मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो?

प्रथम मी आज मराठी तरुण उद्योगामध्ये उतरत आहेत त्यांचे अभिनंदन करतो, कारण साधारणपणे ३५ ते ४० वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठी माणसे व्यवसाय करत होती. आज त्या प्रमाणात मराठी माणसे जास्त प्रमाणात उद्योगामध्ये आहेत, असे विधान करणे तुलनात्मकदृष्ट्या चुकीचे ठरेल.

माझ्या या विधानाला सबळ आधार आहे. जसे की, ३५ ते ४० वर्षांपूवी जितकी लोकसंख्या होती व मोजक्याच क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या संधी होत्या व त्या वेळीही सहजासहजी बीज व खेळते भांडवल उपलब्ध होत नसे. (त्या वेळेस मल्टिनॅशनल बँकांच नव्हत्या ज्या आजमितीस सर्रास स्वत: रिस्क घेऊन, नियम/अटी शिथिल करून कर्ज देतात.) कारण त्या वेळेस फक्त राष्ट्रीयकृत, सहकारी व शेड्यूल बँकाच कर्ज द्यायच्या; पण त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करता करता दमछाक व्हायची.

आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत जे मराठी उद्योजक व्यवसाय करीत आहेत त्याचे सरासरी प्रमाण बघितले तर मराठी उद्योजकांची संख्या वाढलेली नाही, असे मी म्हणेन, पण जमेची बाजू अशी आहे की, आज मराठी लोक धडाडीने उद्योग-व्यवसायांमध्ये उतरत आहे आणि त्यांचे कुटुंबीयदेखील उत्पन्नाचे साधन म्हणून नोकरीऐवजी व्यवसाय करण्यास पाठिंबा देतात व सहकार्यही करतात.

इतर जाती-धर्मांतल्या व्यावसायिकांच्या तुलनेत मराठी उद्योजक मागे पडताना दिसतो, याची प्रामुख्याने कारणे मी विस्तृतपणे खाली देत आहे.

मराठी उद्योजक जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचा अभ्यास करतोच, असे नाही. उदा. त्याने जर एखादे उत्पादन सुरू करायचे ठरवले तर त्याच्या उत्पादनाला संपूर्ण भारतामध्ये कुठे विक्रीसाठी संधी आहे, याच क्षेत्रात आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत, याची माहिती जमा करतोच असे नाही. ज्याला ‘Project-Report’ किंवा ‘Need-Analysis’ असे म्हणतात.

याच्याच आधारावर मी निवडलेल्या प्रॉडक्टला किती प्रमाणात संधी उपलब्ध आहे, हे कळते; पण अशा प्रकारचा अभ्यास करून सर्वच उद्योजक व्यवसायात उतरतातच असे नव्हे. या प्रोजेक्ट रिपोर्टचा उपयोग न केल्यामुळे उद्योजकाला आपल्या धंद्यासाठी किती खेळते भांडवल व बीज भांडवल लागेल याची कल्पना नसते व असे उद्योजक अपुर्‍या भांडवलानिशी व्यवसायात उतरतात.

बरेच उद्योजक दुसर्‍याच एखाद्या यशस्वी उद्योजकामुळे प्रभावित होऊन आपला व्यवसाय सुरू करतात आणि त्यांना अपयश येते, याचे कारण त्यांनी त्या यशस्वी उद्योजकांची आजची सुस्थिती पाहिलेली असते, परंतु त्या यशस्वी उद्योजकाने त्याचा व्यवसाय सुरू केल्यापासून आजपर्यंत सहन केलेला त्रास, त्या मार्गातील खाचखळगे, घेतलेले कष्ट, मेहनत आणि चिकाटी पाहिलेली नसते.

काही उद्योजकांची आपल्या व्यवसायामध्ये मेहनत करण्याची मानसिकताच नसते. तसेच मी हा व्यवसाय करतो, असे सांगायचीदेखील आपल्या नातेवाईकांना, समाजातील लोकांना सांगण्याची लाज वाटते.

माझ्या मागील चाळीस वर्षांतील अनुभवातून मी हल्लीच्या काही उद्योजकांच्या बाबतीत नोंदवलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.

  • वेळेच्या नियोजनाचा अभाव
  • आपल्या व्यवसायाशी व ग्राहकांशी बांधीलकी नसते.
  • आपला व्यवसाय वाढवणे, टिकविणे ही माझी एकट्याची जबाबदारी असून ती मला पार पाडायची आहे, अशी मानसिकताच नसते. त्यामुळे व्यवसाय सुरू करणे, टिकवणे, वाढवणे या प्रक्रियेमध्ये योग्य ते वेळोवेळी निर्णय घेणे व घेतलेले निर्णय चुकीचे ठरले व ज्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले तरी त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी नसते, जेणेकरून काही उद्योजक मनाने खचून जाऊन आपला व्यवसाय बंद करतात आणि सोपा आणि शाश्‍वत उत्पन्नाचा, नोकरीचा मार्ग निवडतात.
  • बर्‍याच उद्योजकांना ते करत असलेल्या व्यवसाय करण्यामागचा उद्देशच माहीत नसतो.
  • अजूनही काही मराठी कुटुंबांमधून त्यांच्या कुटुंबातील सदस्याला व्यवसाय करण्यापासून रोखले जाते. मराठी व्यावसायिकाची व्यवसायामध्ये पीछेहाट होऊ नये व जास्तीत जास्त मराठी माणसांनी उद्योग क्षेत्रात उतरावे या दृष्टीने काही उपाय :
  • कुठल्याही उद्योजकाने त्याला ज्या क्षेत्रात उद्योग करायचा आहे त्यातील संधी, भांडवल, आवश्यक असलेली जागा, मनुष्यबळ याचा एक project report व need analysis report तयार करून अभ्यास करावा व त्याच्याच आधारे मी हाच व्यवसाय करावा की करू नये हा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेताना दिवसातील किती तास मेहनत करावी लागेल याचासुद्धा विचार करावा. त्याप्रमाणे आपल्याला स्वत:ची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता आहे की नाही याचादेखील विचार करावा.
  • अपुरे बीज भांडवल, खेळते भांडवल अधिक स्वत:चे भांडवल पुरेसे असल्याशिवाय व्यवसायात उतरू नये.
  • आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेला कर्मचारीवर्ग हा तुमचा व्यवसाय सुरू करणे, सुरू ठेवणे व वाढवणे यासाठी आवश्यक असलेले साधन आहे. आपण स्वत: मालक आणि आपल्याकडे काम करणारे कर्मचारीवर्ग हे माझे स्वत:चे व्यावसायिक कुटुंब असून मी मालक म्हणून त्या कुटुंबाचा प्रमुख आहे, ही भावना असावी.
  • व्यवसायामध्ये अथवा व्यक्तिगत जीवनात शब्दाला जास्त किंमत असते. या बाबतीत तीन प्रकार आढळतात-
    – दिलेला शब्द पाळणारे
    – दिलेला शब्द न पाळणारे
    – मी कोणाला तरी शब्द दिलाय हेच विसरून जाणारे व यापेक्षा सर्वात वाईट प्रकारचे उद्योजक असा समज ठेवतात की, दिलेला शब्द हा न पाळण्यासाठी किंवा फिरवण्यासाठीच असतो. यामुळे वैयक्तिक जीवनातच नव्हे उद्योग जगतातदेखील अशा उद्योजकांच्या विश्‍वासार्हतेलाच तडा जातो. म्हणून माझा सल्‍ला आहे की, आपण जे करू शकतो, तोच शब्द द्यावा म्हणजे आपल्याकडून कधीही चुकीचा शब्द देऊ नये.
  • आपण जो व्यवसाय निवडला आहे तो सकारात्मक दृष्टीने करावा, तसेच त्या व्यवसायावर श्रद्धा असावी.
  • आपण निवडलेला व्यवसाय हा स्वहिमतीवर करावा, कोणाच्याही पाठिंब्यावर करू नये.
  • व्यवसाय इतकाच वाढवावा की, त्या व्यावसायिकाचे अथवा त्याच्या भागीदाराचे व्यवसायातील प्रत्येक प्रक्रियेवरती जातीने वैयक्तिक लक्ष ठेवले जाईल.
  • वेळोवेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सल्‍ले घेत राहा.
  • व्यवसाय करताना व्यवसायासाठी स्वत:वर वेळेचे बंधन घालून घेऊ नये.
  • कुठलेही व्यवसाय करताना स्वत:चे आरोग्य, मन:स्थिती चांगली राहील, याची काळजी घ्यावी.
  • कुठलीही व्यक्ती व्यवसाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन म्हणून करते. म्हणून त्यांना दर महिन्याला ठरावीक रक्कम देण्याबरोबरच वेळही द्यावा.
  • शेवटचे पण महत्त्वाचे असे की, आपल्या व्यवसायासाठी घेतलेले कर्ज हे औषधासारखे वापरावे. कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूससारखे पिऊन वापरू नये. तसेच व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे पैसे हे परत द्यायचे आहेत याचे भान राखावे, कारण बरेचसे उद्योजक हे पैसे आपल्याला व्यवसायात झालेला नफा समजून कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी किंवा स्वत: छानछोकीने राहण्यासाठी वापरतात.

आपणा सर्व उद्योजकांना एकच सल्‍ला आहे की, आपण करत असलेला व्यवसाय हा आपला ध्यास आणि श्‍वास असला पाहिजे.

– चेतन कुलकर्णी
(लेखक व्यवसाय सल्लागार व प्रशिक्षक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?