बिझनेस करायचा म्हणजे नेमकं काय करायचं?

बिझनेस म्हणजेच व्यवसाय करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, हेच अनेकांना कळलेलं नसतं म्हणून ते म्हणायला बिझनेस तर करत असतात, पण बिझनेस काही होत नसतो.

प्रत्येक उद्योजक व्यवसाय करतो म्हणजे समोर येणारे टास्क पूर्ण करत असतो किंवा नोकरदार व्यक्तीप्रमाणे स्वतःचं एक schedule तयार करून ते पाळत असतो. हाच दिनक्रम, नित्यक्रम रोज रोज चालू ठेवला म्हणजे त्याला वाटतं की तो बिझनेस करतोय.

उद्योजकाने व्यवसायात त्याच्या अनुभवानुसार काही प्रोसेस सेट केलेल्या असतात. त्या प्रोसेस फॉलो केल्या की ठराविक व्यवसाय होतो. हे योग्यच आहे, पण याला खऱ्या अर्थाने बिझनेस किंवा व्यवसाय करणं म्हणता येणार नाही.

बिझनेस करायचा म्हणजे त्यात केलेल्या कामाचं आकलन, नवनवीन संधींचा, मार्केटचा शोध, नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस डेव्हलपमेंट; सतत वाढती कमान असणारे विक्रीचे वाढते आकडे या गोष्टी असायला हव्यात. नुसती विक्री वाढून चालणार नाही, तर त्याचसोबत नफाही वाढता असला पाहिजे.

एकीकडे विक्रीत वाढ होतेय आणि दुसरीकडे नफा न वाढता तोटा वाढत जात असेल तर तुमचा व्यवसाय डबघाईला जातोय आणि तो भविष्यात बंद पडणार आहे हे लक्षात ठेवा.

ग्रोथ आणि तोटा याच्या या गणिताला तंत्रस्नेही स्टार्टअप हे अपवाद असू शकतात, कारण त्यांचा सगळा खेळ हा प्रॉफिटचा नसून व्हॅल्युएशनचा असतो.

तुम्ही पारंपरिक व्यवसाय करत असाल तर विक्री वाढवत नेण आणि त्याचसोबत नफाही वाढवणं यावरच लक्ष्य केंद्रित करा.

तुमच्या ध्येयाशी टीमला एकरूप करा

व्यवसायामध्ये मीटिंग, चर्चा, टार्गेट ठरवणं आणि त्यांचा आढावा घेणं याला खूप महत्त्व आहे. तुमची मीटिंग ही मुद्देसूद आणि स्पष्ट धोरणांनुसार व्हायला हवी. वेगवेगळ्या गटांसोबत मीटिंग व्हायला हवी. त्यातून तुम्हाला तुमच्याच व्यवसायातले अनेक पैलू लक्षात येतील आणि त्याचा व्यवसायवाढीसाठी लाभ होईल.

जसे की भागीदारांसोबत मीटिंग, सहकाऱ्यांसह मीटिंग, विक्री टीमसोबत मीटिंग, प्रॉडक्शन्स टीमसोबत मीटिंग अशा वेगवेगळ्या गटांसोबत तुमची चर्चा व्हायला हवी.

तुम्ही कंपनीचं, तुमचं काही ध्येय, विकासाचा आराखडा निश्चित केलेला असायला हवा. हे ध्येय वर्ष, महिना, आठवडा असा तुकड्या तुकड्यात विभागायला हवं.

वेगवेगळ्या गटांशी जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा त्यांनाही कंपनीच्या ध्येयाची कल्पना द्या. त्यांनाही त्यात सामावून घ्या. त्यांना त्यांचा रोल किंवा त्यांच्याकडून असलेल्या टार्गेटची कल्पना द्या.

अशाने तुमचा व्यवसाय फक्त तुमचा न राहता संपूर्ण टीमचा होईल आणि सर्वांच्या प्रयत्नाने ध्येयसिद्धी शक्य होईल. व्यवसायात रिव्ह्यूला खूप महत्त्व आहे. झालेल्या गोष्टींचा आढावा घ्या.

उद्योजक म्हणून तुमच्या पातळीवर हा आढावा घ्याच, पण नंतर वेगवेगळ्या टीमसोबतही घ्या. अशाने आपण कुठे कमी पडतोय. काय चुकतंय हे लक्षात येईल. त्यात सुधारणा करता येईल आणि तुमची टार्गेट्स अधिक रिअलिस्टिक होतील.

नवीन मार्केटचा शोध

तुम्ही जो व्यवसाय करताय त्यासाठी तुम्ही एक मार्केट निश्चित केलेलं असेल. हे मार्केट म्हणजे भौगोलिक सीमा, ग्राहक वर्ग, स्त्री-पुरुष, आयुमर्यादा इत्यादी. तुम्हाला तुमचं मार्केट वाढवत न्यायला हवं.

जसं की समजा तुम्ही लहान मुलांसाठी प्रॉडक्ट तयार करत असाल तर हळूहळू किशोरवयीन मुलांसाठीही प्रॉडक्ट डेव्हलप करायला हवीत. एखाद्या जिल्ह्यापुरता तुमचा सप्लाय असेल तर सोबत एकेक करत जिल्हे वाढवायला हवेत.

असा मार्केटचा विस्तार केला तरच बिझनेस वाढणार आहे आणि बिझनेस वाढतोय म्हणजेच तुम्ही बिझनेस करताय. ठेविले अनंते तैसेचि रहावे या उक्तीप्रमाणे तुमची वागणूक असेल तर तुम्ही तुमच्याच व्यवसायातले नोकर आहात आणि तुम्ही ठरवून घेतलेल्या प्रोसेस या तुमच्या बॉस आहेत.

Author

  • हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?