मला माझा उद्योग अनेक पटींनी वाढवायचा आहे. कसे करायचे ते सांगा. माझ्या समोरील सुखवस्तू जातक मला विचारत होता. त्यांचे कपडे, गळ्यातील सोन्याची साखळी, मर्सीडीज गाडी इत्यादी गोष्टी त्यांच्या व्यवसायातील यशाची साक्ष देत होत्या.
या गृहस्थांचा पिढीजात दुधाचा व्यवसाय होता. त्यांनी स्वतः त्या व्यवसायाला उद्योजकीय वळण देऊन तो व्यवसाय नावारूपाला आणला होता. आता त्यांनी दूध, दुधापासून बनणारे विविध पदार्थ यांचे उत्पादन आणि विक्री यामध्ये जम बसवला होता.
दूध बाहेरून घेऊन सगळ्या प्रक्रिया करण्यामध्ये या गृहस्थांचा हातखंडा होता. कष्टपण अपार केले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या १५ वर्षांमध्ये एखादाच दिवस असा असेल की, ते त्यांच्या कारखान्यावर गेले नाहीत आणि जेव्हा जायचे ते १६ तासांपेक्षा कमी कधीच काम केले नाही.
या उद्योगात आज अनेक नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. त्यांना तोडीस तोड उत्पादन काढणे, तेदेखील किमती कमी ठेवून ही काही सोपी गोष्ट नाही. ते साध्य करण्यासाठी अविरत कष्टांबरोबर कल्पकता, संशोधन आणि सतत नवीन नवीन उपाययोजन यांची अतिशय गरज असते.
या गृहस्थांनी ते एकहाती करून दाखवले होते. आता व्यवसाय स्थिरावला होता. आता त्यांना त्या व्यवसायाची उत्तुंग वाढ करावयाची होती. हेच त्यांचे माझ्याकडे येण्याचे प्रयोजन होते. मी त्यांच्या पत्रिकेचा बारकाईने अभ्यास केला.
गुरू, शनी आणि बुध हे तीन ग्रह त्यांच्या कर्मस्थानाशी चांगल्या तर्हेने संबंधित होते. त्यामुळे माणूस नीटनेटका, कष्टकरी आणि विपुल बुद्धिमत्ता असणारा असा होता; परंतु पत्रिकेचा जो गुण माझ्या नजरेत भरला तो होता दशाबदल. एकोणीस वर्षांची शनी दशा संपून आता बुधाची दशा सुरू होत होती आणि अशा दशा छिद्रात ही व्यक्ती माझ्याकडे सल्ला मागायला आली होती.
दशा म्हणजे आयुष्यातील ऋतू. दशेबरोबर आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलते तसेच आपली स्वतःची उद्दिष्टे आणि प्रेरणा बदलतात. यामुळे आपण पाहतो की, अनेक उद्योग जे पूर्वी अयशस्वी झाले होते ते अचानक अतिशय यशस्वी होतात किंवा अनेक वर्षे चालणार्या उद्योगांना आपला बाडबिस्तरा गुंडाळावा लागतो.
मध्ये त्या उद्योगांची काही कर्तबगारी किंवा नामुश्की नसते, तर परिस्थितीचा रेटा हे होण्यास भाग पडतो. उदाहरणार्थ अर्थशास्त्र हा विषय हजारो वर्षे अभ्यासला गेला असला तरी त्याची विशेष प्रगती झाली ती संगणकक्रांती झाल्यावरतीच किंवा CFL Light चे युग येते आहे, येते आहे असे वाटायला लागले असतानाच अचानक LED Light आले आणि त्यांनी बाजारपेठच बदलून टाकली.
नोकियासारखा उद्योग यशाच्या अत्युच्च पायरीवर असताना अचानक खाली घसरून नाहीसा झाला. सिनेमामध्ये बघा ना, शत्रुघ्न सिंह, प्राण, Oliver Hardy सारखे खलनायक त्यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात साईड हिरो म्हणून नावाजले गेले. याला म्हणतात दशा परिणाम.
तुमच्या पत्रिकेत एक महादशेच्या वेळी कोणती कोणती घरे उद्युक्त होतात त्याप्रमाणे तुमच्या प्रेरणा असतात आणि तुम्ही कशाप्रकारे दशेशी जुळवून घेता यावर तुमचे त्या दशेतील यश अवलंबून असते. यासाठी दशास्वामीचा मूळ स्वभाव काय, तो कुठे बसला आहे, त्याच्यावर कोणाकोणाची दृष्टी आहे इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो आणि त्याप्रमाणे जातकास सल्ला देता येतो.
या गृहस्थांच्या बाबतीत दशास्वामी शनीने त्यांच्याकडून भरपूर मेहनत करवून घेऊन त्यांना उत्तम परिणाम दिले होते. शनीचा स्वभाव शारीरिक काम करण्याचा. त्यामुळे निर्मिती उद्योग त्यास चांगल्या प्रकारे जुळतो. निर्मिती उद्योग किंवा उद्योगात निर्मिती विभाग.
आमच्या विचारविनिमयाप्रमाणे आजपर्यंतचे सगळे कष्ट त्यांनी निर्मिती विभागातच केले होते आणि दशेप्रमाणे ते बरोबरपण होते आणि आतादेखील त्यांना निर्मिती विभागाचीच वाढ करावयाची होती. येथेच तर ग्यानबाची मेख होती. नवीन दशास्वामी होता बुध.
हा विपणनक्रियेशी संबंधित आहे. बोलणे, प्रसिद्धी माध्यमे, लिहिणे, वाचणे, संदेश प्रसारित करणे इत्यादी क्रियांना या दशेत सहकार्य, मदत आणि मार्गदर्शन मिळते. त्यामुळे या अनुषंगाने उद्योगाचा विस्तार करणे सोपे जाते. आपल्या दशेला पोषक अशा क्रिया केल्यास त्यांना यश मिळणे सोपे जाते. प्रवाहाबरोबर पोहणे केव्हाही चांगलेच असे म्हणू या.
त्यामुळे यांची बुधाची दशा सुरू होत असताना उद्योगाची वाढ करण्यासाठी निर्मितीमध्ये (प्रॉडक्शन) गुंतवणूक करणे धोक्याचे होते, व्यावहारिक नव्हते आणि पत्रिकेशीही सुसंगत नव्हते. आतापर्यंत त्यांच्या उद्योगाचे नेतृत्व निर्मिती विभागाकडे होते, आता ते विपणन विभागाकडे द्यायची खरी वेळ आली होती.
निर्मितीमध्ये गुंतवलेल्या प्रत्येक रुपयापेक्षा, विपणनामध्ये गुंतवलेला प्रत्येक रुपया त्यांना जास्त लाभाचा ठरणार होता. मी त्यांना या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आणि आता उद्योगवृद्धीसाठी विपणनाची कास धरा, असे सुचवले.
सुरुवातीपासून केलेल्या आणि स्वतः विकसित केलेल्या निर्मिती विभागाची जबाबदारी दुसर्यावर सोपवून स्वतः विपणन या विषयात हात घालणे ही काही सोपी गोष्ट नव्हे; परंतु जे काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे पावले टाकतात त्यांनाच विजयश्री माळ घालते हे विसरून चालणार नाही. त्यापुढे सगळी श्रींची इच्छा!
– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
९८२०४८९४१६
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.