‘उद्योग साथीदार’ कसा निवडावा?

अशोक, सुधीर आणि श्रीधर हे तिघेही उच्चशिक्षित इंजिनीअर. मुंबईच्या ख्यातनाम महाविद्यालयातून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यावर त्यांनी चिपळूणजवळील औद्योगिक वसाहतीत जागा घेऊन आपली फर्म चालू केली. उत्पादनाला वाव होता, बाजारात मागणी होती, उत्पादन करता येत होते, परंतु आजच्या घडीला फर्म डबघाईला आली होती आणि त्यांच्यापैकी एक भागीदार भागीदारी विसर्जित करा आणि मला माझे पैसे द्या, असा तगादा लावून होता. त्यापैकी सुधीर आपली कैफियत घेऊन माझ्यासमोर बसला होता. त्याच्याबरोबर त्याची बहीणदेखील होती. असे का होते आहे?

असा त्यांचा प्रश्न होता.

ते इतरही ज्योतिषांकडे जाऊन आले होते. त्यांना सांगितले गेले होते की, पत्रिकेप्रमाणे भागीदारी त्यांना फळणार नाही आणि त्यांनी भागीदारी करून मोठी चूक केली आहे. त्याबद्दलदेखील त्यांना सल्ला पाहिजे होता. आमचा व्यवसाय आम्ही भागीदारी केल्याशिवाय करूच शकत नाही, तेव्हा काय करावे, असादेखील त्यांचा प्रश्न होता.

अशा वेळी सगळ्या भागीदारांच्या पत्रिका पाहणे गरजेचे असते. मी सगळ्यांच्या पत्रिका करून घेतल्या. Comparative analysis करत असताना मला लक्षात आले की,

पत्रिकेप्रमाणे अशोक इतर दोघांपेक्षा बराच जास्त dominant होता. त्याच्या पत्रिकेत मंगळ महत्त्वाची भूमिका बजावत होता. अशी माणसे सरळ स्वभावाची असतात, त्यांची विचारशैली साधी सोपी असते, अनेक स्तरीय विचार (multi level thinking) त्यांना जमत नाही, तसेच ते प्लॅन ब कधीच तयार करत नाहीत.

‘खाईन तर तुपाशी’ अशी त्यांची मनोभूमिका असते. त्याची पत्रिकादेखील इतरांच्या पत्रिकेपेक्षा बरीच उच्च दर्जाची होती आणि आता जो भागीदार बाहेर पडण्यास पाहत होता तोदेखील अशोकच होता. दशा, गोचर किंवा इतर गोष्टी फारशा नकारात्मक नव्हत्या किंवा धंद्यात एवढी मोठी ठोकर मारण्याइतपत जबरदस्त नव्हत्या.

याचा अर्थ या अपयशाला त्यांची वागणूकच कुठल्या ना कुठल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात जबाबदार होती. परिस्थिती चांगली असली तरी अति धाडस किंवा वेडे धाडस केल्यास आपल्या हातात काहीच राहत नाही. मी त्यांना खोदून खोदून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली…

प्रत्येकाची वैशिष्ट्ये काय? प्रत्येक जण फॅक्टरीमध्ये काय काय करायचा? ते एकत्र कसे आले? गुंतवणूक कुठून आणली?कशी आणली? बिझनेस प्लॅन काय होता? उत्पादन कोणते करायचे, ते कसे ठरवले? वगैरे वगैरे….

त्यांनी अडखळत प्रश्नांना उत्तरे देण्यास सुरुवात केली. ज्योतिष्याला या गोष्टींचे काय देणेघेणे, असा त्यांच्या चेहर्‍यावर भाव होता. त्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून मीच त्यांना स्पष्टीकरण दिले.

उद्योग ज्योतिष म्हणजे उद्योगास करावयाची सर्वांगीण मदत, अर्थात ज्योतिषाच्या प्राचीन विद्येच्या माध्यमातून.

या सर्वांगीण मदतीमधला टेक्नो-कर्मशियल (तांत्रिकी आणि व्यावसायिक) आणि फिजिकल मेनिफेस्टेशन (भौतिक प्रकटीकरण) या बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात, कारण त्यामुळेच आपल्याला समस्येच्या मुळाशी जाता येते आणि उपाय करता येतो.

अनेकांना असे वाटते की, ज्योतिषाला सगळे आपोआप पत्रिका पाहून कळले पाहिजे. असे नसते. माहितीचे/प्रश्नाचे अनेक पदर असतात आणि एक एक पदर उलगडत गेल्यावरच समस्येचा उलगडा होतो. याकरिता जातकाकडून वस्तुनिष्ठ व सर्वंकष माहिती मिळणे फार महत्त्वाचे असते.

माझा कयास बरोबर होता. पुढील चर्चेतून निष्पन्न झाले ते आधी रंगवलेल्या चित्रापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. तिघांनीही एकच अभ्यासक्रम पूर्ण केला असला तरी त्यांमध्ये अशोक हुशार म्हणून प्रसिद्ध होता व बाकी दोघे त्याचे जुनियरच नव्हे तर त्याच्या उपकारातही बांधलेले होते.

दोघांनाही त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यास, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्यात, ते पास होण्यात त्याने बरीच मदत केली होती. या गोष्टींमुळे या दोघांमध्ये त्याच्याबद्दल एक आदरभाव होता आणि त्याच्या शब्दाला ते खूप मान देत होते. त्यामुळे प्रत्येक जागी त्याचाच शब्द प्रमाण मानला जायचा. सगळ्या समस्यांची मेख येथेच होती.

फॅक्टरी कुठे काढायची, उत्पादन काय करायचे, तंत्रज्ञान कोणते वापरायचे, या सगळ्या गोष्टी अशोकने सांगितल्या आणि इतरांनी अमलात आणल्या. येथपर्यंत सगळे ठीक होते, कारण या सगळ्या गोष्टी तांत्रिक होत्या आणि अशोकचा त्यात हातखंडा होता. इतरांनादेखील त्यात बर्‍यापैकी गती होती.

जेव्हा विक्रीची वेळ आली तेव्हा त्यात कोणीच अनुभवी नव्हता.

दोन पर्याय त्यांच्या समोर होते…..

मोठ्या उद्योगांना ठोक पुरवठा करायचा, यात विक्रेत्यांची त्यांना गरज पडणार नव्हती किंवा लहान लहान उद्योगांना किरकोळ पुरवठा करायचा. यामध्ये त्यांना विक्रेत्यांना नोकरीवर ठेवण्याची गरज होती, उत्पादनांचा साठा ठेवण्याची गरज होती व इतरही बरेच आनुषंगिक खर्च होते.

अशोकने मोठ्या उद्योगांना ठोक पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कयासाप्रमाणे दोन-तीन मोठे ग्राहक पटवले की काम झाले; परंतु झाले ते विपरीतच. एक तर सॅम्पल टेस्टिंगमध्ये या मोठ्या ग्राहकांनी बराच वेळ घेतला. म्हणजे नमनालाच घडाभर तेल. नंतर व्हेंडर म्हणून नोंदणी वगैरे सोपस्कार आले आणि नंतर हे मोठ्या ग्राहकाचे छोटे पुरवठादार असल्याकारणाने त्यांना कडक क्रेडिट अटी सहन कराव्या लागल्या.

इतके करूनदेखील मोठे ग्राहक यांच्याशीच बांधील राहत होते असेदेखील नाही. त्यांना बाजारात अधिक स्वस्तात माल मिळाला तर ते तेथून घेत आणि यांचा राखीव, संकटकालीन पुरवठादार म्हणून उपयोग करून घेत. त्यामुळे यांचा खर्च बराच वाढला आणि हाताबाहेर गेला. यापैकी कोणीच अर्थशास्त्राशी संबंधित नसल्यामुळे त्यांना परिणामांची जाणीव झाली, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

गोदामे भरली होती. मालाला उठाव नव्हता. बराच माल टाकाऊपण झाला होता. उद्योगाला भांडवलाची गरज होती, परंतु पदराचे आणि वरचे सगळे पैसे ते घालून बसले होते. कर्जदार आता दार ठोठावत होते. त्यातच या धक्क्यामुळे अशोकला नैराश्य आले होते. त्याचा नर्व्हस ब्रेक डाऊन झाला होता.

आतापर्यंत त्याने कधी आयुष्यात पहिली जागा सोडलीच नव्हती, ना कधी अपयशाचा सामना केला होता. त्यामुळे हा धक्का अतिशय जबर होता. तर इतर दोघांची स्थिती सुकाणूशिवायच्या होडीसारखी झाली होती.

यांना तातडीची उपाययोजना जरुरीची होती. त्यांच्या पत्रिका पाहता त्या दोघांमध्ये मिळूनदेखील उद्योग या स्थितीतून वरती आणण्याची क्षमता नव्हती. फॅक्टरी ताबडतोब बंद करा. सगळा माल बाजारात आणा आणि नगद किंवा क्रेडिट कशाही प्रकारे विकायचा प्रयत्न करा. बँकांशी बोलून कर्ज refinance कसे करता येईल हे बघा.

त्यासाठी चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. नोकरी बघा. तुम्हा दोघांच्याही पत्रिका नोकरीसाठी चांगल्या आहेत. आतादेखील जरी तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही धंदा करत आहात तरी वास्तविक तुम्ही नोकरीच करत आहात. तीन वर्षांनंतरचा काळ तुम्हाला भागीदारीसाठी चांगला आहे. तोपर्यंत चांगली नोकरी करा, अनुभव गाठीशी बांधा आणि आणखी दोन भागीदार घेऊन धंद्यास परत सुरुवात करा.

ते भागीदार कुठल्या क्षेत्रातील असावेत, त्यांमध्ये काय काय गुण असावेत, भागीदारीची तत्त्वे काय असावीत यासाठी आपण सविस्तर :

आम्हाला सांगितले गेले आहे की, भागीदारी आम्हाला फळणार नाही, तुम्हीदेखील बघताय की, भागीदारामुळेच सगळी समस्या उभी राहिली आहे आणि तरी तुम्ही म्हणताय की, तीन वर्षांनंतर भागीदार घ्या आणि धंदा करा.

तुमच्या समस्या भागीदारीमुळे नसून भागीदारी ज्या प्रकारे केली त्यामुळे निर्माण झाल्या आहेत. या भागीदारीत अशोकच मालक होता आणि धंदा तोच चालवत होता. त्यामुळे त्याला ज्या गोष्टींमध्ये गती होती तेथे उद्योगास गती मिळाली आणि जेथे त्याचे निर्णय चुकले, अनुभव आणि ज्ञान कमी पडले, तेथे तुम्हाला समस्या निर्माण झाल्या. बहुतेक धंद्यांमध्ये भागीदार जरुरीचा असतो; किंबहुना असे म्हटले तरी चालेल की, मोठा धंदा भागीदारीशिवाय होतच नाही.

अगदी धीरुभाई अंबानी, नारायण मूर्ती, बिल गेट्स, केशुब महिंद्र यांनी आपला धंदा भागीदारीतूनच सुरू करून नावारूपास आणला; परंतु भागीदारी कशासाठी करायची, भागीदाराने तुमच्या धंद्यात काय आणले पाहिजे, भागीदारी कुठवर करायची, फायद्यात असताना कसे वेगळे व्हायचे, भागीदारीची कोणती काळजी तुम्ही घेतली पाहिजे याचा अंदाज तुमच्या पत्रिकेवरून घेता येतो. कुणाशी भागीदारी तुम्हाला कशा प्रकारे फळेल याची माहिती होते आणि त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करता येते.

लग्न आणि भागीदारी व्यवसाय यातील साम्यस्थळे

लग्न हीदेखील जीवनभराची भागीदारीच आहे. जसे लग्नामुळे आयुष्याला भरारी येते, आपली स्वप्ने साकार होऊ शकतात, आपल्यास समर्थ आधार मिळू शकतो तसेच धंद्याचेपण. जसे लग्न करताना कुंडली जुळवून मार्गदर्शन केले जाते, तसेच काहीसे उद्योगाबद्दल असते.

आपण म्हणजे बहुतेक लोक ज्योतिष्याकडे दोन प्रसंगी जरूर जातात. एक म्हणजे मुलाचे बारसे आणि दुसरे म्हणजे लग्न. बारशाच्या वेळी पत्रिका बनवण्यासाठी, तर लग्नाच्या वेळी पत्रिका जुळवण्यासाठी. लग्न ही एक प्रकारची जीवनभराची भागीदारीच आहे आणि त्यात नवरा आणि बायको हे दोघेच भागीदार नसतात, तर त्या दोघांची पूर्ण कुटुंबे भागीदारीत सामील असतात.

तुम्ही लग्न समारंभात लक्ष दिले, तर तुम्हाला कळेल की, भटजीबुवा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या जबाबदार्‍या समजावून सांगत आहेत आणि त्याच्या त्याच्याकडून होकार मिळाल्यावरच पुढे जात आहेत. असो.

लग्नामध्ये वर व वधू यांचे गुण जुळवले जातात. १८ ते २८ गुण जुळल्यास ती जोडी उत्तम मानली जाते. याचा अर्थ आहे की, त्यांच्यामध्ये सामाईक गुण आहेत आणि वेगवेगळे गुणदेखील आहेत, त्यामुळे त्यामध्ये योग्य ते परस्परावलम्बित्व राहून त्यांचा संसार चांगला चालेल.

जर गुण १८ पेक्षा कमी जुळत असतील तर त्या जोडप्यात साम्य फारच कमी आहे आणि मतभेद होण्याचे प्रसंग जास्त येतील. जर गुण २८ पेक्षा जास्त असतील तर त्यामध्ये साम्य अति प्रमाणात आहे आणि परस्परावलम्बित्व फार कमी आहे, त्यामुळे त्यांच्यामधील स्वतंत्रता जास्त होऊन त्यामध्ये समन्वयाचा अभाव तयार होईल.

अशा प्रकारचा ढोबळ अंदाज बांधता येतो. अर्थात गुणमीलन ही लग्न जुळवण्याची प्राथमिक पायरी असून तो एक ढोबळ निकष आहे. (पूर्ण माहितीसाठी लेखकाची ‘पत्रिका मीलनाच्या सात पायर्‍या’ हे पुस्तक वाचावे.) परंतु अशाच प्रकारे ‘उद्योग ज्योतिषा’मध्ये भागीदाराच्या पत्रिका जुळवल्या जातात. अर्थात त्यामध्ये अनेक इतर पैलूदेखील लक्षात घेतले जातात.

मला असे दिसून आले आहे की, धंद्यात दोन प्रकारचे लोक असतात. एक अशा विचाराचे की, भागीदारच नको. दुसरे असे की, ज्यांना भागीदार पाहिजे असतो, परंतु ते भागीदार निवडताना फारसा विचार करत नाहीत. आपल्या जवळचा, आपल्याबरोबर शिकलेला, शाळासोबती, महाविद्यालयामधला, आपली ज्याच्या बरोबर जुळते अशा प्रकारचा भागीदार घेऊन धंदा चालू करतात आणि नंतर पस्तावतात.

या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. भागीदार हा धंद्याच्या दृष्टीने उपयोगाचा असला पाहिजे, व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने नाही. तुम्हाला भागीदाराच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे, गळ्यात गळा घालून बागडायचेही नाही किंवा गळ्यात गळा घालून रडायचेही नाही. ‘भागीदार’ या संज्ञेबद्दल गैरसमजच अधिक आहेत. तेव्हा यापुढे आपण ‘उद्योग साथीदार’ हा शब्द वापरू.

साथीदार म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्हाला उद्योगाला उपयुक्त अशी शक्ती घेऊन येते आणि ती शक्ती तुम्हाला आताच्या वेळी मोबदला दिल्याखेरीज वापरता येते. ज्यांना तुम्ही लगेच मोबदला देता ते तुमचे पुरवठादार (suppliers)असतात. ज्यांना पैशाखेरीज इतर प्रकारे तुम्ही मोबदला देता ते सर्व तुमचे कुठल्या न कुठल्या प्रकारे साथीदार किंवा भागीदार असतात.

भागीदारांचे किंवा साथीदारांचे प्रामुख्याने तीन जागी महत्त्व असते.

  • व्यवसाय चालू करताना
  • व्यवसाय वाढविताना (Business Growth)
  • व्यवसाय विस्तारताना (Business Expansion).

व्यवसाय चालू करताना अनेक गोष्टींची जरुरी पडते. जागा, भांडवल, वेगवेगळे परवाने. यासाठी तुम्हाला जर साथीदार मिळू शकला तर तुमचे काम सोपे होते. असा साथीदार प्रामुख्याने या विषयातील जाणकार असावा किंवा उत्तम जनसंपर्क असलेला, राजदरबारी वजन किंवा स्थावर मालमत्ता असलेला असल्यास तुमची कामे सोपी होतात. अशा माणसाबरोबर चालणे तुमच्या व्यवसायालादेखील लवकर व चांगले स्थैर्य मिळवून देते.

या माणसाच्या स्थावर मालमत्तेचा तारण म्हणून वापर करून तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. त्यामुळे त्याची राहिलेली मालमत्ता कामाला येते आणि तुमच्या व्यवसायासाठी भांडवलही मिळते. ज्या कामांसाठी तुम्हाला प्रत्यक्ष जावे लागले असते अशी कामे हा माणूस फोनवर करू शकतो तेव्हा तुमची कामे सोपी होतात. अशा अनेक गोष्टी सुकर होतात. ही माणसे जितकी दूरची असतील तेवढे बरे.

दुसर्‍या प्रकारचे साथीदार व्यवसाय पसरवण्यासाठी कामास येतात. हे साधारणपणे तांत्रिक ज्ञान असलेले व सांगितलेली जबाबदारी पार पडणारे असे असावेत. फारसे महत्त्वाकांक्षी नसले तर उत्तमच. ते एक एक सुभा/फांदी (branch) सांभाळतील आणि तुमच्यावरचा बोजा कमी होईल. हे तुमच्या विश्वासातील, कुटुंबातील, मित्र परिवारातील असतील तर जास्त चांगले.

तिसर्‍या प्रकारचे साथीदार म्हणजे व्यवसायवृद्धीसाठी कामाला येणारे. हे साथीदार व्यवसायाच्या वेगवेगळ्या अंगांशी संबंधित असावे लागतात. जसे तांत्रिकी, अर्थ, उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री. यातील जेवढ्या जास्त भागांशी संबंधित साथीदार तुमच्याजवळ असतील तेवढ्या जोरात तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढविता येईल.

नारायण मूर्ती यांनी आपला व्यवसाय चालू करताना सात भागीदार घेतले होते. प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगवेगळे होते. प्रत्येकाचा काम करण्याचा प्रदेश किंवा आवाका वेगवेगळा होता.

एक मोठी Fast Food Chain आहे . इतर अनेक chains बंद झाल्या; परंतु यांची घोडदौड चालूच आहे. त्यांच्या यशाचे रहस्य आहे ते त्यांच्या भागीदारीत. तुम्ही यांच्या दुकानात जाऊन नुसते बसलात जरी तरी त्यांचा फायदाच फायदा होतो. ही कंपनी पूर्णपणे साथीदारांमध्येच चालते.

एका साथीदाराची जागा, दुसर्‍याचा पैसा, तिसर्‍याचे interior decoration चवथ्याकडून खुर्च्या, पाचव्याकडून तंत्रज्ञान अशी ही मारुतीच्या शेपटीसारखी वाढत जाणारी साखळी आहे. एवढेच काय, तिथे वापरला जाणारा झाडू आणि टिश्यू पेपरदेखील कोणत्या तरी भागीदारापासूनच येतो. म्हणून तुम्ही काही केले तरी आणि काही नाही केले तरी त्यांचा फायदाच होतो आणि असे मिळालेले भांडवल परत परत गुंतवून ते मोठे होत आहेत.

उद्योग ज्योतिषप्रमाणे भागीदार/साथीदार मीलन करताना त्यांचे गुण, प्रकृती (ature), प्रवृत्ती (aptitude) आणि अंतस्थ हेतू या गोष्टींचा आढावा घेतला जातो. त्याचबरोबर तुमच्याबद्दलदेखील हीच माहिती करून घेतली जाते. अर्थात पत्रिका, हात, नाव आणि चर्चा या माध्यमांतून.

त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचे साथीदार हवेत, कशासाठी हवेत, साथीदारीसाठी त्यांचा आणि तुमचा चांगला काल कुठला, साथीदारीच्या करारात कोणकोणत्या गोष्टीचा विशेष उल्लेख हवा, कोणत्या साथीदाराने कोणते काम करावे इत्यादी गोष्टींचा ऊहापोह केला जातो. हे कसे केले जाते हे आपण पुढील लेखात पाहू.

– आनंद घुर्ये
९८२०४८९४१६

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow