“वैताग आलाय. आता नोकरीचं काय तरी केलं पाहिजे लगा!”
“रानात कितीबी जीव काढला तरी उत्पन्न काय निघना; नोकरी बघितली पाहिजे आता!”
“इंजिनिअरींग होऊन दोन वर्षे झाली अजून तुला काही काम भेटलं नाही, इंजिनिअर म्हणून नाही तर नाही जी भेटंल ती नोकरी कर!”
हे आणि असे शेकडो संवाद महाराष्ट्राच्या गाव, शहरात नेहमी ऐकायला येतात. शिक्षण-नोकरी क्षेत्रात वाढत जाणारी स्पर्धा प्रत्येक विद्यार्थी आणि नोकरीच्या उमेदवाराला अटळ आहे. कुठल्याही नोकरी उमेदवाराच्या करिअरची सुरुवात होते शिक्षणापासून!
सत्तर ऐंशीच्या दशकानंतर शिक्षणाबद्दल थोड्या फार प्रमाणात का असेना आस्था वाढू लागली आणि गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत प्रत्येक श्रीमंत गरीब पालकांच्या मनात आपला पाल्य शिकला पाहिजे ही भावना रुजू लागली.
जसाजसा काळ पुढे सरकू लागला तसं तसा शिक्षणाबद्दलचा दृष्टीकोनदेखील व्यापक होऊ लागला. सुरुवातीला स्वतःचं नाव लिहीता आलं तरी बास या भावनेपासून शिकून सवरुन नोकरी लागली पाहिजे, ही भूमिका प्रत्येक कुटुंबाची होऊ लागली.
हे चक्र चालू असतानाच ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांतीचं वारं फेर धरू लागलं आणि आपला मुलगा किमान एखाद्या कारखान्यात मजूर म्हणून का असेना कामाला लागला पाहिजे हा विचार प्रत्येक घरात होऊ लागला.
शहरी भागात शिक्षणाचे अमर्याद पर्याय उपलब्ध असल्याने करिअरसाठी संधीदेखील जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. याउलट ग्रामीण भागाचा विचार करता मर्यादित शैक्षणिक संधी असतानाच करिअरचे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. शैक्षणिक टप्प्यातदेखील मागील ३०-४० वर्षांत पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल ठराविक क्षेत्रांकडेच राहिला आहे.
नव्वदीच्या दशकात माहिती तंत्रज्ञानाचं जग खुलं झालं तरीही शैक्षणिक ओढा लगेच या क्षेत्राकडे आकर्षित नाही झाला. नव्वदीचा काळ शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणारा ठरला, या काळात विद्यार्थ्यांचा कल बऱ्यापैकी डीएडकडे होता.
जसं जसं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी उपलब्ध होत होत्या त्यानुसार कल इंजिनिअरिंग क्षेत्राकडे वळला. या काळात महाराष्ट्रात शेकडो इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्याने तयार झाली.
बेरोजगारी वाढायला लागली तशी व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाचं वारं वाहायला लागलं आणि पुढे लाट आली MBA यासारख्या व्यवस्थापन क्षेत्रातील कोर्सेसची. ठराविक काळानंतर या कोर्सेसचा परिणामदेखील कुचकामी ठरला.
थोडक्यात सारांश सांगायचा तर दर दशकात शैक्षणिक व्यवस्थेत वेगवेगळ्या कोर्सेसच्या लाटा आल्या त्याप्रमाणे आपला विद्यार्थी वर्ग या लाटांच्या प्रभावाखाली येऊन वेळ पैसा यांचा विचार न करता ‘गुलाल तिकडे चांगभलं’ या न्यायाने वागत राहिला परिणामी बेरोजगारीचं संकट गडद होत गेलं.
मुंबई, पुणे, नागपूर या ठरावीक शहरांना सोडलं तर ग्रामीण भागात ना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण व्यवस्था याउलट इतर राज्यांचा विचार केला तर गुजरातसारखे व्यापारी क्षेत्रात पुढारलेल्या राज्यांनी ‘गुजरात पॅटर्न’ निर्माण करत ‘व्हायब्रंट गुजरात’सारखे उपक्रम राबवत रोजगाराच्या लक्षणीय संधी उपलब्ध केल्या ; प्रत्येक नोकरीच्या संधीसोबतच छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या संधीदेखील तिथे उपलब्ध झाल्या.
आपल्या राज्यातदेखील पुणे-मुंबईसारख्या शहरात हजारो उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या, पण स्थानिक लोकांनी कितपत या संधीचा फायदा घेतला हादेखील मोठा प्रश्न आहे.
आज पुण्या-मुंबईत मराठी लोकांपेक्षा परप्रांतीयांचे जास्त उद्योग व्यवसाय उभे आहेत याची कारणं जर शोधली तर सर्वात महत्त्वाचं आणि मूळ कारण येतं ते म्हणजे मराठी माणसाची उद्योजकीय मानसिकतेबद्दलची अनास्था.
आपल्या भारत देशाबद्दल बोलायचं तर विविधांगी धर्म, भाषा, परंपरा आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारी लोकसंख्या हाताशी घेऊन कृषीप्रधान संस्कृतीला सर्वोच्च स्थानी मानणारा विकसनशील देश म्हणून आपण जगभरात ओळखले जातो. ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, ही विचारधारा स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीयांच्या मनात खोलवर रुजलेली आहे.
जागतिकीकरणाचं धोरण स्विकारल्यानंतर या तत्त्वात बदल होऊन ‘उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती’ हे तत्त्व भारतीयांच्या मनात रुजलं. याला कारण बिनभरवशाची शेती, ना हमी मालाला भाव आहे ना उत्पादक किमती एवढंदेखील उत्पन्न शेतीतून मिळतं त्यामुळे शक्यतो शेतकर्यांच्या पिढ्या शेतीपासून दूर झाल्या आणि कमी का असेना पण फिक्स पगार देणारं उत्पन्नाचं साधन म्हणून नोकरी सर्वोत्तम गणली जाऊ लागली.
आज आयटी क्षेत्रांत भारतीय कंपन्यांनी घेतलेली झेप माना दुखवणारी आहे, पण खरी स्पर्धा झाली ती शेती आणि नोकरीमध्येच, कारण व्यापाराला असणारं दुय्यम स्थान आजही कायम आहे.
त्यातल्या त्यात मराठी माणूस व्यापारउदीम म्हटलं की एक पाऊल मागे सरकतो मागच्या चार-पाच दशकांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल नोकरी आणि पगाराच्या मायाजालाने मराठी माणसाला कुठंतरी बांधून ठेवल्यासारखं झालं आहे.
उद्योग, व्यवसाय म्हटलं की अनिश्चितता, उद्योग व्यवसाय मराठी माणसाला जमणारच नाही, धंदा काही चालत नाही, धंदा करुन कोण मोठं झालंय का ही मानसिकता मराठी माणसाला उद्योग व्यवसाय करण्यापासून दूर करते.
– विजय पवार
9130042020
(लेखक ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.