बेरोजगारीच्या निर्मूलनासाठी उद्योजकता विकास सर्वात महत्त्वाचा

अर्थव्यवस्थेत खरेदी-विक्री करता येईल अशा उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करतानाच त्यासंबंधीच्या सेवा देणं या गोष्टींचा समावेश उद्योग संकल्पनेत होतो. म्हणजेच समाजाच्या आवश्यक गरजांची पुर्तता करणार्‍या वस्तूंची निर्मिती म्हणजेच उत्पादन तयार करणं, ते उत्पादन विकणं आणि त्यासंबंधी सेवा पुरवणं म्हणजेच उद्योग होय.

लोकांचे जीवनमान सुधारत आवश्यक गोष्टींचा समावेश करत लोकांचं जीवन सहज करणं हा कुठल्याही उद्योगाचा हेतू असतो. उदा. औषधनिर्मिती उद्योग, खाद्यपदार्थनिर्मिती , अन्नधान्य पुरवठा, कापडनिर्मिती इ.

उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादन आणि सेवांचा गरजूपर्यंत पुरवठा करणारी व्यवस्था म्हणजे व्यवसाय. व्यवसाय हा उद्योग आणि समाज यांच्या मधला दुवा म्हणून काम करतो. नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी संबंध निर्माण करत संपत्ती मिळवण्याच्या उद्देशाने सर्व क्रिया व्यवसाय संकल्पनेत येतात.

केवळ संपत्ती मिळवणं हेच व्यवसायाचे एकमेव उद्दिष्ट नसते तर सामाजिक गरजांची पूर्तता करून वस्तू किंवा सेवा यांची देवाणघेवाण करत परस्परहित साधणे हे दूरगामी उद्दिष्ट व्यवसायाच्या माध्यमातून साध्य केले जाते.

सतत वाढत जाणार्‍या मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी अखंडित आणि सदैव पुनरावृत्ती होणार्‍या देवाणघेवाण क्रियांचा समावेश व्यवसाय संकल्पनेत होतो. सोळाव्या शतकातील युरोपातील व्यापारी क्रांती ही एकोणिसाव्या शतकातील आधुनिक औद्योगिक क्रांतीचं उगमस्थान मानता येईल.

केवळ पैसा मिळवणे हे व्यवसायाचे उद्दिष्ट नसून उपयोगासाठी तयार उत्पादनांनाचा विनियोग करणे हा हेतू साध्य केला जातो. व्यवसायात नैसर्गिक साधनसामुग्रीवर प्रक्रिया करून वस्तू वा उत्पादन तयार करणे मनुष्यबळ आणि यंत्रांच्या सहाय्याने आवश्यक उत्पादन घेणे, साठवण करणे, योग्य जागी पुरवठा करणे इ. व्यापक स्वरूपाच्या क्रिया व्यवसाय संकल्पनेत समाविष्ट आहेत.

उद्योजकता या क्षेत्राची व्याप्ती नवीन उद्योगाच्या निर्मितीपुरतीच मर्यादित नाही, हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. उद्योग, व्यवसाय करणारी एखादी व्यक्ती केवळ वैयक्तिक जोखीम घेऊन स्वतःचीच प्रगती साधत नाही तर अर्थव्यवस्थेलादेखील यथोचित हातभार लावतो आहे.

नजिकच्या काळात उत्तमोत्तम सर्जनशील कल्पनांना जन्म देणार्‍या उद्योजकीय दृष्टिकोनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये या दृष्टिकोनाला आकार दिला जात आहे. उद्योजकीय कौशल्य विकसित करणे हे बेरोजगारीच्या निर्मूलनाचे सर्वोच्च तंत्र असल्याचे सिद्ध झाले आहे.

आजकालचं जग हे स्पर्धेचं आणि नावीन्यतेचं आहे. उद्योग व्यवसाय करताना मार्केटपेक्षा वेगळं देणाऱ्याचीच चलती आहे. उद्योग व्यावसायिक क्षेत्रांत मागील आठ-दहा वर्षांपासून एक नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्येक उद्योग व्यवसाय करू इच्छिणार्‍याला आकर्षित करत आहे.

दहा वर्षापूर्वी दिल्ली बंगळुरूपर्यंत मर्यादित असणारा स्टार्टअप शब्द आज गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील मागास खेडेगावातदेखील सहज चर्चिला जातो; पण आपल्याला ही मूळ संकल्पना खरंच माहीत आहे का? की गावात एखादं किराणा दुकान, पंक्चरचं दुकान किंवा रसवंती सुरू झालं म्हणजे स्टार्टअप्स सुरू झाले का? कुठलाही व्यवसाय सुरू करणं म्हणजे स्टार्टअप आहे का?

स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. आधीच मार्केटमध्ये असलेला म्हणजे तुम्ही विकणार आहात ते उत्पादन किंवा सेवा जर आधीच मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्ही तोच व्यवसाय करत असाल तर त़ो पारंपरिक व्यवसाय झाला. उदा. किराणा दुकान, चहाची टपरी किंवा पंक्चरचं दुकान इ.

स्टार्टअप ही संकल्पना नावीन्याशी जोडलेली आहे. व्यावसायिक संकल्पना एकदमच नवीन असेल म्हणजे तुमच्या व्यावसायिक मार्केटमध्ये कोणाचाच तो व्यवसाय नाही किंवा उपलब्ध व्यवसायात नावीन्यता आणून लोकांच्या समाजाच्या अडचणी सोडवणारी संकल्पना म्हणजे स्टार्टअप.

थोडक्यात उत्पादन-सेवा यासंदर्भात नवीन संकल्पना घेऊन येणारे नवउद्यमी किंवा प्रचलित सेवा उत्पादने वेगळ्या पद्धतीने ग्राहकांसमोर मांडणे म्हणजे स्टार्टअप.

आपल्या दैनंदिन आयुष्यातील एखादा ज्वलंत प्रश्न किंवा अडचण कायदेशीर मार्गाने सोडवून आपलं आयुष्य सुकर आणि सुखकर करणारी ज्यातून आर्थिक उत्पन्न मिळते अशी तंत्रज्ञानाचा वापर करणारी व्यावसायिक संकल्पना म्हणजे स्टार्टअप.

व्यवसायच का?

प्रत्येक उद्योजकाची त्याने किंवा तिने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय का घेतला याबद्दलची एक वेगळीच कथा असते. काहींना पहिल्या दिवसापासूनच माहीत असतं की त्यांना स्वतःसाठी काम करायचे आहे आणि इतर कोणासाठी काम करतानाच ते व्यवसायाची संकल्पना घेऊन येतात आणि उद्योजकतेची झेप घेण्याचे ठरवतात.

बहुतेक व्यावसायिक एका गोष्टीवर सहमत होतील, उद्योजक असणे उत्तमच आहे याची अनंत कारणेदेखील आहेत आणि प्रत्येक उद्योजकाची स्वतःची वैयक्तिक कारणेदेखील असतात. त्यापैकी काही कारणांची मिमांसा खालीलप्रमाणे करता येईल :

१) तुमच्या नशिबावर तुमचे पूर्ण नियंत्रण असते.
२) उद्योजक नवनिर्मिती करणारे असतात.
३) एक कुटुंब म्हणून उद्योगसंस्था उभा राहते.
४) तुमच्या ब्रँडचे प्रतिनिधित्व कोण करते हे तुम्ही नियंत्रित करता.
५) आयुष्य बदलण्याची संधी तुमचा व्यवसायच तुम्हाला उपलब्ध करुन देतो.
६) तुमच्या कार्यक्षेत्रावर तुमचे पूर्ण नियंत्रण असते.
७) स्वातंत्र्य – तुमचा व्यवसाय तुम्हाला विचार करण्याचे , केलेला विचार अमलात आणण्याचे , कामाच्या पद्धतीचे , निर्णयाचे , वेळेचे , सहकारी निवडण्याचे, ध्येयनिश्चीतीचे अमर्याद संधींचे स्वातंत्र्य बहाल करते.
८) कमाईच्या अमर्याद संधी

ग्रामीण भागातील उद्योजकीय संधी

ग्रामीण भागात उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. स्टार्टअप इंडिया नोंदणीकृत स्टार्टअप्सपैकी ४५ टक्के स्टार्टअप्स ग्रामीण भागातील असून यांच्या व्यावसायिक संकल्पनादेखील ग्रामीण भागातील अडचणी सोडवण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देतात.

यावरून आपल्या लक्षात येईल की ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण लोकसंख्या अस्तित्वात आहे गरज आहे फक्त योग्य दिशा देण्याची.

बहुसंख्य मनुष्यबळाची उपलब्धता, नैसर्गिक साधनसंपत्तीची सहज उपलब्धता, उद्योगासाठी आवश्यक जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे या गोष्टींमुळे ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय यशस्वी होतात. या सर्व प्रवासात प्रश्न पडतो आम्ही उद्योग व्यवसाय निवडावा कोणता?

ग्रामीण भागात उद्योजकता क्षेत्राचा विचार करताना उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करणे कधीही फायदेशीर ठरते. यातील वेगवेगळे पर्याय विचारात घेतले तर शेतीमाल प्रक्रिया उद्योग सध्याच्या काळात फायदेशीर ठरतो आहे.

शेतीमाल प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी

योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड दिली तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. शेतीवरील उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल तर शेतकऱ्यांना शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे.

भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेऊन वैयक्तिक पातळीवर किंवा शेतकरी गट स्थापन करून शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि मालाचं नुकसान टाळण्यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योग परिपूर्ण पर्याय ठरू शकतो. ग्रामीण भागातील खरेदी शक्तीचा अंदाज आल्यानेच मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्या ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून उत्पादने तयार करत आहेत आणि तिथेच विक्री करत आहेत.

या दृष्टीनेदेखील ग्रामीण उद्योजकांना स्पर्धेचा सामना करावा लागत आहे; शेवटी मुक्त बाजारपेठ असल्याने ज्याचं उत्पादन चांगलं त्याचीच विक्री हे सूत्र असल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादन किंवा सेवा दिली तर निश्चितच ग्रामीण उद्योजकतेला उज्वल भविष्य आहे.

लेखाचा समारोप करताना वैयक्तिक अनुभव तुमच्याशी सामायिक करावेसे वाटतात, भौगोलिक स्थान हे उद्योजकीय दृष्टिकोनाला मारक कधीच ठरत नाही. याउलट काय विकायचं, कुठं विकायचं आणि कसं विकायचं या प्रश्नांची उत्तरे मिळाली की आपल्या भागात कोणता व्यवसाय चालू शकतो याचं उत्तर आपोआप मिळतं.

– विजय पवार
9130042020
(लेखक ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow