काळ बदलतोय; मराठी माणसाने उद्योगात यायलाच हवं!

उद्योग-व्यवसाय आणि मराठी माणूस म्हणजे न जुळणारं समीकरण, ही आपली धारणा होऊन बसली आहे. “आपण भले आणि आपली नोकरी भली”, ही आपल्या डोक्यात पक्की बसलेली मानसिकता. सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभराची पक्की भाकर, जी कधीच उपाशी ठेवणार नाही म्हणूनच आपण सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असतो.

हीच जागा आता खाजगी क्षेत्र घेत आहे, कारण खाजगी क्षेत्रात असणारा पगार हा मराठी माणसाला आकर्षित करतो आहे. त्यामुळे मराठी पाऊले उद्योग, व्यवसायाकडे फारशी वळताना दिसत नाहीत. उद्योग चालला तर बारा गाडे, नाही तर घर खाऊन चौकट गळ्यात, या जुन्या म्हणी आजही आपल्याला उद्योग, व्यवसायासाठी प्रतिबंध घालत आहेत.

मग या मानसिकतेत राहून मराठी माणसाने धंदा करायचाच नाही का? मुळात आपल्याला कोणतीच रिस्क घ्यायची नाही, हे आपण पिढ्यानपिढ्या ठरवून टाकले आहे.

लहान मुलाच्या हातात वीस रुपयाची नोट देऊन त्याला शेजारच्या दुकानातून चार अंडी जरी आणायची म्हटली तर आपण त्याच्याकडे पैसे देत नाही, कारण त्याच्याकडून अंडी फुटतील अशी भीती आपल्याला असते. पण जर या भीतीपोटी आपण त्याला व्यवहार शिकवणारच नसू तर त्याला व्यवहार कळणार तरी कसा?

काळ बदलतो आहे, सरकारी नोकरभरती कमी होऊन नोकर्‍यांचं खाजगीकरण होतं आहे, जुन्या पेन्शन योजना बंद झाल्या आहेत, खाजगी क्षेत्रातील नोकर्‍या आज आहेत तर उद्या नाहीत. मग जर या सगळ्यांमध्ये शाश्वत काहीच नसेल. मग मराठी माणसाने उद्योग व्यवसाय का करू नये?

आपल्या बापजादाद्यामंध्ये आजपर्यंत धंदा कुणीच केलेला नाही, त्यामुळे तो आपल्या रक्तात नाही, धंदा आपण शिकलो नाही. असे बरेच गैरसमज अजूनही आपल्या मनात कायम आहेत.

धंदा मुळात रक्तात नाही, तर विचारात असतो आणि तो विचार आपण आता स्वीकारला पाहिजे. आपल्यापैकी बरेच लोक हे पहिल्या पिढीतील उद्योजक आहोत. वारसाहक्काने आपल्याकडे शेती, घरदार, गाडी, बंगला या गोष्टी आल्या आहेत, पण वारसाहक्कात वडिलोपार्जित व्यवसाय आल्याच प्रमाण खूप कमी आहे.

असो हरकत नाही, पण जर येणार्‍या पुढच्या पिढीकडे जर वारसाहक्काने आपण एखादा व्यवसाय देऊ शकलो, तर याचं एक वेगळंच समाधान असेल. मुळात व्यवसायात आणि नोकरीत हाच तर फरक असतो.

नोकरी एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित करता येत नाही, पण उद्योग-व्यवसाय हस्तांतरित करता येतो. म्हणूनच आपल्याला व्यवसायाच्या दिशेने काही पाऊले उचलणे आज गरजेचे आहेत.

उद्योग-व्यवसाय करायचा म्हटलं की लगेच आपण शेठ झाल्याचा भास आपल्याला होतो. दुकानाच्या गल्ल्यापेक्षा आपल्या दुकानातल्या बरण्या जास्त वाजतात आणि मग आपण व्यवसायात शेठ म्हणूनच वावरत असतो. उद्योजकीय मानसिकतेतून हे सर्रास चुकीचे आहे. तुमच्यात उद्योजकीय माईन्डसेट असायला पाहिजे, पण फक्त शेटचा तोरा नसावा.

व्यवसायात तुम्ही चौकस असायला पाहिजे, तुमचा मार्केटचा अभ्यास पाहिजे. तुमचे मार्केटचे स्पर्धक तुम्हाला माहीत असायला हवेत. तुमचे ग्राहक, त्यांची मार्केट डिमांड याचा तुम्हाला अंदाज असला पाहिजे. बरेचदा व्यवसाय हा आपल्या ग्राहकांच्या नेटवर्कवर अवलंबून असतो.

म्हणून तुम्हाला आपले ग्राहक जोडण्यासोबतच ते टिकवता आले पाहिजेत आणि मुळात व्यवसायाचा पाया म्हणा अथवा मूळ हे पैसा असते. त्यामुळे व्यवसाय करतांना तुम्ही आर्थिक साक्षर असले पाहिजे.

तुमचे आर्थिक गणित जर चुकले तर तुमचा व्यवसाय अडचणीत यायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून मार्केटची उधारी, व्यवसायात येणारा पैसा, देयकाची देणी, बँकांचे व्याजदर, सावकारी व्याजाच्या पैशांची देणी, अशा अनेक बारीकसारीक गोष्टीचा विचार उद्योजकाचे केला पाहिजे.

आजूबाजूच्या काही बुडीत निघालेल्या व्यवसायाची उदाहरणे देत उद्योग-व्यवसायापासून दूर जाण्याची कारणे मराठी माणूस शोधत असतो, पण त्याच परिसरात यशस्वी व्यवसायाची यशोगाथा आपण का पाहत नाही याचे नेहमीच आश्चर्य वाटते.

त्या आपल्या परिसरातील यशस्वी उद्योजकांना आपण कधीतरी भेटलं पाहिजे, त्यांचे व्यवसायातील अनुभव जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेलच आणि आपल्याला व्यवसायाची नवीन प्रेरणा मिळेल.

उद्योग म्हटलं की प्रथमदर्शनी आपल्यासमोर येथे कारखानदारी, भली मोठी कंपनी आणि एम.आय.डी.सी.मधील कानाचे पडदे फाडणारा कर्कश आवाज, पण मुळात एकविसाव्या शतकात उद्योग, व्यवसायाची व्याख्या आणि संकल्पना पूर्णपणे बदलली आहे.

याची अनेक उदाहरणे आहेत, प्रॉडक्टसोबतच आता सर्व्हिस इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. याचसोबत ट्रेडिंग सेक्टर देशविदेश स्तरावर यशस्वीपणे काम करते आहे. हे आपण मराठी उद्योजकाने अभ्यासणे गरजेचे आहे. रुपयासोबतच आपली कमाई आपण डॉलरमध्ये का करू नये, याचा विचार व्हायला हवा.

मराठी माणसाच्या घरात जर एकादा मुलगा, मुलगी दहावी पास झाली की आपण सायन्सला पाठवण्याच्या तयारीत असतो. कारण डॉक्टर, इंजिनिअर आपल्या डोक्यात पक्के बसले आहे आणि बाकी आर्ट्सही आपली उरलीसुरलेली हक्काची शाखा. पण त्या मुलाला आपण कॉमर्सचे शिक्षण देऊन व्यवसायसाक्षर का करत नाही, हे अजून न उमगलेले कोडे आहे. जर शिक्षणासाठी आपण कॉमर्सचा विचार केला तरी त्यात असणार्‍या नोकर्‍या आपण शोधत असतो.

एम.बी.ए. झालेली आपली मराठी मुले शिक्षण पूर्ण करून व्यवसाय-उद्योगात आपले नशीब न अजमावता नोकरीच्या शर्यतीत उभे आहेत. ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. याला शिक्षण व्यवस्थासुद्धा याला जबाबदार आहे असं म्हणावे लागेल. व्यावसायीक अभ्यासक्रमात मुलांना व्यवसायापेक्षा नोकरीचे बीज पेरले जाते आणि हे आता बदलले पाहिजे.

जर मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग कॉलेजच्या रेप्युटेशनच्या याद्या जरी तुम्ही चाळल्या तर त्यात नोकरीमध्ये अमक्या-अमक्या कंपनीत अमक्या-अमक्या पॅकेजच्या पगाराच्या नोकरीत काम करणारे विद्यार्थी दाखवल्या जातात.

जर कोणी एखादा स्टार्टअप सुरू केला, तर त्याचा कुठेच नामोल्लेख नसतो. तर मुळात ही मानसिकता शाळा कॉलेजमध्येसुद्धा बदलणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे कॉलेजला प्लेसमेंट सेलचे डिपार्टमेंट असते असेच उद्योजकीय डिपार्टमेंट का असू नये?

– निलेश देशमुख
संपर्क : 9689395123
(लेखक व्यवसाय सल्लागार आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?