पैशाबद्दल तुमचा दृष्टिकोन काय, हे कसे ओळखाल?

आता आपण एक प्रयोग करूया. आपल्या घराच्या दिवाणखान्यात शांत बसा. पहाटे ४.३० वाजता किंवा संध्याकाळी ६.३० वाजता सकाळची वेळ जमू शकल्यास उत्तम. मोबाइल ऑफ करा. दिवे मंद करा. इतरांना सांगून ठेवा तुम्हाला व्यत्यय आणू नका. दरवाजाकडे तोंड करून शांत बसा, अंगावर किंवा जवळपास कमीतकमी वस्तू ठेवा. एक चांगले चालणारे पेन आणि कोरे कागद मात्र जवळ असू द्या.

आता डोळे मिटा. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. नास्तिक असाल तर तुमच्या उत्सवमूर्तीचे स्मरण करा. उत्सवमूर्ती म्हणजे तुमचे आदर्श. तीन वेळा दीर्घ श्वास घेऊन सोडा. आता मनात असा विचार आणा की जगातला सगळा पैसा किंवा जगातली सगळी संपत्ती, या बंद दरवाजाबाहेर एकवटली आहे. काय दिसते आहे तुम्हाला? जे तुम्हाला दिसेल ते दृश्य मनात साठवा.

ते दृश्य बर्‍यापैकी स्पष्ट झाले की डोळे उघडा आणि भराभर कागदावर लिहून काढा तुम्हाला काय काय दिसले ते. स्वत:शी प्रामाणिक राहा. हे केल्यावरच पुढे वाचा.

तुम्हाला काय काय दिसले?

रुपयांच्या नोटा, निरनिराळ्या देशांच्या नोटा, नोटांचे गठ्ठे, विखुरलेल्या नोटा, तिजोरीतल्या नोटा, गल्ल्यातल्या नोटा, खिशातल्या नोटा, देवाणघेवाण होत असतानाच्या नोटा, जुगारातल्या नोटा, नाचात नर्तिकेवर उधळल्या जाणार्‍या नोटा, रस्त्यावर भरलेल्या दंडाच्या नोटा, तिकीट काढताना दिलेल्या वा घेतलेल्या नोटा, टेबलाखालून दिलेल्या अथवा घेतलेल्या नोटा, हॉटेलमध्ये दिलेल्या बिलाच्या नोटा, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटा, सिनेमातल्या वरच्या मजल्यावरून खाली उधळलेल्या नोटा, इत्यादी इत्यादी.

सोने, चांदी, दागिने, अलंकार, हिरे, माणिक, मोती.

चेक किंवा धनादेश, डिमांड ड्राफ्ट, हुंडी, मनी ऑर्डर, मृत्युपत्र, देणगीपत्र, गिफ्ट डीड, प्रॉपर्टीचे कागद, कर्जाचे कागद, हिशेबाच्या वह्या , शेअरचे कागद, रद्दी कागद.

लॉटरी तिकीट, मटक्याचा नंबर, घोड्याचा नंबर.

कार, रेल्वे, विमान, जहाज, यॉट, रॉकेट.

टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, दालमिया, पिरामल इ उद्योगपती.

राजकारणी (नावे घेत नाही)

सूनबाई, जावई, सासरा, सासू, आजी, आजोबा, काका, काकी.

मित्र, मैत्रिणी.

गाई, गुरे, शेळ्या, मेंढ्या, बकर्‍या, कुत्रे, घोडे, हत्ती, ससे, उंट.

तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग.

तेल, तिळाचे तेल, गोडे तेल, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल.

पेट्रोल, डिझेल, एंजिन तेल, वंगण, ग्रीस, रॉकेल.

लोखंड, अ‍ॅल्युमिनिम, सोने, चांदी, मँगनीज.

पाईप्स, नळ, वायर्स, वॉशर्स, नटस, बोल्ट्स.

हवा, पाणी, आवाज, ऊन, पाऊस, वारा.

दारू किंवा दारूच्या बाटल्या, वाइनची पिंपे, बिअर.

कोका कोला, पेप्सी, मॅक डोनाल्ड, केएफसी.

स्टेट बँक, रिझर्व्ह बँक, पी.एम.सी बँक, सुवर्ण बँक, माधवपूर बँक.

द्राक्षे, सफरचंद, आंबे, संत्री, मोसंबी, केळी.

अपार्टमेंट, बंगला, बिल्डिंग, गगनचुंबी इमारती.

मोबाइल, कॉम्प्युटर, स्क्रीन्स.

टोप्या, शर्ट, पँट, कपडे, चपला जोडे, अंतर्वस्त्रे.

जमीन, शेती, जंगले, डोंगर, दर्‍या, वाळू, माती, दगड, काच, प्लास्टिक, गारगोट्या, शंख, शिंपले.

वृक्ष, वेली, पाने, छोटी झाडे, बाग.

नदी, समुद्र, सरोवर.

आणि अगदी शेवटी

गटारे, उकिरडे, टाकाऊ प्लास्टिक, घाण, कचरा, उष्टे अन्न, विष्ठा.

हे सगळे होते पैशाचे प्रकार.

या सर्व प्रकारामधून दृगोच्चर होते ती

१. तुमची पैशाकडे बघायची दृष्टी आणि
२. तुमचा पैशाकडे बघायचा सर्वसाधारण दृष्टिकोन आणि आवाका.

या प्रयोगाचे प्रयोजन काय?

तुमची पैशाकडे बघायची दृष्टी जर कोती असेल तर आजूबाजूला असलेल्या बर्‍याच संधी तुम्ही सोडून देणार. त्याकडे बघणारसुद्धा नाही, कारण त्यात तुम्हाला पैसे दिसत नाही.

जर तुमचा पैशाकडे बघायचा दृष्टिकोन छोटा किंवा घायकुता असेल, तर तुम्ही तुम्हाला चांगल्या वाटणार्‍या संधीसाठीच अडून बसाल आणि पुढे जाणार नाही. तुम्हाला काय दिसले ते तुम्ही कोण आहात यावर अवलंबून आहे. (हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. यावर आपण पुढील लेखात सविस्तर उहापोह करूच.)

वर दिलेल्या सर्वच गोष्टी पैसे किंवा near money या प्रकारात मोडतात. यापैकी सगळ्या गोष्टीचे संपत्तीत रूपांतर करून अब्जोपती झाले आहेत. त्यांना तेथे पैसे दिसला जेथे इतरांची दृष्टी पोेहोचूच शकली नाही.

तुम्ही सारासार आणि सकारात्मक विचार करून तुमची दृष्टी सुधारू शकता आणि तुमचा आवाका वाढवू शकता. उठा, विचार करा आणि तुमचा आवाका वाढवा.

– आनंद घुर्ये
9820489416

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?