जी हल्ली कुठे आपल्या मराठी धमन्यांंत वाहू लागली आहे. सतत नोकरीच्या मानसिकतेत असणारा मराठी तरुण उद्योगी होवू लागला आहे. हे आकडेवारीही सांगते व अनुभवही. भारतात सर्वाधिक स्टार्टअप नोंद महाराष्ट्रात झालेली आहे. ठिकठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात अन्य प्रांतीयांची मक्तेदारी होती, तिथे मराठी तरुण उतरत आहेत.
मागील तीन वर्षांत माझ्या आयटी कंपनीद्वारे आम्ही शेकडो व्यवसायांना वेबसाइट व डिजिटल मार्केटिंगच्या सेवा देतो. यामध्ये अनेक प्रकारच्या व्यवसायांचे मालक, सीइओ, सीटीओ यांच्यासोबत मीटिंग होतात. त्यांचा व्यवसाय समजून घेता येतो.
आयटीमध्ये सात वर्षांचा नोकरीचा अनुभव घेऊन तीन वर्षांपूर्वी मी यातच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. गेल्या तीन वर्षांत व्यवसाय करताना जे थ्रिल अनुभवायला मिळत आहे, ते नोकरीत फिक्स पगार असतानादेखील कधीच मिळालं नाही. नोकरीच्या सात वर्षांत आपण काही तरी करत आहोत, अशी भावनाच कधी नव्हती.
जर तेच चेहरे, तेच काम, त्याच समस्या आणि तेच ई-मेल्स. सुट्टी हवी असेल तर विनंत्या करा आणि परवानगी मिळाली तरच सुट्टी घ्या. ही काय लाइफ झाली? आयुष्याचा फार मोठा कालावधी कागदोपत्री अनुभव घेण्यात जात होता.
असे असले तरीही व्यवसाय करणे म्हणजे अनेक आव्हाने असतात, जिथे तुम्हास लढावेच लागते. तुमच्यात आमुलाग्र असे बदल करावे लागतात. ज्यास हे शक्य आहे त्यानेच यात यावे, नाही तर गड्या आपला जॉब बरा अन त्याच त्या फेर्या मारा.
माझ्या अनुभवानुसार मराठी तरुणांना काही सल्ले :
– कोणताही व्यवसाय चालू करण्याआधी शक्य तो त्या क्षेत्रात नोकरीचा अनुभव घ्या.
– निदान दोन वर्षे तरी घरखर्च व स्वखर्च चालेल इतका पैसा बाजूला ठेवा.
– कर्ज घेत असल्यास जोखीम असते, शक्यतो टाळावेत व घ्यावेच लागेल अशी स्थिती असल्यास पंतप्रधान मुद्रा योजना किंवा इतर एखाद्या योजनेद्वारे सबसिडी घ्यावी.
– तुमच्याकडे भांडवल करायला गुंतवणूक कमी असेल तर उत्पादन क्षेत्रात उतरू नये. हवं तर डिस्ट्रिब्युटर होऊन अनुभव घेवून मग इथे सुरुवात करू शकता.
– घरचा व कुंटुंबाचा विरोध हा होणारच हे गृहित धरलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही व्यवसायात पैसा कमवत आहात हे दिसून येत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही मेहनत करा ती व्यर्थ! पण आपण मात्र या दाखवून द्यायच्या भानगडीत नाही अडकायचं! व्यवसायात झालेला नफा हा स्वखर्च व कर्जाचे हफ्ते यामध्येच लावायचा. व्यवसाय मोठा झाला की आपणही मोठे होत जातो.
– स्वार्थी व्हायचे. होय! मराठी माणसाला हे जमत नाही. मनाची श्रीमंती ही समाजसेवेत दाखवायची. व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठीच असतो. आपणास आपल्यासह आपल्या कर्मचार्यांचेही भागवायचे असते.
– कामाच्या गुणवत्तेसोबत तडजोड करायची नाही. परवडत नसेल तर अधिक पैसे घ्या, पण गुणवत्ता कायम ठेवा. ज्याने तुम्हास ग्राहक टिकवून ठेवता येतील व नवे ग्राहकही मिळतील.
– व्यवसायाच्या अकाउंट्सवर बारीक लक्ष ठेवा. एक रुपयाही खर्च झाला किंवा धंद्यात आता तर त्याची नोंद हवी. रोज रात्री झोपण्याआधी अकाउंट्स, रोख, गुंतवणूक किती आहे. देणे किती, येणे किती याची नोंद ठेवायची. उद्याच्या रात्री पुन्हा.
– इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे तुमचा सध्याचा स्टॉक किती, किती लागेल, अॅसेट्स किती ही सर्व नोंद रोजच्या रोज हवी.
– मार्केटिंग स्वत: शिकून घ्या. बोलायला व भेटायला लाज वाटत असेल तर व्यवसाय करूच नका. बोलता आले पाहिजे, हजरजबाबीपणा. तुमची सेवा किंवा उत्पादने लोकांची कोणती गरज भागवतात हे सांगायचे. जाहिरातीमध्ये तुम्ही काय करत आहात हे सांगण्यापेक्षा तुम्ही कोणती गरज भागवता हे सांगायचं.
लीड जनरेशनच्या नवीन टेकनिकद्वारे व संकेतस्थळाद्वारे तुम्ही जगभरात कुठूनही ग्राहक मिळवू शकता. काहीही करताना काही तरी मार्केटिंग करत राहायची.
– तंत्रज्ञानात मागे राहू नका. तुम्ही जे क्षेत्र निवडलं आहे त्यात नवीन तंत्रज्ञान वापरून कॉस्ट कटिंग केली जावू शकते का हे पाहा. यासाठी वेगळा वेळ काढा. हवे तर विशेषज्ञांची मदत घ्या.
– 24 x 7 तुम्हास व्यवसायच करायचा असतो. तुमची नाती, मैत्री, दुरावतील. दुरावू देत. व्यवसाय मोठा झाला की येतील ते किंवा नवे निर्माण होतील.
– शेअर बाजारात गुंतवणूक करा. मिळणार्या नफ्यातून हे जरुर करावे. यात जो परतावा मिळतो तितका इतर कशातही नाही. पैश्याने पैसा वाढतो तो इथूनच. शिकून घ्या. धोका पत्करा. कित्येक जण हेच करतात. सुरुवात तर करा एक नवं उत्पन्नाचं स्रोत सुरू होईल.
– करारनामा जो अजूनही नवमराठी उद्योजकांत दिसून येत नाही. कुठलाही नवा करार असो की डिल, क्वोटेशन सर्व गोष्टींचा करारनामा करायला हवा. याने पुढे येणार्या अनेक समस्या आधीच सुटतात.
– वेळेला महत्त्व द्या. रोज सकाळी लवकर उठा, रात्री कितीही उशीर झाला तरीही. कमी झोपेची सवय लावून घ्या. आपल्या स्वत:वर गुंतवणूक करा. नवं तंत्रज्ञान शिकण्याची, व्यक्तिमत्त्व विकासावर खर्च करा. वेळेचं नियोजन हवं. दिलेली वेळ पाळायची
हे सर्व लिहायला माझा एक तास जाणार हे नियोजनात आहे. कुठे किती वेळ द्यायचा हे ठावूक हवं. मनावर नियंत्रण ठेवायला जमायला हवं. इतर कोणीही हे ठरवू शकत नाही किंवा करून घेवू नाही शकत.
आपले आपल्यालाच सर्व करायचे असते. तुम्ही राजे असता. तुमचा व्यवसाय म्हणजे स्वत:चे राज्य. ते कसे चालवायचे हे स्वतालाच ठरवावे लागते. गर्व व आळस हे दोन सर्वात मोठे शत्रू असतात. अती नम्र राहायचे. अलिप्त राहून कार्यरत राहायचे. कामांच्या जबाबदार्या वाटून द्या. यासाठी विश्वासू टीम निर्माण करायची.
– व्यवसायामध्ये कधीही समाधानी होवू नका. एका उद्योगावर विसंबून राहू नका. आणखी विस्तार करत राहायचे. रतन टाटा या वयात अजूनही नवनव्या उद्योगांत गुंतवणूक करत आहेत. काय गरज आहे त्यांना? पण ते खरे उद्योजक आहेत. तुम्ही इतरांना रोजगार देताय
नाही दिले तरीही स्वत:साठी रोजगार निर्माण करून एक नोकरीची जागा दुसर्यास वापरू देताय, ज्यावर कित्येकांचे खर्च भागवले जाते. यापेक्षा मोठे सामाजिक कार्य ते कुठले असावे! उद्योजक व्हा!
– तुषार कथोरे
7021631848
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.