महिला : वेळ व्यवस्थापनाच्या आदर्श वेळ व्यवस्थापन

तुमची कुवत तुम्ही स्वतःच ओळखा. विश्वास ठेवा स्वतःवर आणि लागा तुमच्या स्वप्नपूर्तीला; पण फक्त फाजील आत्मविश्वास घेऊन नाही तर नियोजनबद्ध पद्धतीनेच, जेणेकरून तुम्ही जे करता आहात त्याची तपशीलवार माहिती तुमच्याकडे आहे आणि त्याप्रमाणेच तुम्ही पुढे जात आहात.

आयुष्य खरे तर आपल्याला कोणत्या वळणावर कधी घेऊन जाईल याचा कयास लावणे महाकठीण काम असते; पण जर का तुम्ही तयारीत असाल तर मात्र तुम्ही ती संधी म्हणूनच पाहाल आणि त्या संधीचं सोनं कराल. नाही तर भयंकर मोठे संकट मानून नांगी टाकाल.

‘स्मार्ट उद्योजक’च्या दिवाळी अंकात लिखाणाविषयी विचारणा झाली तेव्हा सर्वप्रथम विचार आला नेमका विषय काय निवडावा? लगेचच नवरात्र सुरू होणार होती आणि सारखं सारखं वाटत होतं की, जी सरस्वतीप्रमाणे ज्ञान एका पिढीतून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचवते.

जी खरे तर लक्ष्मीसारखी चंचल, पण कुटुंबाच्या गरजांची योग्य काळजी घेऊन पैशाची उलाढाल करणारी आणि एकाच वेळी किती तरी आणि पूर्णपणे भिन्न परिस्थितीत दुर्गेसारखी झुंज यशस्वी करणारी जी रणरागिणी आहे तिच्यासाठी लिहू या.

‘सरस्वती म्हणजे ज्ञान, लक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती आणि कालिका म्हणजे कृती’

हा साधासुधा अर्थ माझ्यासाठी आणि ह्या त्रिशक्तीचा मिलाप जर कुणात असेल तर ती म्हणजे स्त्री-शक्ती, मग ती माता, पुत्री, गृहस्वामिनी किंवा मैत्रीण, अगदी कुणीही असेल; पण जर का ती तुमच्या आजूबाजूला असेल तर वातावरणातील बदल सहज दृष्टीस पडतो. अशी ही रणरागिणी दिवसभरात ज्या काही दिव्यांतून बाहेर पडते ती सामान्य बाब नक्कीच नसते.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कृतिशील, काही ना काही करण्यात गुंतलेली. ते कदाचित मुलांसाठी असेल, सासू-सासर्‍यांसाठी किंवा कदाचित नवर्‍यासाठी असेल; पण स्वतःसाठी क्वचितच. दिवसभराच्या रामरगाड्यात दिवस चालू कधी होतो आणि संपतो कधी त्याचा थांगपत्ताच नसतो.

ऑफिसला जाते म्हणून कित्येकदा कोणता दिवस आहे आणि कोणती तिथी हे ध्यानात असत नाही. तर फक्त घरात असेल तर त्याचाही ठावठिकाणा नसतो; पण ती घरात आहे म्हणून तिचे जीवन सरळ सहज चाललं आहे असंही कुणी समजू नये, कारण एका जागी शांतपणे पडून राहण्याची सवय खूपच कमी स्त्रियांना असते.

बाकीचे एक काम संपायच्या आतच दुसर्‍या कामाचा नुसता विचारच करत नाहीत, तर ते करायची सुरुवातही झालेली असते. त्यामुळे शक्यतो विरंगुळा नाहीच आणि जर विरंगुळाच नसेल तर कुठे तरी चिडचिड असणारच.

कधीकधी दुसर्‍यांसाठी जगता जगता स्वतःला कुठे तरी मागे सोडून दिलेले असते आणि त्याची उणीव किंवा खंत मनाच्या कोपर्‍यात कुठे ना कुठे तरी असतेच. कित्येकदा त्यामुळेदेखील चिडचिड होते.

अशा वेळी कुणी उपदेश देण्याऐवजी गरज असते ती कुणी तरी कौतुकाचे दोन शब्द बोलण्याचे. जर ते मिळाले तर मग काम करायला आणखीन तेवढाच उत्साह; पण चिडचिड तरीही असणारच, कारण एकटे करून करून करणार तरी किती? शेवटी कुणाचा तरी मदतीचा हात मिळणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असते.

कधी ती स्पष्टपणे बोलून दाखवणार, तर कधी कुणी तरी समजून घ्यावे, ही अपेक्षा ठेवणार आणि जर ती पूर्ण नाही झाली तर एकदाच भयंकर स्फोट ठरलेलाच. त्यात किती आणि कुणाच्या ठिकर्‍या उडतील ते सांगू शकत नाही, कारण ही गौरी एकदा का दुर्गा/कालिका झाली की महादेवही हतबल होऊन जातो.

जेवून झालं की तुम्ही झोपायला मोकळे; पण हिला मात्र उद्याची काळजी. कारण पुन्हा एकदा तीच पळापळ. तेच सर्व काही. कामे उरकून ती ठरलेली ट्रेन पकडून नोकरीसाठी धावतपळत जाणे किंवा एवढ्या सर्व गोंधळात स्वतःचा ठसा उमटवलेला असा एक उद्योग ज्याच्यासाठी वेळ देणे आणि तो वाढविणे तेवढेच महत्त्वाचे आणि जिकिरीचे काम.

हे सर्व एकट्यानेच न करता किंवा कुणी तरी समजून घेऊन मदतीचा हात देतील, ही फक्त अपेक्षा करत न बसता स्वतःला त्याच्या अनुरूप बनवले तर चालू शकेल का?

मान्य आहे की, तुम्ही जे करता आहात त्यात तुमचा हात कुणी पकडणे शक्यच नाही. अगदी तुमच्यापेक्षा कुणी कणभरही चांगले काम करण्याची शक्यताही अगदी दुर्मीळ; पण शेवटी तुमचा जन्म फक्त हे सर्व करत करत एक दिवस पळत पळत स्वतःच स्मशानातील लाकडांवर जाऊन झोपण्यासाठी तर नक्कीच झालेला नाही आहे, हो ना? की झाला आहे त्याचसाठी?

जर नाही तर काही वेगळे करता येणे शक्य आहे असं वाटतं ना तुम्हाला? आणि जर वाटत असेल तर रस्तादेखील सापडेल. गरज आहे ती फक्त स्वतःला सुसंघटित (ऑर्गनाइज) करून नियोजनबद्ध आयुष्य जगायला सुरुवात करायची आणि त्यासाठी कुणीही किंवा कोणतीही एंजल (परी) वगैरे येणार नाही आहे तुमच्या आयुष्यात, जादूची कांडी फिरवायला. जे करायचं आहे ते फक्त आणि फक्त तुम्हालाच. त्यासाठी गरज लागते ती वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्याची.

माझी एक मैत्रीण आहे, जिचे लग्न वयाच्या अठराव्या वर्षीच झाले होते आणि हो तेही लव्ह मॅरेज; पण तरीही तिला कामासाठी घरातून बाहेर पडायची परवानगी नव्हती. घरदार सांभाळून तिला सर्व काही करावे लागत होते.

दोन्ही मुले थोडी मोठी झाल्यावर म्हणजे साधारणपणे आठवी-नववीत आल्यावर तिने उद्योजिका होण्याचा विचार केला, पण तरीही घरून परवानगी नव्हती; कारण नवरा उद्योजकच. त्यामुळे पैशासाठी काम करण्याची गरजच नव्हती.

पण तिला स्वतःसाठी काही तरी करायचं होतं आणि त्यासाठी तिने मनाची तयारी केलेली होती. शेवटी ठरलं की, दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ती घराबाहेर पडून आपला व्यवसाय वाढवू शकते; पण घराला गरज असेल तर मात्र त्या त्या वेळी तिला थांबावंच लागेल.

तिने ते मानलं आणि उतरली व्यवसायात. त्यानंतर साधारणपणे वर्षभराने सप्ताहातून एक दिवस सकाळी तिला नेटवर्किंग मीटिंगला जाण्याची मुभा मिळाली जिथे आमची एकमेकांशी ओळख होऊन आम्ही चांगले मित्र बनलो आणि एकंदरीत तिच्या कार्यप्रणालीबद्दल कळायला लागलं.

अतिशय मनमिळाऊ, बोलण्यात कोणतेही आढेवेढे नाही की गावगप्पा नाहीत किंवा कुणाबद्दल गॉसिप नाही! आपल्याला जे काम करायचं आहे आणि ज्याच्यासाठी आपण इथे आलो आहोत त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित. पूर्णपणे व्यावसायिक आणि मित्रांमध्ये तेवढीच धमाल करणारी, अगदी मनमोकळी मस्ती आणि त्याचबरोबर दुसर्‍याला मदत करण्यास तेवढीच तत्पर.

थोड्याच कालावधीत तिने घर व्यवस्थितरीत्या सांभाळत आणि एक ते सात ह्या सहा तासांमध्ये एक चांगलाच नफा कमावणार्‍या व्यवसायाला उभे केले. आता मुलाला धंद्यात पुढे जाण्यास मदत करते आहे ती आणि हो आता ती आजीबाईदेखील झालेय. त्यामुळे आपले कुटुंब, व्यवसाय आणि त्याचबरोबर नातवाशी खेळण्यात मस्त वेळ घालवते.

वेळेच्या व्यवस्थापनाशिवाय शक्य झाले असते का हे? नक्कीच नाही. आमचा खूप सारा वेळ फक्त आणि फक्त विचार करण्यात आणि नको त्या गोष्टींमध्येच जातो. आम्ही स्वप्ने तर खूप सारी बघतो; पण दुर्दैवाने बहुतांशी स्वप्ने आम्ही स्वप्नातच पुरी करतो.

ठरावीक वेळेत धंदा होऊच शकत नाही ही आमची कायम मनोवस्था; पण जर का व्यवस्थित वेळापत्रक बनवले आणि त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने काम केले तर अशक्य असे काहीच नसते.

तुम्ही बघा ना तुमच्या टीव्हीवरील मालिका, अगदी सोशल मीडियावर चिटकून राहा, काहीही समस्या नाही; पण कामे पूर्ण करून झाल्यानंतरच. कित्येक वेळा कामाचा डोंगर पडलेला असतो आणि आम्ही मात्र कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत असतो.

आणि त्यानंतर उशीर झाला म्हणत चिडचिड करत कामे पूर्ण करतो. जर का ती कामे तुम्हालाच करायची असतील तर ती अगोदर पूर्ण करायला काय हरकत आहे? शेवटी मनःशांती तर तुम्हालाच लाभेल ना? आणि त्याचबरोबर कामाची गुणवत्तादेखील वाखाणण्याजोगी असेल आणि तसे केले तरच कळेल ना तुम्हाला, की किती वेळ आहे तुमच्याकडे तुमच्या आवडीनिवडी जपायला किंवा एखादा संकल्प पूर्णत्वास न्यायला, ज्याची स्वप्ने तुम्ही वर्षानुवर्षे बघत आला आहात.

माझ्या ह्या मैत्रिणीने तेच केले आणि त्यामुळेच ती पुढे जाऊ शकली आणि ह्या जीवघेण्या स्पर्धेत स्वतःचा ठसा उमटवू शकली.

चला, थोड्या वेळासाठी मानू या की, ती नशीबवान होती. सर्वांचंच नशीब असं असतंच असे नाही. चूल, मूल, व्यवसाय आणि स्वतःचे छंद जपणे तेवढे सोपे नसते. आयुष्याचा समतोल साधणे तेवढे सोपे नक्कीच नसते. अगदी खरं, पण मी साक्षी आहे अशा खूप सार्‍या अनुभवांचा. लहानपणी जेव्हा गावी जायचो तेव्हा गावातील बायकांना विहिरीवरून पाणी आणताना पाहायचो.

डोक्यावर दोन-तीन हंडे आणि त्यावर एक कळशी आणि त्याचबरोबर कंबरेवर बसलेले मूल. हंड्यांना हातही न लावता मैत्रिणीशी (तिच्या डोक्यावरही तेवढाच भार) गप्पा मारत मारत घरापर्यंत पोहोचायचं आणि मध्ये मध्ये बाळाचे लाडही पुरवायचे.

शेतावर काम करायचं, घरात जेवण बनवायचं. त्याचबरोबर जर घरची होडी असेल तर मासे विकायला बाहेर पडायचं आणि सणासुदीला मनसोक्त नाचायचं आणि मनभरून फुगड्या किंवा तत्सम खेळ खेळत रात्र जागवायची.

हे फक्त आणि फक्त एखाद्या स्त्रीलाच शक्य असतं, कारण त्यांना ते करावं लागत नाही; तर ती नैसर्गिक देणगीच आहे त्यांना ईश्वराने दिलेली. म्युझिक लागता क्षणीच जर कुणी नाचायला सुरुवात करत असतील तर त्या मुली किंवा बायका असतात.

मुलांना जबरदस्ती करावी लागते, मुलींना नाही. क्वचितच एखादा मुलगा (माझ्यासारखा) स्वतःहून नाचायला सुरुवात करतो, नाही तर बहुतेकांच्या बाबतीत जोपर्यंत पोटात दारू जात नाही तोपर्यंत नाचायला जोश येत नाही.

तुमची कुवत तुम्ही स्वतःच ओळखा. विश्वास ठेवा स्वतःवर आणि लागा तुमच्या स्वप्नपूर्तीला; पण फक्त फाजील आत्मविश्वास घेऊन नाही तर नियोजनबद्ध पद्धतीनेच, जेणेकरून तुम्ही जे करता आहात त्याची तपशीलवार माहिती तुमच्याकडे आहे आणि त्याप्रमाणेच तुम्ही पुढे जात आहात.

आयुष्य खरे तर आपल्याला कोणत्या वळणावर कधी घेऊन जाईल याचा कयास लावणे महाकठीण काम असते; पण जर का तुम्ही तयारीत असाल तर मात्र तुम्ही ती संधी म्हणूनच पाहाल आणि त्या संधीचं सोनं कराल. नाही तर भयंकर मोठे संकट मानून नांगी टाकाल.

सरतेशेवटी जर रणरागिणीबद्दल बोलतोय तर माझ्या आईबद्दल लिहिल्याशिवाय हे पूर्ण होऊच शकत नाही. आम्ही कोळी आहोत, म्हणजे मासेमारी करणारे. आई मच्छी विकायची माझी आणि तिच्याच जिवावर आम्ही मोठे झालो. आई-बाबा दोघेही छोट्याशा पण वेगवेगळ्या खेडेगावांतलेच.

बाबा 8 वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले होते, त्यामुळे ते लहान वयातच मुंबईला आले आणि आई लग्न झाल्यावर म्हणजे जेमतेम 17-18 वर्षांची असताना. घरातलं सर्व काही करून ती काही ना काही करण्यात गुंतलेली असायची.

सुरुवातीला ती शिलाई मशीन चालवायला शिकली व त्यावर कपडे शिवून द्यायला लागली आणि त्याचबरोबर जवळच महानगरपालिकेच्या आवारात काही लोक इंग्रजी शिकवताहेत हे कळल्यावर ही लागली तिथे हजेरी लावायला.

शिक्षण होतं फक्त चवथीपर्यंत आणि तेही गावातलं; पण भयंकर जिज्ञासा आणि कुतूहल एखाद्या नवीन गोष्टीला समजून घेऊन शिकण्याची. बाबा तिला प्रत्येक कामात मदत करायचे आणि कदाचित त्याचमुळे ती सवय आम्हाला नकळतपणे लागली.

बाबांना सकाळी 4.30 वाजता म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय. त्यामुळे ते उठून स्वतःची आंघोळ झाल्यावर आईला उठवायचे आणि हो तेही तिच्यासाठी आंघोळीचे पाणी गरम करूनच. कालांतराने आई बाजारात बसून मच्छी विकायला लागली.

जेमतेम दोनच वर्षांनी म्हणजे मी नऊ वर्षांचा असताना बाबा वारले. त्यानंतर तिने आमच्या आई-बाबांची भूमिका एकटीनेच पार पाडली. कितीही संकटे का येईना, पण जेमतेम काही क्षण त्रागा करणार आणि त्यानंतर पुन्हा हसर्‍या चेहर्‍याने कोणत्याही संकटाला सामोरे जायला तयार.

मी वयाची पस्तिशी पार केली असेल ज्या वेळी आईने नऊवारी साडीऐवजी सहावारी साडी नेसायला सुरुवात केली. थोडंसं कठीण गेलं होतं ते स्वीकारणं, कारण आई म्हणजे नऊवारीतच पाहिजे ना? सर्व कळत होतं आणि जाणून होतो की, हे तिचं आयुष्य आहे आणि त्याचा निर्णय घेण्याचा अधिकारही तिचाच.

तसेही खूप केले आहे तिने आमच्यासाठी. आता तिला तिचं आयुष्य पूर्णपणे जगता आलं पाहिजे आणि ती जगली शेवटपर्यंत आपले आयुष्य अगदी मनसोक्त; कोणत्याही दडपणाशिवाय. ती हे सर्व काही करू शकली, कारण उगाचच दडपणाखाली किंवा नको त्या गोष्टीत चिडचिड करत नाही बसली ती आणि हो सोशल मीडियापासून लांब खरंखुरं आयुष्य जगली ती.

घरातून बाजारात जायला निघाली की बस स्टॉपपर्यंत पोहोचायला अर्धा/एक तास सहज लागायचा तिला, कारण सर्वाना भेटत, गप्पा मारत मारत पुढे जायचं आणि जेवढं होईल तेवढी मदत करण्याचा नेहमीच शिरस्ता आणि आनंद मिळायचा तिला त्यात. घरातही पाहुण्यांची रेलचेल, कारण ते खातात त्यांच्याच नशिबाचं, ही सद्भावना.

तिच्याबरोबर राहून भरपूर काही शिकलो आणि तसेही ती सकाळी लवकर जाऊन दुपारी येणार आणि पुन्हा काही तासांत पुन्हा बाजारात जाणार आणि परत रात्री येणार; पण जर का सर्वच कामे तिनेच करायची ठरवली असती तर किंवा आम्हाला ती कामे शिकवलीच नसती तर किंवा आमच्यावर सोडलीच नसती तर किंवा तिची धावपळ समजून आम्ही ती शिकून घेतलीच नसती तर? कदाचित घर आणि व्यवसायाच्या ओझ्याखाली दबली गेली असती ती आणि मनमोकळा श्वास घेणे शक्यच झाले नसते तिला.

हे सर्व शक्य होते जेव्हा तुम्ही फक्त एकटे काम करत बसत नाही, तर असं वातावरण निर्माण करता ज्यात प्रत्येकाचा सहभाग असतो आणि स्वखुशीने प्रत्येक जण आपापली कामे चोखपणे पार पाडतो.

शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वतः काम करा व ती कशी करतात त्याची जाणीव तुमच्या मुलांनाही असू द्या आणि हो, नवरोबादेखील यातून सुटता कामा नये, पण प्रेमाने. त्यामुळे दडपण झुगारून मोकळ्या मनाने काम करा आणि त्यासाठी योग्य नियोजन करा. छंद जपा आणि वाढवा. त्याने तुमच्या आयुष्याला एक वेगळेच वलय प्राप्त होईल आणि कायम जाणीव असू द्या,

त्रिशक्तीनंतर फक्त आणि फक्त स्त्रीशक्तीलाच आयुष्याचा समतोल साधण्याची नैसर्गिक देणगी उपलब्ध आहे!

– शैलेश तांडेल
७२०८११२३३१

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?