उद्योगोपयोगी

कामाचे वेळापत्रक आणि नियोजन

Advertisement
वेळापत्रक हे दुसरे घड्याळ समजले जाते.

कामे कशी, केव्हा करावीत, त्यांचा प्राधान्यक्रम काय असावा, या प्रश्नांवर पुन: पुन्हा विचार करण्यापेक्षा उपलब्ध वेळ आणि एकूण कामे यांचा विचार करून एकदाच वेळ ठरवून कामाचे वेळापत्रक तयार करावे. त्यामुळे वेळेची बचत होऊ शकते. हे वेळापत्रक केवळ मनातल्या मनात नसावे, तर लेखीसुद्धा असावे. तसेच त्याची प्रत शक्यतो कायम बरोबर बाळगावी.

त्यामुळे कागदावर असलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे सोपे होते. कामाचे वेळापत्रक तयार करताना कोणत्या कामाला अंदाजे किती वेळ लागेल, कामांचा प्राधान्यक्रम काय असेल, कामांची संसाधने कोणती इत्यादी प्रश्नांचा विचार व्हावा.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://rzp.io/l/smartudyojak


कामाच्या वेळापत्रकाचे फायदे :

कामाच्या पूर्वनियोजित वेळापत्रकामुळे एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित होऊन ते काम कमी वेळेत पूर्ण होते. त्यामुळे वेळेची बचत होते. प्रत्येक कामाला एक विशिष्ट वेळ दिल्याने कोणतेही काम दुर्लक्षित राहत नाही. प्रत्येक कामाला स्वतंत्र वेळ दिला जातो.

वेळापत्रकामुळे कामामध्ये नियमित आणि सलग प्रगती दिसून येते. त्यामुळे सगळीच कामे कमीत कमी तणावमुक्त परिस्थितीत पूर्ण होतात. वेळापत्रकामुळे उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त वापर करता येत असल्यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

वेळापत्रक बनवताना विचारपूर्वक नियोजन करून प्रत्येक कामाच्या डेडलाइन्स ठरवाव्यात.

या ठरवलेल्या डेडलाइन्स पाळल्या जाणेसुद्धा महत्त्वाचे असते. कारण पहिले काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने पुढच्या कामाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने डेडलाइन्स पाळल्याने कमी वेळेत जास्त कामे पूर्ण होऊन वेळेचे नियोजन उत्तम पद्धतीने होऊ शकते.

नियोजन करताना दोन कामांमध्ये थोडा वेळ ठेवावा.

यालाच ब्रीदिंग स्पेस म्हणतात. हा अवधी एक काम संपल्यानंतर मेंदूवर येणारा ताण झटकण्यासाठी उपयोगाचा असतो. कधी कधी वेळेची बचत करण्यासाठी स्वतःला अजिबात वेळ न देता घाईघाईमध्ये कामे पूर्ण करण्याची सवय दिसते. या सवयीमुळे मेंदूवरील ताण वाढत जाऊन त्याचा प्रतिकूल परिणाम तब्येतीवर होण्याची शक्यता असते. तसेच अशा ताणतणावाच्या परिस्थितीत काम केल्याने कामाची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता निर्माण होते.

वेळ वाचवण्यासाठी घाईघाईमध्ये कामे अर्धवट करण्याची सवय दिसते.

त्यामुळे गरजेप्रमाणे तेच तेच काम पुन: पुन्हा हातात घ्यावे लागते. त्यापेक्षा थोड़ा वेळ घालवून एकच काम एकहाती पूर्ण करावे.

वेळापत्रक बनवण्याच्या आणि त्याचे पालन करण्याच्या सवयीने एकूणच आयुष्यात नियोजन, नियमितपणा आणि वक्तशीरपणाच्या सवयी लागतात. त्यामुळे आयुष्याला शिस्त लागते.

– कविता दातीर

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!