…तरच घडू शकते उद्योजकीय मानसिकता
उद्योजकता

…तरच घडू शकते उद्योजकीय मानसिकता

स्मार्ट उद्योजक मासिक प्रिंट आवृत्ती वर्षभर घरपोच मिळवा फक्त रु. ५०० मध्ये! नोंदणीसाठी : https://imjo.in/Xx7Uq6

उद्योजक होण्याआधी आपण उद्योजक होऊ शकतो अशी श्रद्धा असली पाहिजे. माणसाच्या जीवनात श्रद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडते. सकारात्मक विचार हा सकारात्मक श्रद्धा असल्याशिवाय येत नाही आणि जर सकारात्मक श्रद्धा असेल तर आपली एक विशिष्ट मानसिकता तयार होते. जसं खेळाडूकडे खेळाडूची मानसिकता असली पाहिजे, अभिनेत्याकडे अभिनयाची मानसिकता असली पाहिजे. तसेच उद्योजकाकडे उद्योजकाची मानसिकता असली पाहिजे. उद्योजकीय मानसिकता असल्याशिवाय उद्योजकात यशस्वी होता येत नाही. मुळात कोणत्याही क्षेत्रात त्या त्या क्षेत्राची मानसिकता असली पाहिजे. मानसिकता म्हणजे काय? तर विचारप्रणाली. आपण एखादी डिटेक्टिव्ह कथा वाचत असतो. त्यातले प्रसंग, पात्र यांत आपण गुंतून जातो.

एखाद्या सामान्य माणसाला जमणार नाही, अशा अशक्यप्राय प्रकरणातील गुंता हा डिटेक्टिव्ह सोडवतो. वाचताना तो गुंता सोडवण्याचा एक वाचक म्हणूण आपण प्रयत्न करतो. पण आपल्याला ते काही जमत नाही. मग हा डिटेक्टिव्ह हा गुंता कसा सोडवतो? कारण त्याच्याकडे डिटेक्टिव्हची मानसिकता असते. तो एका विशिष्ट पद्धतीने विचार करतो, कार्य करतो. तसेच उद्योजकीय क्षेत्रात अपेक्षित असल्याप्रमाणे उद्योजकाने विचार केला पाहिजे, कार्य केले पाहिजे. त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. तरच उद्योजकीय मानसिकता विकसित होऊ शकते.

डर के आगे जीत है

लहानपणी एखादी गोष्ट करू नये यासाठी पालक आपल्याला भीती घालायचे. तिथे जाऊ नकोस, नाहीतर बुवा येईल. माऊंटन ड्य़ूच्या जाहिरातीत डर के आगे जीत है, असं वाक्य आपण ऐकलंय. बर्‍याचदा भीतीमुळे संभाव्य धोका तुम्हाला कळतो. भीतीमुळेच तर अनेक चुकीच्या गोष्टी करण्याला आपण धजावत नाही. तोटा, दुखणे, नकार, त्रास अशा अनेक भीतींमुळे आपण सावध होतो, म्हणूनच भीती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उद्योजकाने सर्वप्रथम उद्योगातले दोष समजून घेतले पाहिजे आणि मग भीतीवर मात ते दोष काढून टाकले पाहिजे.

Advertisement

केवळ कठोर परिश्रम नको, तर परिश्रमाची विभागणी हवी

सगळेच म्हणतात की व्यवसायात कठोर परिश्रम करायला हवे. ते खरेच आहे, पण प्रत्येक काम तुम्ही एकट्याने करू शकत नाही. जर परिश्रमाची विभागणी केली तर परिश्रमाचे प्रमाण वाढते आणि ते काम स्मार्ट्ली होते. तुम्ही काही कामे आठ तासात करत असाल आणि जर त्या कामांची विभागणी तुम्ही केली तर, तुमच्या लक्षात येईल की तुमच्या वाटेला केवळ तीन तासाचे काम आले आहे. मग उरलेला वेळ तुम्ही इतर कामांसाठी खर्च करू शकता. दुसरी गोष्ट आठ तासात तुम्ही जितके करायचा, कामाची विभागणी केल्यामुळे आठ तासात पाचपट काम झालेले तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे परिश्रमाची विभागणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

चिडचिड करू नका

व्यवसायात आपण रागावतो. कारण आपल्याला भीती वाटते की आपले ग्राहक आपल्यासोबत अधिक काळ राहणार नाहीत. ते आपल्याला सोडून जातील. आपले भागीदार आपल्याल्या फसवतील. आपण सतत आपल्या बॅंक बॅलेन्सबद्दल विचार करत राहतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पैशांमुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. पैशांमुळे केवळ पैशांचेच प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे निश्चिंत राहून व्यवसाय करा.

दाग अच्छे है

जे चांगले उद्योजक असतात, ते कधीही स्वतःला सर्वगुणसंपन्न समजत नाहीत. ते सतत नवीन शिकण्याच्या मनस्थितीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होऊच शकत नाही, असे ते समजतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे, चुका टाळाव्यात. विशेषतः उद्योगातील चुका महागात पडू शकतात. त्यामुळे शक्यतो चुका करू नयेत, पण माणूस म्हटला की चुका करणारच. त्यामुळे चुका बर्‍याचदा सुधारण्याची संधी देतात. थोडक्यात हेतू शुद्ध असेल तर चुकांवर मात करता येते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करता येते. त्यामुळे दाग अच्छे हैं…

आनंद लुटा

तुम्हाला जर आयुष्यात आनंद हवा असेल तर तुम्ही आनंदी राहायला शिकलं पाहिजे. दुःख दुःखाला आकर्षित करतं आणि आनंद आनंदाला आकर्षित करतो. त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. तुम्हाला विनाकारण आनंदी राहता आलं पाहिजे. तुमच्या ग्राहकांशी बोलताना, काम करताना, पत्येक गोष्ट करताना तुम्ही आनंदी असायला हवे.

विजय किंवा यशाचा क्षण

प्रत्येक माणसाला अहंकार असतो. तो प्रत्येक माणसात वेगवेगळ्या प्रमाणात असेल, पण अहंकार असतोच. आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींना आपण पाण्यात पाहतो, त्यांना कमी लेखतो. आपण इतरांपेक्षा मोठे आहोत, हे बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो. यशस्वी उद्योजक अशा गोष्टी करत नाहीत. ते विजयात स्वतःची भूमिका काय आणि किती आहे याचे मूल्यमापन करतात आणि इतरांच्या श्रेयाला महत्त्व देतात. आपल्या सहकार्‍यांचे अभिनंदन करतात. हे सर्व करण्यात त्यांचा अहंकार आड येत नाही आणि म्हणूनच ते यशस्वी उद्योजक असतात. त्यामुळे बिनधास्त राहा. आपला विजय आपल्या सहकार्‍यांसोबत साजरा करा आणि आपल्यातील उद्योजकीय मानसिकता जोपासा.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp

उद्योजकता आणि व्यवसायविषयक माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये save करा आणि त्यावर आपले नाव, जिल्हा व तालुका पाठवा.