एकट्याने व्यवसाय सुरू करत असाल तर OPC हा उत्तम पर्याय!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


बहुतेक उद्योजक आपल्या धंद्याची किंवा व्यवसायाची सुरुवात एकल व्यापार/व्यावसायिक संस्थेने (प्रोप्रायटरशिप) करतो. एकल व्यापारास/व्यावसायिकास लागणारे भांडवल हे स्वतःच्या पुंजीतून अथवा स्वतःची पत वापरून उभे करावे लागते. एकल व्यापार/व्यावसायिक आपला व्यापार स्वतःच्या बुद्धिकौशल्याच्या आणि हिमतीवर उभे करतो.

‘एकोहं द्वितीयोनास्ती!’ या उक्तीप्रमाणे, एकल व्यापार/व्यवसाय हा एकखांबी तंबू असतो आणि अर्थातच सकृद्दर्शनी अजिबात किचकट नसलेली ही संस्था चटकन सुरू करता येते तशीच ही बंदही चटकन होते. आता थोडा वाकडा विचार करू या.

समजा ‘क्ष’ व्यावसायिकाने एक लहान पापड उद्योग सुरू केला व तो हळूहळू काही वर्षांत वाढवत नेला. सुरुवातीला 1-2 व्यक्ती नोकर म्हणून असलेला उद्योग आता 8-9 लोकांच्या रोजगाराचे साधन बनला. उद्योग आणखी वाढवण्यासाठी, मालकाने पतसंस्थेकडून सुमारे 5 लाख रुपये कर्ज राहते घर गहाण ठेवून घेतले व ‘क्ष’ने कर्ज परतफेड करण्याची स्वतंत्र वैयक्तिक हमीसुद्धा दिली.

दुर्दैवाने व्यवसायात नुकसान झाल्यामुळे, ‘क्ष’ कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरला आणि पतसंस्थेने ‘क्ष’च्या घरावर जप्ती आणली. आपल्या बौद्धिक कौशल्यावर उभ्या केलेल्या एका सुप्रतिष्ठित कोचिंग क्लासचा मालक (आपण त्याला ख म्हणू) एका नवीनच कारणमुळे गोत्यात आला.

त्याच्या प्रतिस्पर्धी क्लास मालकाने (आपण यास ग म्हणू) बौद्धिक संपादक कायद्यांतर्गत ‘ख’वर खटला दाखल केला. ख आता खटला हरण्याच्या परिस्थितीत आहे व त्यावर क्लासचीच नाही, तर खासगी मालमत्ता विकण्याची पाळी येऊ शकते, कारण ख हा कोचिंग क्लासचा प्रोप्रायटर आहे.

तिसरी कथा तर त्याहूनही वेगळी आहे. ह गेल्या 5 वर्षांपासून एक मार्केटिंग संस्था चालवतो आहे आणि अर्थातच सदर संस्था एकल व्यापार संस्था असल्यामुळे ह हा चालक आणि मालक आहे. संस्था कालानुरूप मोठी होते आणि ह मदतनीस म्हणून त्याच्या बालपणीच्या मित्राला कामावर ठेवतो. हा मित्र ‘ह’च्या अनुपस्थितीत स्वतः ह असल्यासारखा कारभार करतो.

दुर्दैवाने ‘ह’चा अपघाती मृत्यू होतो आणि त्याने उभारलेल्या संस्थेची सर्व सूत्रे आपसूकच त्याच्या मित्राकडे येतात आणि त्याचा मित्र सदर संस्थेचा मालक बनतो. ‘ह’च्या पश्चात मार्केटिंग संस्थेचा त्याच्या घरच्यांना काडीमात्रही उपयोग होत नाही.

या तीनही उदाहरणांमध्ये एक गोष्ट अधोरेखित होते की, आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळे वैयक्तिक आयुष्यात व वैयक्तिक आयुष्यामुळे आपल्या व्यावसायिक आयुष्यात नक्कीच नुकसान होऊ शकते; पण हे नुकसान नक्कीच टाळता येणे शक्य आहे. कसे विचारलं तर, एका कंपनीची स्थापना करा व आपला उद्योग अथवा व्यवसाय कंपनीच्या नावे करा.

आपल्यापैकी बरेच लोक, एक कंपनी स्थापन करण्यासाठी कमीत कमी किती व्यक्तींची गरज असते? या साध्या प्रश्नाचे त्वरित कमीत कमी दोन असे उत्तर द्याल. हे उत्तर एका वर्षापूर्वी बरोबर होते; पण सद्य:स्थितीत नवीन कंपनी कायदा 2013 च्या अनुषंगाने एकल व्यक्ती कंपनी स्थापन करता येऊ शकते, जेणेकरून उद्योग/व्यवसायाची मालकी ही एकाच व्यक्तीच्या हाती राहील आणि कंपनी या संस्थेला मिळत असलेले फायदेही उद्योजक/व्यावसायिक उपभोगू शकेल.

एकल व्यक्ती कंपनी

भारतात जरा उशिराच एकल व्यक्ती कंपनी स्थापन करणे शक्य झाले आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये एकल व्यक्ती कंपनीचा उगम 1897 मध्ये झाला असे म्हणायला हरकत नाही. एकल व्यक्ती कंपनी अमेरिका, सिंगापूर, चीन, संयुक्त अरब अमिरात, तुर्कस्थान, पाकिस्तान या देशांमध्ये करणे शक्य आहे.

युरोप आणि अमेरिकेत ही संकल्पना अत्यंत लोकप्रियदेखील आहे. पाकिस्तानात एकल व्यक्ती कंपनीचा उगम 2003 म्हणजे आपल्या दहा वर्षे आधी झाला होता. त्यामानाने आपण जरा मागासलेलेच आहोत. असो, ‘अंधेर से देर भली’.

एकल व्यक्ती कंपनीचे फायदे

  • स्थापनेसाठी कमी किचकट प्रक्रिया आणि स्थापनेनंतरही खासगी कंपनीपेक्षा कमी क्लिष्ट कायदेशीर बाबी.
  • कंपनीची स्थापना करण्यास केवळ एका व्यक्तीची आवश्यकता.
  • प्रवर्तक-मालक आपला उद्योग/व्यवसाय वेगळी ओळख घेऊन चालवू शकतो.
  • प्रवर्तक-मालक आपली देणी भांडवलाइतकी मर्यादित ठेवू शकतो.
  • प्रवर्तक-मालक आपला वैयक्तिक व व्यावसायिक हिशेब स्वतंत्र पद्धतीने ठेवू शकतो.
  • उद्योगाची भरभराट व आवाका वाढल्यास एकल व्यक्ती कंपनीचे खासगी (Private Limited Company) अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये (Public Limited Company) रूपांतरण करता येते.
  • रिझर्व्ह बँकेच्या धोरणाप्रमाणे एकल व्यक्ती कंपनीला अग्रक्रमी कर्ज मिळू शकते. (संदर्भ – RBI Master Circular No. Master Circular No. RBI/2013-14/ 107 RPCD.CO. Plan. BC9/04.09.01/2013-14 dated July 01, 2013)

कंपनी (निगमन नोंदणी) अधिनियम, 2013

  • एकल व्यक्ती कंपनीची स्थापना प्रवर्तक-मालक म्हणून सज्ञान प्रौढ व भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती करू शकते.
  • प्रवर्तक-मालक एका वेळी एकाच एकल व्यक्ती कंपनीचा प्रवर्तक-मालक असू शकतो.
  • एकल व्यक्ती कंपनीचे भांडवल नगण्य असू शकते; पण ते रुपये 50 लाखांपेक्षा जास्त असू नये.
  • एकल व्यक्ती कंपनीचे भागभांडवल रुपये 50 लाख अथवा वार्षिक उत्पन्न 2 कोटी रुपये झाल्यास सदर कंपनीचे रूपांतरण खासगी अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये करणे आवश्यक.
  • प्रवर्तक-मालकाने एक सज्ञान व प्रौढ वारस नेमणे आवश्यक. सदर वारस, प्रवर्तक-मालकाच्या पश्चात स्वतः प्रवर्तक-मालक बनतो. सदर वारस बदलता येऊ शकतो अथवा वारस स्वखुशीने राजीनामादेखील देऊ शकतो. त्या परिस्थितीत दुसरा वारस नेमणे अत्यावश्यक.
  • एकल व्यक्ती कंपनीच्या संचालकपदी एक अथवा एकापेक्षा जास्त संचालक असू शकतात.
  • चालू उद्योग अथवा व्यवसाय, एकल व्यक्ती कंपनीमध्ये सहजपणे हस्तांतरित होऊ शकतो.
  • एका वित्तीय वर्षात संचालक मंडळाच्या केवळ दोन बैठका घेणे आवश्यक.
  • एकल व्यक्ती कंपनीच्या वार्षिक ताळेबंदावर फक्त एका संचालकाच्या सहीची गरज.
  • एकल व्यक्ती कंपनीला वार्षिक ताळेबंद आणि वार्षिक माहिती अहवाल रजिस्ट्रार ऑफ कंपनीमध्ये जमा करणे आवश्यक.
  • एकल व्यक्ती कंपनीच्या नावासमोर (One Person Company) असे लिहिणे आवश्यक.

साधारण रुपये 1 लाख भागभांडवल असलेल्या एकल व्यक्ती कंपनी स्थापनेस अंदाजे रुपये 15,000 खर्च येतो व वार्षिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्यास अंदाजे रुपये 20,000 खर्च येऊ शकतो.

एकल व्यक्ती कंपनी ही लघु, अति लघु आणि लघुतम (Small, Medium and Micro Enterprises) क्षेत्रातील उद्योग/व्यवसायधारकांसाठी सुवर्णसंधी आहे, जेणेकरून उद्योजक व व्यावसायिक, एका कंपनीला मिळणारे फायदे आणि तेदेखील अत्यंत वाजवी किमतीत मिळवू शकतात.

– राहुल सहस्रबुद्धे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?