प्रत्येक स्त्रीसाठी आवश्यक आहे ‘वर्क लाईफ बॅलन्स’

संध्याने बँकेत आल्याआल्या प्रथम मुलीच्या पाळणाघरात फोन केला. तिची लहान मुलगी तापाने फणफणलेली होती पण संध्याची सहकारी आधीपासूनच रजेवर असल्यामुळे संध्याला रजा मिळाली नाही. संध्याचे कामात लक्ष नव्हते.

एका महत्त्वाच्या गोष्टीत संध्याच्या हातून चूक झालीच. साहेबांच्या ते लक्षात आले. त्यांनी चूक सुधारून घेतली. संध्याला त्यांनी बोलावून घेतले व ते म्हणाले, “तुमच्या पगारातून वसुली करू का?” ही गोष्ट संध्याच्या मनाला खूप लागली. संध्याकाळी बँकेतून निघाल्यावरही संध्या याच गोष्टीच्या विचारात होती.

आपल्या हातून असं कसं झालं? ताप आलेल्या मुलीला एका हातान घेऊन सुन्न मनाने ती घरी आली आणि घरातील कामे आवरू लागली. मुलगी रडत होती तिला एक फटका द्यावा असेही संध्याच्या मनात येवून गेले.

संध्या बँकेत असताना मुलीच्या काळजीत गुंतलेली. आणि घरी असताना बँकेतल्या कामाचा विचार करत होती. तिला घरसंसार आणि नोकरी या दोन्ही आघाड्या कशा सांभाळाव्या हाच प्रश्‍न होता.

पल्लवीचा स्वत:चा गृहोद्योग आहे. कलात्मक गिफ्ट वस्तू, पेंटिंग व एब्रॉयडरीच्या साड्या, ड्रेस मटेरियल इ.चा. घरी स्टॉकही असतो. ती ऑनलाईनसुद्धा विकते.

घरी कोणी स्टॉक बघायला महिला येतात तेव्हा ती घरच्या कपड्यात, घरातील कोणीतरी हॉलमध्येच पाय पसरून आडवे झालेले, मोठ्या आवाजात लावलेला टिव्ही अशी घराची स्थिती. अशात पल्लवीकडे ग्राहकांना पुन्हा येवून खरेदी करावी असं वाटत नाही.

खरंतर पल्लवीचा माल अगदी खात्रीशीर. पण या सगळ्या अडचणी उद्योगात येतात. ऑनलाईन विक्री करतानासुद्धा तिला अनेक प्रकारचे अनुभव येतात. एखाद्या ग्रृपवर कोणी एखाद्या वस्तूची मागणी केली तर तिच्या पूर्वीच इतर कोणीतरी त्यांच्या प्रॉडक्टची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवलेली असते.

त्याचवेळी घरातील प्रत्येकाला असे वाटते की पल्लवीचे घरात लक्ष कमी आणि फोनमध्ये जास्त असते. पल्लवीला कळत नाही की घर आणि काम दोन्ही एकत्र कसं सांभाळावं. दोन्हीला आपण योग्य न्याय देत नाही असा विचार करून ती चिडते.

खरंतर ‘वर्क लाईफ बॅलन्स’ हा ‘फंडा’ पल्लवी व संध्यासारख्या स्त्रीयांसाठी उत्तर आहे. काय आहे ‘वर्क लाईफ बॅलन्स’चा मंत्र?

‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे आपला प्राधान्यक्रम ठरवणे. हे फार महत्त्वाचे आहे. प्रत्येकीने एकदा दोन-तीन तासाचा वेळ काढून निवांतपणे आपल्याला काय करायचे आहे हे लिहून काढावे. कोणत्या गोष्टी प्राधान्याने मिळवायच्या आहेत. कोणत्या गोष्टी थोड्या उशीरा मिळाल्यास चालतील आणि कोणत्या गोष्टी मिळाल्या तर उत्तम पण मिळाल्या नाहीत तरी काही दु:ख नाही याची यादी करावी.

उदा. पल्लवीचे घेऊ. पल्लवीचा उद्योग आहे तर ती काय करू शकते? समजा नवर्‍याला डब्यात ३-४ पदार्थ द्यायचेत, पूजाअर्चा करायचीय, ऑनलाईन मागणी आल्यास त्यांना तात्काळ उत्तर द्यायचंय, टीव्ही बघायचाय, घर आवरायचंय, स्वच्छता, मुलांचा अभ्यास अशा प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. अन्यथा सर्व गोष्टी एकत्रित येतात व कशालाच न्याय देता येत नाही.

प्राधान्यक्रम ठरला की पुढे काय तर महत्त्वाचे आहे वेळेचे नियोजन. सकाळी किती वाजता उठणार इथं पासून कोण कोणत्या क्रमाने काय काय कामे करणार आणि कोणती कामे कोणी करायची हे पण ठरवणे महत्त्वाचे आहे. उदा. ‘माझ्यासारख्या घडीच्या पोळ्या कुणालाच येत नाहीत.” असं वाक्य म्हणणारी स्त्री स्वत:च्या सापळ्यात स्वत:च अडकते.

मग पोळ्यांना बाई ठेवणे, पोळ्या विकत आणणे किंवा घरातील कोणीही या कामात मदत करणारे असेल तर त्यांची मिळणारी मदतीची शक्यता यामुळे बंदच करून टाकते. त्यामुळे कोणते काम स्वत: करायचे, कोणते आऊटसोर्स करायचे, घरातील इतर सदस्यांकडून कशा कशात मदत घ्यावी. आणि मुलांना स्वतंत्रपणे स्वावलंबनाचे धडे द्यावे या गोष्टी म्हणजे ‘वर्क लाईफ बॅलन्स’ची पुढची पायरी.

माझा मुलगा छोट्या शुशूत असताना बूट पॉलिश करत असे. प्रथम त्याने बुट पॉलिश केले तेव्हा माझ्याच कुटूंबातील एका व्यक्तीने माझ्यावर टिका केली की मी किती आळशी व दूष्ट आई आहे म्हणून. साडेतीन वर्षाच्या मुलाकडून मी बूट पॉलिश करवून घेते.

त्यावेळी मी न चीडता त्यांना सांगितले की ते बूट त्याचेच आहेत आणि ती लिक्विड बुट पॉलिशची बाटली उलटी करून तो जोडलेला ब्रश बुटावरून फिरवणे हे काही कष्टाचे काम नव्हे. उलट शाळेतील त्याच्या बाईंनीही त्याचे या गोष्टीसाठी कौतुकच केलेय. हे सर्व त्याच्याच समोर चालू होते.

त्याला बाईंनी केलेले कौतुक आठवले आणि तो गोड हसून म्हणाला, “आई, मी आजोबा आणि बाबांच्यापण बुटांना पॉलिश करू का?” त्याचे आजोबा समोरच होते त्यांना आपल्या नातवाचे कौतुक वाटले. त्या घटनेपासून माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा मला पाठिंबा मिळत गेला. त्या क्षणी मी त्यांच्या मते एक जबाबदारी आई झाले.

मला घरातल्या छोट्या छोट्या काम ते मदत करू लागले त्यामुळे मलाही थोडा वेळ त्यांच्यासाठी काही तरी करण्यासाठी मिळू लागला. जसे की त्यांच्या आवडीचं एखादं गाणं लॅपटॉपवर त्यांच्यासाठी लावून देणे. त्यांच्यासोबत बसून गप्पा करत चहा घेणे. इ. म्हणजेच प्रथम मदत मागताना जी भिती वाटते, कधी कधी अहंकार आडवा येतो अशा गोष्टी जाणीवपूर्वक दूर साराव्यात.

आपण वेळेचे नियोजन याविषयी बोलतोय. अशावेळी स्वत:साठीही वेळ द्या. स्वत:ची कामे करताना विशेषत: स्वयंपाक, पूजाअर्चा, व्यायाम या गोष्टींचे नियोजन करा आणि आराखडा तयार करा.

आठवड्याचे नियोजन करताना दोन्ही वेळच्या स्वयंपाकातील मूळ घटक भाज्या, नाश्ता, यासाठी लागणार्‍या आणि घरातील सदस्यांच्या आवडीनुसार, डाएट, पथ्य यानूसार एक आठवडी आराखडा तयार करून त्यामध्ये त्या प्रत्येक पदार्थाची नोंद करावी. म्हणजे काम सुलभ होते. एकादशी, चतुर्थी सणवार या सगळ्याचे नियोजन आधीपासूनच करावे.

आपल्या घरातील पुढील पिढीच्या मुलांना स्वयंपाक घरात काही करायची इच्छा असल्यास त्यांना त्यासाठी उद्युक्त करावे. तक्रारी न करता त्यांना पाठिंबा द्यावा. यातूनच तुमची मुलं तुमच्या रोजच्या कष्टांची किंमत ओळखतात आणि मुलांनी साधा चहा जरी आपल्यासाठी आयता बनवून दिला तरी सर्वांना आनंदच मिळतो.

काही कामे एकत्रित करता येतात जसे की टीव्ही पाहताना एकीकडे भाजी निवडणे, कपड्यांच्या घड्या करणे, इ. इ. अशा उरकता येणार्‍या गोष्टींची यादी करून कामे करता येतील.

आपण आपल्या उद्योगातून सुट्टी कधी घेणार हे ठरवा. नोकरीत असाल तर आठवडी सुट्टी असतेच. अनेक स्त्रियांच्या सुट्टीच्या दिवशी आधीची उरलेली कामे उरकणे, स्वच्छता यातच दिवस संपून जातो. त्यामुळे आपली सुट्टी आपल्या आवडत्या गोष्टी करण्याच्यादृष्टीने प्लान करा.

आराम करा आणि सोबत पुढील आठवड्याचे नियोजनही करा. यामुळे मुलं, नवरा, कुटुंबातील इतर सदस्य यांना वेळ देणेही नक्की जमते. मानसिकता हा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा.

संध्याच्या उदाहरणात पाहिलं की संध्या बँकेत असताना घराचा आणि घरात असताना बँकेचा विचार करते. खरंतर ही आपली कसोटी आहे. आपण या क्षणी जे करतोय त्यात आपणं एकाग्र होणं महत्त्वाचं आहे. अन्यथा दोन्हीकडे आपण तोंडघशी पडतो.

त्यामुळे, “आज आताचा हा क्षण माझ्या हातात आहे, त्याचं सोनं करायची संधी मला क्षणभरच आहे.” ही जाणीव मनात सतत बाळगा. नियोजन उत्‍तम करा. संवाद उत्तम करा. राग आला तर संयम ठेवा. चिंता टाळा.

मी पंधरा वर्षे पूर्णवेळ नोकरी केली. सकाळी ८.२५ ला नाश्ता, दुपारचे जेवणाचे डबे, व्यायाम, पूजाअर्चा, हे सर्व करून निघत असे. घरी यायला संध्याकाळचे सात वाचायचे. त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, रोज मैत्रीणींसोबत रात्रीचे चालणे, देवळात जाणे रात्री एकत्रित जेवणे, रोज ध्यानधारणा, संगीत हे सर्व मी करू शकत होते.

त्याचेवळी माझ्यासोबत काम करणार्‍या इतर स्त्रियांची, शेजारणी, नात्यातील स्त्रीया यांची कुतरओढपण पाहत होते. त्यातूनच मला हा वर्क लाईफ बॅलन्सचा मुलमंत्र मिळाला. मी माझ्या करिअरमध्ये पाच बदल्या आणि वाढत्या कामाच्या जबाबदार्‍या स्वीकारू शकले ते याचमुळे. हे सर्व करताना घर, काम, छंद, सहली, अशा अनेक गोष्टी सांभाळल्या.

यातूनच आता मी मागील काही वर्षे एक उद्योजक म्हणून काम करतेय. विविध कंपन्या, बँका लहानमोठे उद्योग, शाळा, कॉलेज आदी ठिकाणी ट्रेनिंग देते ते वर्क लाईफ बॅलन्समुळेच.

– स्मिता सोहनी

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?