. उद्योग चांगला चालला होता; परंतु भविष्याचा विचार करता त्यांना इतर काही उद्योग करण्यामध्ये रस होता. ते तेच विचारायला माझ्याकडे आले होते. मी त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास केल्यावर त्यांना विचारले की, आत्ताचा उद्योग त्यांचा पिढीजात उद्योग होता किंवा कसे? ते म्हणाले की, त्यांचे वडील सधन शेतकरी होते आणि ह्या भावांनीच हा उद्योग चालू केला होता.
मी त्यांना सांगितले, तुमच्यापैकी कोणाचीच कुंडली उद्योग उभारण्याची नाही तेव्हा तुम्ही हा नवीन उद्योग चालू केला हे एक आश्चर्य वाटते त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग सांगितले, आमच्या सगळ्यात छोट्या भावाने आम्हाला या उद्योगात आणले. त्याने हा चालू केला; परंतु नंतर आमचे त्याचे काही वाद झाल्याने आम्ही त्याला बाजूला केले आणि हा उद्योग पुढे चालवला.
मी त्यांना स्पष्टच सांगितले, तुमच्यापैकी एकाचीही पत्रिका नवीन उद्योग काढण्यास सध्या उपयुक्त नाही. तुम्ही या फंदात पडू नका, नाही तर आतापर्यंत कमावलेला सगळा पैसा गमावून बसण्याची पाळी येईल. नवीन उद्योग चालू करायचा असल्यास तुमच्या भावासारखा भागीदार शोधा आणि त्याला सर्वतोपरी मदत करा. नवीन उद्योग चालू करताना पत्रिकेतील आठवे स्थान चांगले असावे लागते. त्यापासून तुम्हाला जातकाची जोखीम घेण्याची क्षमता कळते.
त्याचबरोबर त्या वेळी त्याची दशादेखील चांगली असायला हवी. काळ चांगला असताना धोका पत्करल्यास त्यातून सुखरूप सुटका होते आणि अनेक वेळा आश्चर्यकारकरीत्या फायदापण होतो. याचे एक उदाहरण पुढे दिलेले आहे.
या तिघा भावांना माझा सल्ला असा होता, तुम्ही तिघेही अतिशय चांगल्या दर्जाचे प्रशासक आहात. तुमच्या पत्रिकाप्रमाणे तुम्हाला रासायनिक सतत प्रक्रिया उद्योगांमध्ये यश आहे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या चालू असलेल्या उद्योगाचा तपास करा आणि त्या उद्योजकाबरोबर भागीदारी करा.
हे दोघांच्याही फायद्याचे असेल, कारण त्यामुळे त्याला त्याचा उद्योग अनेक पटींनी वाढवता येईल आणि उद्योग त्याच्या प्रतिस्पर्ध्यांकडून विकत घेतला जायची भीती नाहीशी होईल. यांचे आता वेगवेगळे तीन उद्योग आहेत.
सुरुवातीला उद्योगात अनेक असे अडथळे येतात, की त्याबद्दल आपण आधी विचार केलेला नसतो, त्यासाठी काही व्यवस्था केलेली नसते. येथे तुमची कार्यक्षमता किती आहे याला महत्त्व नसते, तर तुमची परिणामकारकता किती आहे याला महत्त्व असते; परंतु एकदा उद्योग बरा चालायला लागल्यावरती मात्र कार्यक्षमतेला महत्त्व येते, कारण त्यामुळेच तुमचा नफा वाढू शकतो.
उदाहरणार्थ माझ्या माहितीतील काही लोकांनी एकत्र येऊन दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू केला. ते दूध आजूबाजूच्या गावांमधून गोळा करून मुंबईला आणून मोठ्या दुग्धालयांना विकायचे. दररोजचे चार टँकर ते मुंबईत आणून आपल्या नेहमीच्या दुग्धालयांना पोचवायचे.
दुधाची परीक्षा झाली की त्यांना त्याप्रमाणे क्रेडिट नोट मिळत असे आणि महिन्यातून एकदा सगळा हिशोब करून पूर्ण पैसे मिळायचे. हे मात्र शेतकर्यांना दर आठवड्यास पैसे देत. कमीत कमी वेळेत दूध मुंबईस आणणे, कमीत कमी डिजेल वापरणे, कमीत कमी अंतरात जास्तीत जास्त दूध गोळा करणे या सर्व गोष्टींना कार्यक्षमता म्हणतात.
पहिल्याच महिन्यात एक दिवस काही कारणाने हमरस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. त्या वाहतुकीत यांचे चारही टँकर अडकले. त्यातील दूध नासले. दोन दिवस वाहतुकीत जाणार होते, नंतर ते टँकर परत आणायचे, त्यातील नसलेल्या दुधाची विल्हेवाट लावायची, ते चांगले परत धुवायचे आणि दूध गोळा करायला पाठवायचे म्हणजे आणखी तीन दिवस आणि या मधल्या दिवसांमध्ये संकलन तर थांबवता येत नाही म्हणजे पहिल्याच महिन्यात २५ टक्क्यांपेक्षा अधिक महसूल गेला. नामुश्की पदरात पडली ती वेगळीच.
या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना जवळ जवळ एक वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागला. येथे उपयोगास येते ती परिणामकारकता. अशा निकडीच्या प्रसंगी काय केल्याने आपला तोटा कमीत कमी होऊ शकेल याचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही करणे म्हणजे परिणामकारकता.
ज्या पत्रिकांमध्ये दहावे स्थान बलवान असते अशा व्यक्ती जास्त कार्यक्षम असतात, तर ज्यांचे आठवे स्थान बळकट असते अशा व्यक्ती अधिक परिणामकारक असतात. अर्थात बाकी स्थानांचा, ग्रहांचा, दशांचा आपल्याला साकल्याने विचार करावा लागतो.
अगदी असाच प्रसंग दुसर्या एका उद्योजकावर ओढवला असता त्याने काय केले पाहा. आपले टँकर अडकले असे कळताच त्याने त्यांना सूचना दिल्या की, जवळच्या गावांमधून जेवढे दही मिळेल तेवढे घेऊन दुधात मिसळा. दुधाचे नासणे थांबत नाही, किंबहुना दूध नासण्याचा वेग वाढतो; परंतु दह्याचे उत्पादन होते. दुधाचे दही व्हायला एक दिवस लागतो.
नंतर त्याने दही काढून घेतले, ते विकले. यासाठी त्याला तीन दिवस जास्त मिळाले. तसेच दह्याचा टँकर धुणे सोपे असते, कमी वेळखाऊ असते. त्यातील पाणी शेतात सोडता येते. नासलेल्या दुधावर प्रक्रिया केल्याशिवाय ते शेतात सोडता येत नाही इत्यादी इत्यादी. या गोष्टींमुळे त्यांचा तोटा बर्याच प्रमाणात कमी झाला आणि उद्योगावरचा परिणाम कमी झाला. याला म्हणतात परिणामकारकता.
कोणत्याही उद्योगात पाच प्रकारच्या गोष्टी जरुरीच्या असतात.
१. सुरुवात
२. उत्पादन
३. विक्री
४. पैशाचे व्यवस्थापन
५. सतत सुधारणा
उद्योगातील वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेळी जास्त किंवा कमी महत्त्वाच्या ठरतात. नवीन उद्योजक एकाच वेळी सगळ्या गोष्टी करण्यास जातात आणि त्यामुळे त्याची ताकद सर्व जागीच कमी पडते. उद्योग ज्योतिषी यातील तुमचे प्रभुत्व किंवा नैपुण्य कशा प्रकारचे आहे याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो त्याचबरोबर तुम्हाला कशा प्रकारच्या भागीदारांची जरुरी आहे हेदेखील सांगू शकतो.
थोडीशी तांत्रिक माहिती या प्रकारे…
अग्नी राशी, मेष, सिंह, धनू आणि मंगल, रवी हे ग्रह तसेच तृतीय स्थान, नवम स्थान या गोष्टी उद्योगाच्या सुरुवातीस महत्त्वाच्या ठरतात. नियमित उत्पादनासाठी वृषभ, कन्या या राशी, तसेच गुरू, शनी हे ग्रह आणि षष्ट स्थान, दशम स्थान यांचा उपयोग होतो. विक्रीसाठी अर्थातच मिथुन, तुला या राशी आणि शुक्र, राहू, बुध यांचा चांगला वापर होतो.
सतत सुधारणांसाठी तुला, कर्क, कुंभ, या राशी आणि पंचम स्थान, व्यय स्थान आणि केतू, नेपच्यून या ग्रहांचा संदर्भ घेतला जातो. अर्थात आजूबाजूची परिस्थिती, जातकाची दशा, त्याचे सद्य-स्थितीतले भागीदार इत्यादींचा साकल्याने विचार करूनच.
तुमची तसेच तुमच्या भागीदारांची बलस्थाने यात कोठे आहेत, कुठला ग्रह किंवा राशी स्थान तुमच्यासाठी फायद्याचे आहे, तसेच त्याची अनुकूल दशा कधी सुरू होते आणि कधीपर्यंत टिकते, या गोष्टींचा पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा आणि या गोष्टी भौतिक प्रकटीकरणानाशी कशा जुळवून घ्यायच्या यालाच म्हणतात उद्योग ज्योतिष. विचार करा आणि तुमचे विचार आम्हास कळवा.
– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
संपर्क : 9820489416
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.