तरुणांनी नोकरीचा मोह सोडून स्वयंरोजगाराचा मार्ग चोखाळावा

जागतिकीकरणानंतरच्या या काळात एक तर नोकरी मिळवणे अवघड आणि जर दैवयोगाने मिळाली तर टिकवणे अवघड. अशा परिस्थितीमध्ये स्वत:चा उद्योग सुरू करण्याला पर्याय नाही. आपला उद्योग-व्यवसाय लहान का असेना, पण तो आपला असतो; म्हणून तरुणांनी नोकरीचा मोह सोडून, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वत:च्या स्वयंरोजगाराचा मार्ग चोखाळावा.

हा मार्ग खडतर आहे. वेळोवेळी नोकऱ्यांमध्ये कपात होते. त्याचे कारण आपल्याला समजूही शकत नाही; पण परिणाम मात्र भोगावा लागतो. अचानक अशी वेळ येण्यापूर्वीच आपण आपला ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा म्हणजे ‘पिंक स्लिप’ची भीती राहणार नाही. पायरीपायरीने जागतिकीकरण पुढे सरकत आहे. आपण आतापासूनच आपला उद्योग, व्यापार, सेवा अथवा शेती उद्योग जागतिक स्पर्धेतही टिकून राहील या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे.

शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय? पेट्रोलियम उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात पेट्रोल, डिझेल मिळाल्यावर उरलेला ‘कचरा’ फेकण्याचा प्रश्न पडायचा. रॉक फेलरने त्या गुळगुळीत कचऱ्यापासून लुब्रिकंट वेगळे केले. तो तर स्वत: श्रीमंत झालाच, पण इतरांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची गुरुकिल्ली देऊन गेला.

आजच्या घडीला आपल्यासमोर साठवणूकीच्या आणि प्रक्रियांच्या अभावी चाळीस टक्के फळे-भाजीपाला वाया जात आहे. आपण शेताशेतात प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभारले तर तेही शून्यातून विश्व निर्माण करणारेच ठरेल. जेव्हा आम्ही लहान होतो त्या काळात जपानमधल्या घरोघरी चालणार्‍या इलेक्ट्रॉनिक उद्योगाचे उदाहरण दिले जाई. साधारणपणे आपल्या ‘लिज्जत’ उद्योगासारखे हे मॉडेल आहे.

शिक्षण हा एक मोठा उद्योग आहे. हल्ली बहुतेक युवक-युवती नोकरीसाठी शिक्षण घेतात; पण हे शिक्षण नोकरी देण्यास पुरेसे ठरत नाही, कारण त्यात व्यक्तिमत्त्व विकास किंवा सॉफ्ट स्किलचा समावेश नसतो. शिक्षण आणि उद्योग यांना जोडणाऱ्या खास प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे. इंटरनेटमुळे माहितीचा स्फोट झाला आहे, असे म्हणतात; पण आपल्या शेतापर्यंत हवी असणारी माहितीच पोहोचत नाही.

आतापर्यंत जी जी तंत्रज्ञाने आली ती तंत्रज्ञाने शेतकऱ्याला लाभदायक ठरण्यापेक्षा शेतकऱ्याला ‘गिऱ्हाईक’ (ग्राहक नव्हे) बनवण्याला कारणीभूत झाली. शेती स्वयंपूर्ण व्हावी, शेतीतून मूळच्या स्रोतात चांगली वाढ व्हावी, पाण्याची-खताची-कीटकनाशकाची बचत व्हावी, किंबहुना त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी, उत्पन्नाचे झरे वाहू लागावेत, शेतीमाल टिकाऊ व्हावा, विकाऊ व्हावा, त्याचे मूल्यवर्धन व्हावे, या दृष्टिकोनातून आपण विविध संधी शोधू शकाल.

आपण आपली बुद्धी, हुशारी, क्षमता, कौशल्ये तुटपुंज्या पगारासाठी गुलामाप्रमाणे का विकावीत? किंवा भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नोकऱ्या मिळवण्यासाठी का वाया घालवावी?

प्रसिद्ध संशोधक माशेलकर यांचे लेखन आपण वाचले नसल्यास त्यांची पुस्तके अवश्य वाचावीत. आपल्या मनातील संशोधकाला जागे करण्याचे, प्रेरणा देण्याचे कार्य ती करत असतात. चला, संधी शोधू यात – आपण आपले शिक्षण, तांत्रिक कौशल्य, अनुभव, आपल्या अनुकूल व प्रतिकूल बाबी विचारात घ्याव्यात.

आपण आपल्या आवडीचा शोध घ्यावा, कारण उद्योजकतेच्या काटेरी वाटेवरून जाताना जेव्हा खिशात पैसे नसतात, पण तरीही काम करावे लागते तेव्हा ही आपली आवडच आपल्याला पैलतीरावर घेऊन जाते. आपला ‘ग्राहक’ निश्चित करा. आपले उत्पादन ज्या टार्गेट ग्रुपसाठी आहे त्याचा विचार करून आपले प्रॉडक्ट काय किमतीला, कशा आवरणात ग्राहकाला सहज उपलब्ध झाले पाहिजे. आपला ग्राहक जे वाचतो, जे पाहतो, जेथे जातो तेथे आपल्या उत्पादनाची महती पोहोचली पाहिजे.

एक समाधानी ग्राहक आपणास अनेक ग्राहक मिळवून देईल. जर आपला उद्योग लहान असेल तर आपण गट्स- Guts च्या जोरावर यश मिळवू शकता. शेतीमालावर प्रक्रिया या विषयाचा अभ्यास करताना आपण आपल्याकडे कोणता माल आहे एवढाच विचार करतो; पण महत्त्वाचा विचार असावा ‘ग्राहक’. स्पर्धा- आपण स्पर्धेला घाबरू नये, तर आपले धोरण ठरवण्यासाठी स्पर्धेचा विचार करावा.

आपण शाळेत ‘टारीचेलीची पोकळी’ शिकलेलो असतो. प्रयोग नलिकेच्या वरती निर्वात जागा असते. आपण जेवढा माल चांगला बनवू तेवढी स्पर्धेची भीती कमी होते. अनेक जणांना स्पर्धेची भीती वाटते. मी सोयाबीनच्या क्षेत्रात काम करतो. मी स्वत: सोयाबीनचे दूध करतो व पितो, त्यामुळे मला माझ्या मालाची/माझ्या ज्ञानाची खात्री असते.

मी पुण्यातल्या प्रसिद्ध शाळेतल्या ९वीच्या विद्यार्थ्यांना सोयाबीनचे दूध बनवण्याचा प्रकल्प करून दाखवला. त्यांच्या चेहऱ्यामवरचे आनंदाचे आणि आश्चर्याचे भाव मला ताकद देतात. शासन वेळोवेळी आपले औद्योगिक धोरण, पर्यटन धोरण, वाइन उद्योगाविषयीचे धोरण तसेच खाद्य प्रक्रिया उद्योगाविषयी धोरण जाहीर करत असते.

रोजचे वर्तमानपत्र वाचताना अशा बाबी माहीत होतात, मात्र आपण उद्योग सुरू करतानाच ‘मराठा चेंबर’सारख्या चेंबर ऑफ कॉमर्सचे सभासदत्व अवश्य घ्यावे म्हणजे आपणास वेळोवेळी संधी व धोके समजतात. भागीदारी? आपण आपला उद्योग खासगी पातळीवर भागीदारीत, मर्यादित कंपनी म्हणून तसेच उत्पादकांची कंपनी म्हणून स्थापन करू शकतो. एवढेच नव्हे तर आता लघू व मध्यम उद्योगांनासुद्धा मर्यादित कंपनीचे लाभ मिळण्याची संधी मिळत आहे. ही एक क्रांतिकारक घटना आहे.

आता आतापर्यंत लघुउद्योग भागभांडवल बाजारातून भांडवल उभारू शकत नव्हते; पण या नव्या संधीमुळे आपल्याला मर्यादित कंपनीचे लाभ घेता येतात. आपण कर आणि कायदे यांची माहिती अवश्य घ्यावी व सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्यावा. शॉर्टकट शोधण्यापेक्षा नियम पाळणे आपल्या खिशासाठी आणि ब्लड प्रेशरसाठी महत्त्वाचे असते!

प्रकल्प अहवाल – लघुउद्योजकांनी स्वत:चा प्रकल्प अहवाल स्वत: बनवावा म्हणजे त्रुटींची कल्पना अगोदरच येते; त्यामुळे वेळेवर पूर्तता करता येते.

उद्योजकता प्रशिक्षण – उद्योजकाला धोका हा घ्यावाच लागतो; किंबहुना फायदा मिळण्याचे कारणच हा धोका आहे. आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, आयुष्यात धोका न घेणे हे तोट्याचे असते. ज्या रस्त्यावरून आपली गाडी जाणार आहे त्या रस्त्यावर सर्वत्र हिरवे दिवे लागलेले असतील अशी अपेक्षा कशी करता येईल? गाडीने शेकडो मैलांचा प्रवास करायचा असेल तर आपल्याला पुढच्या शंभर-दोनशे फुटांपर्यंतचा प्रकाश पुरेसा ठरतो.

उद्योग सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या बाजारपेठेचा अभ्यास करावा. तसेच उत्पादनाच्या आणि मार्केटिंगच्या बाबतीत ‘काही जगावेगळे’ आणि तरीही फायदेशीर ठरेल असे काय करता येईल याचा विचार करावा. इंटरनेटमुळे जग एका क्‍लिकवर आले आहे.

आपण आपला माल इंटरनेटद्वारेही विकू शकतो. उद्योग सुरू करताना आपणास अनेक सरकारी संस्था साहाय्य करू शकतात. त्यांनाही चांगल्या उद्योजकांची गरज असते.

नवीन तंत्रज्ञान – नवीन तंत्रज्ञान माहीत करून घेण्यासाठी आपण विविध B2B औद्योगिक प्रदर्शनांना भेटी द्याव्यात.

उद्योजकता शिबिरे – आम्ही अन्नप्रक्रिया उद्योगासाठी वेळोवेळी उद्योजकता शिबिरांचे/चर्चासत्रांचे आयोजन करतो. अन्नप्रक्रिया उद्योग मागे राहण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नवउद्योजकांना ज्या प्रकारचे उद्योग सुरू करावयाचे आहेत ते पाहावयास मिळत नाहीत किंवा तेथे प्रत्यक्ष काम करायची संधी मिळत नाही.

आपण याला अन्नप्रक्रिया उद्योगांचे उबवणी केंद्र म्हणूयात. उत्पादक शेतकरी, दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांनी तसेच सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या  कॉर्पोरेट कंपन्यांनी अशी इन्क्युबेशन सेंटर्स उभारली पाहिजेत.

उद्योग उभारण्याच्या पायऱ्या :

  • स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा विचार.
  • माहितीचे संकलन.
  • उद्योग व्यवसायाची निवड.
  • कागदपत्रे गोळा करणे.
  • प्रकल्प अहवाल तयार करणे.
  • उद्योगाची नोंदणी.
  • भांडवल उभारणीची प्रक्रिया.
  • जागेची निश्चिचती.
  • विविध परवानग्या मिळवणे.
  • बांधकाम, यंत्रे उभारणे.
  • मशीनरीची निवड व ऑर्डर.
  • मनुष्यबळाची निवड.
  • कच्च्या मालाची शाश्वती.
  • विक्रीयंत्रणा उभारणे.
  • उत्पादनाची चाचणी.
  • व्यापारी उत्पादन सुरू करणे.
  • उद्योग उभारणी.

– पद्माकर देशपांडे
९३२५००६२५१

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?