मानवाच्या विकासामध्ये वाहनांचा खूप मोठा वाटा आहे. मानवाने दगडी चाकाच्या शोधापासून आज इलेक्ट्रिक वाहने बनवण्यापर्यंत मजल मारली आहे, परंतु वाहन उद्योगाला वेगळा अर्थ तेव्हा प्राप्त झाला जेव्हा वाहनांमध्ये मोटर वापरण्यास सुरुवात झाली.
खनिज तेलाच्या (पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू) वापराने वाहन उद्योगाला चालना मिळाली आणि त्यातूनच नवनवीन उद्योग आणि नोकरीच्या संधी जन्माला आल्या.
१८८६ मध्ये पहिली मोटर कार रस्त्यावर धावली आणि त्याला आता दीडशे वर्ष होऊन गेलीत. या काळामध्ये बर्याच उद्योगसंधी उपलब्ध झाल्या. आज पूर्ण जगभरात साधारण दीड अब्ज वाहने धावत आहेत.
या काळात बरेच संशोधन झाले असले तरी वाहनांची मूळ रचना तीच होती, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा ज्या वेगाने वाढतो आहे ते पाहता येणार्या काळात डिझेल, पेट्रोलवर चालणारी वाहने इतिहासजमा होतील, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
इलेक्ट्रिक वाहन आणि पारंपरिक वाहन यांच्या मूळ रचनेमध्ये खूप वेगळेपण आहे. याच उद्योगाच्या बदलत्या रूपामुळे अनेक नवनवीन उद्योग तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत, याचा आजच्या तरुण पिढीने लाभ घ्यायला हवा.
वाहननिर्मिती क्षेत्रात तर नवीन संधी आहेतच, पण त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांत सर्वात महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे उच्च क्षमता असणार्या बॅटरीजच्या उद्योगातही खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.
उच्च क्षमता असणार्या बॅटरीज हे एक नवीन उभरणारं उद्योग क्षेत्र आहे. याचसोबत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स ही येणार्या काळात वाहन उद्योगाची महत्त्वाची गरज असणार आहे.
या क्षेत्रामध्ये तरुणांना करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि म्हणूनच आजच्या तरुणांनी या क्षेत्राकडे एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे.
– सचिन कदम
संपर्क : 8668259434
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.