महिला उद्योजकांची गरज आणि उपलब्ध संधी

‘सबल महिला बलवान भारत’,’ हे आहे महिला बँकेचे ब्रीदवाक्य. प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही गरज आहे. ‘मुलगी शिकली आणि प्रगती झाली’. झपाट्याने आपल्या समाजातील तिची प्रतिमा बदलू लागली. स्त्री ही केवळ ‘चूल आणि मूल’ एवढंच आपलं विश्‍व सीमित न ठेवता आज घराबाहेर पडली आहे. आपल्या कर्तृत्वाचा झेंडा तिने सातासमुद्रापार पोहोचवला आहे. स्त्री घराबाहेर पडून नोकरी करू लागली.

वेगवेगळ्या जबाबदार्‍या लीलया पेलू लागली. या पुरुषप्रधान समाजात तिने संघर्षाने स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलं आहे. त्याचप्रमाणे स्त्रीने स्वतंत्र उद्योग यातही स्वत:ला उभं केलं आहे, परंतु स्त्रियांचे उद्योगातील अस्तित्व नगण्य आहे एवढं मात्र नक्की. याचमुळे आपल्या देशात स्त्रीयांना उद्योगात जास्त वाव आहे.

जास्तीत जास्त महिलांनी उद्योगाकडे वळणं ही काळाची गरज आहे. समाधानकारक गोष्ट म्हणजे व्यावसायाभिमूख शिक्षणाकडे मुलींचा कल वाढतोय. उद्योगामध्ये सरकारदरबारी पुरुषांना मिळणार्‍या सवलतींपेक्षा स्त्रियांना मिळणार्‍या सवलती जास्त आहेत. अनेक सरकारी योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात, परंतु त्याची माहिती नसते. याची वेळोवेळी माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.

घर, संसार, मुलं यांची जबाबदारी सांभाळत व्यवसायात उतरणे आव्हानात्मक आहे. अशा वेळी सुरुवात गृहउद्योगातून केल्यास तारेवरची कसरत जमवण्यास सोपे जाते. उद्योग म्हणजे उद्योजकाचे मूल असते आणि एक मूल वाढवणं म्हणजे त्यावर योग्य संस्कार करून सक्षम करणे हे प्रत्येक उद्योजकाचे कर्तव्य असते आणि त्याचसाठी सतत अभ्यास करत राहणं, नवनवीन गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे.

मेणबत्ती व्यवसाय, ब्युटी पार्लर, मसाला, पापड, लोणची उद्योग, सरबत बनवणे, पणत्या बनवणे, पाळणाघर चालवणे, ज्वेलरी मेकिंग, अगरबत्ती बनवणे व विकणे, साड्या-ड्रेस मटेरियल विक्री, टेलरिंग, खानावळ चालवणे, छपाई, डीटीपी सेंटर, कॉम्प्युटर क्‍लासेस चालवणे असे एक ना अनेक प्रकारचे पर्याय आपल्याला मिळतील. हे आपल्याला सतत माहितीत असणारे पर्याय आहेत, परंतु याउलट आपणास माहिती नसणारेही हजारो पर्याय उपलब्ध असतात. त्याची माहिती करून घेतली तर वेगळा व्यवसाय पर्याय उपलब्ध होतो.

यातही ग्रामीण महिला आणि शहरी महिला यांच्यासाठी वेगवेगळे पर्याय असतील. काही पर्यायाने शहरी महिलांसाठी सोपे आणि बाजारपेठेच्या दृष्टीने चांगले पर्याय असतील आणि उलटपक्षी काही ग्रामीण स्त्रियांसाठी चांगले ठरतील. Denise Cheryl या महिला उद्योजकीने चेन्नईत आपल्या आईसोबत ड्रीम व्हेव्हर्स नावाची कंपनी सुरू केली केवळ पाचशे रुपयांच्या भांडवलात.

ब्युटी पार्लर, स्पा यांना लागणारी इको-फे्रंडली उत्पादने पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. ड्रीम व्हेव्हर्सचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे कार्यरत असलेल्या महिला या आर्थिक किंवा शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत. तसेच काही महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेला ‘लिज्जत पापड’ हा सामूहिक उद्योगही सर्वपरिचित आहेच.

महिलांनी उद्योगात उतरावे आणि आपला उद्योग वाढवावा यासाठी मागील अठरा वर्षे अविरत कार्यरत असणार्‍या मीनल मोहाडीकर आपणास ठाऊक आहेतच. ही उदाहरणे देण्याचे कारण असे की, एकछत्री स्वत:चं अस्तित्व स्थापन करण्याची आणि सामूहिकरीत्या एकत्रित येऊन यशस्वी उद्योग उभं करण्याचं सामर्थ्य स्त्रीत आहे. त्यामुळे उद्योगात उतरताना अशी उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून पुढे गेल्यास त्यातून प्रेरणा मिळते.

‘स्त्री’ म्हणजेच नवनिर्माण. उपजतच जिला नवनिर्माणाचे वरदान लाभले आहे, ती उद्योग खूप चांगल्या प्रकारे उभा करू शकते आणि गरजेतून एखादा नवा उद्योग शोधूनही काढू शकते.

वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात आलेच असेल ती स्वत:लाही सक्षम करते आणि रोजगारनिर्मिती करून अनेकांना उपजीविकेचे साधनही निर्माण करून देते.

‘बचत गट’ ही संकल्पना एक सर्वसमावेशक आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत महिला आणि व्यवसाय यांची जणू एक चळवळच तयार झाली आहे. यातूनच आज तळागाळातील ग्रामीण स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. ग्रामीण स्त्रिया शेती, घर आणि संसार यासोबत जोडधंदा म्हणून मत्स्यशेती, कुक्कुटपालन, शेळी, पालन करू शकतात. गोधडी शिवणं हाही एक मोठा उद्योग होऊ शकतो. हासुद्धा गरजेतून निर्माण झालेला उद्योग आहे. हा उद्योग सामूहिकरीत्या काही महिलांनी एकत्रित येऊन सुरू केला तर त्याला चांगल्या प्रकारे स्थैर्य मिळू शकते.

महिलांनी उत्पादनासोबतच स्वत:च्या व्यवसायासाठी बाजारपेठ मिळवणे आणि व्यवसायाचा व्याप वाढवणे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. उद्योगाच्या अनेक गरजा असतात. त्यातील एक म्हणजे आपल्या उत्पादनाची जाहिरात. महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसायाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या उत्पादनाच्या पॅकेजिंग, मार्केटिंग, पब्लिसिटी आणि जाहिरात अशा वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या प्रॉडक्टचा दर्जा आणि त्याची मांडणी याबाबत सतत प्रयोग करून त्यातील ताजेपणा टिकवावयास हवा.

मार्केटिंगमध्ये सध्या वेगाने वाढलेला आणि क्षणात लाखो लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवणार्‍या ‘डिजिटल मार्केटिंग’चा वापर आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी करावयास हवा. याबाबत महिला काही प्रमाणात जागरूक नसतात. वेगवेगळ्या उद्योगांत स्वत:चं अस्तित्व उभं करणार्‍या अनेकींना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सतत सामोरे जावे लागते त्याचा अभ्यास व्हायला हवा.

सतत आपल्या क्षेत्रात नव्याने येणार्‍या गोष्टींना आत्मसात करावयास हवे. वर म्हटल्याप्रमाणे उद्योगजगतातील महिलांचे योगदान त्यांच्यासाठी उपलब्ध संधी, त्यांनी उद्योगाकडे वळण्याची गरज, त्यांच्यापुढील आव्हाने या सर्वच गोष्टींचा आपण या सदरात उहापोह करुयात.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?