का केली अठरा वर्षीय अर्जुनच्या कंपनीत रतन टाटांनी गुंतवणूक?

‘जेनेरिक आधार’ ही कंपनी आणि तिची स्थापना करणारा ठाण्याचा अर्जुन देशपांडे सध्या खूप चर्चेत आहेत. ह्याला कारण की ‘जेनेरिक आधार’ ह्या कंपनीमधला काही हिस्सा भारतातील सगळ्यात नावाजलेले उद्योगपती रतन टाटा ह्यांनी खरेदी केला आहे. रतन टाटा हे नाव उद्योगजगतात जसं नावाजलेलं आहे त्याहीपेक्षा एक भारतीय म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे.

इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने एका अठरा वर्षांच्या मराठी मुलाच्या स्टार्टअपमधील काही हिस्सा खरेदी करावा, ही बाब अर्जुन देशपांडेसाठी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती प्रत्येक भारतीयासाठी येत्या काळात महत्त्वाची ठरणार आहे. कारण अर्जुनाच्या बाणांना आता रतन टाटांच्या रूपाने श्रीकृष्णा सारखा सारथी लाभला आहे असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही.

नक्की ‘जेनरिक आधार’ काय आहे?

रतन टाटांसारख्या मोठ्या उद्योजकाला भुरळ पाडणाऱ्या ह्या बिझनेस मॉडेलमध्ये नक्की असं काय आहे ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

जेनेरिक औषध म्हणजे काय? हे आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही रोगावर औषध शोधण्यासाठी औषध बनवणाऱ्या कंपन्या खूप सारे पैसे शोधकार्यात गुंतवतात. त्या रोगावर मग औषधांच्या रूपाने उपाय मिळाल्यावर ह्या गोळ्या, लसी, इंजेक्शन, क्रीम अथवा ड्रॉप्स बाजारात आणतात. बाजारात आणताना ह्या औषधांची बनवण्याची किंमत जरी कमी असली तरी त्यांच्या शोधासाठी गुंतवलेल्या पैश्याचा परतावा म्हणून ही औषध बाजारात चढ्या भावाने विकल्या जातात.

ह्यामागे त्यांच्या निर्मितीचा खर्च, शोधाचा खर्च आणि बनवणाऱ्या कंपनीचा नफा तसेच त्याची विक्री करणाऱ्या रिटेलर, केमिस्ट ह्यांच कमिशन हा सगळा अधिभार औषध विकत घेणाऱ्या ग्राहकाच्या माथ्यावर मारला जातो. प्रत्येक नवीन औषधाच्या निर्मितीत गुंतवलेले पैसे परत मिळवता यावेत ह्यासाठी प्रत्येक सरकार अशा प्रकारच्या नवीन औषधाला काही वर्षासाठी पेटंट हक्क (स्वामित्व हक्क) देते.

ह्याचा अर्थ असतो की ह्यासारखं औषध दुसरी कोणतीही कंपनी बनवू शकत नाही. एकच कंपनी औषध बनवत असल्याने किमती ठरवण्याचा हक्क कंपनीकडे जातो. स्पर्धक नसल्याने कंपनीला औषधांच्या विक्रीतून नफा कमावता येतो. पण जेव्हा अश्या एखाद्या औषधाचं पेटंट संपते, तेव्हा ते औषध दुसऱ्या कंपन्याही बनवू शकतात.

फक्त ते बनवताना मूळ औषधाच्या जवळपास सारखेच घटक आणि काही मार्गदर्शक तत्त्व त्या कंपनीला पाळावी लागतात. जी नवीन कंपनी औषध बनवणार तिच्याकडे ते बनवण्यासाठी लागणारा फॉर्मुला आणि लागणारे घटक आधीच माहीत असतात.

त्यामुळे नवीन कंपनीला फक्त बनवण्याचा खर्च करावा लागतो. ह्यामुळे औषधांची किंमत प्रचंड प्रमाणात कमी करता येते. कमी किमतीत ही रिटेलर आणि केमिस्टच कमिशन,कंपनी आपला नफा कमावून ही औषधे जवळपास ५० ते ८० टक्के कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. अशाच औषधांना जेनेरिक औषध असं म्हणतात.

भारत असे जेनेरिक औषध बनवणारा जगातील सगळ्यात मोठा उत्पादक आहे. जगातील ६० टक्के जेनेरिक औषध आणि लसींचा वाटा एकट्या भारताकडे आहे. आजमितीला जेनेरिक औषधांची भारतातील बाजारपेठ ३८ बिलियन अमेरीकन डॉलर इतकी प्रचंड आहे. एकट्या भारताने २०१९-२०२० मध्ये एका वर्षात २० बिलियन अमेरिकन डॉलर किमतींची जेनेरिक औषधे अमेरिका आणि युरोपियन देशांत निर्यात केली आहेत.

एकट्या अमेरिकेत जेनेरिक औषधांचा वाटा जवळपास ८८ टक्के इतका प्रचंड आहे. ग्राहकांकडून औषधांच्या झालेल्या मागणीत जेनेरिक औषधांचा वाटा ८८ टक्के म्हणजे फक्त १२ टक्के औषधे ही पेटंट केलेली होती. ही बाजारपेठ ज्या वेगाने अमेरिकेत वाढते आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक वेगाने भारतात ती येत्या वर्षात वाढणार आहे.

भारत सरकारने सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्यमान भारत’ ही योजना आणली आहे. ही जगातील सगळ्यात मोठी आरोग्य सेवा देणारी कोणत्याही सरकारची योजना आहे. ह्याच्या कक्षेत येणाऱ्या लोकसंख्येचा विचार करायचा झाला तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको अशा तिन्ही देशांची मिळून जितकी लोकसंख्या होईल त्याहीपेक्षा जास्ती लोक ह्या योजनेअंतर्गत आरोग्य सेवेच्या छत्राखाली येणार आहेत.

भारतातील गरीब, अतिशय गरजू लोकांपर्यंत जाणाऱ्या ह्या योजनेचं यश-अपयश हे ह्याच जेनेरिक औषधांच्या उपलब्धतेवरही अवलंबून आहे. भारतात अजूनही जेनेरिक औषध तितकीशी रुळलेली नाहीत.

ह्याच कारण ग्राहकांना औषधांची नसलेली माहिती आणि ग्राहकांकडून ब्रॅण्डिंग च्या नावावर उकळण्यात येणारे पैसे ह्यामुळे जेनेरिक औषध ही पेटंट औषधांच्या भावाने विकली जातात. त्यामुळे भारतीय ग्राहकांच्या मनापर्यंत ती पोहचत नाहीत.

अर्जुन देशपांडेच्या त्या तरुण मनाने वयाच्या १५-१६ व्या वर्षात भारतातील जेनेरिक औषधांच्या बाबतीतली उदासीनता आणि ह्यातले कच्चे दुवे ओळखले होते. औषधांच्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या आईसोबत उन्हाळाच्या सुट्टीत अनेक देशात फिरताना अर्जुनला जाणवलं की भारतात अजूनही जेनेरिक औषधांचे फायदे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेले नाहीत. त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. त्यातून जन्म झाला ‘जेनेरिक आधार’चा.

जेनेरिक औषध, औषध कंपन्यांकडून घेऊन ते थेट रिटेलर, केमिस्टकडे पोहचवल्याने जवळपास १५ ते १८ टक्क्यांची बचत होत होती आणि हा सगळा फायदा रिटेलर आणि केमिस्टचा नफा काढूनही ग्राहकांपर्यंत औषध कमी किमतीत पोहचवण्याचं शिवधनुष्य अर्जुन देशपांडेने उचललं. जेनेरिक औषधांच्या किमती कमी झाल्याने समाजातील गरीब व्यक्तीच्या अवाक्यात ही औषधे यायला लागली.

अर्जुन देशपांडे

अवघ्या दोन वर्षात ‘जेनेरिक आधार’ची उलाढाल (टर्नओव्हर) ६ कोटींपर्यंत वाढला. आपल्या वाटचालीचे एक प्रेझेंटेशन अर्जुन देशपांडेने रतन टाटा ह्यांना दाखवलं होतं. भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत औषध पोहचवण्याची क्षमता आणि त्याचवेळी त्यातील सहभागी व्यक्तींना योग्य तो मोबदला देणारं बिझनेस मॉडेल रतन टाटांनी नेमकं हेरलं.

जवळपास साठ वर्षांपेक्षा जास्त काळ ‘टाटा ग्रुप’सारख्या जगातील नावाजलेल्या ग्रुपची धुरा आणि उद्योगजगताचा अनुभव रतन टाटांकडे आहे. स्वतःची जवळपास ७५०० कोटी रुपये संपत्ती असणाऱ्या रतन टाटांनी ‘जेनेरिक आधार’मध्ये पैसे गुंतवण्याची दोन करणे म्हणजे ‘जेनेरिक आधार’ची वाढती लोकप्रियता आणि भारतातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचणारं आणि भारतीयांच आयुष्य समृद्ध करणारं बिझनेस मॉडेल.

येत्या वर्षभरात ‘जेनेरिक आधार’ जवळपास एक हजार रिटेलर आणि केमिस्ट ह्यांच्यामार्फत भारतातील ५-६ राज्यात विस्तार करणार आहे. त्याचसोबत आय.टी. आणि ऑनलाईन सेवा देण्याच्या बिझनेसमध्येही उतरणार आहे. एक वर्षात ‘जेनेरिक आधार’ने आपले उत्पन्न जवळपास शंभर ते दीडशे कोटीपर्यंत नेण्याचं लक्ष ठेवलं आहे.

आता रतन टाटांसारख्या खऱ्या भारतीयाचं पाठबळ मिळाल्यावर अर्जुन देशपांडे ह्या अठरा वर्षीय मराठी मुलाची घोडदौड येत्या काळात भारतातील जेनेरिक औषधाचा चेहरामोहरा तर बदलावणार आहेच, पण त्यासोबत प्रत्येक भारतीयाला औषध स्वस्तात मिळण्याची सोय करणार आहे.

– विनीत वर्तक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?