Advertisement
स्वागत कक्षात नोकरी ते हाउसकीपिंग कंपनीचा मालक
कथा उद्योजकांच्या

स्वागत कक्षात नोकरी ते हाउसकीपिंग कंपनीचा मालक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळवरील घामात भविष्य शोधण्यासाठी उद्योजक चैतन्य इंगळे पाटील यांचा प्रवास सांगली ते पुणे व्हाया स्वागत कक्ष ते हाउसकीपिंग कंपनीचा मालक असा झाला.

चैतन्य यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात ग्रामीण भागात झाला. वडील शिक्षक असल्यामुळे बालपण कडक शिस्तीत गेले. माध्यमिक शिक्षणात प्रचंड हुशार पण उच्च माध्यमिक शिक्षणात सतत अपयश पदरी आले. बारावी अनुत्तीर्ण. दुसर्‍या वेळी प्रयत्न करून कसेबसे बारावी उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर कसाबसा पदवीला प्रवेश मिळाला. पदवीला प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यास तीन वर्षे गेली. तिथेही अपयश. तब्बल सहा वर्षांच्या अथक कष्टाने वनस्पतीशास्त्र विषयात पदवी संपादन केली.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

या सर्व प्रवासात कुटुंबियांना मुलाच्या भविष्याची चिंता सतावत होती. त्यातच चैतन्य यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड असल्याने त्या चिंतेत अजून भर पडत गेली. आणि त्यामुळे वडिलांच्या इच्छेखातर एन एस कायदा महाविद्यालय, सांगली येथे वकिली शिक्षणासाठी प्रवेश घेतला, पण चैतन्य यांचे तिथेही मन रमले नाही.

मनात सतत दडपण, न्यूनगंड व त्याबरोबर सर्व अपयश धुवून काढण्यासाठी जगापेक्षा वेगळे काहीतरी केले पाहिजे असे सतत सतावत होते आणि त्याच कारणामुळे पठ्ठ्याने कोल्हापूर-पुणे रेल्वे पकडली आणि पुण्याचा प्रवास चालू झाला. पुण्यात आल्यावर स्पर्धा परीक्षांचे वर्ग जॉईन केले. ते करता करता यशदा पुणे येथे कंत्राटी पद्धतीने स्वागत कक्षात नोकरी पकडली.

स्पर्धा परिक्षेची प्रचंड मेहनत घेऊन तयारी केली, पण तिथेही सरकारी अनास्थेचा फटका बसला आणि परत अपयश पदरी पडले. अशा प्रकारे अकरावीपासून चालू झालेली अपयशाची मालिका हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबच होत होती.

थोडा विचार केला आणि असे ठरवले की आता जिथेपण जाऊ तिथे सर्वोच्च ज्ञान आत्मसात करू आणि त्याच विचाराने प्रेरित होऊन यशदा येथे कंत्राटी पद्धतीत काम करत होतो तिथेच स्वच्छता विभाग, केटरिंग विभाग, मेंटेनन्स विभाग अशा सर्व विभागातील ज्ञान आत्मसात केले. हे करताना अठरा तास काम केले, कारण आयुष्यात काही तरी वेगळे करायचे या एकाच गोष्टीने झपाटले होते.

आतापर्यंत जे पण अपयश पदरी पडले आणि त्यामुळे घरच्या लोकांना अनेक वेळा अपमान सहन करावे लागले याची साल कुठे तरी मनात कायम होती. हे सर्व करत असताना केटरिंग डिप्लोमा, एम.ए. असे शिक्षण चालू ठेवले. कारण शिक्षण तुमच्या आयुष्यात कधीही वाया जाणार नाही हा मंत्र वडिलांकडूनच मिळाला होता.

एकदा एका वरिष्ठ पर्यवेक्षकाने काही चूक नसताना कामावर चुकीची भाषा वापरली. चैतन्यने पुढच्या पाच मिनिटांत नोकरीचा राजीनामा दिला. स्वभिमानापोटी दिलेल्या राजीनाम्याने सांगलीसारख्या राजकीयदृष्ट्या पुढारलेल्या, परंतु औद्योगिकदृष्ट्या मागास भागातून आलेल्या या मराठमोळ्या तरुणाने ‘वर्धंस ग्रुप’ या कंपनीची बीजे पेरली.

राजीनामा दिला त्यावेळी घरच्यांना जेव्हा या गोष्टीची कुणकुण लागली तेव्हा घरचे प्रचंड चिंतीत झाले व परत त्यांना वाटू लागले की आता हे महाशय काय करणार. “मी जे करेन ते कुटुंबासाठी मान ताठ करणारेच असेल”, हा विश्वास दिल्यावर काही दिवसांनी चैतन्य घरच्यांचा पाठींबा मिळवण्यात यशस्वी झाले. तसेच दुसर्‍याची सरदारकी करण्यापेक्षा छोटे का असेना पण स्वत:चे स्वराज्य असावे असा विश्वास वडिलांनी दिला. वडील कधीही समोर बोलत नसत पण हा मुलगा जे पण करेल ते आमची मान गर्वाने ताठ होईल असेच करेल असे खासगीत बोलत असत. दुर्दैवाने चैतन्यच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काही महिन्यातच वडिलांचे अकाली निधन झाले.

घरच्यांना दिलेला शब्द, वाढते वय, सोडलेली नोकरी आणि खिशात काही नाही, पण आकाशाला गवसणी घालण्याची ताकद असलेले हे व्यक्तिमत्त्व. समोर गडद अंधार व आता नेमकी सुरुवात कशी करायची हा यक्ष प्रश्न. पण खचून न जाता स्वत: बादली, खराटा झाडू, फिनेल घेऊन लोकांची घर साफ करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला काही लोक, नातेवाईक, मित्र या व्यवसायाची थट्टा करायचे. त्या वेळेस त्यांना वडिलांचे ‘यदी लोग आपके लक्ष्य पर हस नही रहे है, तो समझो आपका लक्ष बहुत छोटा है, लेकीन लोग आप के लक्ष्य पर हस रहे है तो समझो आप बहुत बडा काम कर रहे हो।’, हे शब्द सतत मेंदूत गस्त घालत असत.

अनेक ग्राहक मिळत गेले आणि कंपनीची यशस्वी घौडदौड चालू झाली. हे सर्व सुरळीत चालू असताना आरोग्याच्या खूप कठीण समस्या २७ ऑक्टोबर २०१३ ला ऐन दिवाळीत झाल्या. मातापित्यांची कृपा, सर्व हितचिंतकांच्या सदिच्छेनी चैतन्य त्या धक्क्यातून बाहेर आले. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये शुद्धीत आल्यावर स्वत:च्या आत असणार्‍या खूप काही गोष्टींचा उलगडा झाला आणि समाजसेवेचे बीज त्या आयसीयूमधेच पेरले गेले. त्याच विचाराने प्रेरित होऊन समविचारी मित्रांना सोबत घेऊन ‘युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन’ या संघटनेच्या कामास सुरुवात केली.

‘सर्वास पोटास लावणे आहे’, या उक्तीनुसार साठ उद्योजक घडवले. आज ‘वर्धंस ग्रुप’मार्फत १,८०० पेक्षा जास्त लोक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय अस्थापनेमध्ये स्वच्छता, सुरक्षा सेवा देतात.

आपण आपले काम करताना आपल्या ग्राहकांना नेहमी नवनवीन देण्याचा चैतन्य यांचा प्रयत्न चालू असतो. त्याचमुळे लोकांची गरज ओळखून फेब्रुवारी २०१६ ला Dirt n Clean या कंपनीची स्थापना केली. या मार्फत होम क्लीनिंग सेवा दिल्या जातात. आज १८ हजारपेक्षाजास्त आनंदी ग्राहकांना सेवा दिल्या आहेत.

होम क्लिनिंग करत असताना ग्राहक पेस्ट कंट्रोल व इतर सेवाविषयी विचारणा करायचे आणि त्याच मागणीतून सर्व सुविधा एकाच छताखाली, घरबसल्या, फक्त एका क्लिकवर सर्वाना कशा मिळतील याचा विचार मनात घोळत राहिला आणि पुढे त्याच विचारातून मे २०१८ ला जन्म झालाDoorMojo चा. DoorMojo च्या माध्यमातून २८ मराठी उद्योजक घडवले गेलेत. पदार्पणातच DoorMojo ला innovetive concept म्हणून ‘अर्थसंकेत’कडून गौरवण्यात आले. येणार्‍या काळात DoorMojo चा विस्तार मुंबई, औरंगबाद, सातारा, सांगली या भागात करण्याचा मानस बोलून दाखवतात.

महाराष्ट्रातील तरुण तरुणींनी व्यवसाय करावा म्हणून चैतन्य इंगळे अनेक मोफत सेमिनार घेत असतात. फेसबुक, whatsapp च्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करतात. आतापर्यंत चैतन्य इंगळे यांनी महाराष्ट्रभर ३० हजारहून जास्त तरुणांना संबोधित केले आहे.

चैतन्य यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यात Innovative Networker Award by Business Network International (USA), मराठी युवा उद्योजक उद्योगिनी संस्था महाराष्ट्र यांचा ‘युवा उद्योजक पुरस्कार’, अर्थसंकेतचा २०१६ चा ‘उत्कृष्ट नवउद्योजक पुरस्कार’ यांना समावेश आहे. चैतन्य आपल्या सर्व यशाचे श्रेय त्यांचे माता पिता, बंधू, पत्नी व इतर कुटुंबीय, व्यावसायिक भागीदार उमेश, कार्यालयातीलमधील ऑफिस बॉयपासून डायरेक्टर, सर्व ग्राहक व सर्व मित्रमंडळी यांना देतात.

संपर्क : चैतन्य इंगळे
९८८१८३३२८६

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!