सातारा शहरातील ऐतिहासिक जलमंदिर येथे १७ जून रोजी शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी लिहिलेल्या “यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्याला साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील १३ यशमूल्यांवर आधारित ‘शिवतंत्र’ ही संकल्पना या पुस्तकात मांडण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीतून स्वबळावर यश मिळवण्याचा मार्ग समाजाला दाखवणे, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः लेखक डॉ. विजय तनपुरे होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले, “हे पुस्तक फक्त वाचण्यापुरते नाही, तर नव्या पिढीला यशस्वी होण्यासाठी दिशा देणारे आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यांचे धडे मिळतात. हे पुस्तक वाचून युवक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. अशी पुस्तके समाजात सकारात्मक चळवळ निर्माण करतात.”
डॉ. विजय तनपुरे यांनी अपंगत्वावर मात करत ३७ वर्षांच्या कारकिर्दीत देश-विदेशात शिवचरित्र पोवाड्यांच्या माध्यमातून पोहोचवले. २००१ मध्ये झालेल्या वैयक्तिक संकटानंतर त्यांनी स्वतःला सावरले आणि गेल्या २६ महिन्यांपासून वर्कआउट, समाजसेवा आणि ‘शिवतंत्र’च्या माध्यमातून तरुणांना उद्योजक बनवण्याचे कार्य सुरू केले. यावेळी त्यांनी आपल्या शिवाश्रम या अपंगांसाठीच्या सेवाभावी केंद्राची माहितीही दिली.
“हे पुस्तक माझ्या आयुष्याचा अनुभव आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी मी स्वतःला घडवले आणि आता ते विचार समाजापर्यंत पोहोचवत आहे. हे पुस्तक शाळा, महाविद्यालये, तरुण उद्योजक, बेरोजगार युवक, अपंग बांधव आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे डॉ. तनपुरे म्हणाले.
प्रकाशन सोहळ्यात शिवकालीन सादरीकरण, क्षणचित्रे आणि मान्यवरांचे अभिप्राय यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले. ‘शिवतंत्र’ ही संकल्पना शिवाजी महाराजांच्या विचारांची आधुनिक पुनर्मांडणी असून, नव्या भारतासाठी ती दिशादर्शक ठरू शकते. हे पुस्तक वैयक्तिक यशासोबतच समाजाच्या पुनरुज्जीवनाचा विचार मांडते.